मराठवाडा हा प्राचीन काळापासून संपन्न असा प्रदेश होता. सातवाहन, राष्ट्रकुट, यादव या बलाढय़ सत्ता इथे नांदल्या आणि त्या राजवटींच्या कालखंडात कलेला मोठय़ा प्रमाणात राजाश्रय मिळाला होता. शिल्पकला आणि मंदिर स्थापत्याच्या कला इथे बहरल्या होत्या. मराठवाडय़ामध्ये जेवढी शिल्पसमृद्ध मंदिरे आणि त्यावरील देखण्या मूर्ती पाहायला मिळतात तेवढय़ा महाराष्ट्रात इतर ठिकाणी एवढय़ा संख्येने पाहायला मिळत नाहीत. होट्टल, धर्मापुरी, पानगाव, निलंगा, औंढय़ा नागनाथ, धारासुर या आणि अशा अनेक ठिकाणी अत्यंत शिल्पजडित मंदिरे आणि त्यावरील वैविध्यपूर्ण मूर्ती हे मराठवाडय़ाचे खास वैशिष्टय़च म्हणावे लागे. या सर्व मंदिरांच्या पंक्तीमध्ये बसणारे अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे नांदेड तालुक्यातील मुखेड गावचे महादेव मंदिर. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मीळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृका. प्राचीन भारतीय समाजात मातृदेवतेची पूजा प्रचलित होतीच. अंधकासुर वधाच्या वेळी शिवाच्या मदतीसाठी काही देवांनी आपल्या शक्ती शिवाला साहाय्यासाठी उत्पन्न केल्या. त्या ब्राह्मणी, वाराही, कौमारी, इंद्राणी, माहेश्वरी, नारसिंही या नावांनी ओळखल्या जातात. या शक्तींनी मिळून शिवाला सहाय्य केले आणि दैत्याचा नायनाट केला अशा कथा पुराणांमधून येतात. या मातृकांना सप्तमातृका असे म्हटले जाते. शिल्पकारांना अर्थातच या सप्तमातृकांचे अंकन करण्याचा मोह झाला होताच. वेरुळच्या लेण्यामधून या सप्तमातृकांची अत्यंत ठसठशीत शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मंदिरांमध्ये एक सप्तमातृका पट पाहायला मिळतो. एका ओळीमध्ये बसलेल्या या मातृका आणि त्यांच्या पायाशी असलेली त्याची वाहने असे शिल्प अनेक ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मुखेडच्या महादेव मंदिराच्या बाह्यंगावर यातली प्रत्येक मातृका ही अत्यंत डौलदारपणे नृत्य करताना शिल्पित केलेली आहे. दुर्दैवाने यातील काही शिल्पांचे हात भंगलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या शरीराचा डौल अत्यंत आकर्षक दाखवला आहे. नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि लयबद्धता त्या मूíतकारांनी इतकी अचूक दाखवली आहे की प्रत्यक्ष नृत्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. त्या प्रत्येक मातृकांच्या पायाशी एक कमळाचे फूल असून त्यामध्ये त्यांचे वाहन शिल्पित केलेले दिसते. त्या वाहनावरून त्या मातृकांची ओळख पटते. नृत्यरत अवस्थेमधील या सप्तमातृकांच्या डोक्यावर मुकुट असून कानात कुंडले आहेत.

त्यांचे अधोवस्त्र मेखलेने बांधलेले असून वस्त्राचा सोगा दोन्ही पायामध्ये रुळताना दिसतो आहे. काही मातृकांच्या पायात तोडे आणि पंजण यासारखे अलंकारदेखील दिसतात. अत्यंत देखण्या, अतिशय प्रमाणबद्ध आणि नृत्यामध्ये रममाण झालेल्या अशा या सप्तमातृका मुखेडच्या महादेव मंदिरावर पाहायला मिळतात. अत्यंत दुर्मीळ असा हा शिल्पठेवा जपला गेला पाहिजे. जर तिथे पर्यटक, अभ्यासक मुद्दाम मोठय़ा संख्येने गेले आणि त्यांनी हा ठेवा पहिला तरच तो जपला जाईल. मुखेडचे हे मंदिर खरोखर अगदी निराळे असेच म्हणावे लागेल. याच मंदिरावर अजून एक दुर्मीळ शिल्प पाहायला मिळते आणि ते म्हणजे ज्येष्ठा अथवा अलक्ष्मीचे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले, पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केल्याची कथा आहे. दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील हिचे शिल्प अत्यंत देखणे आहे. इथे ही ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे तर एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातला असून तिच्या डाव्या खांद्यावरून लोंबणारी एक मुंडमाळा आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव हे दिसते आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे. ते पाहण्यासाठी तसेच नृत्यमग्न सप्तमातृकांचे दर्शन घेण्यासाठी मुखेडला आवर्जून गेले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा