नोंद
सध्या सर्वत्र संमेलनाचे वारे वाहत असले, तरी केवळ पारंपरिक संमेलनाच्या साच्यात न मोडणारी काही संमेलने होत असतात. अशापैकी एक असणारे पक्षीमित्र संमेलन नुकतेच नागपूर येथे पार पडले, त्यानिमित्ताने..
नागपूर येथे नुकतंच ४-५ जानेवारी रोजी २७ वं पक्षीमित्र संमेलन झालं. राज्यभरातून सुमारे २५० पक्षीमित्र त्याला आले होते. संमेलन म्हटलं की भाषणं, ठराव, परिसंवाद असं पारंपरिक स्वरूप डोळ्यासमोर येतं. पण पक्षीमित्र संमेलन याला अपवाद असतं. कारण केवळ परिसंवाद, भाषण न होता तज्ज्ञांपासून सर्वसामान्य पक्षीमित्रांचा सहभाग आणि संवर्धनाच्या दृष्टीने ठोस उपाय यामध्ये मांडले, स्वीकारले जातात.
पक्षीमित्र संमेलनाचे प्रणेते प्रकाश गोळे व रमेश लाडखेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून संमेलनाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थान नागपूरचेच ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी भूषविलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली हे संमेलनाचे विशेष अतिथी होते व तर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत उद्घाटक होते. त्यांनी पक्षीमित्र व वन विभागाने पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. उद्घाटक मारुती चितमपल्ली म्हणाले की, ‘‘सध्या पक्षी निरीक्षणामधील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आमच्या वेळी अशी साधने फारशी उपलब्ध नव्हती. आज अनेक नवीन पक्षीनिरीक्षक तयार होत आहेत, आधुनिक तंत्रामुळे त्यांच्या अभ्यासाला वेग मिळत आहे, मात्र एखादा विविक्षित पक्षी घेऊन त्यावर अभ्यासू लिखाण केलेले दिसत नाही. एकच पक्षी असा विषय घेऊन लिहिलेली पुस्तकं केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहेत.’’ सलीम अलींच्या पक्ष्यांविषयीच्या दहा खंडांचे पुनर्प्रकाशन होण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.
संमेलनाचे आयोजक ‘सोसायटी फॉर वाइल्डलाइफ कन्झव्र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च’ (वाइल्ड सीईआर) या संस्थेचे डॉ. बहार बावीस्कर यांनी प्रास्ताविकात संमेलनाची भूमिका मांडली. २६ व्या संमेलनाचे अध्यक्ष गोपाळ ठोसर यांना संमेलनाची सूत्रे विद्यमान अध्यक्षांकडे सुपूर्द केली. संमेलनाचे अध्यक्ष अनिल पिंपळापुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पक्षीमित्र संमेलन हा पक्षीप्रेमींचा अनौपचारिक मेळावा असल्याचं नमूद करतानाच, त्यांनी या एकत्रीकरणानंतर काय, या प्रश्नाचं उत्तर आपल्या दोन दिवसांच्या विविध परिसंवादांतून आणि सादरीकरणातून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या जखमी पक्षी, सुटका आणि पुनर्वसन या विषयावर अभ्यासू अशी ‘कॉन्सेप्ट नोट’ तयार व्हावी, तेच संमेलनाचं फलित ठरेल. पक्ष्यांशी बांधीलकी असणारे सारे पक्षीप्रेमी एकमेकांशी मैत्री करण्याच्या दृष्टीने एकत्र आले असले तरी ही एक चळवळ आहे, त्यामुळे त्यातूनच पक्षीमित्र संमेलन हे अभ्यासाचे व्यासपीठ व्हावे अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली. मध्यवर्ती पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी इंग्लंडच्या आरएसपीबीचे दहा लाख सदस्य असताना आपले मात्र केवळ हजारावरच अडकलो आहोत. पक्ष्यांविषयी धोरणात बदल घडवून आणायचा असेल तर आपलं संख्याबळदेखील वाढवलं पाहिजे असं नमूद केलं.
‘‘जखमी पक्ष्यांची सुटका आणि पुनवर्सन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर संमेलनात विशेष सादरीकरणं आयोजित करण्यात आली होती. पशुवैद्यक डॉ. बहार बावीस्कर यांनी आजवर केलेल्या अनेक पक्ष्यांच्या सुटकांच्या अनुभवावर आधारित केलेल्या सादरीकरणात अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांना स्पर्श केला. ‘‘बऱ्याच वेळा पक्षी जखमी आहे, इमारतीवर अडचणीच्या जागी अडकला आहे असे फोन येतात. अशा वेळेस पक्षी सोडवायला गेल्यावर प्रथम त्याला सुटकेची गरज आहे का हे पाहणे सर्वात महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा त्याचे तसे बसणे हे नैसर्गिक असते, पण सर्वसामान्यांना त्याची माहिती नसते. पक्षी सुटका करून आणल्यावरदेखील त्याला धडधाकट करून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हे महत्त्वाचे असते.’’ महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे पक्षी पुन्हा त्याच्या अधिवासात पुनर्वसित होण्याचे प्रमाण हे केवळ २५ टक्के इतकेच असल्याचे कटू सत्य त्यांनी नमूद केले. सुटका करताना काय करावे, काय साधनसामग्री असावी, कायदेशीर बाबी कोणत्या या मुद्दय़ांना त्यांनी त्यांच्या सादरीकरणात स्पर्श केला. डॉ. प्रिया बावीस्कर यांनी जखमी पक्ष्याची सुटका केल्यानंतर त्याला नेमकं काय आणि कसं खाद्य द्यावं यावर मार्गदर्शन केलं. गौरव कडू यांनी पक्ष्यांचे अपघात या विषयावर तर आश्विन पाटील यांनी पक्ष्यांच्या जीवनातील जगण्याचा संघर्ष मांडला. साहसी क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अमोल खंते यांनी उंचावर, अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करताना साहसी खेळातील साधनांचा उपयोग या विषयाची थोडक्यात माहिती दिली. संमेलनाच्या ठिकाणी जखमी पक्ष्यांची सुटका व संवर्धन या अनुषंगाने सुमारे ८० छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते.
खरं तर संमेलनाच्या लांबलेल्या उद्घाटन सत्रामुळे ही सादरीकरणं सकाळच्या सत्राऐवजी दुपारी सादर झाली. पण संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना हीच असल्यामुळे व हा विषय सविस्तर चर्चेचा असल्यामुळे यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं होतं. तसेच त्यापाठोपाठ याविषयी पक्षीमित्र संघटनेची अधिकृत भूमिका ठरविणे महत्त्वाचं होतं. ती चर्चा दुसऱ्या दिवशी झाली. त्यामुळे वेळेच्या अभावी एकतर मूळ विषयाची सविस्तर मांडणी होऊ शकली नाही तसेच विषयाला पुढे नेणारी चर्चा परिणामकारक घडू शकली नाही.
त्यानंतरच्या सत्रात पक्षी संवर्धन या विषयीची चार अभ्यासू सादरीकरणे करण्यात आली. इंडियन बर्ड कन्झर्वेशेन नेटवर्कचे मुख्य समन्वयक राजू कसंबे यांनी महाराष्ट्रातील संवर्धनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं. तर कौस्तुभ पांढरीपाडे यांनी लोकसहभागातून तणमोर संवर्धनाच्या कामाचा आढावा घेतला. जंयत वडदकर यांनी दुर्मीळ अशा रानपिंगळ्याविषयीच्या सद्यस्थितीबाबत सर्व पक्षीमित्रांना अपडेट केलं. तसेच रामशीष जोशी यांनी कोकणातील गिधाड संवर्धनाच्या प्रकल्पातील नवीन उपक्रमांची माहिती दिली. चातक सोसायटी जळगावचे अनिल महाजन यांच्या ‘वंडरफुल वर्ल्ड ऑफ बर्ड्स’ आणि अविनाश लोंढे व सुरेंद्र अग्निहोत्री यांच्या इंडियन कोर्सर हे दोन माहितीपट दाखविण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शहरातील अंबाझरी तलावावर पक्षीनिरीक्षणाने झाली. प्रचंड विस्तार असलेल्या या तलावाभोवती अनेक पाणपक्षी आढळल्यामुळे सभागृहातील पक्षीमित्रांची ही भटकंती आनंदमय झाली. दुसऱ्या दिवसातील सत्रांमध्ये अनेक अभ्यासू तसेच हौशी पक्षीमित्रांनी सादर केलेल्या सादरीकरणांचा समावेश होता. पक्ष्यांचे आवाज, चिमण्यांची कृत्रिम घरटी, पक्ष्यांची बदलती निवासस्थाने, पक्षीनिरीक्षणाची साधने, पक्षीगणनेतील अनुभव, भंडारा जिल्ह्य़ातील पक्षीवैभव, सोलापूरमधील रंगीत करकोच्याची शिकार असे अनेक विषय यामध्ये होते. सर्वच सादरीकरणं ही उत्तम होती. जळगाव येथील केशर उपाध्ये यांनी आपल्या अंगणातील पक्ष्यांच्या हालचाली चित्रित करून एक सादरीकरण केले. हे सादरीकरण तांत्रिकदृष्टय़ा उत्कृष्ट नसले तरी त्यांची पक्षीनिरीक्षणाची ओढ दिसून येत होती. केवळ बौद्धिक गप्पा न मारता संवर्धनाच्या दृष्टीने नेमके काय करता येईल यावर सायंकाळच्या खुल्या सत्रात चर्चा झाली. चायनीज मांजा हा सध्या पक्ष्यांसाठी खूप घातक असल्यामुळे त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी त्वरित वनविभागाशी बैठक घ्यावी असे ठरले. तसेच राजकीय नेत्यांनादेखील याबद्दल माहिती देऊन त्यांच्यामार्फत धोरणात नियमात बदल करावेत अशी सूचना करण्यात आली.
संमेलनाच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने जखमी पक्षी सुटका व पुनर्वसन या संदर्भात काय करता येईल यावर झालेल्या चर्चेनुसार एक फेब्रुवारीपर्यंत सर्व पक्षीमित्रांना आपल्या सूचना यासाठी ६्र’ूिी१@ॠें्र’.ूे या मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर वनविभागाशी चर्चा करून याविषयी एक सामायिक अशी पद्धत तयार करण्याचे ठरले. यासाठी राज्यभरातील पक्षीमित्रांची माहिती संकलित केली जात असून जिल्हा पातळीवर समन्वयक नेमले जातील असे पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी सांगितले.
यंदाचे संमेलन राज्याच्या एकदम दुसऱ्या टोकाला असल्यामुळे काही प्रमाणात पक्षीमित्रांची संख्या कमी होते. मात्र अनेक तरुण पक्षीमित्रांचा सहभाग उल्लेखनीय होता. आपल्या भागातील काम सर्वापर्यत पोहोचावे यासाठी सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, जळगाव येथून हे पक्षीमित्र संमेलनात सामील झाले होते. यामध्ये नेहमी दिसणारे भेटणारे चेहरे तर होतेच पण त्याचबरोबर काही नवीन, पण नियमित झालेले चेहरेदेखील दिसत होते.
नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयाच्या सक्रिय मदतीमुळे संमेलनाला मोठं बळ मिळालं. दरवर्षीच्या संमेलनात पुढील संमेलनाचे आयोजन संस्था व ठिकाण ठरत असते. मात्र २६ व्या संमेलनात कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता. पण नंतर वाईल्ड सीआर या नागपूरच्या संस्थेने प्रस्ताव सादर करून संमेलन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली, आणि ते यशस्वी करून दाखवले. २८ वे संमेलन पुण्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आला असून त्यावर पक्षीमित्र संघटनेने स्वीकृती दर्शविली असल्याचे जाहीर करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा