फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागली की तमाम सिनेमाप्रेमींना वेध लागतात ते ऑस्करचे. म्हणूनच यंदाच्या वर्षी ऑस्कर नामांकन मिळवलेल्या महत्त्वाच्या सिनेमांची चर्चा या मालिकेतून केली जाणार आहे. यावेळी ‘बर्डमॅन’ या सिनेमाविषयी-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑस्कर पुरस्कारांबद्दल जे सार्वत्रिक मतभेद पाहायला मिळतात, त्यात दर्जा आणि व्यावसायिकता यांच्यातला संघर्ष हा एक नेहमीचा मुद्दा आहे. अमुक चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, पण तो काही इतका बरा नव्हता, असं आपण नेहमीच ऐकतो, पण खरं तर त्यात आश्चर्य वाटावं असं काय आहे? दर्जेदार चित्रपटांना ऑस्कर पारितोषिकं देण्याचा प्रयत्न असला, तरी त्यांचं दर्जेदार असणं हे व्यावसायिक चौकटीतून मोजलं जातं, हेदेखील खरंच. त्याचं कारण हे, की ऑस्कर पुरस्कार व्यावसायिक चित्रपटांचे आहेत, प्रयोगशील चित्रपटांचे नाहीत. त्यामुळे खर्चीक, नेत्रदीपक चित्रपटांची नामांकनं आणि अनेकदा त्यांना मिळणारे पुरस्कार, हे खरं तर अपेक्षित असायला हवं.
या पाश्र्वभूमीवर यंदाची सवरेत्कृष्ट चित्रपटांची नामांकन पाहिली तर आनंद वाटण्यासारखी गोष्ट आहे. निवड करताना यंदा व्यावसायिकतेपेक्षा प्रयोगशीलतेला दिलेलं महत्त्व जाणवण्यासारखं आहे आणि ब्लॉकबस्टर एन्टरटेनमेन्ट ही बाजूला पडली आहे. अनेक मोठय़ा आणि नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या महत्त्वाकांक्षी विषय हाताळणाऱ्या या कामात एक सर्वार्थाने लायक असं एक नाव शोधायचं हे खरं तर कठीण काम, पण यादीकडे पाहताच एक नाव इतर सर्वाच्या पुढे येऊन उभं राहतं, आणि ते म्हणजे आलेहान्द्रो इनारितूचा बर्डमॅन. ‘बर्डमॅन ऑर ( दि अनएक्स्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नरन्स)’ हे त्याचं पूर्ण नाव. ‘बर्डमॅन’ केवळ सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी नाही तर एकूण नऊ नामांकनांत आहे, ज्यात अभिनयाची तीन तर आहेतच, वर दिग्दर्शन, छायाचित्रण, पटकथा, ध्वनी अशी इतरही महत्त्वाची नामांकनंही आहेत.
इनारितू हे हॉलीवूड पाहणाऱ्यांना नवं नाव असलं तरी जागतिक चित्रपटांकडे लक्ष ठेवून असणाऱ्यांना ते चांगलंच माहीत आहे, ते त्याच्या डेथ चित्रत्रयीमुळे, ज्यातल्या आमोरेस पेरोसवरून आपल्याकडला ‘युवा’ हा चित्रपट सुचला होता. गंमत म्हणजे ‘बर्डमॅन’मध्ये त्याने आपल्या चित्रपटासाठी निवडलेली स्ट्रॅटेजी, ही डेथ चित्रत्रयीच्या अगदी उलट आहे. यातल्या ‘आमोरेस पेरोस’, ‘ट्वेंटीवन ग्रॅम्स’ आणि ‘बॅबल’ या तीन चित्रपटांत त्याने कथानकाची सलगता काढून टाकून त्यांच्या घटनाक्रमाशी खेळ केला होता. इथे तो केवळ एक, काही दिवसांच्या अंतरात घडणारं सलग कथानक तर मांडतोच, पण तेवढं करून थांबत नाही, सुरुवात आणि शेवट वगळता, तो हे कथानक जणू काही एका सलग चालणाऱ्या लांबच लांब शॉटमध्ये शूट केल्याचा आभास तयार करतो. त्यात वापरलेली ही एक क्लृप्तीही हा चित्रपट विशेष ठरवणारी आहे, ती स्वत:कडे गरजेपेक्षा अधिक लक्ष वेधून घेत असली तरीही. पण ही तर नुसती सुरुवात आहे, इनारितूच्या पोतडीत इतर गमतीजमतीही आहेत.
सर्जनशीलता विरुद्ध व्यावसायिकता हा ‘बर्डमॅन’मागचा प्रमुख अजेंडा आहे. कामातलं समाधान महत्त्वाचं का पैशात आणि रसिकांच्या प्रेमात मोजता येणारं यश, हा या चित्रपटाला पडलेला प्रश्न आहे. यशस्वी कलावंतांना असणारी तडजोडमुक्त शुद्ध कलेची ओढ आणि शुद्ध कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्यांमध्ये आलेला कडवटपणा यामागची कारणं इथे तपासली जातात. कला कधी श्रेष्ठ मानायची? ती कोण सादर करतंय आणि कोण नावाजतंय याचा त्या कलेच्या प्रत्यक्ष गुणवत्तेशी संबंध आहे का? व्यावसायिकतेमागे कला आहे की नाही? शुद्ध कला नावाचं काही असू शकतं का? अभिनेत्याचा मुखवटा हा केवळ प्रेक्षकांपुढे असतो का एरवीही? कलेत आणि आयुष्यातही काय प्रमाणात तडजोड चालवून घेतली जाऊ शकते? कीर्ती आणि दर्जा यांचा परस्परसंबंध आहे का? असे अनंत प्रश्न दिग्दर्शक आपल्यापुढे मांडतो. त्यांची गहनता आपल्याला थेट जाणवू न देता, पण आपल्याला एका वैचारिक पेचात अलगद गुंतवून ठेवत.
‘बर्डमॅन’चा दुसरा विशेष आहे, तो एके काळी यशस्वी सुपर हीरोची भूमिका करून बाहेर पडलेल्या आणि आजही त्या एकाच भूमिकेच्या जिवावर ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या भूमिकेत, खरोखरच एके काळी यशस्वी सुपर हीरोची भूमिका करून बाहेर पडलेला आणि आजही त्या एकाच भूमिकेच्या जिवावर ओळखला जाणारा अभिनेता वापरतो. हा आहे मायकेल किटन, टिम बर्टनच्या बॅटमॅन आणि बॅटमॅन रिटर्न्समुळे स्टार झालेला आणि आज विस्मृतीत गेलेला. टाइप कास्टिंग, म्हणजे व्यक्तिरेखेच्या व्यक्तिमत्त्वाला सुसंगत असणारी अभिनेत्यांची योजना, ही अनेकदा प्रेक्षकाला भूमिका चटकन कळायला फार उपयोगाची ठरते. इथेही तेच होतं. ‘बर्डमॅन’च्या भूमिकेने मोठा केलेला इथला रिगन थॉम्सन ही तशी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे आणि बरंच काही सांगायचं असल्याने, पटकथाही तशी सोपी नाही. इथे किटनला पाहता क्षणी आपल्याला ही व्यक्तिरेखा कळते आणि व्यक्तिचित्रणात वेळ फुकट जात नाही. त्याऐवजी आपण पुढल्या गोष्टीकडे वळतो.
चित्रपटाचं कथानक एका ब्रॉडवे प्रॉडक्शनच्या रंगीत तालमींच्या काळात घडतं. त्यांच्याकडे प्रीवू स्वरूपात या तालमी खऱ्या प्रेक्षकांसमोर करण्याची पद्धत आहे. रिगन बर्डमॅनमधून बाहेर पडल्यावर त्याचं काही भलं झालेलं नाही आणि हे नाटक, हा त्याचा करिअर सावरण्याचा बहुधा अखेरचा प्रयत्न आहे. रेमन्ड काव्र्हर या लघुकथांसाठी गाजलेल्या लेखकाच्या ‘व्हॉट वुई टॉक अबाऊट, व्हेन वुई टॉक अबाऊट लव्ह’ या कथेचं रिगनने स्वत:च नाटय़ रूपांतर केलंय, ते तो स्वत: दिग्दर्शित करतोय आणि त्यात कामही करतोय. प्रीवूज तोंडावर आले असताना एक अपघात होतो आणि आयत्यावेळी एका महत्त्वाच्या भूमिकेत माईक शायनर (एड नॉर्टन) या रंगभूमीवरल्या स्टारला आणावं लागतं, ज्याला सतत चुचकारत राहणं भाग असतं. रिहॅबमधून नुकती सुटलेली रिगनची मुलगी (एमा स्टोन) या प्रॉडक्शनला मदत करतेय आणि तिच्या काळजीनेही रिगन त्रस्त झालेला. या साऱ्यावर नियंत्रण ठेवतोय रिगनचा वकील मित्र जेक (झ्ॉक गॅलिफिआनाकीस). रिगन स्वत: मात्र या प्रयोगाबद्दल साशंक आहे, त्यातच शायनरचा आगाऊपणा त्याच्यावरल्या ताणात भरच टाकतोय. अशातच त्याच्या लक्षात येतं की नाटकं उचलण्या-आपटण्याची क्षमता असणाऱ्या एका प्रख्यात समीक्षिकेने त्याच्यावर डूख धरलाय आणि ती नाटक पडल्याशिवाय शांत बसायचीच नाही.
‘बर्डमॅन’चा नटसंच प्रचंड नाववाला तर आहेच, म्हणजे त्यामानाने कमी महत्त्वाच्या भूमिकांमधेही हॅन्गओव्हरमधला गॅलिफिआनाकीस किंवा नेओमी वॉट्स यांसारखे मोठे स्टार्स त्यात आहेत, त्याशिवाय ‘बर्डमॅन’च्या सुपरहिरो थीमला अनुसरून यातल्या यंदा नामांकनात असणाऱ्या तिन्ही प्रमुख कलाकारांनी सुपरहिरोपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली आहेत. नॉर्टनने ‘द इन्क्रिडिबल हल्क’मध्ये हल्कची भूमिका केली आहे आणि स्टोन नव्या स्पायडरमॅन चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका करते. हा योगायोग असण्याची
शक्यता आहे, पण असेलच असं नाही.
‘बर्डमॅन’ जवळजवळ संपूर्णपणे टाइम्स स्क्वेअर परिसरात ब्रॉडवेवरल्या थिएटरमध्ये घडतो. (एका बिकटप्रसंगी टाईम्स स्क्वेअरमधल्या भर गर्दीतून रिगनला अंतर्वस्त्रावर मारावी लागलेली फेरी चित्रपटाच्या हाय पॉईन्ट्समधला एक आहे.) हे थिएटर, त्यातले जिने, कॉरिडॉर्स, लॉबी, प्रेक्षागृह, मेकपरुम्स, कॅटवॉक आणि स्टेज या साऱ्या जागा, इथला अवकाश याचा दिग्दर्शक अतिशय परिणामकारक वापर करतो. वर म्हटल्याप्रमाणे छायाचित्रणाला एका शॉटची एकसंधता आणून देण्यासाठी दिग्दर्शकाने वेगवेगळ्या शॉट्सचं जोडकाम डिजिटली पुसलं आहे, पण हा झाला तांत्रिक भाग. तो पुरेसा नाही. रचनेच्या दृष्टीने कशानंतर काय यायला हवं? कॅमेरा एका स्थळापासून दुसऱ्यास्थळी न्यायचा तर कोणत्या व्यक्तिरेखेबरोबर नेता येईल? प्रहरांमधले बदल कसे दाखवायचे, यांचा विचार इथे बारकाईने केलाय. त्याला पानंच्या पानं पाठ करून हुकमी बोलणाऱ्या कलावंतांची साथही आहे. त्यात चित्रपटाची आणखी एक गंमत म्हणजे रिगन या व्यक्तिरेखेच्या मन:स्थितीचं दर्शन. ही मन:स्थिती दोन प्रकारे समोर येते. एकतर त्याच्यावरला ताण आणि क्लॉस्ट्रोफोबिआ याला छायाचित्रण, प्रकाशयोजना, ट्रान्झिशनच्या जागा यांमधून उठाव दिला जातो आणि दुसरी आहे ती त्याची स्वत:बद्दलची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा. ही येते ती त्याच्या डोक्यात सतत वावरणाऱ्या ‘बर्डमॅन’ या सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेमधून. ही व्यक्तिरेखा काल्पनिक आहे, त्याच्यापुरती आहे, केवळ त्याच्या डोक्यात आहे, पण तिचं सततचं अस्तित्व रिगनला आपण सामान्यांपेक्षा कोणी वेगळे आहोत हे जाणवून देतं. तिच्या मदतीने तो चमत्कार घडवू शकतो, वस्तू हलवतो, स्फोट घडवतो, उडतो, पण हे केवळ आपल्या डोक्यात. यातलं काहीच इतरांना दिसत नाही. आधी केवळ पात्राच्या मनात असणारा पण चित्रपटाच्या शेवटाकडे मॅजिकल रिअॅलिझमकडे झुकणारा हा भाग दिग्दर्शकाच्या चित्रभाषेवरल्या नियंत्रणाचा एक उत्तम नमुना आहे.
‘बर्डमॅन’ मला व्यक्तिश: महत्त्वाचा वाटतो तो अनेक कारणांसाठी. त्यातल्या आशयाची खोली, चित्रणातल्या युक्ती, संवादांचा चटपटीतपणा हे सारं आहेच, पण त्यापलीकडे जाऊन त्याचा सहजपणा आहे तो खरा महत्त्वाचा. आपण काही जगावेगळं करतोय असा अभिनिवेष न बाळगता तो प्रेक्षकाला काही कळत असेल हे गृहीत धरतो हे मला खास वाटलं. तेवढय़ावरूनही त्याचं ऑस्कर नामांकनातलं आघाडीचं स्थान नक्कीच योग्य वाटतं.
गणेश मतकरी