नवरात्रीच्या काळात बरेच तरुण- तरुणी अनवाणी चालण्याचं व्रत करताना दिसतात. काय असते यामागची मानसिकता? त्याबद्दल मानसोपचार तज्ज्ञांचं मत काय आहे?
लहानपणापासूनच आपण सतत कोणाला ना कोणाला तरी घाबरत असतो. लहान असताना जेवलो नाही, वेळेवर झोपलो नाही तर बागुलबुवाची भीती असायची. थोडं मोठं होऊन शाळा-कॉलेजात गेल्यावर ‘अभ्यास’ नामक अनाकलनीय गोष्ट मनात दहशत निर्माण करत असते. ऑफिसमध्ये बॉस डोक्यावर बसलेला असतो आणि लग्न झाल्यावर तर नवरा-बायको एकमेकांएवढे जगात कोणालाच घाबरत नाहीत. विनोदाचा भाग सोडला तर मथितार्थ असा की, मनुष्यप्राणी कायम कोणत्या ना कोणत्या भीतीने, ताणाने पछाडलेला असतो. आपल्याला सतत काही ना काही हवं असतं. एखादी गोष्ट मिळाली म्हणून पूर्णत: समाधानी झालेली माणसं विरळच. हल्ली तर सुख आणि समाधान मिळवण्याची गरज वाढत असल्याचे दिसून येते. लहानपणी तहानभूक एवढीच गरज असलेले आपण आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत गरजांची एक लांबलचक यादीच बनवून टाकतो जिला मुळी अंतच नसतो. आयुष्यभर असा हा ‘अतृप्त आत्मा’ कायम आपल्या बरोबर असतो.
तरुणपणी या अतृप्तीमध्ये सर्वात जास्त वाढ होते. एकीकडे याच वयात डोळे किलकिले करून खरं जग बघायला नुकतीच सुरुवात झालेली असते आणि दुसरीकडे या जगाच्या अजब-गजब तऱ्हांनी बावचळायला होत असते. ‘अंगात धमक आहे, कसून मेहनत करण्याची अगदी पक्की तयारी आहे पण लक साथ देत नाहीये यार..’ मेहनत आणि दैव यांच्यामध्ये कुठेतरी अडकलेली ही तरुण पिढी. नशिबावर पूर्ण विसंबायला मन धजावत नाही आणि नशिबाकडे पूर्णपणे पाठ फिरवताही येत नाही. मग ‘सक्सेस मंत्रा’ म्हणजे फक्त मेहनत न राहता ‘मेहनत आणि नशीब’ असा बनतो. या नशिबाला खूश करण्यासाठी पर्यायाने देवाला प्रसन्न करण्यासाठी कळत-नकळतपणे बऱ्याच गोष्टी केल्या जातात.
नवरात्रीत किंवा एरव्हीही बरीचशी मुलं देवदर्शनासाठी काही ठरावीक दिवस अनवाणी चालत जातात. असं नित्यनेमाने करणाऱ्या तरुणांना हे करण्यामागचं प्रयोजन विचारले असता बहुतेकांनी ‘श्रद्धा’ असे उत्तर दिले. काहींच्या घरात ही पद्धत खूप आधीपासून सुरू असल्यामुळे त्यांना ते फार वेगळं काही करत आहेत असं वाटत नाही किंबहुना असं चालत जाणं त्यांच्यासाठी आता सवयीचा भाग झाला आहे. काहींनी तर असे अनवाणी देवदर्शनाला जाण्याला आपली शारीरिक क्षमता आणि सहनशीलता जोखण्याचे उत्तम परिमाणच घोषित करून टाकले. ‘माझ्या मित्राने/ मत्रिणीने असं केले आणि त्याला/ तिला याचा फायदा झाला म्हणून आता मीपण करतोय/ करतेय.’ असे म्हणणारेही कमी नाहीत. प्रत्येकाची कारणं वेगळी, हेतू वेगळे पण पद्धत मात्र एकच. जणू वेगवेगळ्या प्रश्नांची उकल या एका उत्तरामध्येच दडली आहे. असं करताना तरुण पिढी नेमका काय विचार करते किंवा यामागे त्यांची नेमकी मानसिकता काय असते याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सावे म्हणतात की, यामागचे विचार समजून घेताना आपल्याला त्यातील दोन पलू जाणून घेणे आवश्यक आहे. पहिला म्हणजे सांस्कृतिक पलू. लहानपणापासून घरात असलेल्या वातावरणाचा, संस्कारांचा ठसा आपल्या मनावर खोलवर उमटलेला असतो. त्यामुळे देव त्याच्याशी निगडित संकल्पना या मनात पक्क्या झालेल्या असतात. त्यामुळे सहजगत्या या गोष्टी त्यांच्या सवयीचा भाग बनतात यात त्यांना काही वावगं किंवा विशेष वाटत नाही. याचा दुसरा पलू मानसशास्त्र आहे. यात अनेक मुद्दे येतात. पहिला म्हणजे मास हिस्टेरिया. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पितोय, अशी उठलेली आवई आणि त्याला लोकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद सगळ्यांना चांगलाच लक्षात असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आप्तस्वकीयांमुळे निर्माण झालेला ताण (ढी१ ढ१ी२२४१ी). यामुळे मी एखादी गोष्ट केली नाही तर माझे मित्रमत्रिणी मला त्यांच्यातले समजणार नाहीत आणि मी वाईट किंवा चुकीचा/ ची ठरेन, अशी समजूत व्यक्ती करून घेते आणि या ताणास बळी पडते. यातील अजून एक मुद्दा म्हणजे देवाला नवस केल्याने, कडक उपवास धरल्याने देव प्रसन्न होतो आणि मला हवी ती गोष्ट तो मिळवून देतो ही भावना. या भावनेतून अशा गरसमजुती निर्माण होतात. वस्तुत: देव जर माणसामाणसांत कोणताच भेदभाव करत नाही तो सगळ्यांना समान वागवतो असे आपण मानलेले आहे तर मग त्याला ही नवसाची अनवाणी चालण्याची लाच आपण का देतो. असे करून आपण त्याच्यामधला आणि लाच घेणाऱ्या माणसामधला फरकच नष्ट करून टाकतो, असा विचार तरुणाई का नाही करत?
खरंतर आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. नवनवीन तंत्रज्ञानाला आपलंसं करण्यात तरुण पिढी कायमच आघाडीवर असते मात्र गोष्ट जेव्हा नवसाची अनवाणी चालण्याची येते तेव्हा मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाची गाडी ठप्प होते. असं का होतं.. विज्ञानाची कास धरणारी ही तरुण पिढी या गोष्टींकडे अपवाद म्हणून का पाहते.. डॉ. सावे म्हणतात, कारण दडलेलं असतं मगाशी उल्लेखिलेल्या सांस्कृतिक पलूमध्ये. आपल्या घरातील संस्कारांमुळे बऱ्याच गोष्टी आपण अजाणता स्वीकारलेल्या असतात आणि यामुळेच बरेचदा सांस्कृतिकदृष्टय़ा स्वीकारलेल्या गोष्टी विज्ञानापेक्षा मोठय़ा मानल्या जातात. उदाहरण घ्यायचं झालं तर देवळात गेल्यावर आपण हात का जोडतो असं कोणी विचारल्यावर क्षणभर आपण बावचळतो. समोर देव आहे त्याच्यावरच्या श्रद्धेने आपण हात जोडतो. पण आपण तर देव चराचरांत आहे असं मानतो मग आपण कायमच हात जोडलेले का नसतो.. प्रश्नांना आपल्याकडे उत्तरं नसतात.
आजकालचे राहणीमान, दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा, असुरक्षितता या गोष्टीही अशा प्रकारांना खतपाणी घालतात. डॉ. सावे म्हणतात की, या गोष्टींमुळे असुरक्षिततेचे चक्रच निर्माण होते. आजकाल आनंदाची व्याख्या बदललेली आहे. पसा, संपत्ती, जमीनजुमला मिळविण्यासाठी माणसं धडपडत असतात. हे जणू काही त्यांच्या आयुष्याचे ध्येयच बनते. त्यांना मिळविण्यासाठी ते आपल्या शरीराची हेळसांड करतात स्वत:वर अतिताण टाकतात. आपल्या जवळच्या नात्यांपासून, माणसांपासून दूर जातात. एकलकोंडी होतात. अनेक मानसिक त्रासांना सामोरे जातात आणि एकदा हवं ते मिळत गेलं की ते साठवण्याची सवय होते. अजून हवं ची हाव वाढत जाते यातूनच भ्रष्टाचारासारख्या गोष्टी घडतात आणि यातून निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेपासून दूर जाण्यासाठी आपण अनेक अंधविश्वासांना, गरसमजुतींना बळी पडतो. याबाबत डॉक्टर म्हणतात की, हल्ली आपल्याला नको ती सवय जडली आहे ती म्हणजे कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याचे आपले प्रमाण वाढले आहे. अगदी सरकारपासून पावसापर्यंत कोणीही या टीकास्त्रातून सुटत नाही. याने होतं काय तर या टीका करण्याचा वाईट परिणाम आपल्यावरच होत असतो. यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जिचा आपल्या विचारांवर, वागण्या-बोलण्यावर परिणाम होतो. हेसुद्धा असुरक्षितता वाढविण्यास कारणीभूत ठरते. याउलट एखाद्या गोष्टीचे कौतुक करण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले दिसून येते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये चांगलं काहीतरी शोधलं की आपोआपच सकारात्मकता निर्माण होते. जी आपल्या मानसिक स्थर्यासाठी, आनंदासाठी खूप आवश्यक असते. असुरक्षितता निर्माण व्हायला काही प्रमाणात माध्यमे आणि जाहिरातीसुद्धा कारणीभूत असतात, असं डॉ. सावे म्हणतात. जाहिराती आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी त्या उत्पादनाची लोकांच्या मनात कृत्रिम गरज निर्माण करतात. परिणामत: या गरजांचा आकडा फुगत जातो आणि ती गरज भागविण्यासाठी चाललेल्या धडपडीमुळे आपसूकच असुरक्षितता निर्माण होते.
अनवाणी देवदर्शनाला जाणे हे कसे चुकीचे आहे किंवा हा एक अंधविश्वास आहे हे पटवून देणे हा या लेखाचा हेतू नसून मुळात तरुणाईमध्ये वाढलेल्या या गरसमजुतीमागची कारणं काय असू शकतात हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. यावरच्या सर्व मुद्दय़ांवरून आपल्याला दिसून येईल की हा प्रश्न केवळ भाबडय़ा श्रद्धेशी निगडित नसून बदललेल्या राहणीमानाशी, मानसिकतेशी आणि तीव्र स्पध्रेशी संबंधित आहे. त्यामुळे या आणि अशा अनेक गरसमजुतींचा विचार करताना विषयाचा एकच पलू लक्षात न घेता त्याचा विविधांगांनी विचार करणे आवश्यक ठरते. .
डॉ. सावेंच्या मते नवस करणे, अनवाणी देवदर्शनास जाणे या गोष्टी माणसाला कमकुवत, परावलंबी बनवतात. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही वृत्ती यामुळे वाढीस लागते. अशा माणसांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आधीपासूनच दिसून येतो. आजची तरुणाई ही देशाचं भविष्य आहे, संपत्ती आहे. देशाचा विकास करण्याचं महत्त्वाचे काम त्यांना पार पाडायचे आहे त्यासाठी मुळात त्यांनी ‘मी, मला, माझं’ ही संकुचित वृत्ती सोडून देणं गरजेचं आहे. ज्या तरुणांना आपल्या शारीरिक क्षमतेचा, सहनशक्तीचा पडताळा घ्यायचा आहे त्यांनी अनवाणी चालण्यापेक्षा मतदान करावे. ते करताना वाटल्यास देवाचे नाव घ्या. आपल्या संतांनी तरी काय वेगळे केले.. परीक्षेत पास होण्यासाठी तीन ते चार तास अनवाणी चालण्याची नव्हे, तर तीन ते चार तास अभ्यास करण्याची गरज असते.
अशा अंधविश्वासांना बळी पडणाऱ्या बहुतेक तरुणांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यांच्या लेखी स्वप्रतिमा बरीचशी नकारात्मक असते. इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे ही जाणीव त्यांना सतत टोचत असते. या जाणिवेमुळे ते अधिकाधिक खचत जातात ज्यामुळे त्यांना स्वत:त ताकद, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कशावर तरी अवलंबून राहावे लागते. या सगळ्यातून बाहेर पडायचे असेल तर मुळात त्यांनी स्वत:ला कमी लेखणं थांबविले पाहिजे. मी जो आहे, जसा आहे तसा चांगला आहे हे त्यांनी मनापासून मानायला हवे. यापेक्षा अजून चांगला मी कसा होऊ शकतो या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. मेहनती राहायला पाहिजे. आपल्यातले अवगुण काढण्याच्या प्रयत्नापेक्षा सद्गुण वाढविण्यावर जोर दिला पाहिजे. मुळात मेहनतीला पर्याय असू शकतो हा विचारच मनातून काढला गेला पाहिजे. आपल्या बुद्धय़ांकाबरोबरच बरोबरच आपला भावनांकही तितकाच महत्त्वाचा असतो. बरेच जण म्हणतात ‘माझं तर नशीबच खराब आहे. पण खरंतर त्यांचा जगाला पाहण्याचा दृष्टिकोनच चुकलेला असतो. त्यामुळे नशिबाला दोष न देता आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर उद्या अनवाणी चालण्याची पाळी न येता रेड काप्रेटवर चालण्याची संधी मिळू शकते.