यादव काळामध्ये भरभराटीला आलेल्या मराठवाडय़ाला अनेक पलू आहेत. इथे विविध देवस्थाने आहेत, लेणी आहेत, मूर्तिकला आहे आणि उत्तमोत्तम मंदिरे आहेत. शिल्पस्थापत्यामधून या प्रदेशाची संपन्नता ध्यानात येते. अनेक महत्त्वाची देवस्थाने इथे आजही नांदती आहेत. मग ते औंढय़ा नागनाथसारखे ज्योतिìलग असो अथवा पानगाव, निलंगा, धर्मापुरीसारखी शिल्पजडित मंदिरे असोत. जालना जिल्ह्यतील अंबड हे तालुक्याचे गाव आणि इथे वसलेली मत्स्योदरी देवी हेसुद्धा त्यातलेच एक उदाहरण. दुधना आणि गोदावरी या नद्यांच्या दुआबात वसलेला अंबड तालुका हा मराठवाडय़ातला एक संपन्न तालुका म्हणून गणला जातो. अगदी इ.स.च्या १८ व्या शतकातही सरकार जालनापूरमधील अंबड हा एक प्रधान परगणा राहिला होता. अंबडच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीच पेशवेकालीन कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यात साखरे घराण्यातील काही कागद, अंबड ताम्रपट, तसेच नाईक अशी पदवी असलेल्या काळे यांच्या घराण्यातील ‘उचापती’ या सदरातली कागदपत्रे यांचा समावेश होतो. अंबडच्या मत्स्योदरी देवीबद्दल बरीच माहिती त्यातून उपलब्ध होते. या गावाची मत्स्योदरी देवी अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून तिचे स्थान हे गावाच्या अग्नेय दिशेला असलेल्या डोंगरावर आहे. ‘मत्स्यश्वरदरम यास्यासामत्स्योदरी’ या उक्तीप्रमाणे या डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले असावे. समोरून तोंड उघडलेल्या माशासारखा हा डोंगर दिसतो. मागच्या बाजूला हा निमुळता होत जाऊन माशाच्या शेपटीसारखे याचे टोक आहे. स्कंद्पुरानातील सह्यद्री खंडांतर्गत उपलब्ध कथेनुसार अंबरीश ऋषींनी कठोर तपश्चर्या करून आणि अनुष्ठाने करून महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन स्वरूपात इथे देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. सध्याचे मंदिर अभावी असून होळकर यांच्या काळातील आहे. अंबड परगणा हा होळकरांच्या खासगी दौलतीचा एक भाग होता. ही खासगी दौलत पेशव्यांकडून मल्हारराव होळकरांना एक विशेष अधिकार म्हणून मिळाली होती. आपले राज्य वृद्धिंगत व्हावे यासाठी अनेक सेवा, इनामे होळकरांनी दिली होती. अंबड येथील मत्स्योदरी देवीला त्यांनी दिलेली इनामे, जमिनी, वर्षांसने हे याचेच द्योतक आहे. सध्याचे मंदिर हे एका डोंगरावर वसले असून तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. पायऱ्या चढून वरती गेले की एक देखणे प्रवेशद्वार लागते. त्याच्या आतील दोन्ही बाजूस देवडय़ा आहेत. पुढे एक चौक आहे आणि नंतर मुख्य मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिरात तीन तांदळे असून त्याच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून इथे पुजल्या जातात. मंदिर प्रदक्षिणा मार्गावर एक देवनागरी लिपीमधील शिलालेख कोरलेला आढळतो. बाजूला काही खोल्यासुद्धा आहेत. उंचावर मंदिर असल्यामुळे इथून खालचा परिसर तसेच अंबड शहराचा देखावा फारच सुंदर दिसतो. मंदिराच्या मधल्या चौकट िभतीवर एक सुंदर शिल्प कोरलेले आहे. तीन मासे आणि त्यांचे एकच तोंड असे हे शिल्प आहे. त्याला शिल्पश्लेश असे म्हणतात. डोंगराच्या पायथ्याशी एक छोटीशी समाधी असून त्यात दगडात कोरलेले दोन मानवी पाय दिसतात. अंबरीश राजाची समाधी असे याला म्हणतात. देवस्थान परिसर खूप प्रशस्त असून या ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये खूप मोठी जत्रा भरते. माशाच्या आकाराच्या डोंगरावर वसलेली ही मत्स्योदरी देवी नक्कीच आगळीवेगळी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा