समस्त मराठी मनावर ज्यांच्या गीतांनी मोहिनी घातली त्या सावळाराम रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांच्या जन्मशताब्दी वर्षांची ४ जुलै रोजी सांगता होत आहे. मूळचे सांगलीकर असणाऱ्या सावळाराम यांनी कोल्हापुरात बी.ए. पूर्ण केलं, त्यानंतर रेशनिंग खात्यात नोकरी करण्यासाठी ते ठाण्यात दाखल झाले. कवितेची वही घेऊन मुंबईत आलेल्या सावळारामांना ही खर्डेघाशी फारशी रुचली नाही आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. पूर्णवेळ भावगीत लेखनाला वाहून घेतलेले सावळाराम पुढे जनकवी ठरले. २१ डिसेंबर १९९७ या दिवशी त्यांचे निधन झाले. जन्मशताब्दी वर्षांच्या सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या काव्याचा हा रसास्वाद.
पुणे स्थानकावरचा तो प्रसंग तसा नेहमीचाच होता, कोणाच्याही, अगदी तुमच्या-आमच्या घरातही घडणारा. लग्न झाल्याने आई-वडिलांना सोडून कायमचं सासरी जावं लागणार या कल्पनेने धाय मोकलून रडणारी एक मुलगी आणि गळ्यात पडून रडणारी तिची आई. ही आईही कधी तरी त्याच भूमिकेतून गेली असल्याने गाडी सुटताना वियोगाचं दु:ख बाजूला सारून मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत्ये.. ‘पोरी, सासरी जाताना डोळ्यांत गंगा-जमुना आणू नकोस, आता सासर हेच तुझं सर्वस्व आहे, सुखी राहा..’
गाडीतले अनेक प्रवासी या प्रसंगाचे तटस्थ साक्षीदार, मात्र त्यातील एका तरुण कवीच्या मनाचा या घटनेने ठाव घेतला.. त्याला लगेचच दोन ओळी सुचल्या.. पुढे त्याने ते गीत पूर्ण केलं, संगीतकार वसंत प्रभू यांनी त्याला साजेशी आर्त चाल लावली व अवघ्या १९ वर्षांच्या लताच्या गळ्यातून ते गीत साकारलं.. ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा.. दिल्या घरी तू सुखी रहा..’ पी. सावळाराम यांच्या या गीताने जणू क्रांतीच घडली. गीत कसलं लोकगीतच झालं ते. उभ्या-आडव्या महाराष्ट्राला त्या गीताने वेड लावलं. आजही कोणतीही मुलगी लग्नानंतर सासरी निघाली की याच गीताची आठवण होते, एवढं या गीताने जनसामान्यांच्या काळजात घर केलं. सावळाराम यांना जनकवी उपाधी मिळण्याची ही नांदी ठरली.
‘गंगा जमुना’नंतरचे दिवस मंतरलेलेच होते. विधिलिखित म्हणा किंवा रसिकांचं भाग्य म्हणा, वसंत प्रभू यांच्या रूपाने सावळाराम यांच्या शब्दकळेला पुरेपूर न्याय देणारा संगीतकार मराठी भावगीतांना लाभला. या दोघांची पहिली भेट झाली तीही ‘एचएमव्ही’तच. ‘गंगा जमुना’च्या आधी या जोडीने चार-पाच गाणी एकत्र केली होती, मात्र या गाण्यानंतर भट्टी विशेष जमून आली. सावळारामांनी गीत लिहायचं आणि प्रभूंनी त्याला सुरांचा साज चढवायचा, असं सुरेल सत्र सुरू झालं. हे कमी म्हणून, शब्द-सुरांच्या या सुंदर लेण्याला स्वरांकित करण्यासाठी मंगेशकर भगिनींपैकी कोणी तरी असणार हे ठरलेलंच. खरं तर, या दोघी तेव्हा हिंदी चित्रपट संगीतात कमालीच्या व्यग्र होत्या, लतादीदी तर काहीशा अधिकच, तरीही या जोडगोळीचं गाणं म्हटल्यावर वेळ राखून ठेवला जायचा. मंगेशकर भगिनींनी गायलेल्या मराठी गीतांपैकी सर्वाधिक गीते प्रभू आणि सावळाराम यांची आहेत, यात या दोघांची थोरवी अधोरेखित होते.
प्रभू हे कमालीचे मनस्वी आणि स्वत:च्या अटींवर काम करणारे संगीतकार, त्यात स्वभाव शीघ्रकोपी. म्हणूनच चित्रपटसृष्टीच्या गळेकापू स्पर्धेत ते फारसे रमले नाहीत (प्रभू-सावळाराम जोडीचे उणेपुरे १९ चित्रपट आहेत). साहजिकच, त्यांनी भावगीतांवर भर दिला. मात्र या जोडीने दिलेल्या भावगीतांवर ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी ती चित्रपट गीतांएवढीच किंबहुना कांकणभर सरसच होती, यात शंका नाही. ‘हसले ग बाई हसले अन् कायमची मी फसले’, ‘हृदयी जागा तू अनुरागा’, ‘घट डोईवर घट कमरेवर’, ‘हरवले ते गवसले का’, ‘बाळा होऊ कशी उतराई’, ‘सप्तपदी मी रोज चालते’, ‘तुझे डोळे पाण्याने भरले’ सावळारामांच्या अशा किती तरी गीतांनी मराठी रसिक नादावला. विशेष म्हणजे, त्यांच्या गीतांमध्ये प्रामुख्याने स्त्रीसुलभ भावभावनांचं प्रतिबिंब उमटलेलं असे, त्यांची बहुतांश गीते ही स्त्रीप्रधानच आहेत. त्यांच्या गीतांतून स्त्रीप्रतिमा अशा काही प्रभावीपणे समोर आल्या आहेत, की वाटावं ही गीतं एखाद्या कवयित्रीनेच लिहिली आहेत आणि हे केवळ भावगीतांपुरतं मर्यादित नाही, तर चित्रपटगीतं लिहिण्याची संधी मिळाली तेव्हाही सावळारामांनी याचा प्रत्यय दिला. याचे अनेक दाखले देता येतील. ‘गंगा जमुना’च्या आधी एखाद्या ‘चिसौकां’ची जी मनोवस्था असते त्याचं किती उत्तम वर्णन त्यांनी ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’ या गीतात केलं आहे. यातील दुसऱ्या अंतऱ्यात त्यांनी केवळ दोन ओळींमध्ये त्या मुलीच्या बालपणापासूनचा प्रवास चितारला आहे. ‘संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली, आली वयात, खुदुखुदु हासते होऊ नी नवरी लग्नाची, होणार सून मी त्या घरची’ हे ‘कन्यादान’ या सिनेमातलं आजही तितकंच टवटवीत आणि या प्रसंगासाठीचं सर्वोत्तम गीत आहे. याच सिनेमातल्या ‘कोकीळ कुहुकुहु बोले’ आणि ‘माझिया नयनांच्या कोंदणी’ या गीतांमध्येही सावळारामांच्या लेखणीने नायिकेच्या भावनांना परकायाप्रवेश करून शब्दरूप केलं आहे. यातलंच ‘मानसीचा चित्रकार तो’ हे गीत तर आजही लोकप्रिय आहे आणि त्याच्याशिवाय गाण्याचा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. ‘प्रेमा काय देऊ तुला’, ‘आली हासत पहिली रात’ (शिकलेली बायको), ‘जिथे सागरा धरणी मिळते’ (पुत्र व्हावा ऐसा), ‘सखी गं मुरलीमोहन मोही मना’ (धर्मकन्या) ही गीतंही सावळारामांचं हे वैशिष्टय़ं अधोरेखित करतात.
सावळारामांच्या गीतांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील सात्त्विक भाव. ही गीतं कमालीची साधीसोपी, आपल्यालाही असं सुचू शकेल असं वाटणारी आहेत. ते कमालीचे प्रतिभावान असूनही या गीतांमध्ये कोणताही अभिनिवेश नाही. याला कारण त्यांचा सरळ, अजातशत्रू स्वभाव असावा. सावळारामांच्या घरात वारीची परंपरा. त्यामुळे पुढे तेही वारकरी व माळकरी झाले. त्यांची आई जात्यावर दळताना ओव्या रचत असे (दुर्दैवाने त्या ओव्यांची कुठे नोंद नाही.) या साऱ्याचं प्रतिबिंब त्यांच्या काव्यलेखनात उमटलं असावं, त्यामुळेच त्यांच्या गीतांत सात्त्विकता, करुणा, भक्तिरस ठायी ठायी आढळतात. वारकरी असल्यानेच त्यांनी लिहिलेली भक्तिगीतंही वेगळी ठरली, अगदी संख्येचा विचार केला तरी तेवढी भक्तिगीतं अन्य कोणी लिहिली नसावीत. विठ्ठल हे त्यांचं दैवतच. या दैवतावर त्यांनी अनेक रचना केल्या. ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘विठ्ठला समचरण तुझे धरिते’, ‘धागा धागा अखंड विणूया’, ‘विठ्ठलाचे नाव घ्या हो’, ‘मूर्त रूप जेथे ध्यान’, ‘सखू आली पंढरपुरा’ ही काही उदाहरणे. मात्र विठ्ठलभक्ती करताना त्यांच्यातील कवी जन्मदात्यांची महती विसरत नाही, काहीशा बंडखोर वृत्तीने एका गीतात ते विचारतात, ‘विठ्ठल रखुमाई परी, आईबाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी’
राधा-कृष्ण या चिरंतन विषयाला वाहिलेल्या पारंपरिक गौळणींमध्ये सावळारामांनी मोलाची भर टाकली आहे. या विषयावर त्यांनी एकापेक्षा एक सरस गीते लिहिली आहेत. ‘राधा गवळण करिते मंथन’, ‘मजवरी माधव रुसला बाई’, ‘दर्पणी बघते मी गोपाळा’, ‘राधा कृष्णावरी भाळली’, ‘जो तो सांगे ज्याला त्याला वेड लागले राधेला’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’ किती दाखले द्यावेत.. श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राधेला कशाचंही भान उरत नाही, याचं खूप प्रभावी वर्णन त्यांनी ‘वेड लागले राधेला’ या गीतात केलं आहे. याचा पहिला अंतरा पाहा,
पितांबराची साडी ल्याली,
मोरपिसांची करी काचोळी,
वेळी अवेळी काजळकाळी,
उटी लाविते मुखचंद्राला,
वेड लागले राधेला..!
या गीतांना आशा भोसले यांचा खटकेबाज स्वर लाभला आहे.
गदिमांच्या लेखणीतून साकारलेलं गीतरामायण अद्वितीयच, मात्र सावळारामांनीही प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर ‘रघुपती राघव गजरी गजरी, ‘रामा हृदयी राम नाही’, ‘श्रीरामा घनश्यामा’, ‘रघुनंदन आले आले’ अशी सुंदर, भावस्पर्शी गीते लिहिली आहेत. ‘रघुपती राघव गजरी गजरी तोडीत बोरे शबरी’ या गीताला तर खुद्द गदिमांनीच दाद दिली होती. गदिमा वयाने व मानाने त्यांच्यापेक्षा मोठे, मात्र एक कालखंड असा होता की ज्या वेळी हे दोघे एकमेकांचे स्पर्धक होते, मात्र ती स्पर्धा निकोप होती. एकाने लिहायचे आणि दुसऱ्याने कौतुक करायचे, असा प्रकार होता. गदिमांना गंगा-जमुनाच्या लोकप्रियतेचंही कौतुक होतं. ‘मला संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच असं लिहायचा प्रयत्न करेन,’ असं ते नेहमी म्हणत. पुढे मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांनी ‘जा बाळे जा सुखे सासरी, नको गुंतवू मन माहेरी’ हे अप्रतिम काव्य रचलंही. आचार्य अत्रे यांनी माडगूळकर व सावळाराम यांना कौतुकाने ‘मावळ्या व सावळ्या’ अशी टोपणनावे ठेवली होती. एखादं नवं चांगलं गीत कानी पडलं की ते दोघांपैकी कोणाला तरी दूरध्वनी करून विचारत, ‘काय रे हे गाणं मावळ्याचं की सावळ्याचं?’
समाजाच्या सर्व स्तरांत सावळाराम लाडके होते. भावगीते, भक्तिगीते, गौळणी, चित्रपटगीते अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या सावळाराम यांना जनकवी अशी मान्यता मिळाली नसती तरच नवल. कुसुमाग्रज हे त्यांचं दैवत. साक्षात कुसुमाग्रजांकडूनच सावळारामांना जनकवी ही उपाधी मिळाली. ‘जो आवडतो सर्वाना, तोचि आवडे देवाला’ या गीतातील ‘घेऊनी पंगू आपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरी निजहृदयाला, तोचि आवडे देवाला’ या पंक्तींना कुसुमाग्रजांनी विशेष दाद दिली होती. एखाद्या कवीला आणखी काय हवं? त्यांच्या लेखणीला ओहोटी ठाऊकच नव्हती, मात्र तिला काहीशी खीळ बसली ती वसंत प्रभू यांच्या अकाली निधनामुळे. १३ ऑक्टोबर १९६७ या दिवशी प्रभू पडद्याआड गेले आणि सावळारामांची जणू प्रेरणाच गेली. त्यानंतर त्यांचा हात लिहिता राहिला नाही, असं नाही, मात्र एक चाक निखळल्याने प्रवासाचा वेग काहीसा क्षीण झाला. प्रभूंच्या निधनावर त्यांची प्रतिक्रियाच बोलकी होती, ते म्हणाले होते, ‘माझा प्रभू गेला..’ १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भालू’ सिनेमातील त्यांची गाणी गाजली. ‘गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मीलन’ हे गीत तर आजही लोकप्रिय आहे. या सिनेमानंतर त्यांना पुष्कळ ऑफर्स आल्या, मात्र त्यातील बहुतांश ऑफर्स या सावळारामांना मानवणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या गाण्यांसाठी भरपूर पैसे मोजण्याची तयारी असणाऱ्या एका निर्मात्याला त्यांनी कथा, प्रसंग याविषयी विचारणा केल्यानंतर ‘अहो, तुम्ही चार-पाच गाणी लिहा अशीच, आम्ही ती घुसवू सिनेमात कुठे तरी,’ असं उत्तर त्यांना मिळालं. अशा बिनडोक आणि भावनाशून्य निर्मात्याशी त्यांचं जमणं शक्यच नव्हतं, त्यांनी नम्रपणे नकार दिला. गीतलेखनावरच चरितार्थ असूनही सावळारामांनी आपलं वैशिष्टय़ असलेल्या सात्त्विकतेशी तडजोड केली नाही, हा त्यांचा मोठेपणा व वेगळेपणा. जनकवी कोणी उगीच होत नसतं..
कमालीचे साधे
सावळाराम यांचे ज्येष्ठ पुत्र संजय पाटील यांनी वडिलांच्या आठवणी जागवल्या. त्यांनी सांगितले, आमचे दादा कमालीचे साधे होते. त्यांनी कधीच कोणाकडून कशाची अपेक्षा केली नाही. अनेक निर्मात्यांनी त्यांचे पैसे बुडवले, तेच निर्माते पुढच्या खेपेस आले तरी हे संतवृत्तीने त्यांना गीते लिहून द्यायचे. ठाण्यातील शिक्षणतज्ज्ञ डॉ. बेडेकर यांच्या आग्रहाने १९६२ मध्ये आमचे दादा नगरसेवकपदाची निवडणूक लढले, त्यात ते निवडूनही आले, पुढे उपनगराध्यक्ष व नगराध्यक्षही झाले. मात्र आमच्या दोन खोल्यांच्या घरात काडीचा फरक पडला नाही. आजही हे घर तसेच आहे. दादा नगराध्यक्ष असताना अनेक जण नगराध्यक्षांचा बंगला कुठे आहे, असे विचारत येत असत आणि आमचे दोन खोल्यांचे घर पाहून बुचकळ्यात पडत असत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून सर्व बडय़ा राजकारण्यांशी ओळख असूनही त्यांनी कधीही कलाकारांच्या कोटय़ातील घराची मागणी केली नाही. एवढा मोठा गीतकार, मात्र त्यांना राज्य शासनाचा एकही पुरस्कार न मिळाल्याने आम्ही मुले तक्रारीचा सूर लावत असू. त्यावर दादांचे उत्तर ठरलेले असे- अरे, रसिकांनी एवढे भरभरून प्रेम दिलेय मला, आणखी पुरस्कार कशाला हवेत? विठ्ठलभक्तीत रमलेल्या दादांचे निधन झाले तेव्हा रेडिओवर योगायोगाने ‘विठ्ठल तो आला आला’ हे गीत लागले होते.