‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘किल्ला’ या दोन्ही सिनेमांतल्या उत्कृष्ट अभिनयामुळे पार्थ भालेराव याने विशेष उल्लेखनीय विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेल्या पार्थचं त्यांनी ‘किल्ला’साठी कौतुक केलं आहे.
‘ए शिष्यवृत्ती..’ अशी बंडय़ाने सिनेमात मारलेली हाक प्रेक्षकांना गमतीची वाटली. मस्तीखोर, खोडकर तितकाच प्रेमळ, काळजी घेणारा बंडय़ा म्हणजे पार्थ भालेरावने ‘किल्ला’ या सिनेमात उत्तम रेखाटला. सिनेमा चिन्मय काळे या व्यक्तिरेखेभोवती फिरत असला तरी बंडय़ाचा उल्लेख केल्याशिवाय सिनेमाचं कौतुक पूर्ण होऊ शकत नाही. सिनेमाचं यश ठरवण्यासाठी जसं बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावर लक्ष ठेवलं जातं तसंच सिनेमागृहातल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाचाही विचार केला जातो. सिनेमागृहातल्या प्रतिसादात थिएटर लाफ्टर ही एक संकल्पना येते. थिएटर लाफ्टर म्हणजे सिनेमागृहातला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. हा लाफ्टर कोणत्या व्यक्तिरेखेसाठी, वाक्यांसाठी, प्रसंगांसाठी जास्त मिळतो हेही तितकंच महत्त्वाचं. वर्षभरापूर्वी आलेला ‘हॅपी न्यू इयर’ हा सिनेमा तद्दन असला तरी ‘थिएटर लाफ्टर’चा मानकरी ठरला होता अभिषेक बच्चन. तसंच ‘किल्ला’ या सिनेमातला थिएटर लाफ्टर ठरला बंडय़ा म्हणजे पार्थ भालेराव. पार्थच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच त्याला ‘भूतनाथ रिटर्न्स’ आणि ‘किल्ला’ या दोन्ही सिनेमांसाठी विशेष उल्लेखनीय असा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचं इंडस्ट्रीतल्या अनेकांनी कौतुक केलं. यात खुद्द बिग बीसुद्धा मागे नाहीत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा सिनेमा पार्थने केला असल्यामुळे तो त्यांच्या संपर्कात असतो. ‘किल्ला’ या सिनेमासाठी त्यांनी पार्थला शुभेच्छांचाही मेसेज केला होता.
पार्थ सांगतो, ‘अमिताभ सरांच्या ऑफिसमधून मला मेसेज आला होता की, सिनेमासाठी शुभेच्छा. सिनेमा नक्की बघेन. सरांकडून असा मेसेज आल्यामुळे अर्थातच मला आनंद झाला. ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये आम्ही एकत्र काम केलंय. माझा मराठी सिनेमा आल्यानंतर त्यांनी आवर्जून मला मेसेज केला याचा मला खूप आनंद आहे.’ पार्थला याआधी प्रेक्षकांनी ‘भूतनाथ रिटर्न्स’ या सिनेमात पाहिलं आहे. पण, ‘किल्ला’चं शूट झाल्यानंतर ‘भूतनाथ रिटर्न्स’चं शूट सुरू झालं होतं. ही गंमत तो सांगतो, ‘आमच्या शाळेत सातपुते सर नाटक शिकवतात. त्यांनी ‘किल्ला’ या सिनेमासाठी होणाऱ्या ऑडिशनची माहिती दिली. पुण्यात आमच्या शाळेत ‘किल्ला’चा दिग्दर्शक अविनाश दादा ऑडिशन घेण्यासाठी येणार होता. मी तिथे ऑडिशन दिली. अविनाश दादासोबत पूर्वी थोडंसं काम केलं होतं. त्यामुळे त्याच्यासमोर अभिनय करण्याचं फारसं दडपण नव्हतं. ऑडिशन चांगली झाली आणि माझी निवड झाली. ‘किल्ला’चं शूट सुरू असताना तिथल्या एका दुसऱ्या दादाने ‘भूतनाथ रिटर्न्स’च्या ऑडिशनबाबत सांगितलं. तिथेही गेलो मी. निवडही झाली. त्यामुळे खरंतर ‘किल्ला’ आधी आणि नंतर ‘भूतनाथ रिटर्न्स’ शूट केला आहे.’
अभिनय क्षेत्रात आल्यानंतर अनेकांचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असतं. काम करता नाहीच आलं तर किमान त्यांना एकदा भेटण्याची इच्छा असते. सगळ्यांचीच ती पूर्ण होतेच असं नाही. पार्थने मात्र यात बाजी मारली. पहिलाच हिंदी सिनेमा बिग बींसोबत करून करिअरच्या सुरुवातीलाच त्याने मोठी झेप घेतली आहे. ‘‘अमिताभ सरांसोबत ‘भूतनाथ..’मध्ये काम करण्याचा अनुभव फारच मस्त होता. सुरुवातीला त्यांच्यासमोर काम करण्याचं दडपण आलं होतं. मात्र त्यांनी सेटवरच्या त्यांच्या हलकफुलक्या वागण्या-बोलण्याने कमी केलं. म्हणूनच आमचे एकत्र सीन्स करताना मजा यायची. सीन्सशिवाय सेटवर आम्ही भरपूर धमाल करायचो. इतरांची टिंगल, खोडय़ा काढायचो. मस्ती करायचो. क्रिकेटही खेळायचो. त्यामुळे सुरुवातीला आलेलं दडपण नंतर नाहीसं झालं.’’ पार्थला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही अमिताभ यांचा त्याला मेसेज आल्याचं त्याने आवर्जून सांगितलं. चांगला प्रादेशिक सिनेमा, कलाकार, दिग्दर्शक यांचं कौतुक करण्यात अमिताभ नेहमी पुढे असतात. एखदा बहुचर्चित सिनेमा बघता आला नसला तरी ते त्याबाबत सोशल साइट्सवर नेहमी व्यक्त होताना दिसतात. पार्थ त्या ठरावीक कलाकारांपैकी एक. त्याच्या कामासाठी त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
‘किल्ला’ सिनेमातल्या त्याच्या कामाचं कौतुक सर्वत्र होतंय. मराठी इंडस्ट्रीतून तर त्याच्या कामाची वाहवा होतेच आहे, पण, ‘भूतनाथ..’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीही पार्थला कौतुकाचा फोन केला होता. नुकताच दहावी उत्तीर्ण झालेल्या पार्थने कला शाखेत जायचं ठरवलं आहे. मानसशास्त्र या विषयात करिअर करण्याचा त्याचा विचार आहे. अभिनय क्षेत्रातही काम करणं सुरूच ठेवणार असल्याचं तो सांगतो. काही दिवसांत त्याच्या एका मराठी सिनेमाचं शूट पुण्यात सुरू होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासाठी ‘किल्ला’चा स्पेशल शो करण्याचा एस्सेल व्हिजनचा प्रयत्न सुरु असल्याचं समजतं.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
पार्थच्या प्रेमात अमिताभ
‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘किल्ला’ या दोन्ही सिनेमांतल्या उत्कृष्ट अभिनयामुळे पार्थ भालेराव याने विशेष उल्लेखनीय विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चन...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-07-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parth bhalerao