आजोबांचा कोट आणि मी – पल्लवी सुभाष
माझं बालपण मालाडच्या एका चाळीत गेलंय. चाळीतलं जगणं खूप वेगळं असतं. एकमेकांच्या मदतीस धावून येण्याबरोबरच शेजारच्या स्वयंपाकघरात काय शिजलंय इथवर माहिती घेण्यास चाळीतली मंडळी तत्पर असतात. हे सगळं मी अनुभवलंय. नवरात्र म्हटलं की आम्हा सगळ्यांसाठी धमाल असायची. नवरात्र सुरू होण्याआधी काय करायचं, सजावट कशी करायची, गरबा, दांडियामध्ये वेगळंपण काय करायचं अशी सगळी चर्चा असायची. नवरात्र सुरू झालं की, रोज ते एकत्र भेटणं, बोलणं, नवनव्या गोष्टी ठरवणं असं सगळं सुरू व्हायचं. नऊही दिवस वेगवेगळे वेश घेऊन मी दांडिया खेळायला जायचे. एका वर्षीचा फॅन्सी ड्रेस मला खूप चांगला आठवतो. माझ्या आजोबाचं आणि माझं नातं खूप वेगळं होतं. ते वकील होते. त्यांचं वक्तृत्व, लेखन, व्यक्तिमत्त्व, ज्ञान या सगळ्याबद्दल मला आदर आहे. त्यांच्या वकिली कोटाचंही मला खूप अप्रुप होतं. एकदा मला फॅन्सी ड्रेसमध्ये सहभाग घ्यायचा होता. माझ्या आजोबांनी माझं त्यांच्या वकिली कोटावर लक्ष आहे हे ओळखलं. आणि आश्चर्य म्हणजे मला वकिलाच्या पोशाखात तयार केलं. त्यांचा कोट, हातात फाइल्स, चष्मा असं तयार करून मला मंडपात घेऊन गेले. तो कोट खाली लोळत होता. पण, मला त्याची अजिबात काळजी नव्हती. कारण माझ्यासाठी आजोबांनी स्वत: तो कोट मला देणं हे खूप महत्त्वाचं होतं. या पोशाखासाठी मला नंतर बक्षीसही मिळालं होतं. लहान असताना अनेकदा वेगवेगळे वेश घेऊन दांडिया खेळले. पण, त्या वर्षीचा तो वेश माझ्या डोळ्यांसमोर अजून आहे. चाळीतली ही सगळी मजा मी मिस करते. मी आजही प्रत्येक सणात त्या चाळीत जाते, तिथल्या लोकांना भेटते. जुने सगळे दिवस त्यावेळी आठवतात.
पाय मोडला तरीही.. – सचिन देशपांडे
मी मूळचा डोंबिवलीचा. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तिथे सतत होत असतात. त्यामध्ये सण-समारंभ धूमधडाक्यात साजरे होत असणार हे वेगळं सांगायला नकोच. विशेष धमाल असते ती नवरात्रीत. डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी दांडिया होत असतो. काही मोठय़ा प्रमाणावर तर काही छोटय़ा प्रमाणावर. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा तर दांडिया, गरबा याचं खूप वेड होतं. त्यात पास वगैरे काढून खेळायला जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. एका कॉलेजमध्ये असाच पास ठेवून दांडिया आयोजित केला होता. पास दाखवून आत सोडणारा डोंबिवलीतला तेव्हाचा तो एकमेव दांडिया असायचा. आम्ही सगळे कॉलेजचे मित्रमैत्रिणी नियमित खेळायला जायचो. एकदा त्या कॉलेजच्या प्रसिद्ध दांडियामध्ये खेळायला जायचं असं ठरवलं. त्यातच नेमकं त्याच वेळी तिथे फाल्गुनी पाठक येणार होती. आता नवरात्र-दांडिया-फाल्गुनी पाठक लाइव्ह हे सगळं कॉम्बिेनेशन पुन्हा कधी बघायला मिळेल माहीत नव्हतं. त्यामुळे ही सुवर्णसंधी साधून आम्ही तिथे जायचं ठरवलं. ऐन वेळी या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे आमच्याकडे सगळ्यांना पुरतील इतके पास नव्हते. तरी आम्ही तिथे जायचं ठरवलं. आमच्याकडे दोन पास होते. त्यावर आमच्या दोन मैत्रिणींना आत जायला सांगितलं. मग मी आणि माझ्या दोन मित्रांनी कॉलेजच्या मागच्या बाजूच्या गेटमधून आत जायचं ठरवलं. रितसर सगळं ठरवल्यानुसार होत होतं. आम्ही मागच्या बाजूला गेलो. कॉलेजच्या आवारातल्या भिंती उंच होत्या. त्यामुळे गेटची उंचीही फार होती. तरी आम्ही त्यावर चढलो. चढल्यानंतर मागून कॉलेजचा वॉचमन ओरडत आला. आम्हाला काही सुचेना. कॉलेजच्या आवारात उडी मारली तर तिथेही पकडणार आणि बाहेर मारली तर तिथेही. त्यामुळे आम्ही फार विचार न करता कॉलेजच्या बाहेर उडी मारली. उडी मारताना माझा एक पाय गेटमध्ये अडकला आणि मी पडलो. कसाबसा खाली आलो. मला खूप लागलंय हे बघून वॉचमनने आम्हाला सोडून दिलं. हे सगळं रामायण होऊनही दुसऱ्या दिवशी मग मी रितसर पास काढून तशाच सुजलेल्या हाताने दांडिया खेळायला गेलो.
बॉयकट शकुंतला – सिद्धार्थ जाधव
मुंबईत शिवडीमध्ये राहत होतो तिथला दांडिया आणि मी अशा खूप मजेशीर आठवणी आहेत. त्या दांडियासाठी तयार होणं, उशिरापर्यंत खेळणं, तिथल्या स्पर्धामध्ये भाग घेणं हे सगळं खूप गमतीशीर होतं. या सगळ्यातून बरंच काही शिकत गेलो. शिवडीत मी जिथे राहायचो तिथे फॅन्सी ड्रेस गरबा असायचा. म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या वेशात जाऊन खेळायचं असा तिथला नियम होता. पण, याकडे कोणी कधीच नियम म्हणून बघितलं नाही. तसं करायला सगळ्यांनाच मजा यायची. मग कोण काय बनणार यावर चर्चा व्हायची. मीही असा तयार होऊन जायचो. वेगवेगळ्या वेशात तयार होतानाची मजा वेगळीच असायची. मला आठवतं, एका वर्षी मी शकुंतला व्हायचं ठरवलं होतं. तसा वेश करून गरबा खेळायला जायचं मी ठरवलं. पण, शकुंतला होण्यासाठी भरपूर बारीकसारीक तयारी करावी लागणार हे माहीत होतं. पण, मीही मागे हटलो नाही. एका मैत्रिणीला मदतीला घेऊन शकुंतलेच्या तयारीला लागलो. त्यानुसार कपडे आणले आणि घातले. यात महत्त्वाचा भाग होता तो मेकअप आणि हेअरस्टाइल. मेकअपही माझ्या त्या मैत्रिणीने चोख करून दिला. उरला प्रश्न हेअरस्टाइलचा. केसाचा वरचा भाग गोलाकार दिसावा यासाठी मी तिथे सीझनचा बॉल ठेवला होता. मग त्यावर ओढणी बांधून त्याला गजरे माळले होते. हा सगळा प्रपंच फक्त त्या गरब्यात नाचण्यासाठी. सगळी तयारी झाली आणि मी गेलो तिथे. सुरुवातीचा काही वेळ मस्त सगळं जमून आलं. त्या पोशाखात मीही हळूहळू स्वत:ला सावरू लागलो. काही वेळानंतर मात्र एक गंमतच झाली. हेअरस्टाइलमध्ये केसाचा वरचा भाग गोलाकार वाटावा म्हणून ठेवलेला तो सीझनचा बॉल कधी पडला कळलंच नाही. तो पडल्यामुळे ती ओढणी, गजरे या सगळ्याचे बारा वाजले आणि मग बॉयकट शकुंतला गरबा खेळत होती. हे चित्र बघून आजूबाजूचे लोक तुफान हसत होते. पण, हे सगळं खूप खेळाडू वृत्तीने घेतलं. हे सगळं झालं म्हणून गरबा खेळताना अजिबात थांबलो नाही. तसाच नाचत राहिलो. हा किस्सा मला अजूनही तसाच आठवतो. असं नटूनथटून, वेगळ्या वेशात जाणं, नाचणं हे सगळं मजेशीर होतंच. पण, ते तयार होण्याची प्रक्रिया मी जास्त एन्जॉय करायचो.
सांस्कृतिक आदानप्रदान महत्त्वाचं – वैभव मांगले
खरंतर मी कधी गरबा, दांडियाला गेलो नाही. कधी खेळलोही नाही. पण, गरब्याशी निगडित एक आठवण नेहमी सांगाविशी वाटते. मी कोकणात देवरुखमध्ये राहत होतो. मी राहत असलेल्या भागात गुजराती बांधव खूप होते. नवरात्र हा सण गुजरात आणि गुजराती लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे हे बांधव असतील तिथे मोठय़ा जल्लोषात हा सण साजरा करतात आणि त्यांच्या आनंदात इतरांनाही सामावून घेतात. तर, देवरुखमध्ये आम्ही राहायचो तिथे त्या गुजराती लोकांनी गरबा सुरू केला. साधारण वीसेक वर्षांपूर्वी तिथे गरब्याची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांचेच लोक गरबा, दांडिया खेळायचे. मग हळूहळू त्यांच्यात मराठी भाषिकही सामील होत गेले. त्यांची संख्या वाढत गेली. वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या गरब्यात आज गुजराती कमी आणि मराठी लोकच जास्त बघायला मिळतात. त्यांनी सुरू केलेला उत्सव नंतर मराठी लोकांनी साजरा करायला सुरुवात केली. केवळ साजराच नाही तर तो उत्तम प्रकारे साजरा करण्यासाठी त्याचं आयोजनही तसंच होऊ लागलं. हे सांस्कृतिक आदानप्रदान मला माझ्या लहानपणी बघायला मिळालं. त्यामुळे गरबा, दांडिया मी कधी खेळलो नाही, पण नवरात्र म्हटलं की मला हे आदानप्रदान आठवते. आता देवरुखमध्ये अनेक ठिकाणी हा सण मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. त्या वेळी त्यांनी सुरू केलेल्या तिथल्या गरब्यामुळे गृहिणी एकत्र येऊ लागल्या, तरुण मुलांना सामाजिक कार्याचं भान आलं. त्यामुळे मी स्वत: ही सांस्कृतिक देवाणघेवाण बघितली आहे आणि मला ही देवाणघेवाण खूप महत्त्वाची वाटते.
‘रास गोफ’ शिकायला मिळालं – उर्मिला कानेटकर
खरं तर नवरात्रीत दांडिया, गरबा खेळायला जाणं हे तरुणाईला खूप आवडतं. मलाही तसं ते आवडायचं. पण नेहमीच दांडिया खेळायला जाण्यासारखं घरचं वातावरण नव्हतं. अगदी विरोध नव्हता, पण नेहमी जाण्यालाही पाठिंबा नव्हता. तशी परंपरा नव्हती. पण नवरात्रीपेक्षा दांडिया, गरबाची एक खास आठवण सांगावीशी वाटते. कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हल हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. तसाच माझाही होता. त्यातही नृत्यस्पर्धा म्हणजे माझ्यासाठी आनंदच. पण एरवी इतर नृत्यप्रकार करून आम्ही स्पर्धेत उतरायचो. एक वर्ष आम्ही वेगळा प्रकार करायचं ठरवलं. युथ फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय पातळीवर आम्ही ‘रास गोफ’ हा प्रकार करायचा असं ठरवलं. आमच्यापैकी अनेकांना हा प्रकार माहीत नव्हता. इतर वेळी नवरात्रीत ठिकठिकाणी दांडिया, गरबा खेळायला जाताना शास्त्रोक्त पद्धतीने केला जात नाही. तसंच ‘रास गोफ’हा प्रकार सगळीकडे बघायला मिळतोच असंही नाही. त्यामुळे हा आम्हा सगळ्यांसाठीच नवा प्रकार होता. यामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या ओढण्या वर एका चक्राला बांधून खाली सरळ सोडल्या जातात. मग नाचत नाचत दांडिया खेळत त्या एकमेकांमध्ये गुंफत त्याचा वेणीसारखा आकार करायचा असतो. सगळ्या ओढण्या एकमेकांमध्ये गुंफून झाल्या की पुन्हा त्या पहिल्यासारख्या सोडणं असा प्रकार असतो. केवळ गुंफून वेणी घालणं आणि सोडवणं असं न करता दांडिया घेऊन नाचत ते गुंफावं लागतं. त्यामुळे दांडिया फिरवण्याची पद्धतही त्यावेळी नव्याने शिकता आली. नाहीतर इतर वेळी आपण आपल्या सोयीने ती धरतो आणि फिरवतो. या ‘रास गोफ’मुळे ते शिकता आलं. यामुळे एकाग्रता, सुसूत्रता, नीटनेटकेपणा अशा अनेक गोष्टी यानिमित्ताने नव्याने शिकता आल्या.
ते पहिलं बक्षीस – माधवी निमकर-कुलकर्णी
मी खोपोलीत राहायचे. तिथला पाटणकर चौक खूप प्रसिद्ध आहे. तिथला दांडिया तर खूपच प्रसिद्ध. मीही न चुकता दर वर्षी तिथे खेळायला जायचे. एका वर्षीची आठवण मला चांगलीच लक्षात आहे. मी नववी-दहावीत असेन. खरं तर याच दरम्यान अनेकदा परीक्षांचा माहोल असायचा. माझीही तेव्हा परीक्षाच सुरू होती. पण, दांडियाला जाण्याचा मोह काही आवरता यायचा नाही. त्यामुळे अभ्यास वगैरे सगळं सांभाळून मी खेळायला गेले. माझ्यासोबत आईसुद्धा यायची तेव्हा. मैत्रिणी भेटतील म्हणून थोडं लवकरच जायचे दांडिया खेळायला. पण, तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यादिवशी तिथे ड्रेस आणि डान्स यांची स्पर्धा होती. सगळ्या मुलींना नटलेलं, सजलेलं पाहून मला वाटलं मीसुद्धा अशी नटून या स्पर्धेत सहभाग घ्यायला हवा. त्या पाटणकर चौकातून वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझ्या घराकडे मी अक्षरश: धावत आले. घरी आल्यावर माझ्याकडे एक जुना घागरा होता. तो घातला. मग त्यावर मिळेल ते गळ्यातलं, कानातलं, बांगडय़ा घातल्या. हे काहीच त्या घागऱ्यावर शोभून दिसणारं नव्हतं. घरात ज्या टिपऱ्या होत्या त्यांना चमचमणारी लेस बांधली. मेकअपचं तेव्हा काही माहीत नव्हतं. फक्त लिपस्टि लावली. अशी सगळी तयारी करून मी पोहोचले त्या मंडपात. माझ्या मैत्रिणींप्रमाणे मीही स्पर्धेत सहभाग घेतला. आणि त्या स्पर्धेत डान्समध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. डान्समध्ये बक्षीस मिळाल्याची ती पहिलीच वेळ होती. त्या वेळी माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. तिने मला प्रोत्साहन दिलं म्हणून मी धावत घरी जाऊन तयारी केली. त्यामुळे हे पहिल्यांदाच डान्समध्ये मिळालेलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या सगळ्यामुळे नवरात्रीचं ते वर्ष मी कधीच विसरू शकत नाही.