आपल्या आजूबाजूच्या परिसरात एवढी आश्चय्रे उभी आहेत की ती पाहायला जन्म पुरणार नाही. फक्त त्याची माहिती आणि ती पाहायची इच्छाशक्ती मात्र हवी. जगज्जननी असणारी श्रीजगदंबा आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता सर्वतोपरी तयार आहे. तिची अनेक मंदिरे आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु काही मंदिरे जशी देवीसाठी प्रसिद्ध आहेत, तशीच काही मंदिरे तिथे असणाऱ्या काही स्थापत्य चमत्कारांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. पुणे सोलापूर हमरस्त्यावरील भिगवण पासून कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे राशीन. गावात इ.स. च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेलं श्रीयमाई किंवा श्रीजगदंबा देवीचं मंदिर आहे. रेणुकामातेचेच एक रूप असलेली ही यमाई माता आहे असे इथे समजले जाते. तटबंदीयुक्त आवाराला भव्य दरवाजा असून त्यालाच लागून देवड्या,
फरसबंदी अंगण, त्यात एक मोठी विहीर बाजूला ओवऱ्या आणि मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. त्या आता विविध रंगांनी रंगवलेल्या आहेत. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. दक्षिणेकडील दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे तर उत्तरेकडील दीपमाळेवर जायला आतून जिना केलेला आहे.
या जिन्याने वरती गेल्यावर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हा चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे. बीड जिल्ह्यतील रेणापूर, शिरूर जवळील कर्डे इथेही अशाच डोलणाऱ्या दीपमाळा आहेत. तसेच गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद शहरांत रेल्वे स्टेशनजवळच्या एका मशिदेचे डोलणारे मनोरे प्रसिद्ध आहेत. पण आता तिथे जाणे सर्वसामान्यांसाठी बंद केले आहे. खान्देशामध्ये फरकांड्याचे असेच हलणारे मनोरे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे पडून गेले आहेत. नगर जिल्ह्यतल्या कर्जत तालुक्यातील असलेले राशीन हे गाव आहे तसं छोटंसच पण इथली देवी आणि तिची मोठ्ठी जत्र या परिसरात खूप महत्त्वाची आहे. राशीनची यमाई ही चतुर्भुज मूर्ती असून तिच्या हातात आयुधे आहेत. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणामध्ये श्रीजमदग्नी मंदिर, तसेच कल्लोळतीर्थ नावाची एक सुंदर बारवदेखील आहे. तसेच वीरभद्राचे पूर्वाभिमुख मंदिर, उत्तराभिमुख श्रीगजाननाचे मंदिर, काळभरव आणि शनीची मंदिरे सुद्धा मंदिर परिसरात पाहायला मिळतात. इथेच असलेल्या विष्णू मंदिरात विष्णूमूर्तीबरोबरच रुक्मिणी-विठ्ठल आणि राधा-कृष्णाच्या मूर्ती आहेत. पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वरांचे राशीन हे गाव. मंदिरातल्या एका ओवरीमधील एक संस्कृत आणि एका मराठी शिलालेखात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. इथे एकूण पाच शिलालेख आहेत. कर्जत तालुका हा रेहेकुरी या काळवीट अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य इथून जेमतेम २० कि.मी. अंतरावर आहे.
राशीनची श्रीजगदंबा
आपल्या आजूबाजूच्या परिसरात एवढी आश्चय्रे उभी आहेत की ती पाहायला जन्म पुरणार नाही. फक्त त्याची माहिती आणि ती पाहायची इच्छाशक्ती मात्र हवी.
आणखी वाचा
First published on: 26-09-2014 at 01:27 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri special