रग्बी या खेळाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? या खेळात आपला संघ आहे आणि त्याचा कर्णधार हृषीकेश पेंडसे नावाचा मराठी तरुण आहे हे माहीत आहे? तो लौकरच जपानमधली एक व्यावसायिक लीग स्पर्धा खेळण्यासाठी रवाना होतोय.. त्याच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल-
रग्बी म्हटलं की आडदांड-धिप्पाड माणसांचा धसमुसळा खेळ हे चित्र आपल्यासमोर उभं राहतं. वीकेंडच्या दिवशी टीव्हीवर सकाळी या रासवट खेळाचे सामने दाखवले जातात. दर्दी ते आवर्जून पाहतात, पण बाकीचे, त्यातलं काहीच न कळणारे मात्र, ‘काय हा आडदांड खेळ’, ‘काय एकेक खेळ शोधून काढलेत’, ‘हे पाहून मारामारी शिकायची का मुलांनी’ अशा प्रतिक्रिया देत असतात. पण तरीही न्यूझीलंड, जपान, इंग्लंड या देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय अशा या खेळाने भारतात पाय रोवायला सुरुवात केली आहे.
क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट हाच धर्म असणाऱ्या आपल्या देशात इतर कुठल्याही खेळाला प्रतिसाद मिळणं तसं थोडं कठीणच जातं. त्यातही थोडय़ा प्रमाणात हॉकी आणि फुटबॉलने तरुणांची मनं जिंकली आहेत. बाकी टेनिस, बॅडिमटन, कबड्डी हे खेळ खेळले जातात, पण त्यांना ‘ते’ वलय नाही. अशा वातावरणात हृषीकेश पेंडसे या एका मराठी तरुणाने चक्क रग्बीसारख्या खेळात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. रग्बी हा खेळ म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने नियमांच्या चौकटीत राहून एकमेकांशी लठ्ठाझोंबी करत गोल करायचा असतो. भारतीय रग्बी संघाचा कर्णधार असलेला हृषीकेश येत्या काही दिवसांत जपानमधली एक व्यावसायिक लीग स्पर्धा खेळण्यासाठी रवाना होत आहे. त्याच्याशी केलेली खास बातचीत-
हृषीकेश पेंडसे हे नाव, मुंबईची पाश्र्वभूमी आणि रग्बी या तीन गोष्टी एकत्र कशा आल्या?
तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे. मी मुंबईत लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे. माझीही या खेळाशी उशिरा ओळख झाली. जयहिंदू कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा मित्राच्या वडिलांनी बॉम्बे जिमखान्यात डिनर पार्टी आयोजित केली होती. ते स्वत: रग्बी खेळाडू होते. बॉम्बे जिमखान्यात त्या पार्टीसाठी आल्यानंतर हा खेळ पाहायला मिळाला. पाहताक्षणीच आपण हे करू शकतो असं वाटलं. रग्बीशी माझी झालेली ही पहिली ओळख. त्यानंतर या खेळाशी नातं जोडलं गेलं, ते कायमचंच.
तुझ्या घरी खेळाची काही पाश्र्वभूमी आहे का?
हो. आमचं कुटुंब मूळचं कोल्हापूरचं. खेळ आमच्या रक्तातच आहे असं म्हटलं तरी चालेल. माझे आजोबा अमेरिकेत होते. तिथे ते कुस्ती खेळायचे. माझी आजी टेबल टेनिसपटू होती. माझी आई उत्तम बॅडमिंटन खेळते. माझ्या लहान भावाने रग्बी खेळायला सुरुवात केली आहे. एकंदरीत घरी खेळ, खेळणं हे वातावरण नवीन नाही. त्यामुळे माझा खेळ वेगळ्या स्वरूपाचा असला तरी खेळाचं वावडं नव्हतं.
लहानपणापासून एखाद्या खेळाशी संलग्न होतास?
हो. ब्रीच कँडी परिसरात मी राहतो आणि माझी शाळा कॅथ्रेडल जॉन स्कूल, फोर्ट. लहानपणी मी खूप आक्रमक होतो. त्यामुळे बरीच वर्षे मी स्क्वॉश खेळत होतो. बास्केटबॉलची मला आवड होती. शालेय शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात मला ज्युडोची आवड निर्माण झाली. या खेळातले बारकावे मी आत्मसात केले. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरच्या खेळात मी सहभागी झालो, अनेक पदकं जिंकली. आक्रमकतेला साजेशा या खेळाने मला खूप काही दिले.
बॉम्बे जिमखान्यात रग्बीची ओळख झाली. प्रशिक्षण कधी सुरू झाले? आणि या खेळाचे स्वरूप कसे असते.
२००३ मध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाली. पाहायला मजा येत असली तरी रग्बीचे प्रशिक्षण अतिशय खडतर असते. धक्काबुकी, खांद्याने पाडणे या कृतीमध्येही नियम पाळणे आवश्यक असते. प्रतिस्पर्धी खेळाडूला इजा होईल असे वर्तन न करता संघासाठी गोल करता येईल, गुण मिळवता येईल यासाठी सगळे प्रयत्न सुरू असतात. साधारणपणे प्रत्येक संघात १५ खेळाडू असतात. स्पर्धेच्या स्वरूपानुसार काही वेळेला प्रत्येकी ७ सदस्यीय संघही असतो. रग्बी हा कुस्ती, खो-खो आणि कबड्डी या तीन खेळांचे मिश्रण आहे असे मला वाटते. प्रतिस्पध्र्याला लोळवण्याचे कौशल्य कुस्तीतले आहे. खो-खो आणि कबड्डीत तुम्हाला डॉजिंग, झेप घेऊन पकडणे, पाठलाग करणे या गोष्टी आवश्यक असतात. रग्बीमध्ये या तिघांचे मिश्रण असते. थेट शारीरिक संपर्क असणारा हा खेळ आहे. एक संघ गोल करून गुण मिळवतो आणि त्याच वेळी दुसरा संघ त्यांना हे करण्यापासून रोखतो हे या खेळाचे सूत्र आहे. मात्र फुटबॉलप्रमाणे आघाडीपटू वेगळे आणि बचावपटू वेगळे असा प्रकार नसतो. सर्व खेळाडू सगळ्या भूमिका निभावतात. फुटबॉलमध्ये पेनल्टी एरिया असतो त्याप्रमाणे रग्बीत ट्रायलाइन असते. त्याला पार करून गोल करणे हे कौशल्य असते. एका गोलसाठी पाच गुण मिळतात. अतिरिक्त दोन गुणांचीही व्यवस्था असते. पेनल्टी किकप्रमाणे गोल करण्याचीही संधी मिळते. त्याद्वारे गोल केल्यास अतिरिक्त तीन गुण मिळतात. शारीरिक आणि मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा हा सर्वागसुंदर खेळ आहे.
खेळाचे स्वरूप पाहता दुखापती होणे स्वाभाविक आहे. त्या होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना असतात?
खरंतर काहीच नाही. तुमच्या प्रशिक्षणात दुखापती होऊ न देता कसा खेळ करायचा याचे तंत्र शिकवले जाते. मात्र दुखापती होतातच. त्याला पर्याय नाही. माऊथ गिअर सोडला तर दुखापती प्रतिबंधात्मक असे कोणतेच उपकरण नाही. दुखापत झाली तर संघाचे फिजिओ असतात आणि मैदानावर डॉक्टरही असतात.
रग्बीच्या स्पर्धा कशा स्वरूपाच्या असतात?
विविध शहरांमध्ये रग्बीच्या लीग आयोजित होतात. मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा शहरांमध्ये या स्पर्धा होतात. या स्पर्धामध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या संघांचा राष्ट्रीय संघासाठी विचार होतो. दक्षिण आशियाई पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाची निवड होते. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची भारतीय संघासाठी निवड होते. रग्बीमध्ये क्लब आधारित स्पर्धेलाच महत्त्व असते. भारतीय संघाचे वर्षभरात केवळ एक किंवा दोन सामने होतात.
भारतीय संघासाठी खेळण्याचा तुझा अनुभव कसा होता?
एक गोष्ट मला स्पष्ट करायला हवी. बाकी खेळांमध्ये टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्यासाठी काही खेळाडूंचे आयुष्य खर्ची पडते. मीसुद्धा मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र मला प्रचंड संघर्ष करावा लागला नाही. खेळ कोणताही असो भारतीय तिरंग्याचे प्रतिनिधित्व करणे हा अभिमानास्पद क्षण असतो. देशाप्रती खेळण्याचा अनुभव रोमांचकारी असतो. आपण भारतासाठी खेळतोय ही भावनाच चेतना जागवणारी आणि सर्वोत्तम खेळण्यासाठी प्रेरणादायी असते.
रग्बीच्या निमित्ताने तू जगभरातल्या लीग्समधल्या संघासाठी खेळतो आहेस, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
२००९ मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी मी लंडनमध्ये होतो. स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या पदवीचे शिक्षण मी घेत होतो. त्या वेळी लंडन स्कॉटिश रग्बी फुटबॉल क्लबतर्फे खेळण्याची मला संधी मिळाली. तो अनुभव खूपच चांगला होता. माझा खेळ पाहून मला ही संधी मिळाली होती. त्यानंतर मला न्यूझीलंडमध्ये खेळायला मिळाले. रग्बीसाठी जगप्रसिद्ध अशा या देशातल्या नॉर्थ शोअर आरएफसी या क्लबचे मी प्रतिनिधित्व केले. रग्बीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या या भूमीत मी खेळाचे अनेक बारकावे आत्मसात केले. यानंतर मला जपानमधल्या कोबे स्टीलर्स क्लबतर्फे खेळायला मिळाले. जपानमध्ये रग्बी लोकप्रिय खेळ आहे. त्यांच्या संरचनेत हा क्लब प्राथमिक स्तरावर असला तरी या संघाला पाठिंबा जबरदस्त आहे. यानंतर मी हाँगकाँगमधल्या हाँगकाँग स्कॉटिश आरसीएफ संघासाठी खेळलो.
या सगळ्या प्रवासानंतर आता तुला जपानमधल्या मान्यवर क्लबने निमंत्रित केले आहे. त्या प्रक्रियेबद्दल काय सांगशील?
आता मी जपानमधल्या सन्टोरी सनगोलिथ क्लबचा व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळणार आहे. जपानमधल्या अव्वल रग्बी क्लब्समध्ये या क्लबचा समावेश आहे. यापूर्वी जपानमधल्या क्लबसाठी मी खेळलो होतो. परंतु तेव्हा माझी कामगिरी चांगली झाली नाही. मात्र माझ्या न्यूझीलंडमधील एजंटने माझा व्हिडीओ करिक्युलम व्हेट जपानमधल्या प्रतिनिधीला पाठवला. काही दिवसांतच मला या क्लबतर्फे चाचणीसाठी निमंत्रण आले. या चाचणीचा अनुभव अविस्मरणीय असा होता. जिंकण्यासाठी किती व्यावसायिकता अंगीकारली जाते याचा अनुभव मला आठवडाभराच्या चाचणीने दिला. सकाळच्या सत्रात जिममध्ये व्यायाम असे. दुपारच्या काळात तंदुरुस्तीची चाचणी असे. पहिल्या दिवशीच आम्हाला हँडबुक देण्यात आले. संघाची खेळण्याची पद्धती, डावपेच, तांत्रिक गोष्टी याविषयी त्यात सखोल माहिती होती. या हँडबुकचा अभ्यास करणे अनिवार्य होते. रग्बीचे सामने शनिवारी होतात. या सामन्यात माझी कामगिरी चांगली झाली. आणखी काही दिवसांनंतर अंतिम संघाची घोषणा झाली. त्यात माझे नाव होते. या संघाचा मी अधिकृतरीत्या भाग झालो. येत्या काही दिवसांत या क्लबच्या हंगामपूर्व शिबिरासाठी मी जपानला रवाना होणार आहे.
एका भारतीय रग्बी खेळाडूकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो?
न्यूझीलंडमध्ये खेळताना मला राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागले होते. त्या संघात अनेक दर्जेदार खेळाडू असल्यामुळे ते साहजिक होते. सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये मला संधी मिळाली आणि मी माझे कर्तृत्व सिद्ध केले. भारतीय खेळाडू कसा खेळतो याची त्यांना कल्पना नव्हती, परंतु भेदभाव, पक्षपात असा अनुभव मला नाही. तुम्ही तुमचे कौशल्य सिद्ध करा, तुमच्या गुणवत्तेला न्याय मिळतो ही रग्बीतली प्रक्रिया आहे. देश त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. न्यूझीलंडमधल्या त्याच क्लबसाठी खेळताना प्लेयर्स चॉइस प्लेयर ऑफ द सिझन या पुरस्काराने मला गौरवण्यात आले.
क्रिकेटेत्तेर खेळाडूंना प्रायोजकांच्या समस्यांनी ग्रासलेले असते, तुझा अनुभव काय आहे?
माझा अनुभव वेगळा नाही. मुळातच भारतात रग्बी हा खेळ रुजलेला नाही. शाळा, कॉलेजेसमध्ये हा खेळ खेळायला सुरुवात झाली, तर खेळाचा प्रसार होऊ शकतो. खेळाचा पसारा मर्यादित असल्याने प्रायोजकांची साथ मिळत नाही. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच आर्थिक पाठबळ दिले आहे. विविध क्लब्सतर्फे खेळायला सुरुवात केल्यानंतर समस्या कमी झाल्या. काही क्लब राहण्याची सोय करतात, खाण्यापिण्याची सोय आपल्याला करावी लागते. काही प्रवासाचा खर्च उचलतात. आर्थिक गणितं सांभाळणं सोपं नक्कीच नाही, पण इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो.
रग्बी खेळण्यासाठी बलदंड शरीराची आवश्यकता असते असा समज आहे?
समज पूर्णत: बरोबर नाही. बलदंड शरीर असेल तर उत्तमच, परंतु ते नसेल तर रग्बी खेळता येत नाही असं नाही. विशिष्ट वजन, काटक शरीर आणि फिटनेस असेल तर रग्बी हा खेळ खेळता येतो. अनेक मुलं आक्रमक असतात. या आक्रमकतेला रग्बी ही योग्य दिशा होऊ शकते.
या खेळासाठी वजन आणि खाण्यापिण्यावर काय नियंत्रण ठेवावे लागते?
व्यावसायिक खेळाडू झाल्यानंतर वजनाबाबत काटेकोर राहावे लागते. माझे वजन १०४ ते १०७ दरम्यान राखणे बंधनकारक आहे. वजन जास्त झाले तर हालचालींवर परिणाम होऊ शकतो आणि वजन कमी झाले तर मला अधिक ऊर्जा खर्च करावी लागू शकते. त्यामुळे वजन निर्धारित टप्प्यात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो. खाण्यापिण्यावर बंधनं अशी काही नाहीत, मात्र खेळताना मर्यादा आणेल असे काही खाण्यावर र्निबध असतात.
गेली दहा वर्षे तू रग्बी खेळतो आहेस, मागे वळून पाहताना कसं वाटतंय?
विश्वास बसत नाही. हे सगळं इतक्या जलद घडलंय की थांबून मागे पाहायला सवडच मिळालेली नाही. हौशी खेळाडूपासून सुरू झालेला प्रवास आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्लबचा व्यावसायिक खेळाडूपर्यंत आला आहे. रग्बी हे आता माझे आयुष्य झाले आहे. या दहा वर्षांत मी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तो क्षण चिरंतन स्मृतीत राहणारा होता. आणखी काही वर्षे तरी मी खेळणार आहे.
रग्बीसारखा वेगळ्या वाटेवरचा खेळ निवडलास, घरच्यांची साथ कशी होती?
त्यांच्या आधाराशिवाय काहीच होऊ शकले नसते. माझ्या बाबांचा केटिरगचा व्यवसाय आहे, तर आई डेंटिस्ट आहे. त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले. शिक्षण घेतल्यानंतर जॉब करण्याचा, व्यवसायात सहभागी होण्याचा धोशा त्यांनी लावला नाही. व्यावसायिक रग्बी खेळाडू होण्याचा निर्णय घेतानाही त्यांची साथ मिळाली. सुरुवातीला या खेळातल्या दुखापतींमुळे त्यांना काळजी वाटत असे. पण आता नाही, ते आवर्जून माझे सामने पाहायला येतात.
रग्बीतले मराठी मुलांचे प्रमाण कसे आहे, या खेळाकडे वळणाऱ्या मराठी खेळाडूंना काय सांगशील?
मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा राष्ट्रीय संघात महाराष्ट्राचे ५-६ खेळाडू होते. पण आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मराठी मुलांनी रग्बी असं नाही त्यांना आवडेल तो खेळ खेळावा, मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. अभ्यास आणि खेळ दोन्ही सांभाळणं कठीण आहे, पण मनापासून आवड असेल तर होऊ शकतं. रग्बी असुरक्षित नक्कीच नाही. फिट राहण्यासाठी आणि रांगडय़ा खेळाचा अनुभव घेण्यासाठी मराठी मुलांनी जरूर रग्बी खेळावं.