‘डान्सर’ म्हणजे तो ‘नाच्या’च असणार अशी विकृत नजर कशासाठी? मर्दही नाचतात की! शिवाय मर्दपणा म्हणजे काय? देशाची लोकसंख्या वाढवणे? शुक्रजंतूंच्या नळकांडय़ा वापरणे? एखादा दुबळा जीव भेटला तर(च) आठ-दहा जणांनी मिळून त्याला धोपटणे, बिनविषारी साप ठेचणे? तोंडात शिव्याच शिव्या असणे? लंपटपणा करत उन्हात रिकामटेकडे भटकणे? व्यसनावर व्यसने करणे? पुरुषार्थाच्या तुमच्या कल्पनाच किती पोकळ आणि व्यक्तिमत्त्व पोखरणाऱ्या आहेत बघा! यापेक्षा वेगळे जीवन सौम्य-सभ्यपणे जगणारे, अजिबात ओंगळ नसलेले पुरुषही बायकांना आवडतात हे तुम्हाला कुणी सांगितलेलं दिसत नाही. क्रिकेटची क्रेझ असताना ती ‘नशा’ टाळून मल्लखांबाला महत्त्व देणारा तेजस्वी कुमार वयाने लहान असूनही मला ‘आदरणीय’ वाटतो. इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांना (च) जॉब मिळतो अशी शैक्षणिक अंधश्रद्धा जेव्हा फार होती, अशा काळात ‘संस्कृत’ हा विषय एकटय़ाने झेपवून पदवीधर झालेला माझा तेव्हाचा प्रिय क्लासमेट रामकृष्ण मालाडकर मोठा अधिकारी झालाच की!
धाडस, धैर्य हे उपजतच असते की? तसेच असावे. ‘माझ्या गावात मी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’ची शाखा सुरू करणारच! फार गरज आहे त्याची! म्हणणारा नवजवान कौतुकाला पात्र ठरायला हवा.
‘लिव्ह इन’चे साहस, आंतरजातीय विवाह, एखाद्या मुलीला अनैतिक व्यवसायातून बाहेर काढून तिच्याशी चक्क लग्न, एक मूल असताना गरीब बाळाचे कल्याण करण्यासाठी दुसरे दत्तक घेणे किंवा या प्रदूषित व्यवस्थेत मूल होऊच न देणे.. हे असे धाडस करणारे लोक खरे ग्रेट! त्यांना सलाम!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा