प्रथितयश, आपल्या लडिवाळ भावगीतांनी रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कविवर्य कै. पी. सावळाराम (मूळचे निवृत्तीनाथ व नंतर झालेले सावळाराम रावजी पाटील) यांचं जन्मशताब्दी वर्ष ४ जुलला सुरू होत आहे. त्यांनी लिहिलेली अनेक भावगीतं म्हणजे स्त्रीमनाच्या भावविश्वाचा अनोखा साक्षात्कारच.
‘हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का?’ असं विनवणारी प्रिया, ‘जिथे सागरा धरणी मिळते..’ तिथे वाट पाहणारी प्रेमातुर प्रेयसी, ‘सांगितल्याविण ओळख तू रे’ म्हणत प्रेम करणारी प्रियतमा, ‘हसले ग बाई हसले अन् कायमची मी फसले’ असं कबूल करणारी नवयौवना, ‘..का नयनांनो जागे केले’ असं विचारणारी स्वप्नधुंद प्रणयिनी, ‘.. सांग दर्पणा कशी मी दिसते’ असं आरशाशी हितगुज करणारी रूपगर्वतिा जेव्हा लग्न होऊन सासरी जायला निघते तेव्हा आई म्हणते, ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा,’ तर सासूच्या रूपातली आई म्हणते, ‘का झालीस गं बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी.’ मग ‘आली हासत पहिली रात’ असा मीलनानंद सांगणारी नववधू, ‘सप्तपदी मी रोज चालते’ असं जीवनाचं सार्थक झाल्याचं सांगणारी पत्नी अशी स्त्रीमनाची कित्येक रूपं त्यांनी शब्दबद्ध केलेल्या कवितांतून पुढे ललनांच्या ओठांवर कायम राहणाऱ्या गीतांच्या रूपांतून अजरामर झाली.
दुर्दैवानं त्यांची भेट झाली नाही, पण त्यांच्या एका पत्राच्यारूपानं झालेल्या भेटीची आठवण कायम मजजवळ आहे याचं मला खूप समाधान आहे. त्यांच्या मला आलेल्या पत्राची आठवण आवर्जून व्हावी आणि सांगावी असंच आजचं साहित्यिक वातावरणही आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकाही राजकारणाच्या आखाडय़ासारख्या वाजूगाजू लागल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची संख्या, गाजवलेल्या साहित्यिक परिसंवादांची आकडेवारी, साहित्यिक वर्तुळातील ऊठबस, लोकसंग्रह यांवर आधारलेली गणितं संमेलनाध्यक्षपदासाठीची लायकी ठरवतात हे आजचं चित्र आहे. ग्रंथनिर्मिती आणि त्यांचं वितरण यांची यथायोग्य यंत्रणा, लोकांपर्यंत आपली कला पोहोचवणारी मोठय़ा प्रमाणात अन् सहज उपलब्ध होणारी रेडिओ-टीव्हीसारखी प्रसारमाध्यमं यांमुळे कवी-लेखक लवकरात लवकर रसिकांपर्यंत आपली कलाकृती पोहोचवण्यात यशस्वी होतात, पण प्रकाशित ग्रंथांपेक्षा, कथाकथन, मालिकांचं संवादलेखन, मालिका आणि चित्रपटांसाठी गीतलेखन यांतून अशा कलाकारांना रसिक-प्रेक्षकांपर्यंत लवकर पोहोचता येतं.
गंमत म्हणजे १९८३ सालच्या मे महिन्यात मला पाठवलेल्या एका मोठय़ा पत्रात कवी पी. सावळाराम यांनी हेच सत्य लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,
‘मी आणि गदिमा (गीतरामायणकार कै. ग. दि. माडगूळकर) हातात हात घालून कोल्हापुराहून चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी निघालो. गदिमा पुण्यातच थांबले. मी मुंबईच्या रोखाने येऊन ठाण्यास थांबलो आणि मोठय़ा उत्साहानं, प्रेमानं गीतलेखन – चित्रपटासाठी, ध्वनिमुद्रिकेसाठी व आकाशवाणीसाठी – करू लागलो. आम्ही ग्रंथसंपदा निर्माण करण्याच्या मागे न लागता रसिकांजवळ वरील माध्यमांद्वारे लवकर पोहोचलो. तसं झालं नसतं तर आम्ही माहीत झालो असतो की नाही कुणास ठाऊक?’
गीतकार पी. सावळाराम यांनी माझ्या पत्राला उत्तर दिलं होतं आणि तेही आंतर्देशीय पत्राची तीनही पानं भरून. निमित्त होतं मी त्यांनी आकाशवाणीवर सादर केलेला ‘विशेष गीतगंगा’ कार्यक्रम ऐकल्याचं. मी त्यांना विचारलं होतं, ‘तुम्ही भावगीत लिहिण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत का?’ यावर त्यांनी खुलासा केला तो असा –
‘विशेष प्रयत्न असे नाहीत.. पण आनंदी भावनांशी समरस होण्यासाठी आपले मन संवेदनाक्षम ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला. चिंतन केलं. ज्या व्यक्तीचा भाव असेल त्या व्यक्तिरेखेच्या स्वभावगुण विशेष आणि बोलभाषा हे जाणून घेतले. त्यासाठी बराच काळ थांबलोही. शब्द नादमधुर आणि अर्थवाही, शोधत राहिलो. भावनेच्या मधाळ पाण्यात सारखे भिजवत ठेवले ते शब्द आणि मगच गीते लिहिली. माझ्या नशिबाने लता, आशासारख्या स्वरकिन्नरी लाभल्या हे भाग्य!’
पत्र वाचून मी नतमस्तक झालो. प्रगल्भता आणि नम्रता हातात हात घालून वावरणारं ते व्यक्तिमत्त्व जेव्हा माझ्यासारख्या सामान्य रसिकाला हे सारं कुठलाही आडपडदा न ठेवता लिहितं तेव्हा स्तिमित होणं एवढंच आपल्या हाती राहतं. त्यांच्या नावानं ठेवलेल्या एका निबंधस्पध्रेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवल्याबद्दल त्यांनी पत्र संपवता संपवता अभिनंदनही केलं होतं आणि माझ्या पत्राला उत्तर द्यायला उशीर झाला म्हणून क्षमायाचनाही केली होती.
‘कुठलाही आडपडदा न ठेवता’ असं म्हणण्याचं कारण म्हणजे, गीतकार आणि कवी यांच्यातल्या सनातन भेदभावाबद्दल त्यांनी त्या पत्रात व्यक्त केलेली खंत –
‘आम्ही भावगीतकार (हा शब्द त्यांनी अधोरेखित केलेला) आहोत, कवी म्हणून आम्हाला मानायला बऱ्याच बुजुर्ग साहित्यिक कवींची इच्छा नव्हती. आमच्या लोकप्रियतेचा दुस्वास करण्यापलीकडे त्यास विशेष काही अर्थ होता असे मला वाटत नाही.. जाऊ द्या!’
जेव्हा कुठल्याच क्षेत्रात म्हणावी एवढी गळेकापू स्पर्धा नव्हती त्या काळातल्या कविश्रेष्ठांची ही अवस्था. पण सुदैवानं आज हा वाद दिसत नाही. सारे कवी, गीतकार तेवढीच प्रसिद्धी, प्रतिष्ठा आपल्या कर्तृत्वानं बाळगून असतात हे किती चांगलं आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या बाबतीतही ‘पहले आप, पहले आप’ असं झालं तर सोन्याहून पिवळं!
खरंच किती हा साधेपणा होता गीतकार आणि कवी पी. सावळाराम, तसेच नाना म्हणजे कै. जगदीश खेबूडकर यांच्या वागण्या-बोलण्यात! पी. सावळाराम त्या पत्रात एके ठिकाणी लिहिते झाले..
‘कवीचं काव्य रसिकांप्रत पोचलं पाहिजे. त्यांनी त्या काव्याचा रसास्वाद घेतल्याखेरीज कवीला काव्यनिर्मितीचं खरं समाधान वाटत नाही. तुमच्यासारख्या रसिकांची सदिच्छा जी आहे, तीच माझी खरी संपदा!’
‘मधुसंचय’ या पुस्तकात कवयित्री कै. शांता शेळकेंनी ‘कवीचा स्वाभिमान’ नावाच्या चार ओळी संग्रहित केल्या आहेत त्या देण्याचा मोह, या पत्राच्या संदर्भानं, टाळता येत नाही..
माझे काव्य रसाळ रंजक असे ठावे जरी मन्मना
‘द्या हो द्या अवधान द्या रसिकहो’ का मी करू प्रार्थना?
जाईची लतिका फुलून विखरी जै गंध सायन्तनी
येती भृंग स्वये रसार्थ, धरिती ते काय शंका मनी?
आजही जेव्हा जेव्हा हे पत्र मी वाचतो तेव्हा एवढंच म्हणावंसं वाटतं की हे कविश्रेष्ठांनो, तुमच्यासारख्यांच्या प्रतिभेचा दरवळच असा आहे की रसास्वादासाठी भुंगे येतच राहतील, काव्यवाचन करत राहतील आणि गीते ऐकतच राहतील.. जिवाचे कान करून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा