एका बाजूला जळत असलेल्या पाच-सात चिता तर दुसरीकडे घाटावर जमलेले हजारो श्रद्धाळू लोक आणि सुरू असलेली आरती अशी दोन विरोधाभासी दृश्यं गंगेच्या घाटावर पाहायला मिळाली.

पाटण्याहून वाराणसीला पोहचेपर्यंत रात्र झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडच्या घाटावर जाण्यासाठी निघालो. तिथे असलेल्या केदारघाटापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक ते दीड किलोमीटरच्या अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागला. गल्ल्या लहान इतक्या की गाडी घेऊन जाणं अशक्यच. आपण आत जाऊ शकू, पण बाहेर कसं यायचं हे कळणार नाही, अशी ती वाट! नदीच्या समोरून घाट सहज, एका पाठोपाठ एक असे दिसतात. पण त्यांच्या मागे, त्या सगळ्या भूलभुलैयामध्ये अख्खं जुनं वाराणसी शहर लपलेलं आपल्याला दिसत नाही. तिथे पोहोचेपर्यंत सकाळचं ऊन पडलं होतं. पाऊस थांबलेला होता. आकाशात थोडेसे ढग होते. त्यामुळे उकडतही होतं. घाट म्हणजे आपण अनेक वेळा चित्रपटात पाहिलेलं असतं ना, अगदी तसं. तो संपूर्ण दिवस त्या वाराणसीच्या मंत्रमुग्ध वातावरणात वावरण्यातच गेला. तिकडचं हे सगळं दृश्य बघून गटातले सगळेच भारावले होते. विविध मंत्रोच्चार सुरू आहेत, शेकडो लोक अंघोळ करत आहेत. काही छत्र्यांच्या खाली पंडित आणि पुजारी श्राद्ध घालायला बसले आहेत. असं सगळं ते वातावरण. सभोवताली अनेक टोप्या दिसत होत्या. मराठी टोप्या, पंजाबी टोप्या, डोक्यावर घुंगट घेतलेल्या राजस्थानी महिला. मुस्लीम टोप्या. असे एक ना अनेक. काही जण माशांना खायला देत आहेत, काही जण मंत्रपठण करत आहेत, तर काही सेल्फीज काढताहेत! प्रत्येक जण आपापल्या श्रद्धा घेऊन तिथे पोचलेला दिसतो आणि या सगळ्या श्रद्धांचा मेळावा भरलेला त्या केदारघाटावर दिसत होता. तिथेच जरा उजव्या हाताला लहान मुलांचा एक गट आलेला दिसला. ती मुलं एका पंडितांकडे वेद शिकायला आली होती. त्यांच्याहून वयाने मोठी अशी काही मुलं ज्यांना अंघोळ करायची नव्हती त्यांना अंघोळीसाठी पाण्यात बुचकळत आहेत, असा सगळा खेळ सुरू होता. हे सगळं बघत असताना, गंगाप्रदूषण, गंगेच्या भोवती चालू असलेलं राजकारण हे सगळं बाजूला पडतं. इथे फक्त दिसतात त्या लोकांच्या श्रद्धा आणि गंगेशी या प्रत्येकाचं असणारं नातं.
प्रत्येकाच्या मनातली ‘गंगा
या आधी गंगेचं आणि त्या गंगापूरच्या पूरग्रस्तांचं गंगेशी नातं पाहिलं होतं. ‘गंगेने इतकी र्वष आपल्याला सांभाळलं, तिचं जे होतं तेच तिने १९९३च्या पुरात परत घेतलं,’ असं म्हणणारे हे इथले लोक. त्याचबरोबर यांच्यापेक्षा काहीच किलोमीटर दूर केळीवाले पाहिले. गंगेच्या गाळाने त्यांना अनेक र्वष उत्तम पीक दिलं होतं. पश्चिम बंगालमधले गंगेच्या चिकट जमिनीमध्ये तळी निर्माण करून मच्छीपालनाचा धंदा करणारे मच्छीमार भेटले. गंगेच्या गाळाच्या मैदानांमध्ये वीटभट्टय़ांचा धंदा करणारे व्यापारी भेटले. यांची गंगा आणि इथे, वाराणसीमध्ये आलेल्या लोकांच्या मनातली गंगा वेगळी आहे. इथे, या घाटावर आलेली कोणीही या गंगा किनारी राहणारे नाहीत. पण या गंगेच्या प्रतिमा अनेक र्वष त्यांच्या मनात आहेत. त्यांच्या घरामध्ये, संस्कारांमध्ये गंगा आहे. आणि ती, त्यांच्या मनातली गंगा जेव्हा ते प्रत्यक्षात बघतात त्या वेळेचं ते भारावलेपण आपण तिथे गेली अनेक र्वष असंच रोज अनुभवायला मिळतं. अनेक तरुण मुलं-मुली त्यांच्या घरच्यांनी सांगितलं म्हणून किंवा सहज इथे ट्रिपला आलो म्हणून डुबकी मारत असतात. पण पाण्यातून वर येताना चेहऱ्यावरचे ते भाव फार विलक्षण असतात. यावरून भारतीयांच्या मनामनात गंगा वसलेली आहे, असं जे आपण ऐकून असतो ते प्रत्यक्षात इथे बघायला मिळतं. यांना गंगेची ऐतिहासिक माहिती नाही, गंगेचा भूगोल माहीत नाही. ही नदी उत्तरेकडील अर्थव्यवस्था कशा प्रकारे समृद्ध करते हेही कदाचित त्यांना माहीत नसतं. पण त्यांची अशी ठाम समजूत आहे की, आपली सगळी पापं या ठिकाणी धुवून निघणार आहेत, आपण शुद्ध होणार आहोत. तर इथे आल्यामुळे आपल्याला मोक्ष मिळणार आहे ही भावना वयस्कर लोकांमध्ये दिसून येते. काशीला येऊन गंगेत स्नान करणं ही प्रथा साधारणपणे दोन हजार वर्षांपूर्वी सुरू झाली असेल. ते अजूनही सुरू आहे. कदाचित मधल्या काळात इथे येणारे लोक कमी झाले असतील. पण नव्या पद्धतीच्या मार्केटिंगमुळे इथली गर्दी वाढलेली दिसते. जास्तीत जास्त लोक इथे येण्याचा प्रयत्न करतात. अनेक टूर्स इथे रोज येत असतात. त्यामुळे लोकांची गंगेबद्दलची श्रद्धा, हेच भांडवल घेऊन इकडचे अनेक व्यवसाय जोमात सुरू आहेत. ही श्रद्धा जागृत ठेवली तरच इथले व्यवसाय टिकून राहणार आहेत.
काशीचं महत्त्व
काशी हे सध्याच्या वाराणसीचं नाव. इथे एक विद्यापीठ होतं. याला धार्मिक स्थळ म्हणून जसं महत्त्व आहे कदाचित त्यापेक्षा अधिक महत्त्व इतिहासात इथल्या विद्यापीठांमुळे मिळालं असेल. या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी भारतभरातून लोक इथे यायचे. वेद, तत्त्वज्ञान शिकण्यासाठी अजूनही लोक इथे येतात. पण त्याचं प्रमाण आता कमी झालं आहे. आपण मराठी माणसांनी असं ऐकलेलं असतं की, रामशास्त्री प्रभुणे हे काशी येथे शिकले होते. कदाचित तेव्हापेक्षा आता संख्येने अधिक लोक इथे येत असतील, मात्र एकूण लोकसंख्येच्या तुलनेत काशीला येऊन वेद शिकणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे हे नक्की. काशीचं महत्त्व समजून घेण्यासाठी तिथल्या काही लोकांना भेटणं गरजेचं होतं. म्हणूनच, इथे श्रीधर पांडय़े यांची भेट घेतली गेली. पांडय़े इथले मुख्य पुजारी. इथे येणाऱ्या सर्व राजकीय आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ते पूजा घालून देतात. त्यांनी सांगितल्यानुसार, पूर्वी काशीमध्ये गंगा नदी नव्हती. वरुणा आणि असी अशा दोन नद्या इथे होत्या. आणि या दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणून वाराणसी असं इथे नाव पडलं. पांडय़े एका दंतकथेचा दाखला देऊन सांगतात की, असी या नदीमधून खूप प्रमाणात जीवजंतू होते. त्याच्यामुळे तिथल्या लोकांना खूप त्रास व्हायला लागला. मग ब्रह्मदेवाने या नदीला शाप दिला की, यापुढे तू एखाद्या धाग्यासारखी वाहशील. पण या नदीने करून ठेवलेली घाण साफ करणं गरजेचं होतं. म्हणून गंगा नदी इथे अवतरली. इथल्या गंगेचं असं वैशिष्टय़ की, इथली गंगाही उत्तर-वाहिनी आहे. भारतात सगळीकडे गंगा ही दक्षिण-पूर्व वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. मात्र इथे तिचा मार्ग वेगळा आहे. काशीमध्ये एकाने सांगितल्याप्रमाणे, २८ हजार मंदिरं आहेत. यांमध्ये सर्वाधिक मंदिरं ही शंकराची. इथलं मूळ मंदिर हे काशीविश्वनाथाचं. हेच नक्की मूळ का, यावर वाद सुरू आहे. त्यामुळे काशीला धार्मिक महत्त्व आहे, विद्यापीठे असल्यामुळे वैचारिक महत्त्व आहे आणि गंगा नदी इथे असल्याने त्याचंही महत्त्व इथे आहेच. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला गंगेच्या धार्मिक महत्त्वाबद्दल रस होता, पण तो तिथल्या प्रथा समजून घेण्यामध्ये. पांडय़े यांच्याबरोबर पूर्वीच्या प्रथा आणि आजचं गंगेचं स्वरूप यावर भरपूर गप्पा झाल्या. गंगा स्वच्छता अभियान, नमामि गंगे याबद्दल त्यांनी बरीच माहिती दिली.
गंगेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी गट जगदीश पिल्ले यांना भेटला. पिल्ले यांनी गंगेच्या घाटावर काही डॉक्युमेंटरीज तयार केल्या होत्या. त्यासाठी त्यांना बरोच पुरस्कारही मिळाले आहेत. पिल्ले यांनी गटाला संध्याकाळी होत असलेली मुख्य आरती बघायला घेऊन गेले. त्यासाठीचा प्रवास हा नदीतूनच एका लहान नावेमधून झाला. संध्याकाळ झाली होती. संधिप्रकाश पडला होता. आरतीची तयारी एकाठिकाणी सुरू होती. त्यांनी मणीकर्णिका या घाटावर सर्वाना नेलं. मणीकर्णिका घाट म्हणजे दशक्रिया विधी करायचा घाट. इथे शेकडो वर्षांपासून अशी प्रथा आहे की, मृतदेह अर्धवट जाळले जातात आणि मग पाण्यात सोडून दिले जातात. यासाठी लाकडांच्या राशी रचून ठवलेल्या दिसत होत्या. आणि जवळच पाच ते सहा चिता जळत होत्या. ही सतत चालणारी क्रिया आहे. बारा महिने, सातही दिवस चोवीस तास इथे हे काम सुरू असतं. इथे मृत्यू आला तर मोक्ष हा निश्चित! त्यामुळे आजही बऱ्याच हिंदू घरांमध्ये गंगेच्या पाण्याने भरलेला कलश ठेवलेला दिसतो.
या घाटापासून थोडय़ाच अंतरावर पुढे दशाश्वमेध हा मुख्य घाट आहे. आणि वाटेवर आणखी दोन वेगळे घाट आहेत. चिता जळत असलेलं दृश्य मनात घेऊन होडी दुसऱ्या दिशेला वळली आणि अगदी विरुद्ध चित्र बघायाला मिळालं. काही हजार लोक घाटावर जमलेले होते आणि काही होडय़ांमध्ये नदीमधून त्या मुख्य आरतीकडे डोळे लावून बसलेले होते. वेगळाच जल्लोष इथे होता. आपल्याला वाटेल की त्या दिवशी काही महत्त्वाचा दिवस होता, म्हणून एवढी गर्दी आणि एवढी मोठ्ठी आरती. पण अशी आरती इथे दर दिवशी होते. एवढी गर्दी आपल्याला आपल्या उत्सवांमध्येही बघायला मिळणार नाही. पण, इकडे हे रोज होतं. इथे सारा भारत आलेला दिसत होता. बाजूच्याच होडीमध्ये पंजाबी लोक होते. मागच्या होडीमधून मल्याळी भाषा ऐकू येत होती. मोठा पाऊस सुरू झाला होता, पण त्याचा या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही.
एकाच नदीच्या या दोन घाटांवर ही दोन चित्रं. एक चित्र अतिशय उत्साहाचं, जल्लोषाचं, आपलं जगणं साजरं करणारं, जगण्यासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आरती करणारं आणि दुसरं जगणं संपवून मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठीची, मृत्यूनंतरची धडपड. हेच चित्र गेली शेकडो र्वष सुरू आहे. वातावरणात भारावलेपण येणारच. गंगेचं हे धार्मिक स्वरूप बघून या नदीचं शुद्धीकरण, या नदीच्या आजूबाजूची अर्थव्यवस्था, इथे चालणारे व्यवसाय याविषयी या गटाचा अभ्यास सुरू झाला. पुढच्या प्रवासामध्ये हिमालयातली धरणं, त्यांचा या सगळ्यावर होणारा परिणाम यावरही काम सुरू झालं.
प्रज्ञा शिदोरे

Story img Loader