आई जगदंबा कुठे आणि कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही. खरंतर ती सर्वत्र आहे. सगळे जग व्यापून आहे. तिची आराधना आदिम काळापासून चालू आहे. तिची मंदिरे अगदी सर्वत्र पाहायला मिळतात. प्रसिद्ध पावलेली तिची देवालये तर आहेतच परंतु अगदी आड रानात, निसर्गाच्या कुशीत सुद्धा ती वसली आहे. किल्ले भटकताना, डोंगरवाटा तुडवताना तिचे अकस्मात झालेले दर्शन फारच आनंददायी असते. छत्रपती शिवरायांची तर ती आराध्य देवताच होती. त्यांच्या अनेक किल्ल्यांवर जगदंबेची मंदिरे पाहायला मिळतात. असेच एक नितांतसुंदर मंदिर आहे ते प्रतापगडाच्या घेऱ्यात पार या गावी. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारया कुंभरोशी गावाजवळून एक रस्ता पार या अत्यंत रमणीय अशा गावाला जातो. याचं पूर्वीचं नाव पार्वतीपूर ! त्याचंच पाहिलं आणि शेवटच अक्षर घेऊन झालं पार. या ठिकाणाशी एक दंतकथा निगडित आहे. या डोंगराळ आणि निबिड अरण्य असलेल्या प्रदेशात अतिबळ आणि महाबळ हे राक्षस राहत होते. ते अतिशय माजले होते आणि त्यांनी इथे उच्छाद मांडला होता. देवांनी विष्णूकडे धाव घेतली. विष्णूने अतिबळ दैत्याचा वध केला पण महाबळ काही मरेना. शेवटी सर्व देवांनी आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्तीने महाबळावर मोहिनी घातली आणि त्याने देवांनाच वर मागायला सांगितले. देवांनी त्याचा मृत्यू व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्याचा नाइलाज होता. त्याला हे मान्य करावेच लागले. पण त्यानेही एक वर मागितला, तो असा की तो पर्वतरूप होऊन इथेच वास्तव्य करेल आणि सर्व देवांनी त्या पर्वतरूपी महाबळीच्या अंगावर वास्तव्य करावे. देवांनी ते मान्य केले. त्यानंतर मग कोयना नदीच्या तीरावर श्रीआदिशक्तीची स्थापना खुद्द देवांनी केली तीच ही रामवरदायिनी. पारच्या देवीच्या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक आहे श्रीवरदायिनी तर दुसरी आहे श्रीरामवरदायिनी. तिची सुद्धा एक कथा आहे. सीतेला शोध घेत असता रामाची परीक्षा पहावी म्हणून पार्वती सीतेचे रूप घेऊन रामासमोर उभी राहिली. रामाने तिचे खरे स्वरूप जाणले आणि हे माते, तू का उगाच त्रास करून घेते आहेस ? असे विचारले. पार्वती प्रसन्न झाली आणि तुझ्या कार्यात तुला यश येईल असा आशीर्वाद देऊन अंतर्धान पावली. श्रीरामाने या जागी तिची स्थापना केली. रामालाही वर देणारी म्हणून रामवरदायिनी या नावाने ती ओळखली जाऊ लागली. पार गावाजवळच पार घाट आहे. कोकणाला देशाशी जोडणारा हा रस्ता पूर्वी व्यापाऱ्यांनी गजबजलेला असे. पार घाटाच्या तोंडाशी मेट किंवा पहारा करायची जागा आहे. समर्थ रामदासस्वामी या देवीच्या दर्शनाला आल्याची नोंद आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या या रहाळामधील जाज्ज्वल्य देवस्थान असलेल्या मंदिरात त्यांनी देवीकडे जे मागणे मागितले ते सुद्धा स्वतसाठी नाही तर स्वराज्यासाठीच मागितले. येकचि मागणे आता द्यावे ते मजकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासि देखता असे मागणे समर्थानी देवीकडे मागितले होते. या ठिकाणी येण्यासाठी आता उत्तम डांबरी सडक आहे. ग्रामस्थ आणि मुंबईला स्थायिक झालेले इथले स्थानिक यांनी बराच पसा खर्च करून आता इथे एक मोठे मंदिर उभारले आहे. मंदिराजवळ भक्तनिवाससुद्धा आहे. अत्यंत रम्य परिसर, आजूबाजूला निबिड अरण्य, आणि प्रतापगडाचा शेजार यामुळे इथे येणे फारच आनंददायी असते. महाबळेश्वरपासून प्रतापगडला जाताना डावीकडे या देवस्थानची कमान उभारलेली दिसते. इथून साधारण 3 कि.मी. वर हे मंदिर आहे. इथेच जवळ कोयनेवर शिवाजीराजांनी बांधलेला दगडी मजबूत पूल आजही उत्तम स्थितीत आहे. या पुलावरून जाणारा रस्ता पुढे मकरंदगडापाशी जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा