शक्तिपूजा ही अगदी आदिम काळापासून सर्व भारतभर केली जाते. विविध रूपामधील शक्तिदेवतेची आराधना करण्याची पद्धत देशभर प्रचलित आहे. दुर्गा, भवानी, महालक्ष्मी, महाकाली या आणि अशा अनेक शक्तिदेवातांचे पूजन आपण करत आलो आहोत. शक्ती म्हणजे सामथ्र्य, ताकद, ऊर्जा अशीसुद्धा भावना शक्ती या नावापाठीमागे आहे. पुराणामध्ये अंधकासुर वधाची एक कथा येते. अंधकासुराच्या वधाच्या वेळी शंकर भगवानांनी सर्व देवांकडे त्यांच्या शक्ती मागितल्या. आणि त्यानुसार सर्व देवांनी त्या शक्ती शिवाला बहाल केल्या. त्या शक्ती म्हणजे ब्रह्माची-ब्राह्मणी, इंद्राची-इंद्राणी, काíतकेयाची-कौमारी अशा होत. त्या बहुधा संख्येने ७ असतात म्हणून त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीिलगी शब्द येतो आणि त्याचा अर्थसुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तिशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरूपातील प्रतिमा दाखवली जाते. जसे की भुलेश्वरच्या मंदिरात गणेशाची शक्ती दाखवताना स्त्रीरूपातील गणेशप्रतिमा दाखवली आहे. ती काही गणेशाची पत्नी नाही तर ती गणेशाची शक्ती असते तिलाच गणेशी अथवा वैनायकी असे म्हणतात. त्याचप्रमाणे विष्णूच्या शक्तींचे मूर्तिरूपातील दर्शन आपल्याला एका सुंदर मंदिरावर पाहायला मिळते. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर होय.
चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्म अशी चार आयुधे असतात. या आयुधांचा त्यांच्या हातातील क्रम बदलला की गणिती शास्त्रानुसार २४ कॉम्बिनेशन्स होतात. त्या प्रत्येक प्रकाराला केशव, माधव, नारायण अशी संध्येत येणारी २४ नावे आहेत. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मुळात वैष्णव मंदिर होते. तारकाकृती पीठावर असलेले हे मंदिर खजुराहोच्या कांदारिया महादेव मंदिराच्या पीठाची आठवण करून देते. मंदिराला एकूण ५० स्तंभ आहेत. मंदिरावरील सर्व शिल्पे ही वैष्णव आहेत. हे लक्ष्मीचे मंदिर असावे. मुख्य कोनाडय़ातसुद्धा वैष्णव शिल्पे आहेत. अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह आहे. दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिविपडी आहे. मंदिराच्या बाह्यभागावर चोवीस वैष्णव शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. जसे विष्णूची केशव, माधव, नारायण, अशी नावे आहेत त्याचप्रमाणे या शक्तींची सुद्धा कीíत, कांती, तुष्टी, पुष्टी, धृती अशा प्रकारे चोवीस नावे आढळतात. अग्निपुराण, पद्मपुराण, चतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथांच्या आधारे ही माहिती मिळते. विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील बहुधा हे एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरीसुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. अजिंठय़ाला जाताना मुद्दाम, आवर्जून अन्वा या ठिकाणी थांबून हे मंदिर पाहून घ्यावे. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे या दर्जाचे आहे. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा होय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा