एकांकिका म्हणजे महाविद्यालयीन आयुष्याचा अविभाज्य भाग. इतरांपेक्षा आपली एकांकिका कशी वेगळी होईल, आपणच कशी बाजी मारू याचं विचारसत्र सतत तरुणाईच्या डोक्यात सुरु असतं. पण, आता एकांकिकांच्या सादरीकरणाबरोबरच विषयाकडेही जास्त लक्ष दिलं जातंय.
संस्कृतात एक श्लोक आहे.
‘देवानाम् इदमामनन्ति मुनय:,
क्रान्तं क्रतुं चाक्षुषम्
रुद्रेणेदमुमाकृतौव्यतिकरे स्वाङगे विभक्तं द्विधा
त्रगुण्योद्भवमत्रलोकचरितं नाना
रसं दृष्यते
नाटय़ं भिन्नरुचेर्जनस्य बहुधापि
एकं समाराधनम्’
या श्लोकात नाटय़कलेचा उगम कसा झाला, याचे वर्णन करण्यात आले आहे. खुद्द भगवान शंकराने आपल्या शरीराचे दोन भाग करून नटराज तयार केला. ती या नाटय़कलेची देवता! त्रिगुणातल्या लोकांची चरित्रे, म्हणजेच स्वभाव दाखवणाऱ्या या नाटकातून नवरसांचे दर्शन होते. आणि म्हणूनच कदाचित विभिन्न आवडी असणाऱ्या लोकांची नाटक ही समान आवड असते, असा या श्लोकाचा ढोबळ अर्थ! तो किती खरा आहे, याचा प्रत्यय महाराष्ट्रातल्या नाटय़प्रेमींनी वारंवार पटवून दिला आहे. हाच प्रत्यय ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या लोकांकिका स्पर्धेनेही दिला.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने राज्यभरात झालेल्या या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत तब्बल १०६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. म्हणजेच जानेवारी २०१४पासून रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने प्रमाणपत्र दिलेल्या तब्बल १०६ एकांकिका या स्पर्धेत सादर झाल्या. त्यातील निवडक ४० एकांकिकांनी विभागीय अंतिम फेरीत आपला ठसा उमटवला. या ४० एकांकिकांमधून मान्यवर परीक्षकांनी निवडलेल्या आठ उत्कृष्ट एकांकिका मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम फेरीत सादर झाल्या.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचा विचार करण्याआधी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेल्या एकांकिकांचा धांडोळा घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तरुणाई नेमक्या कोणत्या दिशेने विचार करते, काळाशी सुसंगत असे किती विषय किती विविध पद्धतीने हाताळले जातात, याचे प्रत्यंतर या स्पर्धामधून येतच होते. रुईया महाविद्यालयाची ‘अगं अगं डिग्री’ ही साधारण दशकभरापूर्वी किंवा त्याही आधी सादर झालेली एकांकिका शिक्षणव्यवस्थेवर तिरकस भाष्य करणारी होती. ‘आरडीएक्स’ नावाच्या एकांकिकेने दहशतवाद या विषयाला समोर ठेवत भाष्य केले होते. त्याचप्रमाणे ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्रा’ या तत्कालीन बोल्ड एकांकिकेमधून समलैंगिक संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला होता. रुपारेल महाविद्यालयाची ‘मृगाचा पाऊस’ वडील आणि मुलीमधील नातेसंबंध, ऋतुस्राव या विषयांवर भाष्य करणारी होती. या एकांकिकेचे सादरीकरण आज, इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या लक्षात आहे.
तशीच लक्षात आहे ‘मिती चार’ या कल्याणच्या संस्थेने सादर केलेली ‘तू, मी, इत्यादी.’ ही एकांकिका! ही एकांकिका त्या वर्षीची सवाई एकांकिका ठरली होती. या एकांकिकेतही शिक्षणव्यवस्था, तरुणांचा करिअरिस्टिक अॅप्रोच आणि त्यामुळे ज्ञान मिळवण्याबाबतची उदासीनता हा विषय हाताळण्यात आला होता. मात्र विषयाबरोबरच केवळ दोन पात्रांनी केलेले सादरीकरण लाजवाब होते. नेपथ्याचा विचार करताना पुण्याची ‘दोन शूर’ ही एकांकिका आठवल्याशिवाय राहत नाही. या एकांकिकेत चक्क बैलगाडी स्टेजवर उभी केली होती. जवळपास संपूर्ण नाटक या बैलगाडीतच घडत होते. या एकांकिकेची लेखनशैली आणि सादरीकरणाची पद्धत, यांमुळे प्रेक्षकांना मिळालेली अनुभूती आजही ताजी टवटवीत असेल. बैलगाडी चालू झाल्यावर त्या गाडीची चाके फिरत राहणे, हादेखील एक मस्त प्रकार या एकांकिकेतून दाखवला होता.
अगदी तीन-चार वर्षांपूर्वीचा विचार करायचा, तर गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या काही एकांकिकांची नावे घ्यायला हवीत. त्यांपैकी महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘थरारली वीट’ ही एकांकिका प्रचंड वादग्रस्त ठरली होती. पंढरपुराला जाणाऱ्या वारीमध्ये घडणाऱ्या अनैतिक गोष्टी या एकांकिकेमधून दाखवण्याचा धाडसी आणि यशस्वी प्रयत्न अभिजित खाडे या दिग्दर्शकाने केला होता. त्याने रंगमंचावर उभी केलेली वारीची दृश्ये डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. त्याचबरोबर ‘मुक्तिधाम’ ही रुईया महाविद्यालयाची एकांकिकाही अशीच वृद्धाश्रम, वडील-मुलगा यांचे नातेसंबंध याबाबत भाष्य करणारी होती. याच नातेसंबंधांवर खूप खेळकरपणे भाष्य करणारी ‘रिश्ता वही सोच नई’ ही एकांकिका दोनच वर्षांपूर्वी अद्वैत दादरकरने सादर केली. गंभीर विषय अत्यंत हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याची अद्वैतची हातोटी आणि अत्यंत चटपटीत संवाद यांमुळे ही एकांकिका त्या वर्षीची सवाई एकांकिका ठरली. संतोष वेरूळकर हे नाव नाटय़जगतातील लोकांसाठी नवीन अजिबातच नाही. संतोष वेरूळकरची सर्वात गाजलेली एकांकिका म्हणजे ‘गमभन’! मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ कादंबरीवर आधारित या एकांकिकेने समूहनाटय़ाचा एक उत्तम आविष्कार सादर केला होता. त्या वर्षीच्या सर्वच स्पर्धामध्ये या एकांकिकेने छाप पाडली. याच दिग्दर्शकाची ‘पूर्णात पूर्णम् उदच्यते’ ही एकांकिका आजही काहींच्या लक्षात असेल. जी. ए. कुलकर्णी या श्रेष्ठ कथाकाराच्या ‘पिंगळावेळ’ या कथासंग्रहातील ‘स्वामी’ या कथेवर आधारित ही एकांकिका त्या वर्षीचे आकर्षण होती.
या सर्व एकांकिकांमध्ये पुण्यातून आलेल्या अनेक एकांकिकांनीही आपली छाप पाडली. ‘पोपटी चौकट’ नावाची एकांकिका त्यातील नेपथ्यामुळे आणि अभिनयामुळे नक्कीच सर्वाच्या लक्षात असेल. त्याचबरोबर दोन-तीन वर्षांपूर्वी सवाई एकांकिका स्पर्धेत नावाजली गेलेली ‘प्राणिमात्र’ ही एकांकिकाही दखल घ्यावी अशीच! या एकांकिकेत वाघाची भूमिका करणाऱ्या नटाची अंगलवचीकता डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.
गेल्या काही वर्षांतील या एकांकिकांच्या विषयांतील वैविध्य ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. म्हणजेच ४० एकांकिकांमधून महाविद्यालयीन तरुणांनी आपले ४० विषय मांडले. त्यात मोबाइल-क्रांती आणि मोबाइलचे व्यसन या विषयांवर दोन एकांकिका सादर झाल्या खऱ्या, पण दोन्ही एकांकिकांमधील विषयांची मांडणी, सादरीकरण यात प्रचंड फरक होता. विशेष म्हणजे या दोन्ही एकांकिका मुंबईतील विभागीय अंतिम फेरीत सादर झाल्या होत्या. एक म्हणजे कीर्ती महाविद्यालयाची ‘डझ नॉट एक्झिस्ट’ आणि दुसरी म्हणजे म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘बिइंग सेल्फिश’! यांपैकी ‘बीइंग सेल्फिश’ने विभागीय विजेतेपद पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला आणि तिथेही तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महाअंतिम फेरीत आलेल्या आठही एकांकिका या राज्यातील आठ विविध केंद्रांवरून आल्या होत्या. केवळ पुण्या-मुंबईतीलच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण आज नेमका काय विचार करतोय, त्याला भेडसावणारे विषय कोणते आहेत, नाटक या माध्यमातून तो हे विषय कसे मांडू पाहतो, तो अस्वस्थ आहे का, रंगमंच या माध्यमाच्या विविध शक्यता तो पडताळून पाहतोय का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या महाअंतिम फेरीच्या निमित्ताने मिळाली. विशेष म्हणजे ही उत्तरे सकारात्मक होती.
जागतिकीकरणानंतरच्या काळात, म्हणजे गेल्या २०-२५ वर्षांमध्ये आपल्या भवतालची दुनिया प्रचंड वेगाने बदलत गेली. ‘लोकांकिका’ स्पर्धेत एकांकिका सादर करणाऱ्या पिढीने हे ट्रान्स्फॉर्मेशन पाहिले किंवा अनुभवले असणेही अशक्यच. पण तरीही जागतिकीकरणाने आणि तंत्रज्ञानातील प्रगतीने त्यांच्या हाती दिलेल्या आयुधांचे परिणाम आणि दुष्परिणाम काय, यांची त्याला चांगलीच जाण असल्याची खात्री ‘बीइंग सेल्फिश’ ही एकांकिका पाहून पटली. तुषार जोशी या महाविद्यालयीन लेखकानेच लिहिलेल्या या एकांकिकेमध्ये मोबाइलचा अतिवापर करणारे तरुण पिढीचे दोन प्रतिनिधी, त्यातल्या एकाला चटके बसूनही त्याचे अतिवापर चालूच ठेवणे आणि दुसरीने मात्र योग्य वेळी त्या कडय़ाच्या टोकावरून मागे फिरणे, यातून तुषारने आजच्या तरुणांचा व्ह्य़ू पॉइंट एकदम छानच मांडला. सादरीकरणाच्या दृष्टीनेही ही एकांकिका अत्यंत सहज सादर केली होती. कम्प्युटरची स्क्रीन किंवा मोबाइलची स्क्रीन मोठय़ा पडद्यावर दाखवत या महाविद्यालयाने तंत्रज्ञानाचीही मदत घेतली. रंगभूमीवर येत्या काही वर्षांत होणाऱ्या तंत्रज्ञान आणि कला यांच्या एकत्रीकरणाच्या प्रयोगाचे हे प्रात्यक्षिक होते.
मुंबईच्या जरा बाहेर पडले की शहापूर, वाडा, मोखाडा, जव्हार असा मोठा आदिवासी पट्टा आहे. मात्र मुंबईच्या किंवा शहराच्या इतक्या जवळ असूनही आपण मात्र या सर्वच गोष्टींपासून अनभिज्ञ असतो. या पट्टय़ातील लोकांचे प्रश्ने, त्यांचे जगणे सगळेच खूप वेगळे आहे. तशीच त्यांची मनोरंजनाची साधनेही! त्यातूनच जन्म झालाय अनेक लोककला प्रकारांचा. त्यांपैकीच एक म्हणजे बोहाडा ही लोककला. राम-रावण युद्ध, रामायण यांवर आधारित या लोककलेला केंद्रस्थानी ठेवून नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालयाने सादर केलेली ‘हे राम’ एकांकिका यामुळेच लक्षणीय ठरली. विषयातील वेगळेपण सोडले, तर मात्र या एकांकिकेने सादरीकरणाच्या आणि विषय संहितेद्वारे मांडण्याच्या पातळीवर मात्र काहीशी निराशा केली.
वेश्याव्यवसाय, वेश्यांच्या वाटय़ाला येणारे हलाखीचे जीवन, या व्यवसायातील इतर कंगोरे या विषयांवर मराठी रंगभूमीवर अनेक नाटके आली आहेत. अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयानेही हाच विषय घेत ‘कोंडवाडा’ ही एकांकिका सादर केली. एकांकिकेची संहिता ढोबळ असली, तरी विषयाच्या बाबतीत त्यात काहीसे वेगळेपण होते. पण प्रयोगाच्या पातळीवर मात्र ही एकांकिका फारशी रंगली नाही.
मोठमोठय़ा लेखकांच्या कथांवरून एकांकिका किंवा नाटके तयार करण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. यंदाच्या पहिल्यावहिल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतही तो आढळला. महाअंतिम फेरीत सादर झालेल्या आठपैकी दोन एकांकिका अशाच कथांवर आधारित होत्या. त्यांपैकी एक म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ या कथेवर आधारित औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाने सादर केलेली ‘मसणातलं सोनं’! तर दुसरी म्हणजे महाराष्ट्राची लोकांकिका ठरलेली पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’! व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेवर आधारित या एकांकिकेने सहजसुलभ सादरीकरण, उत्तम दिग्दर्शन, आकर्षक नेपथ्य व प्रकाशयोजना आणि प्रवाही संगीतामुळे सर्वच प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर ‘मसणातलं सोनं’ या एकांकिकेतील कलाकारांचा अभिनय आणि पाश्र्वसंगीत यांच्यातील तालबद्धता लक्षात राहण्याजोगी होती.
एखादा किचकट विषय हाताळतानाही महाविद्यालयातील तरुण त्या विषयाकडे किती हलक्याफुलक्या पद्धतीने पाहू शकतो, याचे प्रत्यंतर चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाच्या ‘कुबूल हैं’ या एकांकिकेने दिले. ओंकार भोजने याने सिग्मंड फ्रॉइडचा सिद्धांत एवढय़ा सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मांडला की, प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली. या एकांकिकेने सवरेत्कृष्ट एकांकिकेचे द्वितीय पारितोषिकही पटकावले. रंगमंचावर आलेली वरात, दोन भागांमध्ये रंगलेले नाटय़, या सर्वच गोष्टी खूपच चांगल्या जमल्या होत्या.
त्यानंतर सादर झालेल्या नागपूरच्या एल. ए. डी. कॉलेजने सादर केलेली ‘बोल मंटो’ ही एकांकिका सआदत हसन मंटो या उर्दू कथाकार आणि लेखकाच्या लेखन प्रक्रियेवर प्रकाश टाकणारी होती. मात्र कलाकारांचा आक्रस्ताळा परफॉर्मन्स या एकांकिकेला लोकांपर्यंत पोहोचवू शकला नाही. मंटो हा भल्याभल्यांना पचायला जड असा लेखक. त्याच्या हयातीतही त्याने ‘बाल की खाल’ या आपल्या स्तंभातून अनेकांच्या चेहऱ्यावरील बुरखे टराटरा फाडले होते. त्याच्या कथांमध्ये नागडे वास्तव तेवढय़ाच नागव्याने समोर मांडण्याचे विलक्षण सामथ्र्य आहे. पण या कथा पेलणे खूप कठीण! ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न या महाविद्यालयाच्या लेखिकेने केला. त्यासाठी तिने काही रूपकेही वापरण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न जमला नाही आणि मंटो काही ‘बोलला’च नाही.
पण सीएचएम महाविद्यालयाचा ‘बुद्ध’ मात्र खूपच प्रभावी बोलला. या महाविद्यालयाची ‘मडवॉक’ ही एकांकिका ठाणे केंद्रातून पहिली आलेली. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘मोझलेम’ या एकांकिकेशी तगडी टक्कर देऊन या एकांकिकेने महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला. उत्कृष्ट संहिता, तेवढेच उत्तम लेखन आणि सादरीकरण यांमुळे या एकांकिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ‘आकाराचा हट्ट सोडून निराकाराच्या मागे लागलं, की बुद्ध लवकर समोर येतो’, अशी किंवा ‘प्रेमात पडतो ते आपण, बुद्ध मात्र प्रेमात नेहमीच उभा राहिला’ अशी चटकदार वाक्ये टाळ्या घेऊन गेली. या एकांकिकेत बेंजामिनची भूमिका करणारा अभिजित पवारही त्याच्या अभिनयासाठी प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. दिग्दर्शनाच्या पातळीवरही ही एकांकिका खूपच चांगली झाली. मात्र ‘मडवॉक’मधील शब्दबंबाळ वाक्यांमुळे ही एकांकिका म्हणजे शब्दांचा ‘मडवॉक’ झाल्याचेही मत काहींनी व्यक्त केले.
या सर्व एकांकिकांचे सादरीकरण एखाद्या व्यावसायिक नाटकाप्रमाणेच चोख होते. प्रयत्न खूप प्रामाणिक होते. दोन एकांकिकांच्या मधल्या अत्यंत कमी वेळेत संपूर्ण सेट उभारणे, प्रकाशयोजनेची व्यवस्था करणे, या सर्वच गोष्टी हे महाविद्यालयीन तरुण खूपच जल्लोषात आणि उत्साहात करत होते. नेपथ्याच्या दृष्टीनेही संहितेचा विचार केल्याचे काही एकांकिकांमधून दिसत होते. सहजसुंदर नेपथ्य विषयाची मांडणी खूपच खुलवत होते. त्यातही चिठ्ठी, मडवॉक, बिइंग सेल्फिश या एकांकिकांचे नेपथ्य विशेष वाखाणण्याजोगे होते.
या सर्वच स्पर्धक महाविद्यालयांतील तरुण तरुणी एकांकिकेच्या दुनियेत नवखे असतील. व्यावसायिक रंगभूमीवर आणि त्या माध्यमांतून टीव्ही मालिकांमध्ये पाऊल टाकण्याचा विचार करत असतील. पण नाटक करण्याची, आपल्या मनातली गोष्ट सांगण्याची त्यांची इच्छा खूप प्रबळ आहे. नाटक सादर करताना ते खूप विचार करतात आणि हादेखील या सर्वामधील समान धागा आहे. या सर्व कलाकारांचे प्रयत्न सुंदर आहेतच, पण ‘लोकसत्ता लोकांकिके’मुळे त्यांना मिळणारे यशही असेच सुंदर असावे ही सदिच्छा!
नटरंग -विंगमास्टर
एकांकिका म्हणजे महाविद्यालयीन आयुष्याचा अविभाज्य भाग. इतरांपेक्षा आपली एकांकिका कशी वेगळी होईल, आपणच कशी बाजी मारू याचं विचारसत्र सतत तरुणाईच्या डोक्यात सुरु असतं.
आणखी वाचा
First published on: 02-01-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One act play competition on college level