एके काळच्या रविकिरण मंडळांप्रमाणे हल्ली ऑनलाइन कट्टे असतात. मराठी विज्ञानकथा लिहिणाऱ्या लेखकांच्या ऑनलाइन कट्टय़ाचा हा आगळावेगळा प्रयोग-

माधव ज्यूलियन, कवी गिरीश अशा कवींनी मिळून १९२१ साली एका मंडळाची स्थापना केली. त्याचं नाव होतं रविकिरण मंडळ! हे त्या काळात काही नवीनच होतं. आजच्या तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या युगात एकमेकांशी असे जोडले जातात ते ऑनलाइन ग्रुपने! असे ऑनलाइन ग्रुप कितीतरी असतील. सोशल साइट्सवर तर अशा ग्रुपचा भरणा असतो. पण, त्यातही जर कोणता ग्रुप आपलं वेगळेपण तयार करत असेल; तर मात्र त्याबद्दल माहिती करून घेणं आवश्यक भासतं.
गेल्या चार-पाच दशकांत मराठी साहित्यात रुळलेला महत्त्वाचा प्रकार म्हणजे विज्ञान कथासाहित्य! प्रत्येक गोष्टीत माणसाने प्रयोगशील राहिलं, नवनवीन प्रयोग केले की त्यातलं नावीन्य टिकून राहतं. हे तत्त्व विज्ञानापेक्षा आणखी कोण जास्त जाणू शकतं? मग, विज्ञान हे प्राणतत्त्व म्हणवणाऱ्या विज्ञानकथेनेही हे तत्त्व अंगीकारलं तर नवल ते काय? विज्ञानकथा ही एकाच प्रकारची न ठेवता ती जेव्हा वेगवेगळी रूपं घेऊन आपल्यासमोर येते तेव्हा वाचकाला ती अधिकाधिक आकर्षति करते हे नक्की! आणि अशाच लेखनाचं व्रत अंगीकारलेलं आहे सायफाय कट्टय़ाने!
मराठी विज्ञान परिषदेने १९७०पासून विज्ञान रंजन कथास्पर्धा सुरू केली. त्याला आता ४५ वर्षे झाली. त्या प्रयत्नातूनच मराठीत विज्ञान साहित्यप्रवाह प्रस्थापित झाला. मविपने केलेल्या या स्पध्रेतूनच डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर असे विज्ञान कथालेखन करणारे हे लेखक विज्ञानसाहित्याला मिळाले. १९७० ते १९९० पर्यंतच्या प्रथम पारितोषिक विजेत्या कथांचे विज्ञानिनी हे पुस्तक श्रीविद्या प्रकाशन, पुणे यांनी १९९२ साली प्रकाशित केले. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवसाहित्य निर्मिती कार्यशाळेसाठी दिलेल्या अनुदानातून २०१२ साली चारदिवसीय विज्ञान कथालेखन शिबीर मविपकडून भरवले गेले. या शिबिरांतील शिबिरार्थीना ज्येष्ठ विज्ञान कथालेखकांकडून मार्गदर्शन लाभले. या प्रयत्नातूनच चार-पाच दर्जेदार विज्ञानकथालेखक मिळाले. शिबिरार्थी आणि मार्गदर्शक नंतरही संपर्कात राहिले.
सायफाय कट्टा म्हणजे मविपने आयोजित केलेल्या ८ ते १२ फेबुवारी २०१२ या विज्ञानकथा शिबिराचा पुढचा टप्पा दि. २७ फेब्रुवारीला अस्तित्वात आला. हा कट्टा म्हणजे ऑनलाइन ग्रुप! त्या दिवसापासून ते आजतागायत कट्टा एकेक शिखरं पार करतोय. या कट्टय़ाचा मूळ हेतू मराठी विज्ञानकथांवर चर्चा, कल्पना/ माहिती यांची देवाणघेवाण हा आहे. त्याच्या अनुषंगाने मराठी कथा/ कादंबऱ्या / कविता असे इतर साहित्य तसेच इंग्रजी साहित्य यावर चर्चाही होणे हे आहे.
कट्टय़ावर एप्रिल २०१२ पासून विविध चॅलेंजेस सभासदांना दिली जातात. त्यावर विज्ञान कथालेखन करायचे असते. ही चॅलेंजेस म्हणजेच विज्ञान कथालेखनातील नवनवे प्रयोग असतात. चॅलेंजेससाठी कधी विषय दिले जातात तर कधी वाक्य तर कधी परिच्छेद! त्या चॅलेंजसाठी ठरावीक अवधी दिला जातो आणि दिलेल्या तारखेला सगळ्यांनी कथा कट्टय़ावर ठेवायची असते. या चॅलेंजमध्ये दिलेला विषय, वाक्य, परिच्छेद एकच असला तरी प्रत्येकाची कथा पूर्णपणे वेगळी असते. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्या कथांच्या कल्पना वेगळ्या असतात. एकदा तर सहा शब्दांत कथा बसवण्याचं आवाहन करण्यात आलं. चॅलेंज देताना जे वाटलं होतं की हे शक्य होईल का? त्याचा रिझल्ट हातात आल्यावर पाहिलं तर थक्क करण्याएवढी संख्या होती कथांची! कधी साखळीकथा लिहिली जाते. त्यात तर अक्षरश: अहमहमिका लागलेली असते. त्याचा वेग आणि यानाचा वेग सारखाच नाही ना अशी शंका यावी. जितक्या उत्साहात चॅलेंजसाठी लिहिले जाते तितकाच उत्साह अभिप्राय देताना आणि घेताना असतो.
मग काय लिखाण चॅलेंजपर्यंतच मर्यादित असतं का? तर नाही. चॅलेंजव्यतिरिक्तही काही विज्ञानकथा कट्टेकरांनी कट्टय़ावर ठेवलेल्या आहेत. या विज्ञानकथांवर कट्टय़ावर झालेल्या चर्चा, मार्गदर्शकांकडून होणारे मार्गदर्शन तसेच इतर सभासदांचे त्यावरील अभिप्राय मग ते कौतुक असो वा टीका हे त्या त्या लेखकाला तर विज्ञानकथालेखन करायला आणि ते समृद्ध व्हायला उपयोगी पडतातच. पण, त्यातून इतर कथालेखकातही विज्ञानकथा लेखनाची जाणीव अधिकाधिक फुलत जाताना दिसते. विज्ञानकथेची साहित्यिक मूल्य यावर कट्टय़ावर भर दिला जातोच. विज्ञानकथेसंदर्भात काही प्रश्नही कट्टय़ावर चíचले जातात. त्यात सभासदांच्या विज्ञानकथेबाबतची शंका असो वा कोणत्या पुस्तकासंबंधी अभिप्राय! ती चर्चा सर्वागीण होत असते. त्याचा प्रत्येक बाजूने विचार केला जातो. अधेमधे कट्टेकर त्यांच्या सायफाय कविता, सायफाय कार्टून्स ही कट्टय़ावर ठेवतात आणि ते स्वाभाविक आहे. एखाद्याला कथा चित्रात सादर करावीशी वाटली तर त्याला अडवण्याचा करंटेपणा कोणीही करत नाही. प्रत्येक जण त्याची वैज्ञानिक संकल्पनेतील कल्पना, अनुभूती वेगवेगळ्या मार्गानेही दर्शवतो, त्याचा आविष्कार सादर करतो. त्यालाही मार्गदर्शक तसेच अन्य सभासद यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जातं. विज्ञानलेखकातील विज्ञानकल्पना आणि लेखन फुलवण्यासाठी अधिकाधिक प्रयोगशील राहण्याकडे कट्टय़ाचा भर असतो. त्यात विज्ञानकथा लेखनातही वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. एवढेच नाही तर कट्टय़ावर विविध कथा स्पर्धाविषयक माहिती वेळोवेळी दिली जाते. प्रत्येक विज्ञानकथा लेखकाच्या लेखनस्वातंत्र्याचा कट्टय़ावर आदर केला जातो. कट्टय़ावर चर्चा समान पातळीत केली जाते. जे काही अभिप्राय आहेत ते मोकळेपणे दिले जातात. विज्ञानकथेत वेगवेगळे प्रयोग करून बघायला प्रोत्साहन दिलं जातं. प्रत्येकजण आपल्याकडची माहिती शेअर करतो. आपल्या नेहमीच्या शैलीबाहेरचे काही प्रयोग करून बघण्यासाठी सभासदाला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे, प्रत्येकाकडून काही वेगळी, नवीन साहित्यनिर्मिती होते. एका लेखकाला आणखी वेगळं काय हवं असतं? कट्टेकरातील प्रत्येक विज्ञानकथा लेखक विज्ञानातील थरारात आपल्या कल्पनेचा आविष्कार साकार करून उत्कृष्ट विज्ञानकथा देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकजण स्वत:ला विज्ञानात अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण, ते ज्ञान तो स्वत:पुरतं मर्यादित ठेवत नाही. तर ते कट्टय़ावर शेअरही केलं जातं.
विविध अंकांतून येणाऱ्या ज्येष्ठ विज्ञानकथा लेखकांचे विचार, त्यांच्या मुलाखती, भाषणं अशी मौलिक माहिती कट्टय़ावर पुरवली जाते. कट्टय़ावर मार्गदर्शक विज्ञानविषयक माहितीच्या विविध िलक्स, लेख, कथा कट्टय़ावर शेअर करतात.
आता लवकरच कट्टेकरांचा विज्ञान कथासंग्रह प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे. त्यात विविध विज्ञान कथालेखकांच्या विविध विषयांवरील विज्ञानकथा आहेत. विविध विज्ञानविषयक माहितीने, विज्ञानकथांनी, विज्ञानविशेषांनी आणि मोलाचे मार्गदर्शन देणाऱ्या मार्गदर्शकांनी आणि अर्थातच सभासदांनी हा सायफाय कट्टा अगदी समृद्ध झालेला आहे. अधिक माहितीसाठी पुढील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. marathisfk@gmail.com

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
Story img Loader