काही तरी वेगळे, हटके अनुभवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी गोबीचे वाळवंट ही एक पर्यटनपर्वणीच. आपल्या अपेक्षेबाहेरचे, नवे असे काही तरी अनुभवून आपण तिथून ताजेतवाने होऊन येतो.
रण किंवा वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मैलोन्मैल असलेला वाळूचा समुद्र, जीवघेणी गरमी, वाळूमुळे डोळे दुखावणारा सूर्यकिरणांचा राप. तरीही आपण त्याचा थोडासा का होईना, पण अनुभव घेतोच. पण सर्वच वाळवंटं वाळूमय नसतात. त्यात मुख्यत्वे चार प्रकार पडतात. पोलर म्हणजे ध्रुवीय डेझर्टस्, सबट्रॉपिकल म्हणजे कटिबंधीय, कोल्ड डेझर्टस् आणि कोल्ड कोस्टल डेझटर्स. पोलर वाळवंटात आक्र्टिक्ट व अंटाकर्ि्टक्ट भाग येतो. येथे बर्फाचेच साम्राज्य, ते बर्फाचे वाळवंट. सबट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये दमदार पाऊस, दमट हवामान व कोरडा हिवाळा. कोल्ड डेझर्टस्मध्ये प्रदीर्घ उन्हाळा, व वाऱ्याबरोबर थोडय़ा फार प्रमाणात आलेल्या बाष्प किंवा हिमामुळे पडणारा पाऊस, जो १० ते १२ इंचांपेक्षा जास्त नसतो. त्यात मोंगोलीआचे गोबी व चीनचे ताकला माकन् डेझर्टस् यांचा समावेश. कोल्ड कोस्टल डेझर्टस्मध्ये समुद्रातील थंड पाण्याच्या प्रवाहामुळे किनाऱ्यालगतच्या भागात थंडीत पारा बराच खाली असून उन्हाळा छान उबदार असतो. यापैकी आमची पोलर वाळवंटं पाहून झाली होती. हल्लीच मोंगोलिआ येथे गोबीचे वाळवंट पाहून आलो. तिथल्या गाईडने दिलेल्या माहितीवरून वरील वेगवेगळ्या वाळवंटांची थोडी फार माहिती झाली.
गोबीचे वाळवंट हे आशिया खंडातील अग्रगण्य मानले जाते. मोंगोलिआ हा देश रशिया व चीन देशांनी वेढला आहे. त्यात गोबी हे देशाच्या मध्यावर आहे. या देशाचा एकतृतीयांश भाग गोबी वाळवंटाने व्यापला आहे. गोबी वाळवंटाचा परीघच ५,००,००० चौ. मैल आहे. त्यावरून हा देश किती अवाढव्य असेल याची कल्पना येईलच. हिमालय पर्वतामुळे पाऊस वाहून नेणारे ढग अडवले जातात. त्यामुळे अधिक उंचावरून जाताना त्यातले बाष्प गोठते व डोंगरावर पडते आणि पलीकडे नुसतेच वारेच जातात. अशा भागाला रेन श्ॉडो एरीआ म्हणतात. गोबीचे वाळवंट अशा प्रकारात मोडते. त्यामुळे इथे पावसाचे प्रमाण वर्षांकाठी १०-१२ इंचच आहे.
गोबीच्या दक्षिणेला पठारी भागात वाळू, पश्चिमेला हिरवळ, मैलोन्मैल पसरलेली खुरटी झुडपं आहेत, तर उत्तरेकडे हिरवळ जरा दाट म्हणजे फूटभर उंचीचे गवत, या भागाला स्टेप्स् म्हणतात. नदीकाठी किंवा पाणवठय़ाकडे जरा जास्त झाडं, असा प्रकार. सेंगर हॉट स्प्रिंग्जच्या परिसरात आपल्याला हिरव्या कुरणांवर चरणारी घोडे, गाई, डोंगरांवर फरची झाडं. जणू प्रतिगुलमर्गच. समुद्रसपाटीपासूनची उंची चार-पाच हजार फूट,
भू-गोलावर ४१ अंश अक्षांश आणि ८७ अंश रेखांशावर स्थान असल्याने गरमीत तपमान ४० अंश सेल्सिअल्स, तर थंडीत सायबेरीआ येथून येणारे थंड वारे, बरोबरीने हिम यामुळे तपमान उणे ५० अंश सेल्सिअल्स. त्यामुळे तपमानात ९० अंश सेल्सिअल्सचा फरक असतो.
इथे तंबूला गर म्हणतात. गर म्हणजे घर. कारण या वाळवंटी प्रदेशात हवेचे तपमान थंडीत कमालीचे शून्य अंशाखाली तर उन्हाळ्यात आपल्यासारखे असते. बकऱ्याची लोकर जाड कापडावर लावून तंबू तयार करतात. तंबूत मध्यावर चूल असून भोवती बैठक असते. आतमध्येच स्वयंपाकघर, झोपण्याची व्यवस्था, प्रार्थनेसाठी बुद्धाची प्रतिमा. मोसमाप्रमाणे गर गुंडाळून, सामानासकट स्थलांतर करावे लागते. असा कार्यक्रम वर्षांत तीन ते चार वेळा करावा लागतो. त्यात धनिक दरवेशींकडे गुरांसाठी, वर्षभरासाठी लागणाऱ्या वस्तूंचे कोठार, असे दोन-तीन गर जास्त असतात.
गोबीच्या वाळवंटात तपमानात फार मोठा फरक असल्याने सिमेंट काँक्रीट बिल्डिंग्ज तग धरू शकत नाही. त्यामुळे या भागात पर्यटकांनादेखील गरमध्येच राहावे लागते. पण पर्यटकांचे गर वरच्या दर्जाचे असतात. म्हणजे एका गरमध्ये दोन-जणांची सोय, शौचालय, स्नानगृह जरा दूर पण स्वच्छ. जेवण, नाश्त्यासाठी रेस्टॉरंट व बार. जेवण साधेच पण भरपूर, व पाश्चिमात्य पद्धतीचे. झोपायला चांगला गादीचा पलंग, पांघरायला ब्लँकेटस् शिवाय सोलारची वीज. पण गरचा दरवाजा मात्र चार फूट उंच, त्यामुळे आत जाताना कमरेत वाकूनच जावे लागते. पहिले दोन-तीन दिवस टाळूवर दरवाजाची चौकट ठणाठण आपटली पण नंतर सवय झाली.
उलान बातर ही मोंगोलिआची राजधानी. हे शहर उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळील अक्षांशावर आहे. हिवाळ्यात उणे ५० अंश सेल्सिअल्सपर्यंत पारा उतरण्याचे एकमेव ठिकाण. उलान बातर सोडल्यानंतर सहा सात तासांच्या ड्राइव्हनंतर आम्ही गोबीच्या हद्दीत प्रवेश करते झालो. या वाळवंटात आपल्याला तीन प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. गर्वान् सैखन नॅशनल पार्क येथे आम्हाला गरची ओळख झाली.
येथील योलीनअॅम नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये भुसा भरलेले स्नो लेपर्ड, लामागीर, मरमोट, दोन-तीन प्रकारचे गरुड, गिधाडं असे पक्षी व प्राणी, दगड स्वरूपातील डायनोसोरची हाडं, अंडी पाहायला मिळतात. बाहेरील आवारात स्टोनएजमधील एक झाड जे आता संगमरवरी दगडाप्रमाणे दिसत होते. तिथून पुढे कोरवन्साई खाँ या पर्वतरांगांमधील अगदी अरुंद दरी, जी योलीन् अम् नावाने ओळखली जाते तिथे लामागीर, गोल्डन ईगल, माऊंटन गोटस् असे वेगवेगळे पक्षी, प्राणी पाहण्यासाठी चांगली तीन तास तंगडमोड केली. पण व्यर्थ, शेपटीशिवायचे गिनीपिगसारखे दिसणारे पिका, हे प्राणी मात्र भरपूर पाहायला मिळाले.
गोबीमध्ये फिरायचे तर रेती, खडी टाकून केलेले रस्ते नसल्यामुळे आमची वरात वाळवंटात चालणाऱ्या फोर बाय फोर जीपने. रस्त्यावर गावांची नावं, मार्गदर्शक बोर्ड नाहीत. दिसतात ते फक्त पायवाटेप्रमाणे असणारे रुंद मातीचे रस्ते. मैलोन्मैल कसलाच मागमूस नाही. ड्रायव्हरला विचारले, आपण चुकणार नाही ना, तर म्हणतो, आम्हाला सवय आहे. आपण एकटेपणे फिरण्याची सोयच नाही आणि गेलोच तर परतणे अशक्य.
दुसऱ्या दिवशी सँड डय़ून पाहण्यासाठी खोंगरिन अल् या ठिकाणी आलो. हा मिड् गोबीचा भाग असल्याने पठारी प्रदेश होता. रस्ता मातीचाच, त्यामुळे भरपूर धुरळा होता. पण तिथे अगदी सहा ते आठ इंच उंचीची लहान लहान झुडपं मात्र पांढऱ्या पिटुकल्या फुलांनी बहरल्याने सर्वत्र पांढरा व हिरव्या रंगाचा गालिचाच पसरल्यागत वाटत होता. त्यामुळे नजरेला उन्हाची रणरण वाटत नव्हती. आपल्या कासच्या पठाराची आठवण आली. या भागात सर्वात उंच असे वाळूचे डोंगर होते. जोराच्या वाऱ्याने वाळूतून सूंसूं करून आवाज येतो. त्यामुळे या डोंगरांना सिंगिंग सँड डय़ूनस् म्हणतात.
हौशी लोकांसाठी जरा बऱ्यापैकी दमछाक करणारा सँड डय़ून चढून जाण्याचा कार्यक्रम होता. बऱ्यापैकी वर आल्यावर भुसभुशीत वाळूमुळे चढणे कठीण होते. प्रत्येक पावलागणिक पाय आत रुतत होता. त्यामुळे दोन फूट चढले की एक फूट खाली येत होतो. अगदी वरच्या टप्प्यावर रांगतच जावे लागत होते. पण अथक परिश्रमाने वर पोहोचल्यावर आजूबाजूचा प्रदेश मात्र चित्रातल्या चंद्रभूमीसारखा दिसत होता. बयान्झ्ॉग या ठिकाणी १९२० साली इंग्लिश ऐतिहासिक संशोधक रॉय चॅपमन याला सर्वप्रथम कित्येक हजारो वर्षांपूर्वीची डायनासोरची हाडे मिळाली होती. या ठिकाणचा परिसर हा लाल माती व वाळूच्या दगडांचा असल्याने सूर्यास्ताच्या वेळेस पडणाऱ्या किरणांमुळे धगधगीत निखाऱ्यांप्रमाणे भासतो. म्हणून या भागाला फ्लेमिंग क्लिफ असे म्हणतात.
सतराव्या शतकात अंतर्गत नक्षली प्रभावामुळे रशियन सैनिकांनी सर्व मॉनेस्ट्रीज् तोडून टाकण्यास सुरुवात केली. इतक्या आतल्या भागातील होशू व आँगिन मॉनेस्ट्रीज्ही त्यांच्या तावडीतून सुटल्या नाहीत. नंतरच्या काळात नव्याने उभारलेल्या त्या स्टॅलीनच्या प्रभावातील नक्षलवादात परत जमीनदोस्त झाल्या. थांका म्हणजेच पताका जमिनीखाली पुरण्यात आल्या तर काही गुप्तपणे रहिवाशांकडे लपवण्यात आल्या. सतराव्या शतकातील या आँगिन मोनेस्ट्रीत हजारावर भिक्षुक राहत होते.
आपण उत्तरेकडे जाऊ लागतो, तसतसे हळूहळू उताराकडे लहानलहान तळी दिसू लागली. त्यामुळे हिरवळ, घोडे, मेंढय़ा, गाईंगुरं बऱ्याच प्रमाणात दिसू लागली. तसेच गुराख्यांचे गर दिसू लागले. इथले मेंढपाळ किंवा गुराखी आपल्याकडल्या गुराख्यांसारखे पायी फिरत नाहीत तर त्यांच्याकडे फटफटी किंवा घोडे असतात. अशाच एका कुटुंबाला आम्ही भेट दिली. एकत्र कुटुंबपद्धती थोडय़ा फार प्रमाणात इथे असल्याचे दिसले. कर्ता पुरुष व त्याचे कुटुंब, आईवडील, कधी भावंडं असे एके ठिकाणीच पण वेगळ्या गरमध्ये राहतात. हिवाळ्याच्या बेगमीसाठी व गुरांच्या चाऱ्यासाठी वेगळा गर असतो. ज्याच्याकडील गुरांची संख्या अधिक तो पैसेवाला गणला जातो.
मालकीणबाईनी आम्हाला घोडीचे दूध कसे काढतात ते प्रात्यक्षिक दाखवून त्यापासून आंबवलेले, त्यामुळे थोडे मद्यार्काचे प्रमाण असलेले ताक, फरमेंटेड मेअर्स मिल्क प्यायला दिले. रात्री त्यांच्यासोबत मंगोलिअन बार्बे -क्यूचे जेवण होते. हा बार्बे-क्यू म्हणजे गरम केलेल्या दगडांवर बकऱ्याचे मांस, बरोबरीने बटाटा, गाजर, कोबी अशा भाज्यांना मीठ-मिरी चोळून एका पत्र्याच्या हंडय़ात घालून शिजवलेला प्रकार. आपल्याकडील ग्रामीण भागात पोपटी करतात तसाच हा प्रकार होता. त्यानंतर थोडा स्थनिक कलाकृतींचा कार्यक्रम झाल्यावर रात्री माळरानावर भणभणत्या वाऱ्यात तंबूत रात्र काढली.
दोन तासांच्या प्रवासानंतर सेंगर हॉट स्प्रिंगच्या इलाख्यात आलो. हा परिसर म्हणजे आपल्या काश्मीरमधला गुलमर्गच. लहानमोठे हिरवे डोंगर, त्यावर चरणारी गुरंढोरं, तर माथ्यावर पाईन वृक्षांचे जंगल. आल्यावर ओळखीच्या प्रदेशात आल्यासारखे वाटले. गरम पाण्याच्या पूलमध्ये मस्तपैकी श्रमविहार झाला. दुसऱ्या दिवशी जवळच्याच डोंगरांवर ट्रेकिंगचा कार्यक्रम होता. चढताना एकमेकांची मस्करी करत, गाईडच्या खोडय़ा काढत दुपारी जेवणाच्या वेळी कँपमध्ये आलो.
आम्ही सर्व मिळून व्हॉलीबॉलचा गेम खेळलो. कुणी पत्ते खेळले. आमच्यासारखेच आणखीन बरेच पर्यटक आले होते. त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण झाली. सर्व खेळीमेळीचे वातावरण होते. रात्री फार उशिरापर्यंत गप्पागोष्टी झाल्या. पण शेवटी निद्रादेवीच्या अधीन व्हावे लागलेच. कारण रोजच्याप्रमाणे लांबचा प्रवास करून चेंगीझ खानची राजधानी, काकोरम् येथे निघायचे होते.
गौरी बोरकर –