आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपुरात घाणीचे अधिराज्य असते, तसेच कचऱ्याचे, टाकून दिलेल्या अन्नाचे आणि मानवी विष्ठेचे साम्राज्य वारीमार्गावर असते. वारीमार्गावरील आळंदी ते लोणंद या टप्प्यातील वास्तवाचे हे भेदक दर्शन.
आषाढी एकादशीला पंढरपुरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीहून ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान ठेवते. सोबत परंपरागत २२७ दिंडय़ांमध्ये सामावलेल्या लाखो वारकऱ्यांचा महासागर असतो. वारी या दोन अक्षरांत अवघे चैतन्य भरून राहिलेले असते. विठ्ठलाच्या ओढीने, मुखाने ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा गजर करीत एका लयीत, एका सुरात पंढरपूरच्या वाटेने जाणारे हजारो-लाखो वारकरी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचितच, पण गेल्या काही वर्षांत त्याला तडे जात आहेत. प्रसिद्धी माध्यमं, छायाचित्रकार आणि सोशल मीडिया अशा माध्यमांतून वारी आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. वारकऱ्यांचं विठ्ठलचरणी, माउलीचरणी समर्पित झालेलं रूप तर सर्वानाच माहीत आहे, पण याच वारीचं आणखीन एक भीषण रूप आहे.
आळंदीहून प्रस्थान ठेवल्यापासून ते पंढरपुरी पोहोचेपर्यंतचं वारीचं सारं वेळापत्रक काटेकोरपणे ठरलेलं असतं. गेल्या कित्येक वर्षांच्या शिरस्त्यानुसार कोणत्या गावात कोणत्या दिंडीचा कोठे मुक्काम असणार, तेथील पूजेचा मान कोणाचा, भोजन व्यवस्था, दान कोण करणार, पालखी तळावरील कार्यक्रम. अशा सगळ्या गोष्टी अगदी शिस्तबद्ध सैन्याप्रमाणे ठरलेल्या. पण, या सर्वात महत्त्वाच्या नेमक्या काही मूलभूत गोष्टींचं मात्र कसलंच ठोस नियोजन दिसत नाही. शौचास कोठे जायचे, कचरा कोठे टाकायचा आणि उरलेल्या अन्नाचं काय करायचं, हेच ते मूलभूत प्रश्न. या साऱ्यांचं एकच उत्तर असतं, वाट फुटेल तिकडे, जागा मिळेल तिकडे. ना त्यावर प्रशासनाचं नियंत्रण ना प्रशासनाची काही ठोस व्यवस्था. कोणी विचारणारं नाही, कोणी अडवणारं नाही. या परिस्थितीत दिसते ती केवळ एक बेफिकिरीची भावना. कोणताही प्रशासक नसतानादेखील आपापल्या वारीचं सारं काटेकोर नियोजन करणारे हे वारकरी नेमके या तीन बाबतींतच कमालीचे बेशिस्त झालेले दिसतात.
आळंदीहून वारी सुरू झाल्यावर पहिल्या रात्रीचा निवास हा आळंदीतच असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आळंदी ते पुणे असा मोठा पल्ला पार केला जातो. माउलींची पालखी प्रस्थान ठेवण्याच्या त्या काळात आळंदीत चारही बाजूंनी नुसता वारक ऱ्यांचा महासागरच उसळलेला असतो. आळंदीत असणारे हजारभर मठ, मैदाने सारे काही वारकऱ्यांनी फुलून गेलेले असते. गेल्या काही वर्षांत यात खूपच वाढ झालेली आहे. आळंदीतील गावकऱ्यांशी बोलल्यावर लक्षात येतो तो या वर्षीचा बदल. प्रशासनाने अनेक सुविधा दिल्यामुळे यंदा सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न फारसा गंभीर झाल्याचे गावकऱ्यांना वाटत नव्हता. नवीन तीनमजली शौचालयांनी बऱ्याच अंशी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यापूर्वी मात्र जशी जागा मिळेल तसे मिळेल त्या ठिकाणी शौचास बसण्याची प्रवृत्ती होती.
गावात या वर्षी परिस्थिती बरीच बरी असल्याचे येथील सुलभ शौचालयाचा कर्मचारी सांगताना लोकांच्या मानसिकतेवर मार्मिक भाष्य करतो, ‘‘ज्यांना शौचालयात बसायचे नसते ते कितीही शौचालये बांधली तरी बाहेरच बसतात. या चार-पाच दिवसांच्या काळात आमची सुलभ शौचालये मोफत उपलब्ध असतात. मात्र तरीदेखील येथे गेल्यावर शुल्क आकारले जाईल या भीतीने न येणारे आणि उघडय़ावर शौचास बसणारेदेखील अनेक आहेत.’’ गावापासून थोडय़ा दूरवर वारक ऱ्यांचे अनेक तळ असतात. या परिसरातील एक महिला व्यापारी सांगते की, ‘‘या दिवसांत लोक आजूबाजूच्या मोकळ्या मैदानात विधी करतात. आम्ही किती जणांना सांगणार आणि काय सांगणार. दोन दिवसांचा त्रास सहन करायचा, इतकेच काय ते आम्ही करू शकतो.’’ अगदी हीच प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारे वारीमार्गावर ऐकायला मिळते.
आळंदी नगरपालिकेने शौचालयाच्या अनेक सुविधा दिल्या आहेत, फिरती शौचालयेदेखील आहेत. पण मुळातच वारकरी संख्या इतकी प्रचंड आहे की ही व्यवस्था कमीच पडते. आळंदीहून पालखी निघाली की तिचा पुढचा मुक्काम पुण्यात असतो. हा रस्ता बराच काळ संरक्षण आस्थापनांच्या (बॉम्बे सॅपर्स, डीआरडीओ इ.) बाजूने असल्यामुळे अनेक ठिकाणी संरक्षक भिंती आहेत. या मार्गावर पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेची व्यवस्था असते. त्यांच्यामार्फत साफसफाई आणि शौचालयांच्या सुविधा असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण होते. पुण्यातील डेक्कन कॉलेजजवळील एक दुकानदार सांगतो की, ‘‘या वर्षी येथे महापालिकेची फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. मात्र मागील वर्षी जवळील इमारतीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पडलेला होता. असा सांदीकोपरा मिळाला की त्याचा वापर करण्याची मानसिकता मागच्या वर्षी प्रकर्षांने जाणवली, पण यंदा ती जागा उपलब्ध नसल्यामुळे आपोआपच महापालिकेची सुविधा वापरली गेली.’’ रस्त्यावरील कचऱ्याबाबत तो पुढे सांगतो की, वारी पुढे गेल्यावर लगेचच महापालिकेने कचरा उचलल्यामुळे फारसा त्रास झाला नाही. यंदा महापालिकेने तब्बल दहा टन कचरा उचलला होता. वारक ऱ्यांची ही मानसिकता आणि कचऱ्याचा दहा टनी आकडा हा वारी मार्गावर आपणास वारंवार ऐकायला मिळतो.
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा पुण्यात मुक्काम झाल्यावर वारी सासवडच्या दिशेने प्रस्थान करते. वारीमार्गावरील एकमेव मोठे शहर पार झालेले असते. पुढील प्रवासात महापालिकेसारखी भक्कम यंत्रणा नसते, ग्रामपंचायत, नगरपालिका याच काय ते आता वारीच्या सुविधा व्यवस्थापनाचा आधार असतात. सारा दिवेघाट माणसांनी फुलून जातो आणि वारी मोकळ्या वातावरणात प्रवेश करते. जसजशी ही शहरापासून व्यवस्थांपासून दूर जाते तसतसे वाटेवरील कचऱ्याचे अस्तित्व वाढत जाते. दिवेघाट चढून गेल्यावर घाटमाथ्याचा विसाव्याचा परिसर तुम्हाला या सर्वाची चूणूक दाखवतो. वारीने पुढे मार्गक्रमण केल्यानंतर चार दिवस झाले असले तरी रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्रावळी, चहाचे प्लास्टिकचे कप, थर्माकोलच्या प्लेट्स यांचे ढिगारे दिसू लागतात. गेल्या काही दिवसांत असणाऱ्या प्रचंड वाऱ्यामुळे हा कचरा रानोमाळ उडून गेला असल्यामुळे कदाचित चार दिवसांनी त्याचे अस्तित्व कमी असले तरी जेथे अटकाव होऊ शकतो अशा ठिकाणी आजही मोठय़ा प्रमाणात अडकून राहिलेला दिसतो. आता हेच चित्र म्हणजे त्या मार्गावरून वारी गेल्याचे निदर्शक ठरणार असते.
पुणे सोडल्यानंतर वारी सासवड मुक्कामी असते. यंदा येथे वारीचा मुक्काम दोन दिवस होता. माउली पालखीसाठी राखून ठेवलेल्या दोन मैदानात पालखी तळ पडतो, तर जवळच्याच आणखी एका मोठय़ा माळरानावर, डोंगराजवळ अनेक पालं पडतात. उर्वरितांसाठी जेथे जागा मिळेल तेथे विखरून राहणे हाच पर्याय असतो. वारी पुढे जाऊन तीन दिवस झालेले असतात आणि साऱ्या सासवड शहराला जंतुनाशक पांढऱ्या पावडरीने माखलेले असते. दोन दिवसाच्या मुक्कामात निर्माण झालेला कचरा, मैला साफ करून गाव स्वच्छ आणि दरुगधीमुक्त करण्यासाठी प्रशासन तीन दिवस झटत असतं. पालखी तळावर दोनशे सीट्स शौचालय, पालांवर चर खणून शौचालय सुविधा, कचऱ्यासाठी अनेक कचराकुंडय़ा अशा उपाययोजना केलेल्या असतात. गेले तीन दिवस हे सारे साफ करण्यात गेलेले असतात. पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण सांगतात की, दररोज आम्ही आठ-दहा टन कचरा या माध्यमातून गोळा करत असतो. पालिका जादा कर्मचारी नेमून साफसफाई करत असते. त्यासाठी पालिकेचे दहा-बारा लाख अतिरिक्त खर्च होतात. शौचालये सुविधा असली तरी बाहेरच बसण्यास प्राधान्य असल्यामुळे मिळेल ती मोकळी जागा वापरण्याकडे कल दिसून येतो असे ते नमूद करतात. अगदी पालखी मैदानच्या कडेने, शौचालयांच्या कडेने शौचास बसण्याचे प्रमाण खूप असल्याचे ते सांगतात. तीन दिवसांच्या मेहनतीमुळे खूप मोठय़ा प्रमाणात स्वच्छता झालेली असते. पालिकेने, कचरा दिसल्यास नागरिकांनी संपर्क करून कळवावे यासाठी जो दूरध्वनी क्रमांक दिलेला असतो त्यावर या तीन दिवसांत दररोज किमान ४० कॉल आलेले असतात, यावरूनच एकंदरीत विषयाची तीव्रता ध्यानात येऊ शकते.
सासवडात मात्र एका वेगळ्याच कचऱ्याने आपल्याला धक्का बसतो. पालांच्या माळावर काही ठिकाणी चक्कभाक ऱ्यांचे, चपात्यांचे ढीग पडलेले असतात. अतिरिक्त ठरलेले अन्न तेथेच सोडून जाण्याच्या या पद्धतीने काही क्षण तरी विषण्णता आल्याशिवाय राहात नाही. अधिकारी सांगतात की, आज तर खूपच कमी आहे, वारीने पुढे प्रस्थान ठेवले की दुसऱ्या दिवशी येथील उर्वरित अन्नाचे ढीग उचलणे हेच पहिले मोठे काम असते. मोठय़ा शहरात अन्नदानदेखील मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यामुळे अतिरिक्त होणारा भात, शिरा, भाकरी, पोळी, आमटी सारे येथेच टाकून द्यायचे ही विचित्र प्रवृत्ती दिसून येते. एकीकडे अन्नासाठी फिरविशी दाही दिशा अशी स्थिती तर येथे रानमाळावर सोडून दिलेले लाखमोलाचे अन्न आणि हेच चित्र पुढच्या प्रत्येक मुक्कामावर दिसून येते.
सासवडनंतरचा वारीचा पुढचा तळ खंडोबाच्या जेजुरीत असतो. पूर्वी जेजुरी गावातच पालखी तळ असे आणि आजूबाजूच्या रिकाम्या जागा, मैदानावर इतर पालांचा मुक्काम. यावर्षी पालखी तळ आणि सर्व पालांना जुन्या जेजुरीजवळ गावाबाहेर एमआयडीसीच्या मैदानात आणि काही शेतांमध्ये जागा देण्यात आली होती. माळाचा विस्तार प्रचंड असल्यामुळे संपूर्ण वारी एकाच ठिकाणी होती. वारीने पुढील प्रस्थान केल्यानंतर तिसऱ्या दिवशी येथे भेट दिल्यावर येथेदेखील मागील पानावरून पुढे चालू अशीच परिस्थिती दिसून आली. उरलेल्या अन्नाचे ढिगारे, प्लास्टिक, अस्ताव्यस्त उडणाऱ्या थर्माकोल प्लेट्स, कप यांनी मैदानाच्या एका बाजूस असणाऱ्या कारखान्यांच्या संरक्षक भिंती भरून गेल्या होत्या. तात्पुरती उभारण्यात आलेली शौचालये दीनवाण्या अवस्थेत होती. मैदानाच्या एका बाजूस असणाऱ्या डाळिंबाच्या बागेतदेखील प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा दिसून येत होता.
जेजुरी नगरपालिका असल्यामुळे येथे शौचालयांची सोय बरी होती. मात्र तरीदेखील ती एवढय़ा मोठय़ा समूहाला पुरणारी नाही. त्यातच विस्तीर्ण माळरान असल्यामुळे पुन्हा मोकळ्या हवेत जाणाऱ्यांसाठी आयतीच सुविधा उपलब्ध झाली होती.
पुढचा मुक्काम हा लगेचच वाल्हे गावातला. सहा-सात वाडय़ांचे मिळून तयार झालेल्या या गावाच्या छोटय़ाशा ग्रामपंचायतीवर सुविधा पुरविण्याची जबाबदारी. पाण्याचे टँकर, पालखी तळाची साफसफाई, विजेची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, जंतुनाशकांची फवारणी अशी सारी कामे त्यांनाच पार पाडायची. एकतर या ग्रामपंचायतीत आधीच कर्मचारी अधिक, खर्च अधिक म्हणून कर्मचारी कपात केलेली, त्यामुळे सगळेच हंगामी कर्मचारी. जोडीला रोजंदारीवर बायका, मजूर घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे काम करावे लागते. वाल्ह्य़ात वारीचा मुक्काम हा गावाच्या पुढे जाऊन रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे होतो. पालखी तळासाठी मात्र रस्त्यानजीकची जागा असते. तेथे मंडप घातला जातो. येथेदेखील आधीचेच सारे मुद्दे दिसून येतात. फरक इतकाच की आदल्याच दिवशी मुक्काम हलल्यामुळे अन्नातील ताजेपणा जाणवत राहतो. वाऱ्यामुळे बराच कचरा उडून गेला असला, जात असला तरी जो दिसतो त्याचे प्रमाणदेखील प्रचंड असते.
अन्नाच्या नासाडीबद्दल तर आणखीनच दोन धक्कादायक बाबी आढळतात. एके ठिकाणी बाजरीच्या भाक ऱ्यांच्या वाळलेल्या ढिगावरून चक्क वाहनाचं चाकच गेलेलं असतं, तर काही ठिकाणी चक्क शौचास बसलेल्या जागेजवळच अन्न फेकून दिलेलं असतं. कामठवाडीजवळच्या या माळावर असणाऱ्या मोजक्याच काही घरांजवळदेखील शौचास बसल्याचा खुणा आढळून येतात आणि जवळच फेकून दिलेलं अतिरिक्तअन्न. काजू, बदाम, पिस्ता, वेलची घातलेला शिरा आणि समोर मानवी विष्ठा हे चित्र पाहिल्यावर या मानसिकतेला काय म्हणायचं हेच कळत नाही.
ग्रामपंचायतीने अनेक प्रयत्न केले असले तरी पाच-पन्नासजणांच्या मनुष्यबळाच्या आधारे केलेलं व्यवस्थापन काय आणि कसं असू शकतं हा विचारच केलेला बरा. प्रचंड माळरानामुळे कोणीही कोठेही शौचास बसलं तरी काय फरक पडणार, ही मानसिकता तर अध्याहृतच असते.
पुणे जिल्ह्य़ातील वारीचा हा शेवटचा टप्पा. वाल्ह्य़ापासून आठ किलोमीटरवर असणाऱ्या नीरा गावात दुपारचं भोजन, स्नान झालं की वारी नदी ओलांडून सातारा जिल्ह्य़ात प्रवेश करते. येथे ताज्या दमाचे सातारा जिल्हा प्रशासन स्वागतास तयार असते. नदीपल्याडच्या लोणंदमध्ये वारीचा यंदाचा मुक्काम दोन दिवसांचा असतो. नीरा लोणंद मार्गावरून आदल्या दिवशीच वारी गेल्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण तीव्रतेने जाणवू लागतं. शेतात विखुरलेल्या थर्माकोलच्या प्लेट्समुळे काळ्या मातीवर पांढरे डाग दिसू लागतात. लोणंदमध्ये पालखीचा तळ एकदम गावात असतो, तर उर्वरित पालांचा मुक्काम गावाबाहेरील फलटणच्या दिशेने मोकळ्या मैदानात पडलेला असतो. साऱ्या गावालाच यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. गावातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद असतो. फलटणच्या मार्गावर एकदिशा वाहतूक सुरू असते. पोलिसांच्या गाडय़ा, रुग्णवाहिका, खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, पाण्याचे टँकर्स आणि मिनरल वॉटर विकणाऱ्या विक्रेत्यांची गर्दी. सारा माहौल वारीमय झालेला असतो. पालखी तळाच्या जवळच ओढय़ाच्या किनारी काही तात्पुरती शौचालयांची व्यवस्था, पालांवरदेखील अशीच काहीशी व्यवस्था, चर खणून केलेलं शौचालय आणि बाकी रान रिकामंच.
प्रत्येक पालावर सुरू असणारे कीर्तन-भजन, पालखी तळावरील भाविकांची प्रचंड गर्दी सारं वातावरण माउलीमय असते. जिल्ह्य़ातील प्रशासकीय अधिकारी झाडून हजर झालेले असतात. पोलिसांचा ताफा असतो. पण सारा भर असतो तो मूलभूत सुविधांपेक्षा देखाव्यावर. कारण जेथे माउलींची पालखी असते त्याच्याच मागे काही अंतरावर तात्पुरती शौचालयं उभारली असली तरी जवळच्याच कंपाऊंडचा आधार घेऊन लघुशंकेला बसताना कोणालाच काही वाटत नसतं. थोडक्यात काय तर पुन्हा तीच मानसिकता अधोरेखित होते. वारीतील पदाधिकारी भेटतात आणि या मानसिकतेचं समर्थनच करतात हा आणखीनच खिन्न करणारा धक्कादायक प्रकार.
दुसऱ्या दिवशी वारी दुपारी तरडगावी प्रस्थान करणार असते. भल्या पहाटेपासूनच पालं उठायला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा कचऱ्याचं साम्राज्य ताबा घ्यायला लागतं. माउलीच्या पालखीपासून केवळ १०० मीटरवरच पत्रावळ्या, भात, शिरा ओतून दिला जातो. माउलीच्या गजरात वारी पुढे सरकते आणि सोसाटय़ाच्या वाऱ्याने मैदानावरील कचरा गावाच्या दिशेने भरकटत जातो. छोटासा माळ सुन्न होतो आणि फुटकळ गोष्टी शोधणारी मुलं पालांच्या कचऱ्यात, माउलीच्या निर्माल्यात चार-आठ आण्याची जुळणी होते का, ते शोधू लागतात. पालखी प्रस्थानानंतर आलेलं रीतेपण या चार-आठ आण्याने आणखीनच केविलवाणं होऊन जातं.
तर जनावरांनादेखील त्रास..
जेजूरीच्या माळावरील एका शेतकऱ्याच्या अनोख्या कृतीने एका वेगळ्याच मुद्याकडे लक्ष वेधले. वारी निघून गेल्यानंतर पुढील काही दिवस उर्वरीत अन्न तो गाई-म्हशींसाठी घेऊन जातो. हे असं घेऊन जाण्यापेक्षा जनावरांनाच येथे सोडलं तर या प्रश्नावर त्याने दिलेले स्पष्टीकरण गंभीर होतं. तो सांगतो, ‘‘गाई-म्हशींनी जर भात खाल्ला तर त्यांचं पोट फुगतं आणि त्या अत्यवस्थ होऊन मरण्याचा संभव असतो. त्यामुळे आम्ही वारी गेल्यावर चार-पाच दिवस तरी या रानावर चरायला सोडत नाही.’’ अधिक माहिती घेतली असता गावातील काही लोकांच्या गाई भात खाण्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत मृत्युमुखी पडल्याचं कळलं. भात सोडून अन्य पदार्थ गाई-म्हशी-शेळ्या खाणार आणि गाढव हा एकच प्राणी हे सगळंच पचवू शकणार.
गाडगेबाबांची परंपरा विसरलो आहोत.. सदानंद मोरे
पंढरपुरातील शौचालय सुविधांसंदर्भात न्यायालयाने ओढलेले ताशेरे हे विषयाची निकड दर्शविणारे आहेत. शौचालयांच्या कमतरतेमुळे होणारे प्रश्न हे किती गंभीर आहेत हा त्यामागील अर्थवाद आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि वारकरी यांनी यापासून बोध घ्यावा हा त्यामागील उद्देश आहे. खरे तर हे पूर्वीच व्हायला हवे होते. वारकरी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याच्या गडबडीत असतात. त्यांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. दोन-चार दिवसाच्या या गोष्टींकडे त्यांना पाहता येत नाही. हे वारकऱ्यांचे समर्थन नाही, त्यांचे वर्तन चुकीचेच आहे. वारकऱ्यांनी मानसिकता बदलायलाच हवी, पण शासनालादेखील या विषयाचे गांभीर्य कळायला हवे. काशी, नाशिकच्या कुंभमेळ्याला जशा सुविधा दिल्या जातात, तशा सुविधा येथे का दिल्या जात नाहीत. वारकरी हा बहुजन समाजातील आहे, चांगल्या पद्धती त्याला शिकवता येऊ शकतात. सरकारने करायचेच म्हटले तर सारे काही करता येईल. पण ते करण्यासाठी प्रश्नाचे गांभीर्य समजणे महत्त्वाचे आहे. ते काम न्यायालयाच्या निर्देशांमुळे झाले आहे.
अर्थात वारकऱ्यांची मानसिकतादेखील बदलावी लागेल. म्हणजेच हा प्रश्न सामाजिक मानसिकतेकडे जातो. त्याचबरोबर आरोग्य शिक्षणाकडे जातो. त्या अनुषंगाने पाहता गाडगेमहाराजांची परंपरा आपल्याकडे कोणीच सुरू ठेवली नाही हे प्रकर्षांने जाणवते. ती चालू राहिली असती तर आज हा मानसिकतेचा प्रश्नच आला नसता. त्यासाठी आता स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर फडकरी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यायला हवा. वारकऱ्यांच्यावर त्यांचा प्रभाव असतो. त्यांनी सांगितले तर बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. अन्नाच्या नासाडीचा मुद्दा हा नियोजनातील कमतरेतेमुळे आहे. अन्न कमी पडू नये म्हणून अधिक प्रमाणात शिजवले जाते. अर्थात त्याची नासाडी होणेदेखील योग्य नाही. गेल्या काही वर्षांत वारीला जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. वारीची महती, जागृती पूर्वी नव्हती ती वाढली आहे. अर्थात केवळ गर्दीच नाही तर त्याचबरोबर गुणवत्तादेखील वाढली आहे. वारीसंदर्भातील प्रश्न पूर्वीदेखील होतेच, पण आता संवेदनशीलता वाढली आहे.
का आणि कसं? करायचं तरी काय..?
ज्येष्ठ वैद्य अष्टमी ते आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत २३ दिवस सुरू असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या आळंदी ते पंढरपूर या वारीमार्गावर साधारण २३ मुक्कामाची ठिकाणं आहेत. त्यातील शेवटचे सहा मुक्काम पंढरपूर आणि वाखरी येथे असतात. तर तिथीच्या क्षयानुसार कालगणना करून सासवड, लोणंद, फलटण या ठिकाणी दोन-दोन दिवस मुक्काम असतो. वारी मार्गावर पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन महापालिका आहेत, तर सासवड, जेजुरी, फलटण अशा काही मध्यम नगरपालिका. उर्वरित ठिकाणी छोटय़ा-मोठय़ा ग्रामपंचायती. माउलींच्या वारीत सर्वसाधारणपणे दोन लाखांच्या आसपास वारकरी असतात. सुमारे २२७ दिंडय़ांचा समावेश या वारीत असतो. काही मोठे फड यामध्ये आहेत. त्यांची स्वत:ची वाहन व्यवस्था, भोजन व्यवस्था असते. अनेक वारकरी छोटय़ा छोटय़ा दिंडय़ा घेऊन सहभागी होतात. मुक्कामाच्या ठिकाणी वीज, पाणी, जागा, साफसफाई, शौचालय सुविधा या सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असते. त्यासाठी शासन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला दोन लाख रुपये, भोजन थांब्याला एक लाख रुपये आणि वारी ज्या गावावरून जाते त्या गावाला पन्नास हजार रुपये अनुदान देते. मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेसाठी हा निधी असतो. पायाभूत सुविधांसाठी तालुका- जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन अनेक योजना राबवित असते. जिल्ह्य़ाची पोलीस यंत्रणा, स्थानिक आरोग्य यंत्रणा मोठय़ा प्रमाणात कार्यरत असतात.
वारी मार्गावर प्रत्येक दिंडीचा क्रम ठरलेला असतो. मार्गावर तसंच मुक्कामाच्या ठिकाणी दानधर्म सुरू असतो. त्यात खाद्यपदार्थापासून ते साबणासारख्या उपयोगी वस्तूंचादेखील समावेश असतो. मुक्कामाला प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. नवे आगंतुक जशी जागा मिळेल तसे राहतात. बहुतांशपणे सर्वचजण राहुटय़ांमध्ये असतात. वारीतील बहुतांश वर्ग हा ग्रामीण भागांतील शेतकरी आणि बहुजन समाजापैकी असतो.
गेल्या दहा वर्षांत वारीतील सहभागींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे वारीतील पदाधिकारी सांगतात. त्याचा सार्वजनिक स्वच्छता, मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडल्याची वेगवेगळ्या स्तरांतून चर्चा होताना दिसून येते. मात्र कोणतेही ठोस उपाय निघत नाहीत. वारी मार्गावर महापालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात स्वच्छता होते. मात्र छोटी गावं, मार्गावरील क्षणभर विसाव्याची ठिकाणं या ठिकाणी यंत्रणा कमी पडते. कचऱ्याचं वाढतं प्रमाण, शौचालयांचा प्रश्न आणि अन्नाची नासाडी हे तीन महत्त्वाचे मुद्दे आळंदी ते लोणंद या वारीमार्गावर वारी गेल्यानंतर प्रवास केल्यावर लक्षात आले.
शौचालयाच्या सुविधेबाबत सध्या फायबरचे तात्पुरते व मोबाइल शौचालये तसंच माळरानावर चर खणून केलेली सुविधा वापरण्यात येते. अधिकाऱ्यांपासून ते वारक ऱ्यांपर्यंत सर्वच याबाबत ग्रामीण मानसिकतेचा आधार घेतात. श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी कमिटी आळंदीचे व्यवस्थापक श्रीधर सरनाईक सांगतात, ‘‘वारकऱ्यांची ग्रामीण पाश्र्वभूमी, त्यांच्या सवयी याचा विचार केला तर ते शौचालयात जाणारच नाहीत. आठ-दहा तासांच्या मुक्कामात सर्वानी जर असे शौचालय वापरायचे ठरवले तर किती शौचालयं बांधावी लागतील. दोन लाखांच्या निधीमध्ये हे होऊ शकेल का?’’ नैसर्गिक विधीची तातडीची गरज असताना लांबवर असलेलं शौचालय शोधण्यापेक्षा वेळेची निकड महत्त्वाची ठरते. त्यामुळे जेथे जागा मिळेल तेथेच हे होणार असे ते सांगतात. अर्थात हे कटू असलं तरी सत्य आहे. इतक्या कमी वेळासाठी खूप मोठय़ा प्रमाणात शौचालयांची गरज भासू शकते. आज तरी कोणतीही नगरपालिका एक-दोन हजारांपेक्षा अधिक शौचालयं पुरवू शकणार नाही. याच संदर्भात वारकरी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील सांगतात, ‘‘केवळ मानसिकता म्हणून चालणार नाही. शासनाला देखील गांभीर्य नाही. सर्वासाठी कायमस्वरूपी अथवा फायबरचं तात्पुरतं शौचालय उभारणं शक्य नसलं तरी चर खणून बांबू आणि बोरीच्या तट्टय़ांपासून तात्पुरत्या शौचालयांची पुरेशी व्यवस्था करता येऊ शकते. त्याचे दोन-तीन संच करून तेच पुढच्या मुक्कामाला परत वापरता येतील. हे करण्यासाठी शासनाने एखादी एजन्सी नेमावी.’’ सुविधांचा वापर करण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे ते नमूद करतात. यावर्षी पाऊस नव्हता पण पाऊस असेल तर उघडय़ावरील विष्ठेमुळे प्रदूषण-रोगराई पसरते असं आरोग्य अधिकारी सांगतात.
दुसरा मुद्दा मोठय़ा प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचा. सहज उपलब्ध होणारे व वजनाला हलके असणारे थर्माकोल, प्लास्टिकच्या प्लेट, कप हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक. पातळ प्लास्टिक वापरायला बंदी असली तर आज सर्वत्रच सर्रास वापर होताना दिसून येतो. यूज अॅण्ड थ्रोच्या गुणधर्मामुळे सध्या याचा वापर वारीतदेखील वाढलेला आहे. दुसरं असं की कचरा उचलण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे ही मानसिकता असल्यामुळे बिनधास्त कचरा फेकला जातो. दहा टन कचरा नगरपालिका उचलू शकते, मात्र ग्रामपंचायतीला ते जड जाऊ शकते. तर माळावरील मुक्कामात कचरा वाऱ्याने उडून जाण्याचेच प्रमाण अधिक असते. वाटेवरील कचऱ्याला तर कोणीच वाली नाही. शेतात जाणारा हा कचरा भविष्यात पर्यावरणाचे असंख्य प्रश्न निर्माण करू शकतो. त्यासाठी प्लास्टिकमुक्त वारीची योजनाच राबवावी लागेल. यंदा पावसाचे प्रमाण शून्य होते. त्यामुळे कचरा वाऱ्याने उडून जात होता, पण पाऊस असेल तर हाच कचरा कुजण्यामुळे प्रदूषण आणि रोगराईचे प्रमाण वाढवू शकतो. तसे यापूर्वी झाल्याचे संबधित अधिकारी सांगतात.
तिसरा मुद्दा अन्नाच्या नासाडीचा. खरं तर या मुद्दय़ावर कुणालाच क्षमा नाही. एकीकडे अन्नाच्या एका कणासाठी आसुसलेली जनता आणि दानधर्मात अधिक अन्न मिळालं आणि उरलं म्हणून सरळ मातीत सोडून देणं हे क्षम्य नाही. काही पदाधिकारी या नासाडीचं समर्थन करताना वेळेची उपलब्धता नसण्याकडे लक्ष वेधतात. अन्नाची नासाडी तर होतेच पण त्याचबरोबर पाऊस असेल तर कुजण्याची प्रक्रिया होऊन रोगराई पसरण्याचा संभव असतो. या संदर्भात वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील सांगतात की, ‘‘अन्नाची नासाडी होते हे खरेच आहे, त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. तसे प्रबोधन सुरू आहे, मात्र शासनानेदेखील सक्रिय असायला हवे.’’ श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव मोहिते सांगतात, ‘‘रोज सायंकाळी समाज आरतीला चोपदार सूचना देत असतात. दिंडय़ाच्या परिसरात अन्न, पत्रावळ्या टाकू नका हे आम्ही सांगत असतो. प्रबोधन सुरू आहे, मात्र सुधारणा होण्यास वेळ लागेल.’’
वारीमध्ये अनेक दिंडय़ांचे फड असतात. त्यांची स्वतंत्र व्यवस्था असते. माउलींच्या पालखीचे मालक हैबतराव आरफळकर यांचा फड हा मानाचा आणि क्रमांक एकचा फड आहे. या फडाचे पदाधिकारी सांगतात की, शौचालयासारख्या सुविधा निर्माण करणं हे खूप मोठं काम आहे, गाव प्रशासन त्यात कमी पडणं साहजिक आहे. गाव आमच्यासाठी त्रास सहन करतं हेच खूप आहे.’’ अन्नाच्या नासाडीबद्दल ते सांगतात, ‘‘पालावर येणारा जाणारा असतो. आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही, पण अन्न कमी पडलं तर वेळ कमी असतो. त्यामुळे अन्न शिल्लक राहातं.’’ थोडक्यात त्यांच्या मते जे चाललं आहे ते योग्यच आहे.
या सर्व घटकांबाबत गावक ऱ्यांची मानसिकता तर आणखीनच वेगळी आहे. गावात वारीची पालखी येणं हे त्यांच्यासाठी भाग्याचं असतं. त्या एक-दोन दिवसाच्या काळात मग काही त्रास झाला तरी तो सहन करण्याची प्रवृत्ती साधारणपणे ग्रामीण भागांत आढळते. माउलीसाठी आम्ही हा त्रास सहन करतो हादेखील भाव त्यामागे असतो. शहरात काही प्रमाणात यावर कुरबुर होते. पण तेथील स्थानिक प्रशासन सक्षम असल्यामुळे तक्रार दूर करणं शक्य असते. सासवड नगरपालिकेला स्वच्छतेसंदर्भात आलेले फोन हेच सूचित करतात.
वारक ऱ्यांची, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आणि गावक ऱ्यांची मानसिकता अशी असली तरी काही गोष्टी एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या आपण स्वत: अवलंबण्याला काहीच हरकत नाही ही भावना खरं तर सर्वामध्ये रुजणं महत्त्वाचं आहे. शहरातदेखील कचरा असतो, तेथेदेखील रस्त्यावर थुंकतात अशी समर्थनं यासाठी देणं म्हणजे आपली चूक झाकण्यासाठी दुसऱ्याची चूक दाखविण्यासारखं आहे. सारं काही शासनानंच करावं आणि आपण केवळ आपल्याच पद्धतीने वागत राहावं हे काही सुजाण नागरिकाचं लक्षण नाही.