lp45रात्रभर छताकडे डोळे लावून तो तसाच पडून राहिला होता. इतक्या लवकर ही अशी वेळ येईल, असं त्याला वाटलं नव्हतं. कारण, पॅरिसकडून त्याला फार अपेक्षा होत्या.
जगात चारच महानगर आहेत, जी खरीखुरी ‘महानगरं आहेत. मुंबई, लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिस. हे त्याच्या मनानं पक्क ठरवून टाकल होतं. आणि किमान पॅरिस तरी आपल्या अपेक्षांचा असा खून करेल, असं त्याला वाटलं नव्हतं.

आयुष्याच्या पंचविशीपर्यंत भारतात शिक्षण वगैरे घेऊन त्यानं न्यूयॉर्क गाठलं होतं. एक आपलं स्वत:चं जग त्यानं तिथं उभारलं होतं. तो स्वत:ला ‘ग्लोबल सिटिझन’ समजायचा. ज्यांना कोणता देश नसतो, धर्म नसतो, पंथ नसतो, भाषेची बंधनं नसतात. वाट फुटेल तिथं आणि नशीब नेईल तिथं भटकत राहायचं, अशी फिलॉसॉफी होती त्याची.
पण, एक दिवस त्याला जाणवलं, लोकांना आपलं नाव माहीत होतं. आता आडनावही कळलंय. नव्हे, त्यांनी ते शोधून काढलंय. त्याबरोबर त्यांनी आपला धर्मही ताडलाय. कुणीतरी आपल्या धर्माचा इसम धार्मिक कार्याच्या नावाखाली दोन उंच इमारती उडवतो आणि दुसऱ्या दिवसापासून वातावरणात तिरस्काराचा इतका दर्प पसरतो, हे सारं त्याच्या बुद्धीपलीकडे होतं. तरीही त्यानं ठरवून दुर्लक्ष केलं. ‘न्यूयॉर्कर अशा गोष्टींना थोडीच भीक घालणार? दर्पच आहे, वातावरण निवळलं की कमी होईल आपोआप’, तो मनाची समजूत काढत म्हणायचा. रोज कोणी न कोणी ‘दाढीवाला’ पोलिसांचा ‘पाहुणचार’ घेऊन यायचा. रोज सकाळी उठताना त्यालाही वाटायचं – आज आपलीही ‘पाहुणचाराची’ पाळी येईल, भीतीनं थरकाप उडायचा. भयासुराच्या छायेत दिवस जात राहिले, पण वातावरण पूर्वीसारखं कधीच निवळलं नाही. शेवटी, ‘त्या’ नजरांना वैतागून त्यानं न्यूयॉर्कला ‘गुड बाय’ केलं आणि तो लंडनला आला.
लंडन! जगावर राज्य केल्याचा टेंभा मिरवणारं लंडन, ब्रिटिश पोक्तपणा चेहऱ्यावर वागवणारं लंडन. थोडा वेळ जरूर लागला त्याला, पण हळूहळू लंडनही मानवू लागलं. तिथंच त्याला आशा भेटली. उत्तर प्रदेशातल्या कुठल्या तरी गावातून शिक्षणासाठी आलेली, विचार करणारी, हुशार, लिबरल, हसरी आशा. भेटी वाढत गेल्या, नातं खुलत गेलं आणि त्यांचा ‘निकाह’ झाला.
दिवस सरत राहिले. कुटुंबही दोघांचं न राहता तिघांचं झालं. मुलाच नाव ठेवलं त्यांनी – अमन. जगण्याची नवी उमेद आणि नवी ‘आशा’ मिळाली, न्यूयॉर्क मनातून पुसट होतं गेलं. पण, एक दिवस लंडनही हादरलं. आता इमारती पडल्या नाहीत. भुयारी रेल्वे कचाटय़ात सापडली. कित्येक लोक मारले गेले.
त्याला धस्स झालं. लंडनही सोडावं लागणार नाही ना, मनातली पाल चुकाचुकायची थांबेचना. त्यानं हातातलं काम सोडलं आणि तो थेट घरी आला. घरी ना आशा नव्हती ना अमन. ते दोघेही कोणाला तरी भेटायला जाणार होते, हे त्याला आठवलं. तो भीतीने खाली बसला, दोन ग्लासभर पाणी पोटात ढकलून पाहिलं. पोटातला गोळा काही केल्या कमी होत नव्हता. बेल वाजली. दारात बॉबी उभा होता. आशा आणि अमन त्या स्फोटात गेल्याची बातमी घेऊन.
त्याचं आयुष्य आता आयुष्य राहिलं नव्हतं आणि लंडनही पूर्वीसारखं राहिलं नाही. आता तिथं न ‘आशा’ होती न ‘अमन’.
चार्ल्स डिकन्स ‘टेल ऑफ टू सिटीज’मध्ये पॅरिसहून लंडनला आला होता. त्याचा प्रवास उलटा होता. तो पॅरिसला पोहोचला. पॅरिसमध्ये आल्यानंतर त्याने मनाचे सारे कप्पे कुलूपबंद केले. त्या कप्प्यामध्ये न्यूयॉर्क होतं, लंडन होतं, आशा होती, अमन होता. तो थोडासा उद्धट -उर्मट बनला. पॅरिसकर असतात तसा. त्यानं जुजबी फ्रेंचही शिकून घेतलं. नेपोलियन इथला, जगाला लोकशाही या शहरानं दिली, कार्ल मार्क्ससुद्धा इथच राहिला, जगाला सौंदर्यदृष्टी या शहराने शिकवली, इथं आपल्या ‘ग्लोबल सिटिझनशिप’ला धक्का लागणं शक्य नाही, असे विचार मनात आकार घेऊ लागले.
तोपर्यंत नवं प्रकरण आलं – ‘शर्ली हेब्दो’ नावाचं. या मासिकाच्या ऑफिसवर हल्ला झाला.

सारं त्याच्या डोळ्यासमोरून झर्रकन सरकून गेलं. तोपर्यंत मोबाइलचा अलार्म वाजला. तो उठला, सामान कालच भरलं होतं. कपडे, किडुकमिडुक वस्तू आणि पॅरिसच्या आठवणी त्यानं ‘पॅक’ केल्या होत्या. विमानाचं २५ किलोचं ‘लिमिट’ होतं. एक बरं असतं, आठवणी ओझ्यासारख्या नसतात.
दरवाजा बंद करता करता पुन्हा एकदा आत जाण्याचा, भिंतींवर हात फिरवण्याचा त्याला मोह झाला. पण, बाहेर टॅक्सी थांबली होती.
प्लेन टेकऑफ होताना त्यानं बाजूच्याला नकळत पॅरिसला वंदन केलं. हळूहळू पॅरिस पुसट होत गेलं आणि ढग दिसू लागले.
आता वर्तुळ पूर्ण होतंय, आपण पुन्हा मुंबईत येतोय, जिथून प्रवास सुरू झाला तिथं. पण, मनात एक विश्वास आहे त्याच्या – मुंबईची दमट हवा हल्ल्यांच्या माऱ्यानं कधी नासणार नाही, कोणीच मुंबईकर कुठल्याच हल्ल्यानंतर एकदाच्या आडनावात धर्म शोधणार नाही. त्याला टोचणाऱ्या नजरा त्याच्या मागे लागणार नाहीत.
प्लेन लँड झालं. इमिग्रेशन ऑफिसरनी त्याला नाव विचारलं – त्यानं नाव सांगितलं. आडनाव त्याला नाही सांगावंस वाटलं. त्या ऑफिसरनीसुद्धा पासपोर्टवर पाहिलं आणि जुनी ओळख असल्यासारखं हसून तो म्हणाला, ‘वेलकम टू इंडिया!’
विनायक रघुनाथ कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris