पावसाळ्यात पाऊस येतो तो मात्र अगदी राजेशाही थाटात आणि गाजत वाजत, दवंडी पिटत (म्हणजेच ढगांच्या गडगडतात व विजा चमकत). पहिला पाऊस सर्वानाच भिजवून जातो (कुणाकडेच छत्री नसते ना तेव्हा!) आणि वाटते कसला हा पाऊस, न बोलावता आला. पण हाच पाऊस आणतो मातीचा दरवळणारा सुगंध जो एक प्रकारचा दिलासा देऊन जातो. काही जणांच्या मते पाऊस हा केवळ आजारपणाला निमंत्रण देणारा, रस्ते तुंबवणारा आणि मुंबईसारख्या शहरात वाहतूक व म्हणूनच जनजीवन विस्कळीत करणारा काळ आहे. ही झाली निराशावादी बाजू.
पण याहीपेक्षा पावसाळा सर्वानाच दिलासा देणारा असतो. मातीचा दरवळणारा सुगंध तर आहेच, त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी फारच महत्त्वाचा आहे. पाऊस कसा, कुठे आणि किती पडतो यावरच धान्य, भाजीपाला उपलब्ध होईल किंवा नाही हे अवलंबून असते. पाऊस वेळच्या वेळी आणि योग्य ठिकाणी पडला तर कशातच कमतरता भासत नाही व शेतकऱ्यांच्या पोटापाण्याची सोय होते. तसेच पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असते, अगदी डोंगर-दऱ्याच नाही तर सारी धरित्रीच हिरवं लेणं ल्यालेली असते. जणू काही हिरवे कपडे आणि हिरवे दागिने घालून नटलेली, सजलेली एखादी नववधू जणू. सर्वत्र पसरलेल्या हिरवळीमुळे सुखद वाटतं. मुलांसाठी तर धम्मालच असते. पहिल्या पावसात चिंब भिजत रस्त्यावर, आजूबाजूला साठलेल्या डबक्यात कागदाच्या नावा सोडतात तेव्हा त्यांना कोण आनंद होतो. डोंगर-भटकंतीलादेखील याच काळात उधाण आलेलं असतं.
पावसाळ्यात आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर कुंद-धुंद वातावरणात भजी वा भाजलेलं कणीस खात, चहा पिण्याची मजा काही औरच असते. याच काव्यात्म वातावरणात प्रेम होण्याची शक्यता जास्त. म्हणूनच पावसाळ्यावर व पावसावर किती तरी गाणी रचली व गायली गेली आहेत.
महाकवी कालिदास यांनासुद्धा मेघदूतासारखं महाकाव्य सुचलं ते याच वातावरणात. पावसाळ्यातील ढगांचे वेगवेगळे आकार पाहिले की कल्पनाशक्ती चौफेर धावू लागते.
पावसानंतर मध्येच ऑक्टोबर महिना तुम्हाला पुन्हा काहीसा उन्हाच्या झळा देतो. त्यानंतर मात्र लपत छपत व हळुवार स्पर्श करीत येणारी गुलाबी थंडी आपणास एका वेगळ्याच विश्वात नेते. गुलाबी थंडी अशासाठी म्हणायचे की ही थंडी गुलाबाच्या पाकळ्यांसारखी हळुवार स्पर्श तर करतेच, पण त्याचबरोबर गुलाबातील काटय़ासारखी थोडीशी टोचतेदेखील. थंडी ही नवयौवना असते. पण तिचे जेव्हा गारठय़ात रूपांतर होते तेव्हा मात्र ती एखाद्या जख्खड म्हातारीसारखी वाटते (अर्थात सर्वच म्हातारी माणसे जख्खड नसतात, काही तर तरुणांनाही लाजवणारी असतात!).
याच काळात सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलेलं असतं, समोरचं काहीच दिसत नसतं. नाटय़गृहातील पडदा सरकावा तसं सोनेरी सूर्यकिरणांनी धुकं हळूहळू दूर होत आणि एक प्रसन्न सकाळ अवतरते. हाच काळ प्रेम दर्शवण्याचा, बहरण्याचा. सृष्टी नयनरम्य फुलांनी बहरते. त्यातल्या त्यात गुलाब जरा जास्तच.
गुलाबावरून आठवलं, गुलाब हे फूलं प्रेमाचं, मत्रीचं व शांततेचं प्रतीक म्हणून देण्यात येतं. गुलाब देण्याचा अर्थ केवळ असा की, गुलाब देणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सांगत असते की, ‘‘तुझ्या जीवनात गुलाबाच्या पाकळ्यांच्या स्पर्शासारखेच क्षण येऊ देईन, काटय़ासारखे टोचणारे क्षण कधी चुकून आलेच तर मी तुला त्या काटय़ांचा त्रास होऊ देणार नाही.
या सर्वाचा अर्थ इतकाच की उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो आपल्याला काही तरी एक शिकवण देऊन जातो. उन्हाळा आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून जग पाहायला लावतो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी एकरूप करतो व या दोन्हीची सांगड घालतो तो हिवाळा. म्हणूनच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही काळ मिळून आपल्याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परीस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती वा उमेद देतात व जीवनात चतन्य निर्माण करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा