यंदा गरब्यासाठी जाताना कसं सजायचं हा प्रश्न तुमच्या डोक्यात ठाण मांडून बसला असेल तर त्याची उत्तरं दीपिका पदुकोणने आधीच देऊन टाकलीत..

‘ए हालो रे..’ची किंचाळी ऐकू आली की, हवेमध्ये नवरात्रीचे रंग मिसळायला सुरुवात झालीच म्हणून समजायचं. मग कुठेतरी दडी मरून असलेले घागराज, चन्या-चोली, रंगीत दुपट्टे, अँटिक ज्वेलरी, मोजडी अचानक आपल्यासमोर प्रकट होतात. वर्षभर खोलीत एका कोपऱ्यात निपचिप पडलेल्या दांडियाच्या टिपऱ्यापण डोकं वर काढतात. अचानक रेडिओ, टीव्ही, युटय़ूब पहावं तिथे फाल्गुनी पाठकची गाणी लागलेली असतात आणि न जाणो का पण वर्षभरात कधीच आपल्याला ती गाणी ऐकावीशी वाटत नाहीत, पण या काळात मात्र या गाण्यांशिवाय इतर काही संगीत असतं याचा विसर पडतो.
बरं दरवर्षी कितीही म्हटलं, ‘नाही यंदा मी नवरात्रीची काही शॉपिंग करणार नाही. मागच्या वेळीचाच घागरा घालेन. तसंही हे नऊच दिवस या घागऱ्यांचं कौतुक असतं. नंतर तो वापरलापण जात नाही.’ पण नाही, बाजारात सजलेली दुकानं पाहून, ‘जी लालचाये, रहा ना जाये.’ अशी परिस्थिती होऊन जाते. त्यात ‘दरवर्षी ट्रेंड बदलतात ना, मग तेच तेच कसं घालून चालेल?’ हा प्रश्नही असतोच. यंदाच्या सीझनमध्ये ‘रामलीला’मधला दीपिकाचा लुक नवरात्र गाजवणार, हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही. दीपिकाचा लुकच नाही पण ‘नगाडा’, ‘राम चाहे लीला’ ही गाणीसुद्धा धूम आणणार आहेत. त्यामुळे नवरात्रीमध्ये सगळ्या दीपिका बनून येतील आणि आपण अजूनही ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या ऐश्वर्याच्या जगात जगत असू तर कसं चालेल? नाही का. चला मग, यंदाच्या या ‘रामलीला’ लुकमध्ये नक्की काय दडलंय याचा शोध घेऊ या. म्हणजे तुम्हालाही शॉिपंगच्या हिशोबाने थोडं सोप्पं जाईल.

‘रामलीला’मध्ये दीपिकाच्या लुकमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे, ‘लाल’ रंग यंदा राज्य करणार. चित्रपटामधील तिच्या बहुतेक घागऱ्याचा रंग लाल होता. त्यामुळे शॉपिंगला जाताना डोक्यात रंगाच्या बाबतीत ‘लाल’ रंग पक्का करून जा. पण हा लाल रंग भडक नसून थोडा रस्टिक, मॅटी शेडचा आहे. टाय-डाय टेक्निकवर अधिक भर दिल्यामुळे हा रस्टिक लुक त्याला मिळाला आहे. कॉटन फॅब्रिकवर टाय-डाय इफेक्ट उठून दिसतो. या सीझनमध्ये हा ट्रेंड हिट असेल. लाल आणि पांढऱ्या रंगातील टाय-डाय केलेला दीपिकाचा घागरा सर्वात प्रथम आपलं लक्ष वेधून घेतो. त्याशिवाय लाल रंगावर केलेली मॅट गोल्ड रंगाची एम्ब्रॉयडरीसुद्धा लक्ष वेधून घेते. नवरात्रीमध्ये घागरा घेण्यास फारसे उत्सुक नसाल, तर लाल रंगाचा लाँग स्कर्ट्स ट्राय करायला हरकत नाही. लाल ऐवजी मॅट यल्लो, पांढरा, क्रीम रंगाचे घागरेसुद्धा चित्रपटामध्ये वापरलेले दिसून येतात.
पण एकदा ‘लाल’ रंगाचं सूत्र डोक्यात फिट केल्यावरसुद्धा पूर्णपणे लालेलाल होण्याऐवजी, तिच्या चोलीकडे एक नजर टाका. या लाल रंगाच्या घागऱ्यासोबत काळा, मॅट गोल्ड, पांढऱ्या रंगाची चोली घातलेली दिसून येईल. जेणेकरून तुमच्या एकूणच लुकला रस्टिक फील मिळेल. मल्टी शेडेड चोलीचा ऑप्शनसुद्धा आहे. दुपट्टय़ामध्येसुद्धा जास्त रंग भरण्याऐवजी काळ्या आणि लाल रंगाचा वापर करून रस्टिक लुक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
एम्ब्रॉयडरी आणि नवरात्री यांचं न तुटणारं नातं आहे. पण यावेळी मिरर वर्क कमी दिसेल. त्याची जागा, थ्रेड वर्क आणि पिटा वर्क घेतील. पिटा वर्क म्हणजे एम्ब्रॉयडरी केल्यावर त्यात वापरलेले सिक्वेन्स थोडे दाबले जातात. त्यामुळे एम्ब्रॉयडरीला ‘ओल्ड वर्ल्ड चार्म’ येतो. पॅचवर्कसुद्धा यंदा पाहायला मिळेल. याशिवाय घागऱ्याच्या बॉर्डरला बांधलेले एम्ब्रॉयडर बेल्ट्ससुद्धा पाहायला मिळतील. टाय-डाय केलेला घागरा आणि त्यावर हा बेल्ट खुलून दिसतो. यशिवाय चोलीवर एम्ब्रॉयडरी मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळेल. एम्ब्रॉयडरीसोबत लटकनसुद्धा वापरू शकता. फक्त हे लटकन ओव्हरसाइझ असतील याची काळजी घ्या.
घागरा-चोली या सीझनमध्ये हिट असतील, पण तरीही त्याचा लुक मॉडर्न हवा. नेहमीच्या लाँग घागराज ऐवजी एम्ब्रॉयडर शॉर्ट स्कर्ट्स वापरायला हरकत नाही. तुम्हाला थोडासा बदल हवा असेल तर प्रियंका-सारखी धोती वापरून बघायलासुद्धा हरकत नाही.
मुलांसाठी सध्या पारंपरिक ‘केडिया आणि धोती’ इन आहेत. पण रणवीर सिंगप्रमाणे सफेद रंगाच्या केडियासोबत ब्राइट निळा, लाल, हिरवा, नारंगी रंगाचा स्कार्फ नक्कीच कॅरी करा. त्यामुळे त्याला फंकी लुक येईल. याशिवाय ब्राइट बांधणी प्रिंट असलेल्या गंजीवर केडिया जॅकेटप्रमाणे घेऊ शकता. कॉटनचे बांधणी किंवा लेहरीया प्रिंटचे शर्ट्ससुद्धा धोतीसोबत घालू शकता. मिरर एम्ब्रोयडरीचं जॅकेटसुद्धा सध्या पाहायला मिळतं. केडिया किंवा नेहमीच्या शर्टवरसुद्धा हे जॅकेट सुंदर दिसतं.
ज्वेलरीच्या बाबतीत लाँग इअरिरग्स सध्या इन असतील. नेहमीच्या अँटिक ज्वेलरीपेक्षा कुंदन, मोत्यांचे दागिने वापरून पाहा. नाकात नथनी मस्ट आहे. अँटिक गोल्ड ज्वेलरी वापरायला हरकत नाही. पण त्यासोबत स्टोन नेकपीस, काचेच्या बांगडय़ा वापरून काही रंग नक्कीच भरा. मुलांसाठी मात्र अँटिक ज्वेलरीचा पर्याय खुला आहे. त्यामुळे स्टड्स, एका कानात इअरिरग, कडा, अंगठय़ा घालायला विसरू नका. एखादा अँटिक नेकपीससुद्धा वापरून पाहा.

मुलींमध्ये या वेळी दरवेळीप्रमाणे टॅटूची क्रेझ पाहायला मिळेल. पण फॅशनेबल ट्रेंडी टॅटू काढण्याऐवजी, पारंपरिक कोंदण स्टाइलमध्ये टॅटू करून पाहा. दीपिकाने रामलीलामध्ये मानेवर गोंदवलेली अक्षरे आठवताहेत ना.. याशिवाय तिची काळी टिकली पण लक्ष वेधून घेत होती.
हेअरस्टाइल ‘मेस्सी’ असेल. कित्येक शॉर्ट्समध्ये दीपिकासुद्धा मोकळ्या केसांमध्ये दिसते किंवा तिचा अंबाडासुद्धा विस्कटलेला दिसून येईल. त्यामुळे तेल किंवा जेल लावून टापटीप केस बांधण्याच्या फंदात पडू नका. मुलांसाठीपण तोच मंत्र आहे.
चला अजून काय हवंय, मस्त मूडमध्ये आपल्या दीपिका किंवा रणवीरसोबत दांडिया हातात घेऊन सज्ज व्हा..हा नवरात्रीचा मौसम गाजवायला.