इराणमधले पार्सा म्हणजे एके काळी भारताच्या सिंध प्रांतावर हुकुमत गाजवणाऱ्या आणि नंतर भारताच्याच आश्रयाला आलेल्यांच्या पूर्वजांची उत्सवनगरी पर्सेपलिस. त्या काळातील सर्वात सुंदर शहर म्हणून पार्साची ख्याती होती.
‘आलं तुमचं पर्सेपलिस, आमचं तख्त ए जमशेद आणि प्राचीन पार्सा.’ आमचा ड्रायव्हर कम गाइड अरमान गाडी पार्क करत म्हणाला. मी बाहेर नजर टाकली. खरंच! पर्सेपलिसची खूण असणारे, तेहरानच्या संग्रहालयात पाहिलेल्या खांबांसारखे खांब दिसत होते! माझ्या चेहऱ्यावर स्मित फुलले. याचसाठी केला होता इराणचा अट्टहास! मी भूतकाळात जगत नाही, पण सर्व जगात पसरलेल्या आपल्या पूर्वजांच्या खुणा पाहण्याची आवड असल्याने या वेळी इराणला भेट दिली. एके काळी भारताच्या सिंध प्रांतावर हुकुमत गाजवणाऱ्या आणि नंतर भारताच्याच आश्रयाला येणाऱ्यांच्या पूर्वजांची उत्सवनगरी (सेरेमनिअल कॅपिटल) पर्सेपलिस-पार्सा !
पर्सेपलिस ऊर्फ पार्सातील भव्य, देखणी भित्तिशिल्पे मी मुंबईचे संग्रहालय, लूव्र व ब्रिटिश म्युझियममध्ये पाहिली होती.
इराणच्या पार्स (अरबी फार्स कारण या भाषेत प नाही) भागात पार्सा वसवण्याचे स्वप्न पहिला डरायस अर्थात डरायस द ग्रेट याचे होते. जवळच पशिर्अन साम्राज्याचा संस्थापक सायरस द ग्रेट याने उभारलेले पासरगाडे होते. पण उत्सवनगरी म्हणून डरायसने पार्सा वसवले. नगराचा शाही भाग वसवण्यासाठी त्याने माऊंट मिथ्र (सूर्यदेवाचा पर्वत)च्या पायथ्याशी जागा निवडली व १२ हजार चौरस मीटरचा चौथरा तयार करवला. चौथऱ्याचा काही भाग चक्क पर्वत कोरून तयार केला होता, तर उरलेला भाग जमिनीवर भर घालून तयार केला गेला. चौथऱ्याभोवती भक्कम तटबंदी उभारण्यात आली. शाही पार्सा भूभागापासून १४ मीटर उंचीवर आहे. म्हणूनच त्याला पर्शिअनांचे अॅक्रोपलिस म्हणतात. तटबंदीच्या बाहेरच्या भागात अमीर- उमराव व सामान्य जनतेची घरे होती. पार्साच्या तटबंदीवर डरायसने शिलालेख (तीन भाषांत) कोरून ठेवले आहेत. त्यात पार्सा उभारण्याची प्रेरणा आपल्याला अहूर मझ्दा याने दिली असून बांधण्यासाठी सर्व मांडलिक देशांची मदत झाली असे नमूद केले आहे. पर्शिअन मंडळींची स्वतंत्र शैलीची स्थापत्यकला नव्हती. मांडलिक देशांतील कारागिरांना बोलावून प्रत्येक शैलीतील अर्क घेऊन त्यांच्या रचना साकार होत. हे जाणकारांच्या लक्षात येते.
पार्सा उत्सवनगरी होते. नवरोज हा सर्वात मोठा सण व इतर उत्सवप्रसंगी सर्व मांडलिक देशांतून प्रतिनिधी येत. या गर्दीच्या दृष्टीने तटबंदीच्या आत जाण्यासाठी प्रशस्त दुहेरी जिना आहे. दुहेरी जिना हे पार्साचे वैशिष्टय़ आहे. पैकी उजवीकडचा जिना अमीर-उमरावांसाठी, तर डावीकडचा इतरांसाठी असे. प्रवेशद्वाराच्या प्रत्येक जिन्याला १११ पायऱ्या आहेत. ६३ पायऱ्यांनंतर लॅण्डिंग व वळून ४८ पायऱ्यांनंतर प्रवेशद्वार होते. प्रत्येक पायरी ६.७० मीटर लांब, १० सें.मी. उंच व ३८ सें.मी. खोल आहे. चढून वर पोहोचताच पार्साची भव्यता नजरेत भरते. भव्यतेची पहिली झलक गेट ऑफ ऑल लॅण्ड्सच्या दर्शनातून मिळते. गेट ऑफ ऑल लॅण्ड्स हे स्वागतद्वार होते. डरायसच्या शिलालेखानुसार ते दुवार्थिम विसद्वयुम (विश्वाचे द्वार) होते. त्या काळात डरायसचे राज्य एजिअन समुद्र ते सिंधपर्यंत होते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने विश्वच! सर्व मांडलिक राजांची भेट पार्सा येथे होत असे. त्यांच्या स्वागतासाठी गेट ऑफ ऑल लॅण्ड्स हा ६१२ वर्गमीटरचा, १८ मीटर उंच, चार खांबांचा व तीन भव्य दारे असणारा कक्ष उभारण्यात आला होता. प्रवेशद्वाराच्या समोरच्या भागावर दोन प्रचंड संरक्षक वृषभ (गार्डिअन बुल्स) उभारलेले आहेत; तर निर्गम द्वारासमोर व्याल रूपातील संरक्षण वृषभ आहेत. त्यांचे शिर पर्शिअन व्यक्तीचे (दाढीसकट), धड वृषभाचे असून गरुडाचे पंख आहेत. ही मंडळी गोपालक होती. राजा स्वत:ला गौपातशाह म्हणत असे व वृषभ हा संपत्ती व बलाचे चिन्ह होता. हे वृषभ २५ ते ३० फूट उंच आहेत. मूर्तिकला अशी अनोखी की समोरचा भाग व्यवस्थित कोरलेला व मोकळा आहे, तर खांद्यापासूनचा भाग उत्थापित आहे. स्वागतद्वाराला लागूनच स्वागत कक्ष होता. दरबारातून बोलावणे येईपर्यंत मंडळी येथे थांबत.
पार्सातील शाही इमारतीत अपादान किंवा ऑडियन्स हॉल (दरबाराप्रमाणे) डरायसचा राजवाडा (टचारा), झरक्सेसचा राजवाडा (हादिश), जनानखाना (हारेम), ट्रेझरी (खजिना), सडसेतून (शंभर खांबांचा कक्ष), शाही थडगी, काही राजवाडे, भव्य रस्ते व काही अपूर्ण बांधकामे आहेत. जनानखाना सोडला तर सर्व पडझड झाली आहे. बांधकामाचे जोते शाबूत आहेत. जिने, थोडय़ाफार भिंती, दारं-खिडक्यांच्या फ्रेम्स शाबूत आहेत. हे सर्व शिल्पांनी नटलेले आहे. त्यावरून एकूण इमारतींची कल्पना करता येते. संग्रहालयातील वस्तू, पुस्तकातील वर्णन व कल्पनाशक्तीची जोड देऊनच हे जिगसॉ पूर्ण करावे लागते. पण जे चित्र तयार होते ते कल्पनातीत असते!
पार्साचा मानबिंदू म्हणजे अपादान अर्थात ऑडियन्स हॉल. याचे बहुतेक बांधकाम डरायसच्या हयातीतच पूर्ण झाले. अपादानच्या चारही कोपऱ्यांत डरायसने सोने व चांदीच्या जाड पत्र्यांवर शिलालेख कोरून ठेवले होते. ते संग्रहालयात पाहायला मिळतात. इमारतींच्या जोत्यावर, पायऱ्यांवर, दारं-खिडक्यांच्या चौकटींवर त्या त्या
इमारतीच्या कार्यानुसार प्रत्यक्ष घटनेचे प्रकटीकरण करणारी अर्ध-उत्थित प्रकारची भरपूर शिल्पे दिसतात. अपादानच्या भिंतीवर राजाला भेटायला येणाऱ्या मंडळींची शिल्पे आहेत. येथे सम्राट मांडलिक राजांची भेट घेऊन त्यांनी आणलेल्या भेटी स्वीकारत असे त्याचे चित्रण आहे. त्या काळी पर्शिअन राजाचे २३ मांडलिक देश होते. त्रिपट्ट पद्धतीच्या शिल्पांत प्रत्येक प्रतिनिधी मंडळाच्या आधी त्यांना एस्कॉर्ड करणारे पर्शिअन अथवा मीडिअन भालदार दिसतात. दोन प्रतिनिधी मंडळांच्या मध्ये पवित्र सायप्रस वृक्ष कोरले आहेत. दोन पट्टांच्यामध्ये बारा पाकळय़ा असणाऱ्या फुलांची ओळ आहे. बारा पाकळय़ा म्हणजे बारा महिने. शिल्पाचे वैशिष्टय़ असे की जिन्याच्या पूर्व व पश्चिम भागावर मध्यापासून त्याच क्रमात शिल्पे असून एकावर उजवा भाग तर दुसऱ्यावर डावा भाग कोरलेला आहे. दोन्ही जोडून त्रिमिती शिल्प तयार होते! कोरीव कामातील बारकावे जसे केस, टोप्या, कपडे व त्यावरचे डिझाइन सर्व त्या त्या देशाला अनुसरून आहे. शिलालेखात देशांची नावे आहेत. यातील १८ क्रमांकाचे चित्र सिंध प्रांतातील मंडळींचे आहे. भेटवस्तू म्हणून त्यांनी शस्त्रे, खेचर आणले आहे. खांद्यावरच्या कावडीत लहान पिशव्या आहेत, ज्यात मसाले किंवा सोने काहीही असू शकते.
पायऱ्यांच्या बा भिंतीवर तीन शिल्पे आहेत. मध्यभागातील मूळ शिल्प सध्या ट्रेझरीच्या बा भागात ठेवले आहे. दुसरे इराणच्या संग्रहालयात आहे. त्याची एक वेगळीच कथा आहे. बाजूची दोन शिल्पे म्हणजे वृषभावर चाल केलेल्या सिंहांची आहेत. आर्य गोपालक, गोपूजक असताना हे शिल्प नक्कीच गोंधळात टाकते. हे मूळ लीडिअन लोक वापरत असत. त्यांचा पराभव केल्यावर सायरसने ते वापरण्यास सुरुवात केली ते नवरोजचे प्रतीक म्हणून. सिंह हे सूर्याचे प्रतीक, तर बैल हे वृषभ राशीचे. सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश या वेळी नवरोज साजरा होतो. त्या काळी हे सर्व २१ मार्च या विषुवदिनी जुळून येत असे. काहींच्या मते वृषभ हे चंद्राचे प्रतीक (पर्शिअन मंडळींसाठी) व प्रकाशाचा अंधारावर विजय हेही विषुवदिनीच होत असे म्हणून हे शिल्प! नंतर याचा प्रयोग सर्वत्र होऊ लागला.
अपादनच्या पूर्वेकडच्या भागावरील जोत्यावरील शिल्पे पर्शिअन कलेचा अप्रतिम नमुना आहेत. ही भिंत ८१ मीटर लांब असून मध्यभागी जोडजिना आहे. पूर्ण भिंत शिल्पांनी नटलेली आहे व पूर्णपणे शाबूत आहे. भिंतीच्या दक्षिण भागावर प्रतिनिधी मंडळींची चित्रे (शिल्प) आहेत. त्रिपट्ट प्रकारच्या चित्रांचा अर्थ ही मंडळी तीन रांगांत उभी राहत असत असा होतो. यातही आपली मंडळी आहेतच. उत्तर भागावरील शिल्पे अनोखी आहेत. यातील त्रिपट्टांपैकी वरच्या पट्टात रथांचे शिल्प आहे, तर खालच्या दोन पट्टांत एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या, हातात हात घेऊन चालणाऱ्या अमीर उमरावांची शिल्पे आहेत. जिना चढताना दुतर्फा वेगवेगळय़ा सैनिकांचे शिल्प आहे. सैनिकांच्या हातात वेगवेगळी शस्त्रे दिसतात. सर्वात वरच्या पट्टात ‘इम्मॉर्टल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिकांचे शिल्प आहे. पर्शिअन सैन्यात १० हजार इम्मॉर्टल्स किंवा ‘अमर’ अथवा चिरस्थायी सैनिकांची तुकडी असे. ही मंडळी कमांडो प्रकारातील असत. त्यांच्यापैकी कोणीही मरण पावला किंवा आजारी पडला तर दुसरा त्याची जागा घेत असे. प्रत्येक सैनिकाजवळ भाला, धनुष्यबाण व पाठीवर भाता आहे. पायात जोडे आहेत. पर्सेपलिसमधील आश्चर्यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे येथे एकही स्त्रीशिल्प नाही! जनानखाना होता, पण स्त्रीशिल्प नाही! नाही म्हणायला याच चित्रपट्टातील रथांच्या पट्टात रथचक्र धरून ठेवणारी खीळ ओबडधोबड स्त्री आकृती आहे! बस! हीच पर्सेलपिसमधील एकमेव स्त्री-आकृती!
पर्सेपलिसमध्ये बरेच राजमहाल होते. पैकी डरायसचा महाल सर्वात सुंदर होता. शिल्लक भागावरील शिल्पे प्रसंगानुरूप आहेत. जसं संरक्षण करणारे सैनिक, राजासाठी जेवणाचे, स्नानाचे सामान नेणारे नोकर, श्वापदांशी झुंज देणारा डरायस वगैरे. एक वैशिष्टय़पूर्ण शिल्प म्हणजे राजसिंहासन वाहून नेणाऱ्या प्रतिनिधींचे शिल्प. शिलालेखात या देशांची नावे आहेत. शिल्पातील मंडळींचे पेहराव व चेहरेपट्टी देशानुरूप आहेत. राजाच्या शिरावर विंग्ड ग्लोरी अथवा रॉयल ग्लोरी ही शिल्पाकृती दिसते. ते राजाचे देवीरूप हे विद्वानमान्य मत आहे. प्रत्येक राजाने असे शिल्प आपल्या थडग्यावरही कोरून घेतले आहे. त्यावरून आणि इतिहासकार डायोडोरिअस ऑफ सिसिली याने लिहिलेल्या ‘आँखों देखा हाल’ यावरून महालाच्या सौंदर्याची कल्पना येते! राजांची थडगी जॉर्डनमधील पेट्रा येथे असलेल्या नबातिअन मंडळींच्या थडग्यांच्या स्टाइलची- डोंगरात कोरलेली आहेत.
पूर्वीच्या काळी राजा म्हटले की हॅरम असेच! येथेही आहे. जनानखान्याची पुनर्बाधणी करून आता तेथे संग्रहालय उभारले आहे. सडसेतून अर्थात शंभर खांबांचा सभामंडपही भव्य होता. ६८.५ x ६८.५ मीटर मापाचा हा मंडप व त्याच्या भोवतीच्या खोल्या सैनिकी गतिविधीसाठी राखून ठेवलेल्या होत्या. येथे राजा आपल्या सेनापतींची भेट घेत असे. आजूबाजूच्या खोल्यांत शस्त्रे ठेवण्याची व सैनिकांची सोय होती. या मंडपाचे छत १०० खांबांनी तोलून धरलेले होते. दगडी कोरीव खांब सुंदर आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे शिरोभागी पाठीला पाठ लावलेले वृषभ असून पाठीवर छताच्या तुळया ठेवल्या जात. या मंडपाच्या भव्य द्वार-चौकटींवर राजा व सैनिकांची शिल्पे आहेत. पार्सातील आणखी एक महत्त्वाचे बांधकाम म्हणजे ट्रेझरी अर्थात खजिना. १२०x ६० मीटर मापाच्या या खजिन्यात अपरंपार संपत्ती होती. इतिहासकारांच्या मते २५०० टन सोने होते! पार्सा ताब्यात घेतल्यावर अॅलेक्झांडरने खजिना लुटला. तो तीन हजार उंट व खेचरांवर लादून जवळील स्यूसा येथे हलवला अशी नोंद आहे. पुरातत्त्वशास्त्रींना खजिन्यात काय मिळाले? तर मातीच्या ७५० टॅबलेट्स. यावर वेगवेगळे हिशोब लिहिलेले होते. यावरून त्या काळातील कामगारांना मिळणाऱ्या वेतनाची कल्पना येते. पुरुषांप्रमाणे स्त्रिया व मुलांचीही कामगार म्हणून नोंदणी होत असे व त्यांनाही पगार मिळत असे. एक स्त्री-कामगार प्रसूती रजेवर असताना तिला जुळे झाल्याने दुप्पट पगार देण्यात आल्याची नोंद आहे. पर्शिअन राज्यात इतकी सुबत्ता होती की, शाही शिल्पाकृतींचे दागिने खऱ्या सोन्याच्या पत्र्याचे असत! रत्ने जडवलेली असत!
पर्शिअन साम्राज्याला ग्रहण लागलं ते अॅलेक्झांडरच्या रूपाने. जग जिंकण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेल्या अॅलेक्सने पर्शिआवर हल्ला केला. (इ.स.पू. ३३०च्या सुमारास) त्या सुमारास पर्शिअन साम्राज्य जरा दुबळे होऊ लागले होते. अॅलेक्सला विजय मिळाला. शहर वाचावे म्हणून खजिनदार ट्रायडेट्सने त्याला संपूर्ण खजिना दिला. पण पर्शिअनांचे महत्त्वाचे शहर म्हणून अॅलेक्सच्या डोक्यात पार्सा खुपत होते. त्याने खजिना तर लुटलाच, पण सैनिकांना पूर्ण शहर व आजूबाजूची वस्ती लुटण्याची पूर्ण मुभा दिली. या लुटालुटीत गावातील पुरुषांची बेफाम कत्तल झाली. स्त्रियांना गुलाम करण्यात आले. घरं, कपडेलत्ते सर्व लुटलं गेलं. इतकंच काय, लाकडी दारांवरील शिल्पांचे दागिने, जडवलेली रत्ने, सोन्याचे पत्रे सर्व उचकटून काढण्यात आले. अॅलेक्स व त्याचे सैन्य पार्सात दोन-तीन महिने मुक्कामाला होते. विजय साजरा करणाऱ्या ओल्या पाटर्य़ा रोजच होत! एकदा मद्यधुंद लोकांसमोर थेअस नावाच्या स्त्रीने (ही अॅलेक्सचा उजवा हात सेनापती टोलेमीचे प्रेमपात्र होती) पार्सा जाळण्याची शक्कल काढली. मग काय निघाली मिरवणूक! पहिला पलिता थेअसनेच भिरकावला. सगळय़ांनी तिचे अनुकरण केले! लाकडी दरवाजे, तुळया, छत सगळय़ांनी पेट घेतला. अवघे पार्सा जळू लागले. किती दिवस? ठाऊक नाही! काही ठिकाणी तर दगडही वितळले, भंगले. पूर्ण शहर बेचिराख झाले. या घटनेचे मूक साक्षीदार म्हणजे जोते, चौकटी व खांब! यातील बरेच खांब नंतरच्या भूकंपात पडले. अॅलेक्स महानचे राज्य प्रस्थापित झाले. तो लवकरच मरण पावला व टोलेमी गादीवर बसला. त्याचा कारभार स्यूसाहून चालत असे.
त्यानंतर इ.स. २२६ ते ६४१ या काळात सॅसनिड यांच्या आधिपत्याखाली पर्शिअन सत्ता पुन्हा उभी राहिली ती इस्लामच्या आक्रमणापर्यंत. वस्तीयोग्य नसले तरी या लोकांचे प्रेरणास्थान पार्साच होते! मधल्या काळात प्राचीन लिपीही विस्मरणात गेली होती. मग स्थानिक लोकांनी या अवशेषांना मिथकातील राजा जमशेद याची राजधानी मानून तख्त-इ-जमशेद असे नाव दिले. आजही पार्सा बघायला हजारो लोक येतात, अचंबित होतात आणि परत जातात.
मालविका देखणे