महाकवी कालिदासाच्या साहित्यावर आजवर बरेच प्रयोग झाले. प्रयोगांसह अनेक शोधनिबंधही होऊन गेले. पण, आता त्याच्याच जीवनावर आधारित पहिलाच प्रयोग पाहायला मिळतो तो, ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ या नाटकातून.
पुरा कविना गणनाप्रसंगे कनिष्ठकाधिष्ठितकलिदासा
अद्यापि ततुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव
अनामिकेची अशी एक आख्यायिका आहे की पूर्वी श्रेष्ठ कवी कोण याची गणना होत असताना करांगुलीपासून सुरुवात करून पहिलं नाव कालिदासाचं. त्याच्या तोडीस तोड कुणीच कवी नाही (नव्हता) म्हणून त्याच्या नजीकच्या बोटाला अनामिका हे नाव पडलं.
कालिदासाची महती वर्णावी तेवढी थोडीच. संस्कृत कवींच्या काळाबद्दल, त्यांच्या नावाबद्दल नेहमीच कुतूहल राहिले आहे आणि त्याला हा कालिदासही अपवाद नाही. ‘कालि’मातेचा दास होऊन याने दोन महाकाव्य, एक स्फूट काव्य, एक खंडकाव्य, तीन नाटकं, या खेरीज अनेक चुटके, समस्यापूर्ती आणि दंतकथा इतका समृद्ध साहित्य खजिना आपल्या नावावर ठेवला. संत रामदासांच्या ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ उक्तीला सार्थ ठरणारं हे व्यक्तिमत्त्व. त्याच्या साहित्यावर बरेच प्रयोग झाले. असंख्य शोधनिबंध झाले (खरंतर त्याचे आता प्रबंध व्हायलाही काहीच हरकत नाही.) पण त्याचा जीवनपट उलगडून दाखवणारा एक पहिलाच प्रयोग झाला आणि तो म्हणजे ‘एका गुराख्याचे महाकाव्य’.
मयूर देवल लिखित, प्रसाद भिडे दिग्दर्शित आणि महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड प्रस्तुत ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ हे नाटक सध्या बरंच चर्चेत आहे. २०१२ मध्ये बावन्नाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाटय़ स्पर्धेत या नाटकाने आपल्या नावावर प्रथम पारितोषिकाची मोहोर उमटवली. केवळ नाटकच नाही तर दिग्दर्शन, रंगभूषा यांना प्रथम, अभिनयासाठीची तीन रौप्यपदके, प्रकाशयोजना, संगीत दिग्दर्शन, पाश्र्वसंगीत यांना द्वितीय आणि नेपथ्याला तृतीय अशी तब्बल १० पारितोषिके या नाटकाला मिळाली. राज्य नाटय़ स्पर्धेत यश मिळवून नाटक थांबलं नाही तर महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘मराठी नाटकासाठीचा सर्वोच्च सन्मान’ मानला जाणारा ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ही या नाटकाच्या लेखकांना या नाटकासाठी प्रदान करण्यात आला. झी गौरवची सहा नामाकनं या नाटकाला मिळाली. दामू केंकरे स्मृती नाटय़ महोत्सवात नाटकाला सादरीकरणासाठी खास निमंत्रण मिळालं. एवढं कमी म्हणून की काय ‘वॉशिंग्टन डिसी’च्या मराठी कला मंडळाच्या चाळिसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हे नाटक ‘वॉशिंग्टन डिसी’ मध्ये आमंत्रित झालं आणि ७ मे रोजी सादर झालं. याच बरोबर ८ मे रोजी ‘बाल्टिमोर मराठी मंडळातर्फे’ आणि १४ मेला कोलंबस इंडियाना येथे, अशा एकूण तीन प्रयोगांसाठी हे नाटक आमंत्रित झालं. हे तीनही प्रयोग नाटकातले अभिनयासाठी रौप्यपदक मिळालेले कलाकार (कालिदासाच्या भूमिकेत-आदित्य रानडे, राजकन्येच्या भूमिकेत-सुप्रिया शेटे आणि दाक्षिणात्य नर्तकीच्या भूमिकेत-तनया गोरे) आणि मराठी मंडळाचे कलाकार यांनी मिळून सादर केलं. सामान्य कलाकारांच्या कष्टाची ही पावतीच म्हणायला हवी.
नाटकाची बांधणी ही जुन्या नाटकाच्या फॉर्मची आठवण करून देणारी आहे. म्हणजे नाटकाची सुरुवात ही नांदीने होते. नांदीनंतर सूत्रधार प्रवेश करतो. ‘सूत्रं धारयति इति सूत्रधार:’ या उक्तीप्रमाणे तो संपूर्ण कथानकाला पुढे नेत नाटकाची सूत्र सांभाळतो. नाटकाचं कथानक अतिशय उत्तम रीतीने लेखकाने फुलवलं आहे आणि दिग्दर्शकानेही ते उत्तम प्रकारे हाताळलेलं आहे. नाटकाच्या बाबतीत शब्द लिहिणं हे लेखकाचं काम आणि ते जिवंत करणं हे दिग्दर्शकाचं आणि नटांचं काम आणि ते नाटकातल्या प्रत्येकाने केलंय असं मयूर देवल म्हणतात. एका गुराख्याचा ‘कालि’मातेच्या आशीर्वादामुळे महाकवी कालिदास झाला हे कथानक वेगवेगळ्या सीन्समध्ये गुंफण ही एक तारेवरची कसरत होती आणि ती सगळ्यांनी एकमेकांचा हात धरत मनावर घेतली आणि यशस्वीसुद्धा करून दाखवली. तसं बघायला गेलं तर विषय ऐतिहासिक आहे, पण तरीही बघताना कुठल्यातरी काळात माणूस हरवत नाही आताच्या काळाशीही नाटकाचा संबंध सहज जोडता येतो आणि म्हणूनच नाटकाला तरुण प्रेक्षकही मनापासून दाद देतो असं या नाटकात दाक्षिणात्य नर्तकीची भूमिका करणारी अभिनेत्री तनया गोरे म्हणते.
या नाटकातलं आकर्षण म्हणजे नाटकातील कलाकारांची वेशभूषा. नट आपल्याला अभिनयाने आपली भूमिका वठवतातच; पण रंगभूषाकार (सुभाष बिरजे) याने आपल्या कलेने ती भूमिका खऱ्या अर्थाने प्रत्येक कलाकारात ओतली आहे याचा प्रत्यत नाटक बघताना येतो. त्याची पावतीही त्यांना मिळालेली आहे. कालिदास कालिमातेची साधना करताना त्याच्यावर टाकलेला प्रकाश आणि त्यासोबत ऐकू येणारं संगीत अंगावर काटा आणतं. अर्थात नाटक ही कुण्या एका माणसाची कलाकृती नव्हेच; पण त्याचबरोबर सगळं एकत्र येऊन त्याचा काहीतरी अजब प्रकार न होता एक उत्तम कलाकृती तयार होणंही तितकंच महत्त्वाचं. संगीत, नृत्य, वेशभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्य हे असे सगळेच भाग एकत्र येऊन एका वेगळ्या साचात, ढंगात नावारूपाला आलेली ही कलाकृती.
भारतातून बरीच नाटके भारताबाहेर सादरीकरणासाठी जातात; पण बहुतांश वेळेला नाटकातील कलाकारांना नावलौकिक मिळालेला असतो. त्यांचे चेहेरे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले असतात. या नाटकाच्या बाबतीत तसं नाही. असं असतानाही सामान्य माणसांचं नाटक भारताबाहेरून आमंत्रित व्हावं यासारखा आनंद दुसरा नाही असंही लेखक मयूर देवल नाटकाबद्दल बोलताना सांगतात. ते पुढे म्हणतात, ‘नाटक लिहून झाल्यानंतर ते अनेक चांगल्या वाईट निकषातून बाहेर पडलं आणि शेवटी प्रसादने दिग्दर्शित करायची तयारी दाखवली. नाटक पाहताना त्यातलं प्रत्येक पात्र मला अपेक्षित होतं तसं आहेच; पण त्याहीपेक्षा ते रंगमंचावर आल्यानंतर माझ्याशी निखळ संवाद साधतं आणि म्हणून ते आपलंसं वाटतं. बरं यातला शेवट बघतानाही माणसाला यातलं जे हवं ते त्याने घेऊन जावं असं जाणवतं. नाटक स्वत:हून कुठलाच बोध देत नाही. बघणाऱ्याने तो आपणहून घेऊन जायचा आहे.’
कालिदासाची प्रतिभा जशी कस्तुरीच्या गंधासारखी सर्वत्र पसरली तसंच त्याची जीवनगाथा सांगणारं हे नाटक सातासमुद्रापार जाऊन एक अत्त्युच्च शिखर गाठण्याच्या प्रयत्नांत आहे. लेखक मयूर देवल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपल्या लिखाणातून कालिदासाचा जीवनपट जरी उलगडला असला तरीही ते आणि या नाटकाचा भाग असणारे सगळेच कालिदासाला अजून शोधताहेत आणि आणखीन ओळखण्याचा प्रयत्न करताहेत. प्रत्येक प्रयोगानिशी त्यांना नवीन कालिदास कळत जातोय आणि आपल्या रंगभूमीला तिच्यावर निस्सीम श्रद्धा असणारे नट नव्याने उलगडत जात आहेत. खऱ्या कष्टाला, खऱ्या कलेला कुठल्याच प्रकारचं ग्लॅमर लागत नाही लागतो तो फक्त रंगभूमीचा आशीर्वाद आणि कलेची उत्तम जाण असणारे रसिक मायबाप हे आपल्या कृतीतून पटवून देणारी नाटय़कृती म्हणजे ‘एका गुराख्याचे महाकाव्य.’ असं थोडक्यात म्हणता येईल.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com