कोल्हापूरचा उल्लेख अनेकदा कलापूर असा केला जातो. कारण महाराष्ट्राला अनेक कलावंत देण्याचे काम कोल्हापूरने केले आहे. कलावंतांच्या या मांदियाळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे दत्तोबा संभाजी दळवी. शाहू महाराजांच्या कालखंडात त्यांची चित्रकला बहरली. शाहू महाराजांच्या कलादृष्टीमुळे अनेक कलावंतांचे भाग्य उजळले, त्याचा महाराष्ट्राला खूप फायदा झाला. बाबूराव व आनंदराव पेंटर यांच्यासोबत काम करताना कलागुण लक्षात आल्यानंतर त्यांना मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टला पाठविण्यात आले, पण वडिलांच्या निधनामुळे त्यांना ते शिक्षण अर्धवट सोडून कोल्हापूरला परतावे लागले. पण त्याआधी त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली होती. शाहू महाराजांनी त्यांना एका जपानी कलावंताकडे टॅटू शिकवण्यासाठी पाठवले होते. त्या काळी समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी त्यांच्याकडून गोंदवूनही घेतले. गोंदणकला आणि हस्तिदंतावरील चित्रण हे त्यांचे हातखंडा विषय होते. शाहू महाराजांसोबत असल्याने त्यांना अनेक संस्थानिकांची चित्रांची कामे मिळाली. ‘किलरेस्कर’, ‘मनोहर’ या अंकांसाठी त्यांनी हास्यचित्रेही रेखाटली.
‘गेट वेच्या कमानीमधून चितारलेले ताज’ हे त्यांचे प्रस्तुतचे चित्र त्या काळी विशेष गाजले होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांचे स्वत:चे चित्रण कमी झाले आणि त्यांनी त्यांचे बव्हंशी लक्ष कोल्हापुरात स्थापन केलेल्या दळवीज आर्ट इन्स्टिटय़ूटवर केंद्रित केले होते.

Story img Loader