नोव्हेंबर महिना हा हेमंत ऋतूचा अर्धा भाग आहे. या महिन्यात उत्तम व्यायाम तर करावाच, शिवाय अल्प आहार घेऊन आपले प्रकृती स्वास्थ्य सुधारावे असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.
यंदाचा नोव्हेंबर महिना दिवाळीनंतर बरोबर एक आठवडय़ांनी येत आहे. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांचे गणेशोत्सव, नवरात्र-दसरा, दिवाळी असे सण मागील दोन महिन्यांत, मोठय़ा उत्साहात साजरे केले गेले. शाळा-कॉलेजांच्या दिवाळीच्या सुट्टय़ा संपवून अभ्यासू मुलेमुली मोठय़ा उत्साहाने अभ्यासाला लागली आहेत. १ नोव्हेंबर कुष्मांडनवमी म्हणून फार प्राचीन काळापासून साजरा करण्याचा सण आहे. या निमित्ताने कोहळा या भाजीची तुम्हीआम्ही दखल घ्यायलाच पाहिजे. दिवसेंदिवस आवळ्याच्या च्यवनप्राशची चलती खूप आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा कोहळ्याच्या वडय़ा या निमित्ताने तुम्हीआम्ही खाऊ या! शरीरात सहजपणे रस, रक्त, मांस धातूंचा पुरवठा करणाऱ्या-कुष्मांडाला स्मरू या! कोहळ्याच्या भाजीला जून कोहळा चालत नाही, पण ज्यांना कोहळ्याच्या वडय़ा, कुष्मांडपाक, घरच्याघरी तयार करायचा आहे त्यांनी जून व भरपूर बिया असणाऱ्या कोहळ्याचीच निवड करावी असा आयुर्वेदाचा सांगावा आहे.
२ नोव्हेंबर हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून अलीकडे विविध मोठय़ा शहरात कटाक्षाने पाळला जातो. त्याकरिता समाजातील सर्वच घटकांना पर्यावरणाचे, सर्व प्रकारच्या स्वच्छतेचे भान ठेवायला हवेच. ३ नोव्हेंबर या दिवशी प्रबोधिनी एकादशी व पंढरपूर यात्रा संपन्न होत असते. ‘पंढरीच्या रायाचे’ नुसते तुम्हीआम्ही दर्शन घेतले तरी आपले मनाचे व विचाराचे निश्चितच प्रबोधन होईल. यंदा ४ नोव्हेंबरला तुलसीविवाह तिथी येत आहे. त्याच दिवशी मुस्लीम बांधवांचा मोहरम (ताजिया) सण साजरा केला जातो. चातुर्मासानिमित्ताने केलेल्या व्रताची सांगता या दिवशी होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध ज्यांनी बंड पुकारून सशस्त्र लढा दिला अशा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन ४ तारखेला येतो. ५ नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी, संत गोरखनाथ प्रकटदिन व मराठी रंगभूमी दिन असे साजरे करण्याची संधी, आपल्या समाजातील भिन्न भिन्न घटकांना आहे. ६ नोव्हेंबर गुरुनानक जयंती व त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे. त्याच दिवशी तुलसीविवाह समाप्तीनिमित्ताने तुलसीमातेची आठवण ठेवू या. आगामी थंडीच्या मोसमात तुम्हाआम्हा सर्वाना सर्दी, पडसे, खोकला, दमा, आवाज बसणे, फ्लू किंवा थंडी-तापासारख्या आजारांपासून लांब ठेवायला, तुळशीच्या ताज्या दहा पानांची सकाळ-सायंकाळ अवश्य मदत घेऊ या. ९ नोव्हेंबर रोजी थोर सामाजिक नेतृत्व भारतरत्न धों.के. कर्वे यांचा पुण्यतिथी दिवस आहे. काही मंडळींना ‘तेरा हा आकडा उगाचच अशुभ वाटतो. १३ नोव्हेंबर रोजी गुरू पुष्यामृत योग आहे. त्या निमित्ताने किमान एक ग्रॅम खरे सोने विकत घ्यावयाची हिम्मत करू या! ज्यांना आपल्या शरीरात ऊर्जेचा अभाव जाणवतो, नेहमी नेहमी थंडी वाजत असते, गारठा नकोसा होतो, त्यांनी अस्सल बावनकशी एक ग्रॅम सोन्याचे वळे दोन कप पाण्यात उकळवावे, आटवावे व असे पाणी नियमितपणे किमान महिनाभर घ्यावे. शरीरात ऊर्जा तर मिळतेच, पण त्वचेला सु-वर्ण, चांगली कांती येण्यास मदत होते. ‘विसाव्या शतकातील ज्ञानेश्वर’ अशी ख्याती असणाऱ्या भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांची पुण्यतिथी १५ नोव्हेंबर रोजी आहे. त्या निमित्ताने ‘औषधाविना उपचार’चे उद्गाते यांची आठवण मला नेहमीच येते. आपल्या भूदान यज्ञाच्या निमित्ताने हैदराबाद येथील प्रवासात खूप तीव्र ताप आलेला असताना, कसलेही औषध न घेता ग्लासभर गरम पाणी पिऊन सोबतच्या डॉक्टर पथकाला ज्वर-मुक्ततेचा धडा घालून देणाऱ्या संतांना नम्र प्रणाम करू या!
भारताचे पहिले पंतप्रधान, तमाम भारतीय बालकांचे आदर्श नेते म्हणून १४ नोव्हेंबरला देशभर बालदिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर रोजी ‘लाल, बाल, पाल’ या स्वातंत्र्यपूर्व लढय़ातील थोर स्वातंत्र्य योद्धांच्या त्रयीतील लाला लजपत रायांचा जन्मदिवस आहे. २० नोव्हेंबर रोजी श्रीसंत दासगणू महाराज पुण्यतिथीनिमित्ताने थोडे अंतर्मुख होऊ या! २३ नोव्हेंबर ‘देवदीपावलीनिमित्ताने घारगे, वडे करू या! शेजारीपाजारी वाटू या. उरले तर खाऊ या.’ २४ नोव्हेंबर हा दिवस शीख संप्रदायाच्या दहा गुरूंपैकी गुरू श्रीतेगबहादूर शहीद दिन म्हणून; आत्मसमर्पणाची कमाल म्हणून आपण सर्वच स्मरण ठेवू या. २८ नोव्हेंबर या दिवशी तीन थोर भारतीय देशभक्त व संतांचे, महात्मा जोतिबा फुले, संत रोहिदास व सेनापती बापट यांचे आठवणीने स्मरण करू या.
आयुर्वेदीय कालगणनेप्रमाणे यंदाचा समस्त नोव्हेंबर महिना हा हेमंत ऋतूतला अर्धा भाग आहे. नोव्हेंबर महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस आपण अल्प आहाराने आपली पचनशक्ती सुधारू या. शारंगधर संहिता या प्राचीन आयुर्वेदीय गं्रथाप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे पहिले पंधरा दिवस हे यमदंष्ट्रा म्हणजे अल्प आहाराचे असावेत. त्यामुळे आगामी काळात आरोग्य चांगले राहते. अन्यथा घाईघाईने आहार वाढवला, तर ‘यमराजांच्या दाढदुखीसारखा’ त्रास होतो. नोव्हेंबर महिना हा आगामी हिवाळय़ाचा प्रारंभ आहे. या काळात मानवी शरीराला ‘आयुर्वेदीय पंचकर्म’ या उपचार पद्धतीची अजिबात आवश्यकता नसते. या काळात तबियत कमाविण्याकरिता, मधुर रसाचे प्राबल्य असणाऱ्या विविध रसायन औषधांची जरूर मदत घ्यावी. उदा. आवळ्याचा च्यवनप्राश, आस्कंद वनस्पतीचा अश्वगंधापाक, कोहळ्याचा कुष्मांडपाक, मलावरोधाचा त्रास असल्यास एरंडपाक किंवा ताज्या एरंडबियांची लापशी यांची मदत नि:संकोच घ्यावी. आयुर्वेदात सुंठ या आपल्या नेहमीच्या मसाल्याच्या पदार्थाला अनन्य साधारण महत्त्व आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हिवाळय़ात खूप आहार वाढविल्यामुळे जर मलावरोधाचा त्रास होत असेल तर ‘हिरडा चूर्ण’ घ्यावयाचा सल्ला दिला जातो. हे चूर्ण सुंठेबरोबरच या काळात घ्यावे. असा शास्त्राचा सांगावा आहे.
नोव्हेंबर महिन्यात हळूहळू गारठा वाढत असतो. आकाश निरभ्र असते. ज्यांनी पूर्वीच्या उन्हाळा-पावसाळय़ात रोगप्रतिकारशक्ती गमावलेली आहे त्यांच्याकरिता ‘पुनश्च हरी ओम’ म्हणून प्रात:काळी व्यायाम सुरू करायला काय हरकत आहे? श्री सूर्यनमस्कार, जोर, बैठका किंवा दोरीच्या उडय़ा, डंबेल्स, पळणे अशा व्यायामांना पैसा पडत नाही हे सांगावयास नकोच. तुम्ही अगोदरपासूनच जर कोणता तरी व्यायाम करत असाल तर तो या महिन्यात जरूर वाढवावा. या पृथ्वीवरील समस्त प्राणिमात्रांना, सर्व तऱ्हेचे श्रेष्ठ बल, शारीरिक व मानसिक बल मिळवण्याचा हा काल आहे. या काळात बहुतेक मनुष्यप्राण्यांपासून अनेकानेक रोग लांबच असतात. पुरेसा व्यायाम व पुरेसा आहार ठेवला तर संभाव्य वातविकार योग्य पोषणाने लांब ठेवता येतात. हा ऋतू थंड असल्यामुळे पित्ताचे विकार सहसा संभवत नाहीत. त्यांची रोगप्रतिकारशक्ती काही कारणाने कमी झालेली असते अशा मधुमेह व रक्तदाबग्रस्त रुग्णांनी मात्र वातकफप्रधान रोगांपासून जपायला लागते. कारण त्यांना पक्षाघात किंवा हृद्रोग या विकारांपासून जपावे लागते. अशा रुग्णांनी हिवाळा सुरू झाला असला तरी आहारविहारात ‘संयमसे स्वास्थ्य’ हा मंत्र जरूर जपावा.
नोव्हेंबर महिन्यात काहींना थंडीच्या सुरुवाती सुरुवातीला पायांच्या भेगांचा त्रास सुरू होतो, त्याकरिता खोबरेल तेल, एरंडेल तेल, घरगुती लोणी वा तूप किंवा शंभर वेळा तांब्याच्या ताम्हणातील पाण्यात घोटून तयार केलेल्या ‘शतधौत घृताची’ मदत अवश्य घ्यावी. काही मंडळींना शरीरातील रक्तदाब वाढल्यामुळे अर्दित किंवा फेशियल पॅरालिसिसचा धोका संभवतो. अशांनी जेवणात शक्यतो मिठाचा वापर टाळावा. तुम्ही आम्ही बहुतेक शहरवासीय ‘व्हाइट कॉलरवाले, ब्ल्यू-कॉलरवाले’ आहोत. ‘आपण काही खड्डे खणत नाही, ओझी वाहत नाही, हमाली काम तर अजिबात करत नाही. आपल्या घरात सतत पंखा, ऑफिसमध्ये पंखा, ए.सी. अशा आपल्यासारख्या बैठय़ा कामवाल्यांना मिठाची अजिबात गरज नसते. आपण नुसते जेवणात व लोणची-पापड किंवा चमचमीत पदार्थ खूप मीठ असणारे खाणार व विविध वात, पित्त, कफ विकारांना आमंत्रण देणार! ज्यांच्या ‘फॅमिली हिस्ट्रीमध्ये’ आई-वडिलांना झालेल्या अर्धागवाताची आठवण आहे त्यांनी निश्चयाने किमान एकवेळ अळणीच जेवावे.
वर सांगितलेल्या अतिस्थूल रक्तदाब किंवा मधुमेहग्रस्त व्यक्ती सोडून बाकीच्या वाचक मित्रांनी नोव्हेंबर महिन्यातील थंडीचा फायदा घेण्याकरिता मधुर व लवणरस प्रधान, गुरू व स्निग्ध गुणाच्या आहाराची अवश्य मदत घ्यावी. अजिबात अनमान करू नये. त्याकरिता यापूर्वी सांगितलेल्या सुकामेव्याच्या अकरा पदार्थाची अवश्य मदत घ्यावी. सुकामेव्याच्या पुढील ‘एकादशव्रताचा’ अंगीकार करा, तबियत कमवा. अक्रोड, अंजीर, काजू, खारीक, खोबरे, जर्दाळू, पिस्ता, बदाम, बेदाणा, मनुका व भाजलेले शेंगदाणे. ज्यांचा पाचकाग्नी किंवा पचनशक्ती चांगली आहे त्यांनी योग्य व्यायामानंतर एखाद-दुसरा डिंक लाडू खावा. पचनाची भीती असल्यास मूग-मेथीचा मिक्स लाडू आठवणीने खावा.
नोव्हेंबर महिन्यात शेतातून नवीन धान्य आलेले असते. आपल्या समाजात जुन्या तांदळाचे महत्त्व किंवा अप्रूप सर्वानाच असते. मग ‘नवीन तांदूळ’ कोणी खायचा? या महिन्यात नवीन तांदूळ अवश्य वापरा. त्याचा भात करताना कमी पाणी वापरा, हे मराठी सुग्रण महिलांना सांगावयास नकोच. या काळात अकारण वायू वाढविणारा, खूप पातळ पदार्थ असणारा आहार शक्यतो टाळावा. ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांनी गव्हाऐवजी ज्वारी किंवा सातूची मदत अवश्य घ्यावी. पण सर्वसामान्यपणे गहू, हरभरा, वाटाणा, उडीद, चवळी, राजमा, मका, सोयाबीन, ओट्स अशा विविध पौष्टिक आहारद्रव्यांची मदत आलटून-पालटून जरूर घेऊ या. आगामी वर्षांकरिता आरोग्याच्या बेगमीकरिता सर्व प्रकारच्या धान्ये, कडधान्ये, ताजी फळफळावळे, भाज्या यांचा आस्वाद घ्यायला हाच योग्य ऋतू-महिना आहे.
आपल्या दिवसाची सुरुवात आपण नेहमी शौच मुख मार्जनानंतर नित्य स्नानाने करतो. सर्वसाधारणपणे स्नानाला गार पाणी केव्हाही चांगले. पण ज्यांनी सकाळी, सकाळी पुरेसा व्यायाम केला आहे त्यांनी आपल्या स्नानाअगोदर स्वहस्ते आपल्या सर्वागाला अभ्यंग-तेल जिरवणे अवश्य करावे व त्यानंतर कोमट पाण्याने स्नान करावे. अजिबात अनमान करू नये. साबणाऐवजी आवळकाठी, कापूरकाचरी, हिरडा, बेहडा, नागरमोथा, उपळसरी, हळद, चंदन, वाळायुक्त ‘हेमांगी’ किंवा अशीच सुगंधी द्रव्ये असणारे उटणे वापरावे. निवृत्त वृद्ध मंडळींनी सकाळच्या स्नानानंतर नोव्हेंबर महिन्यातील कोमल सूर्यकिरणात अवश्य बसावे. सायंकाळी व पहाटेच्या थंडीत हातमोजे, पायमोजे, स्वेटर, मफलर अशांची मदत घ्यायला संकोच करू नये. दिवसभरात गडद रंगाचे कपडे घालण्याकरिता हाच योग्य ऋतू आहे. ज्यांना राहण्याकरिता मोठय़ा जागेचे भाग्य लाभले आहे त्यांनी खासकरून ऐसपैस मोठे अंथरूण झोपेकरिता निवडावे. गरजेप्रमाणे मऊ चादर, कांबळ, ब्लँकेट किंवा जाड रग, दुलई यांची मदत अवश्य घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी अवश्य फिरून यायला हवे हे सांगायला नकोच. रात्री निद्राधीन होण्याअगोदर जी व्यक्ती किमान वीस-तीस मिनिटे फिरून येईल तिला पहिली झोप उत्तम लाभते. दुसऱ्या दिवशीच्या जीवन संग्रामाला ती समर्थपणे नवीन उत्साहात, नवीन जोशात तोंड देऊ शकते.
तबियत ठीक रखो।
हिम्मत करो। हिम्मत बढाओ।
शुभं भवतु।