आदरांजली
नेल्सन मंडेला गेले. आयुष्यातली २७ वर्षे तुरुंगवासात घालवणाऱ्या या माणसाला कधी निराशेने स्पर्श केला नाही की जीवनाबद्दलची त्यांची आसक्ती कमी झाली नाही. आयुष्याप्रमाणेच त्यांनी राजकारणातल्या आपल्या व्यवहारांमध्येही खुलेपणाच ठेवला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या पैलूविषयी-
कोणत्याही राजकीय व्यक्तीचा विचार करताना त्या व्यक्तीला ‘कोणत्या ना कोणत्या विचारधारेच्या कप्प्यात बंदिस्त करणे’ हे मानवी स्वभावाचे अविभाज्य अंग आहे. एक तर असे केल्याने त्या व्यक्तीवर टीका करणे सोपे जाते शिवाय त्या व्यक्तीला देवत्व बहाल केले जाणार नाही याची काळजी तिच्यातील वैचारिक उणिवा दाखवून करता येते. त्याच वेळी समाजातील एक घटक सर्वतोपरी प्रयत्न करून अशा व्यक्तींना ईश्वरत्व बहाल करण्याचा प्रयत्न करीत असतो. या द्वंद्वातून ती व्यक्ती समजून घेताना मात्र निखळ आनंद मिळाल्यावाचून राहात नाही.
६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेत राहणारे ‘भारतरत्न’ निखळले. दहा हज्जार दिवस सूर्य न पाहिलेला नेल्सन मंडेला नावाचा स्वातंत्र्यसूर्य अस्ताला गेला. नेल्सन मंडेला यांचे आत्मचरित्र वाचताना सातत्याने समोर येणारी बाब म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. एक राजकारणी असूनही आपले सारे आयुष्य प्रामाणिकपणे घालविणाऱ्या या नेत्याच्या आयुष्याच्या बांधणीची ही कहाणी..
नेल्सन यांचे मूळ नाव रोलिल्हाल्हा.. या नावाचा अर्थ होतो ‘खटय़ाळ’ किंवा ‘उनाड’ तर इंग्रजी भाषक ख्रिस्ती शाळेत दाखल झाल्यानंतर शाळेतील बाईंनी ठेवलेले नाव म्हणजे नेल्सन. या नावाचा अर्थ आहे, ‘अजिंक्य योद्धा’.. आपल्या ९५ वर्षांच्या आयुष्यात परस्पर विरोधी छटा आणि प्रतिमा असणारी ही दोन्ही नावे मंडेला जगले. शालेय जीवनाचा, तेथे शिकलेल्या गोष्टींचा मानवी मनावर आयुष्यभर प्रभाव राहतो असे म्हणतात. छोटा नेल्सन शाळेत तर मोठय़ा हौसेने जाई, पण त्याचबरोबर आपल्या ‘कळपा’मध्ये खोसा आणि थेंबू या आफ्रिकेतील दोन जमातींच्या ऐतिहासिक कथांचे श्रवणही तितक्याच तल्लीनतेने करीत असे. वस्तुत: मंडेला हे थेंबू या आदिवासींच्या राजघराण्यातील. पण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात नमूद करून ठेवले आहे की ‘थेंबू आणि खोसा वीरांच्या कथा ऐकताना माझ्या बालमनात सर्व जातींच्या निरपेक्ष वीरतेचे कौतुक निर्माण झाले’. समतेच्या तत्त्वाची बीजे मंडेलांच्या आयुष्यात अशा पद्धतीने पेरली गेली.
शाळेत सगळेच जातात, अभ्यासही करतात, उत्तीर्णही होतात. पण शाळेत शिकविल्या जाणाऱ्या गृहीतकांना आव्हान देत नाहीत किंवा आपल्याला काही चुकीचे शिकविले जात असेल असे कुणाला चुकूनही वाटत नाही. मंडेला यांचे वेगळेपण आणि त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मी इथून सुरू होते. शालेय जीवनात इतिहास हा मंडेलांचा आवडीचा विषय. आपल्या जमातीच्या ‘मुखियां’कडून ऐकलेल्या गोष्टी आणि इतिहासातील दाखले यांत काही दुवे आहेत का हे नेल्सन तपासू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ब्रिटिशांकडून शिकविला जाणारा इतिहास हा आफ्रिकेचा खरा इतिहास असेलच असे नाही किंबहुना त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, ‘आफ्रिकेचा खरा इतिहास ब्रिटिश पुस्तकांमधून वाचायला मिळणारच नाही’ आणि इथूनच त्यांच्या मनातील प्रामाणिकपणाने, निरागसतेने आणि स्वातंत्र्याच्या निकडीने तीव्र उचल घेतली.
आयुष्याची २७ वष्रे स्वत: तुरुंगात असतानाही, या माणसाच्या अंत:करणातील स्वातंत्र्याची अखंड, अविरत प्रेरणा अविचल राहिली. त्यांच्या शालेय जीवनातील आणखी दोन प्रसंग मंडेला यांच्या स्वभावाची जडणघडण अधोरेखित करतात. नव्या आणि खऱ्या अर्थाने ‘गोऱ्या’ शाळेत प्रवेश घेताना मंडेला यांना ‘राजसल्लागार’ होण्यासाठी शिकायचे आहे, असे त्यांच्या मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. आपण राजघराण्यातील असल्यामुळे आपल्याला विशेष वागणूक मिळेल असा मंडेलांचा कयास होता. प्रत्यक्षात त्या शाळेत आलेली सर्वच मुले कोणत्या ना कोणत्या राजघराण्याशी जोडली गेलेली होती. यामुळे, ‘विशेष वागणुकीच्या’ बाबतीत नेल्सन यांचा भ्रमनिरास झाला. पण यातून लहानग्या नेल्सननी घेतलेला बोध खूप महत्त्वाचा आहे. ‘आयुष्यात राजघराण्यातील आहोत या सबबीने नव्हे तर स्वकर्तृत्वाने मार्ग शोधावा लागतो’. पुढील आयुष्यात मंडेला यांना ज्या भीषण अनुभवांना, अन्यायांना सामोरे जावे लागले ते जाताना त्यांच्या अंत:करणातील निरागसता आणि स्निग्धता कायम राहिली त्याचे मूळ या प्रसंगात आहे.
याच शाळेत एकदा परीक्षा तोंडावर आलेली असताना इंग्रजी आणि इतिहास या विषयांमध्ये आपली काही डाळ शिजत नाही हे मंडेलांना समजून चुकले. तशी भीतीही त्यांनी आपल्या मत्रिणीकडे व्यक्त केली. तेव्हा मत्रिणीने त्यांना आश्वस्त करताना, काळजी करू नकोस. आपल्या शिक्षिका या पहिल्या कृष्णवर्णीय महिला पदवीधर आहेत, त्या आपल्याला नापास नक्कीच करणार नाहीत, असे सांगितले. आपल्या एका मुलाखतीत मंडेलांनी हा प्रसंग नमूद करताना सांगितले की, त्या वेळी मी उत्स्फूर्तपणे तिला म्हणालो ‘‘जे माहीत नाही ते माहिती आहे असे भासविण्याची हुशारी माझ्या अंगी आलेली नाही, त्यामुळे हा मार्ग अनुसरणे मला जमेल असे वाटत नाही’’. मंडेला यांच्या नेतृत्वाला जो प्रतिसाद जगभरातून लाभला त्याचे कारण त्यांच्या या प्रांजळ स्वभावात आपल्याला दिसते..
नेल्सन मंडेला हे गांधीजींनी मांडलेल्या स्वातंत्र्यलढय़ाच्या पद्धतीचे पाईक असल्याचे आपण मानतो, पण त्यामागील खरे कारण वेगळे आहे. मंडेलांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे एक वैशिष्टय़ं होते ते म्हणजे ‘प्रश्न तत्त्वांचा नसून क्लृप्त्यांचा – डावपेचांचा आहे’ या मूल्यावरील त्यांची दृढ श्रद्धा. आपल्या आत्मचरित्रात मंडेलांनी याबद्दल जे नमूद केले आहे ते उद्धृत करणे गरजेचे आहे : ‘िहसक चळवळ दडपणे सरकारला सहज शक्य झाले असते त्यामुळे, अिहसक मार्गाचा वापर करणे ही व्यावहारिक गरज होती. एक डावपेच म्हणून तो मार्ग मी स्वीकारला होता. गांधीजींप्रमाणे एक शाश्वत मूल्य म्हणून मी ते स्वीकारले नव्हते!’ आपल्या राजकीय विचारसरणीचा पाया व्यावहारिकतेवर आणि उपयुक्ततेवर आधारलेला होता, हे जगजाहीर करण्यात मंडेला यांना जराही कमीपणा वाटला नाही, हे त्यांचे वेगळेपण.
रिचर्ड स्टेंगेल यांनी टाइम साप्ताहिकात मंडेला यांच्या नेतृत्वातील वेगळे पलू मांडले होते. त्यातील दोन पलू तर सर्वार्थाने भिन्न होते. मंडेला यांचे बालपण रानावनात हुंदडण्यात गेले होते. त्या वेळी त्यांनी मेंढय़ा पाळण्याचे कसब आत्मसात केले होते. मेंढय़ांच्या कळपाला सांभाळायचे तर, त्यांच्या नेत्याला म्हणजे मेंढपाळाला त्यांच्या मागे राहावे लागते. नेत्याने आघाडीवर राहून नेतृत्व करावे ही जगाची रीत. पण कळप सांभाळताना त्याचे मानसशात्र वेगळे असते हे मंडेलांनी हेरले. कळपाचे नेतृत्व करणाऱ्याने नव्या कल्पना मांडण्याची – काय करायचे ते सांगण्याची गरज नसते, तर कळपामध्ये जेव्हा मतभेद निर्माण होतात तेव्हा मतक्य निर्माण करण्याची गरज असते आणि म्हणूनच नेतृत्वाने आघाडीवर राहण्यापेक्षा मागे राहण्याची गरज मंडेला अधोरेखित करतात. शिवाय याचा आणखी एक फायदा असतो, असे उपयुक्ततावादी स्पष्टीकरणही खुद्द मंडेला देतात.. आपली संकल्पना इतरांवर लादण्यापेक्षा संकल्पना अशा पद्धतीने मांडली जावी की प्रत्येकाला ‘ही तर मीच मांडलेली संकल्पना’ असे वाटले पाहिजे, असे त्यांचे धोरण होते.
दुसरी बाबही अशीच. आपले मित्र आणि आपल्या विरोधातील बंडखोर यांच्याविषयीची. विश्वासू व्यक्तींच्या वर्तुळात बंडखोर कमी धोकादायक असतात, मात्र जर मोकळे रान मिळाले तर ते अधिक ‘तापदायक’ ठरू शकतात. हे लक्षात घेत ‘मित्रांना दूर ठेवू नयेच, पण बंडखोरांना अधिक जवळ करावे आणि त्यांचे अंत:करण जिंकून घ्यावे,’ असे सूत्र मंडेला मांडत असत. मंडेला राजकारणी म्हणून किती व्यावहारिक, धूर्त आणि ‘प्रॅग्मॅटिक’ होते याचे हे उत्तम उदाहरण.
मंडेला आयुष्याची २७ वष्रे तुरुंगात होते. यापकी काही कालावधी तर असा होता की, जेव्हा त्यांना वर्षांतून केवळ दोन पत्रे लिहिण्यास आणि दोन पुस्तके वाचण्यास परवानगी होती. आपल्याला एक बाब लक्षात घ्यायला हवी की अवघ्या आठ बाय नऊच्या कोठडीत, त्या अंधारात एकटय़ाने आयुष्य घालविण्याची २७ वष्रे सवय झाल्यानंतर मंडेला यांना एकलकोंडेपणा आला असता तरी कोणालाही त्यात आक्षेपार्ह वाटले नसते. आपले जीवनावरील प्रेम, आपली आसक्ती आणि माणसाच्या अस्तित्वाची दृढ ओढ त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. उलट तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे काही विवाह झाले. त्यांचे देखणेपण हे की त्यांनी या साऱ्या बाबी खुल्या अंत:करणाने जगासमोर ठेवल्या. मानवी जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या माणसाला माणसाचेच दर्शन दुर्लभ होणे यापेक्षाही अमानवी ते काय, आणि हीच मला झालेली खरीखुरी शिक्षा होती, असे मंडेला म्हणत असत.
बाबा आमटे यांनी लिहिलेल्या ‘गांधी : एक युगमुद्रा’ या कवितेत म्हटले आहे –
‘सामान्य माणसासारखे प्रमाद गांधींनीही केले,
पण.. सामान्य माणूस जे कबूल करायला बिचकतो ते त्यांनी जगजाहीर केलं.’
मंडेला आणि गांधीजी यांच्यातील फरक पूर्णपणे मान्य करतानाही, या ओळी मंडेला यांनाही तंतोतंत लागू पडतात हे मांडल्यावाचून राहवत नाही.
एका नेत्यासमोरील खरे आव्हान असते ते त्याच्या निवृत्तीच्या प्रसंगात. कारण असा नेता निवृत्त होत असताना त्याने उभं केलेलं काम तो ज्या हातांमध्ये सोपवितो ते हातही तितकेच बळकट असणे गरजेचे असते. राजकीय जीवनातून- सत्तास्थानातून निवृत्ती घेणे ही काही सामान्य बाब नाही. मंडेला यांनी मात्र पिकले पान झाडावरून ज्या सहजतेने गळून पडावे त्या सहजतेने सत्तेच्या सिंहासनाचा त्याग केला. शिवाय आपल्यानंतर नवस्वतंत्र झालेले दक्षिण आफ्रिका नावाचे बाळ अत्यंत सुरक्षित हातात राहील हेही पाहिले. आधी थाबो म्बाकी आणि आता जेकब झुमा यांच्या हातात आफ्रिका अभंग आहे. तात्पर्य, मंडेलांनी आपल्या हाती सत्तेच्या दोऱ्या ठेवण्यापेक्षा स्वतंत्र विचारसरणीची, दक्षिण आफ्रिकेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झुंजण्याची जाणीव असलेली पिढी तयार केली. देशात लोकशाही आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार लागू करणे, शक्य असूनही राजकीय कारकीर्द न लांबविणे आणि प्रगल्भ नेतृत्व तयार करणे हे मंडेला यांचे कर्तृत्व मानावे लागेल.
आपल्या अिहसक लढय़ानंतरही मंडेला यांचा लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गड्डाफी आणि क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो यांना पािठबा होता. या विरोधाभासाचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल, असा सवाल एका अमेरिकन पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर मंडेला यांनी फार उत्तम आणि नेमके उत्तर दिले. ते म्हणाले, ‘अमेरिका प्रत्येक गोष्टीकडे ‘ब्लॅक ऑर व्हाइट’ याच दृष्टिकोनातून पाहते म्हणून असे वाटते तुम्हाला. जगात सारे काही काळे किंवा पांढरे नसते. कोणत्याही घटनेमागे अनेक कारणे असतात आणि कोणत्याही प्रतिसादाचे अनेक आयाम! माझ्या मते, मला शेवट काय हवा आहे आणि तिथे पोहोचण्याचा सर्वात प्रभावी व्यावहारिक मार्ग कोणता हाच खरा प्रश्न आहे, आणि या निकषावर हे दोघेही निर्दोष ठरतात. म्हणून मला ते आवडतात.’ इतका खुलेपणा, राजकारणात राहूनही इतके प्रांजळपण आणि आपल्याला आदर्शवादी म्हणून जग ओळखत असतानाही व्यवहारांवरील दृढ निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पलू होते.
मंडेलांचं शक्तिस्थान हे होतं की त्यांनी आयुष्यात व्यावहारिकतेची कास कधीच सोडली नाही आणि हे प्रामाणिकपणे कबूल करण्यात कधी कद्रूपणा केला नाही. पण त्यांचं दुर्दैव हे आहे की, राजकारणात राहूनही प्रांजळपणे जगण्याच्या त्यांच्या व्यावहारिकतेला महत्त्व देण्याऐवजी बहुतांश जणांनी ते वास्तववादापेक्षाही कसे आदर्शवादी होते याच्याच प्रतिमा उभ्या करण्याचा जिवापाड प्रयत्न केला.
मंडेला नावाचे वादळ!
<span style="color: #ff0000;">आदरांजली</span><br />नेल्सन मंडेला गेले. आयुष्यातली २७ वर्षे तुरुंगवासात घालवणाऱ्या या माणसाला कधी निराशेने स्पर्श केला नाही की जीवनाबद्दलची त्यांची आसक्ती कमी झाली नाही. आयुष्याप्रमाणेच त्यांनी राजकारणातल्या आपल्या व्यवहारांमध्येही खुलेपणाच ठेवला.

First published on: 13-12-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nelson mendela