यंदाच्या ऑस्कर मानांकनात प्रायोगिक चित्रपटांच वर्चस्व असलं तरी ‘बर्डमॅन’, ‘द ग्रँड बुडपेस्ट होटेल’ हे वेगळ्या वळणाचे चित्रपट आणि द इमिटेशन गेम, थिअरी ऑफ एव्हरीथिंग हे अर्थपूर्ण चरित्रपट बाजी मारतील अशी शक्यता आहे.
यंदाच्या ऑस्कर नामांकनांना घेतल्या जाणाऱ्या आक्षेपातला प्रमुख आक्षेप म्हणजे या साऱ्या चित्रपटांना असणारं प्रायोगिक वळण. पुरस्कार व्यावसायिक चित्रपटांना दिले जाणारे असताना प्रत्यक्ष ऑस्कर पुरस्कार सोडा, पण नामांकनातही तद्दन व्यावसायिक (चांगल्या अर्थाने) चित्रपटांना स्थान नसेल, तर लोक ऑस्कर पाहायला तरी का जातील, असा एक सूर या वेळी ऐकू येतो आहे. त्यात अगदी चूक म्हणण्याजोगं काही नाही. पीटर जॅक्सनच्या ‘लॉर्ड ऑफ द रींग्ज’च्या अखेरच्या भागाने पारितोषिकांची लयलूट केली होती, पण त्याच दिग्दर्शकाच्या त्याच वळणाच्या हॉबिट चित्रत्रयीच्या अखेरच्या भागाचं मुख्य नामांकनात नाव नाही. क्रिस्टफर नोलनच्या ‘डार्क नाइटने’ काही वर्षांपूर्वी चांगलाच ऑस्कर बझ तयार केला होता, पण त्याच्या या वर्षीच्या इन्टरस्टेलरचं जगभर कौतुक होऊनही, ऑस्करने त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात घेतलेलं नाही. त्याऐवजी आहेत ते बरेचसे गंभीर वळणाचे, छोटय़ा-पर्सनल गोष्टी सांगणारे, छोटेखानी चित्रपट. त्यातल्या त्यात भव्य चित्रपट मानायचे तर दोन निघतील. छायाचित्रणात महत्त्वाचा प्रयोग करणारा ‘बर्डमॅन’. ज्याच्याबद्दल आधीच्या लेखात लिहलं होतं, आणि अर्थात वेस अॅन्डरसनचा ‘द ग्रँड बुडपेस्ट होटेल’. बर्डमॅनप्रमाणेच यालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक यांसह नऊ विभागात नामांकनं आहेत.
अँडरसन हे एक नाव हॉलीवूडच्या साच्यात जराही न बसणाऱ्या, पण तरीही वर्षांनुर्वष याच लोकांमध्ये राहून, त्यांच्यातले अनेक नट वापरून, अत्यंत वेगळ्या धर्तीचे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांमधे अग्रणी मानता येईल. ‘रशमोर’, ‘द रॉयल टेनेनबॉम्स’, ‘द दार्जिलिंग लिमिटेड’ किंवा ‘मूनराइज किंगडम’ सारखे चित्रपट त्यांच्या विक्षिप्त विनोदाने, अवघड आशयाने आणि अनेक स्टार्सच्या अनपेक्षित भूमिकांमुळे महत्त्वाचे ठरतात. हे चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकाबद्दल फार अनुकूल वा फार प्रतिकूल, या दोन टोकांची मतं प्रेक्षकांत तयार करू शकतात. ‘बुडपेस्ट’ हा त्याचा त्यामानाने कथेच्या पातळीवर कळायला सोपा आणि गमतीदार सिनेमा. फ्लॅशबॅक हे तंत्र कथेला चौकट टाकण्यासाठी, संदर्भ देण्यासाठी आणलेलं आपण पाहिलेलं आहे, पण इथे त्यांचा वापरही वेगळाच.
कथानक घडतं ते युरोपमधल्या रिपब्लिक ऑफ झुब्रावका या कल्पित देशात. चित्रपट सुरू होतो १९८५ मध्ये, तिथून मागे जात पोचतो १९६८ मध्ये, ग्रँड बुडपेस्ट हॉटेलच्या उतरत्या काळात. तिथे एका लेखकाला (जुड लॉ) हॉटेलचा मालक झीरो मुस्ताफा (एफ मुरे एब्राहम) आपल्या तरुणपणची (तरुण झीरो- टोनी रेवोलोरी) गोष्ट सांगायला लागतो आणि आपण पोचतो थेट १९३० मध्ये, गुस्ताव (राल्फ फाइन्स) या मॅनेजरच्या हाताखाली भरभराट होणाऱ्या हॉटेलवर. हे चित्रपटाचं मुख्य कथानक. म्हटलं तर थ्रिलरच्या वळणाचं, ज्यात खून, मारामाऱ्या, कारस्थानं, बदललेली मृत्युपत्रं, जेलमधून पलायन, पाठलाग असं सारं काही येतं, पण अँडरसनचे चित्रपट हे आपल्या गतीने, आपल्या मर्जीने जातात. चित्रप्रकाराची बंधनं त्यांना पडत नाहीत. यात कथानक घडताना समोर दिसतंय तितकीच त्यामागची पाश्र्वभूमीही महत्त्वाची ठरते. कम्युनिझम, युद्ध, राजकीय अंदाधुंदी, नशीब, या साऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आपलं आयुष्य घडवतो हे इथे दिसतं. तेही अधोरेखित करण्याची गरजही न पडता.
‘बुडपेस्ट’ जुन्या युक्त्यांना नव्या सफाईने सादर करतो. स्टॉप मोशन/ बॅक प्रॉजेक्शन ही तंत्र ज्या काळात वापरली जायची त्या काळातलं कथानक सांगताना दिग्दर्शक तीच जुनी तंत्र वापरतो. त्याचा कॅमेराही अनेकदा वापरला जातो तो चित्रपटाची चौकट हे रंगभूमीवरलं उत्तम नेपथ्य असल्यासारखा. दृश्य संकल्पनेचा अभिजात विचार डोळ्यांपुढे ठेवत तो आपली चौकट आखतो आणि पात्रांना त्यावर स्थान देतो. शैली, साधनं यांचं जुन्या नव्याचं हे मिश्रण त्याच्या केवळ याच चित्रपटात आहे असं नाही. एका परीने तो अँडरसनचा ट्रेडमार्क आहे. वर सांगितलेले अभिनेते यात प्रमुख असले तरी एड्रीअन ब्रॅडी, विलेम डफो, जेफ गोल्डब्लूम, एडवर्ड नॉर्टन असे अनेक मोठे, लोकप्रिय कलाकार यात छोटय़ा-मोठय़ा भूमिकांत आहेत. अँडरसनचे खास ओवेन विल्सन आणि बिल मरीदेखील दर्शन देऊन जातात. केवळ या साऱ्यांनी मनापासून गंमत वाटून केलेलं काम म्हणूनही ‘बुडपेस्ट’ उल्लेखनीय आहे. या दिग्दर्शकाचा जो प्रेक्षक आहे, त्यांनी चित्रपटाला आपलं म्हटलंय. ऑस्कर मिळणं न मिळणं हे आता दुय्यम आहे.
सामान्यत: ऑस्कर नामांकनांमध्ये चरित्रपटांना खास स्थान असतं, कारण व्यावसायिकतेतही या मंडळींचा अर्थपूर्णतेचा शोध सुरूच असतो, मग तो कमी प्रमाणात का असेना. त्यामुळेच पुस्तकं, चरित्र यांचं सहाय्य त्यांच्या अनेक चित्रपटांना मदतीचं ठरतं. यंदाच्या नामांकनात या प्रकारचे तीन चित्रपट आहेत, पण अमेरिकन स्नायपरला युद्धपटांचा अधिक मोठा संदर्भ आहे. त्या तुलनेत स्टीवन हॉकिंग यांच्या चरित्रावर आधारित जेम्स मार्श दिग्दर्शित ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’, आणि अॅलन टुरिंग या गणितज्ञाच्या चरित्रावर आधारलेला मॉर्टन टिल्डम दिग्दर्शित ‘द इमिटेशन गेम’ हे अधिक सरळसोट चरित्रपट म्हणता येतील.
काही बाबतीत, या दोन्ही चित्रपटांमध्ये साम्ये आहेत. या दोन्ही चरित्रनायकांचा आजच्या विज्ञानाशी बराच संबंध आहे. हॉकिंग यांचा काळासंबंधातला रिसर्च तर जगप्रसिद्ध आहेच, वर टुरिंग यांनी कोड ब्रेकिंग यंत्रांवर केलेलं काम, हे संगणकाच्या शोधाला कारणीभूत ठरलेल्या संशोधनातलं मानलं जातं. दोघांनाही व्यक्तिगत आयुष्यात एकेका मोठय़ा अडचणीशी झगडावं लागलं. मात्र फरक हा, की हॉकिंगनी त्यांच्या आजारावर मात करून संशोधन सुरू ठेवलं, पण टुरिंगच्या काळात हॉमोसेक्शुअॅलिटीला समाजात असणारा प्रचंड विरोध त्यांना एका मर्यादेपलीकडे सहन झाला नाही, आणि त्यांनी वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी आत्महत्या केली.
दोन्ही चित्रपट पाहिले तर ‘इमिटेशन गेम’ हा नक्कीच उजवा असल्याचं लक्षात येईल. नामांकनांकडे पाहूनही हे स्पष्ट व्हावं. ‘थिअरी’ला दिग्दर्शनाचं नामांकन नाही. खरं तर दर्जात असा फरक असण्याचं कारण नाही. दोघांची आयुष्यं तशाच नाटय़पूर्ण घटनांनी भरलेली आहेत आणि दोघांच्याही कामाचा अवाका प्रचंड आहे. तरीही हे होण्याचं एक कारण म्हणजे ‘थिअरी’च्या संहितेत हॉकिंगच्या व्यक्तिगत आयुष्याचा पुरेसा विचार झालाय, पण काम ही त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची बाजू, कदाचित त्यांना जिवंत राहायला भाग पाडणारी प्रेरणा असूनही संहिता ते काम गृहीत धरते. क्वचित त्यांच्या थिसीसवर चर्चा होते, वा कधी तरी आपण त्यांच्या लेक्चरला हजेरी लावतो, पण ते पुरेसं नाही. बऱ्याच प्रमाणात त्यांचा मोठेपणा मानून चालावं लागतं. आता इथे अर्थात अशी अपेक्षा नाही, की चित्रपट पाहून आपल्याला हॉकिंगचं सारं संशोधन कळेल. ते तर त्यांची पुस्तकं वाचूनही कळायला कठीण आहे. पण हातपाय चालत नसताना, आवाज यंत्राच्या साहाय्याने पोचत असताना आपल्या मनावर, विचारांवर काय ताबा ठेवून हा माणूस इतक्या उंचीला पोचला असेल हे दिसणं आवश्यक होतं. थिअरी ते न दाखवता केवळ प्रेम आणि लग्नसंबंध या दोन बाजूंमधेच अडकून राहतो.
याउलट ‘इमिटेशन’ गेम मात्र परिस्थितीचा सर्व अंगांनी विचार करतो. युद्धादरम्यान त्यांची भूमिका, वरिष्ठांनी उभ्या केलेल्या अडचणी, कोडब्रेकिंग मशीन उलगडल्यावरही युद्ध जिंकण्यासाठी केलेला स्ट्रॅटेजीचा विचार, माणूस आणि यंत्र यांमधली तुलना, समाजाला उपकृत करणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचं समाजाचं, वागण्यातला विरोधाभास दर्शवणारं धोरण अशा अनेक बाजू त्यात येतात. एक विशिष्ट काळ उभा करणं हे नेहमीच कठीण असतं. ‘द इमिटेशन गेम’ ते उत्तमरीत्या करून दाखवतो.
गेम आणि थिअरी, या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या नायकांना, बेनेडिक्ट कम्बरबॅच आणि एडी रेडमेनला, अभिनेत्याच्या भूमिकेसाठी नामांकन आहे. या दोघांनीही काम उत्तम केलंय यात शंकाच नाही, मात्र रेडमेनला मुळातच करण्यासारखं अधिक आहे. हॉकिंगना आपण सर्वानी पाहिलेलं आहे, त्यांच्या आजाराची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. त्यांची कुठेही नक्कल होऊ न देता त्या व्यक्तिरेखेला पडद्यावर उभं करायचं, हे अतिशय कठीण आहे. यंदा अभिनेत्यांच्या नामांकनात इतरही चांगली नावं (स्टीव कॅरेल, ब्रॅडली कूपर, मायकल कीटन) असली, तरीही या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. घोषणा व्हायचीच काय ती बाकी आहे. अर्थात, या अशा मानाच्या पुरस्काराबाबत पारितोषिक मिळण्या इतकंच नामांकनही महत्त्वाचं असतं. तुमच्या दर्जावर शिक्कामोर्तब करायला ते पुरेसं आहे.
गणेश मतकरी