रशियाच्या ईशान्येला असलेले कामचाट्का द्वीप पर्यटनासाठी सोयीचे नसल्याने बहुतेकांना परिचित नाही. पण हिमशिखर, ज्वालामुखी, गरम पाण्याचे झरे, चिखलाची कुंडे या सगळ्यांमुळे इथलं पर्यटन वैशिष्टय़पूर्ण आहे.

हल्ली आपल्यापैकी बरेचजण अमेरिकन अलास्का ट्रिपला जातात. पण हा अलास्का पूर्वी अमेरिकेच्या मालकीचा नव्हता तर रशियन साम्राज्याचा भाग होता. रशिया हा पश्चिम कॅनडापासून पश्चिम युरोपपर्यंत पसरलेला अवाढव्य, प्रचंड देश. रशियाच्या अति ईशान्येला कामचाट्का हे पॅसिफिक, बेरिंग, हॉश्तॉक समुद्र अशा तीन दिशांनी वेढलेले द्वीप आहे. त्यापैकी काही भाग अमेरिकेने शंभरेक वर्षांपूर्वी विकत घेतला होता. पुढे त्यांना तेथे तेलाचा भरपूर साठा मिळाला. त्यामुळे आताचा जो भाग आहे त्याला कामचाट्का, म्हणजेच रशियन अलास्का म्हणतात. हा भाग पर्यटनासाठी सोयीचा नसल्याने बहुतेकांना परिचित नाही, म्हणून त्याचा गाजावाजा नाही.

१७ व्या शतकात रशियन आर्मीमधील डॅनिश दर्यावर्दी व्हीटस बेरिंगने या भागात प्रथम पाऊल ठेवले. काही वर्षांनी दिलेल्या दुसऱ्या भेटीत तो सेंट पीटर व सेंट पॉल या दोन बोटी घेऊन आपल्या साथीदारांसमवेत आला. म्हणून त्या भागाला त्याने पेट्रोपॉवलस्की हे नाव दिले. दर्यावर्दी इलाखा असल्याने रशियन सरकारने तेथे अगदी रशियन जनतेलादेखील जाण्यास मज्जाव केला. २०व्या शतकात हा भाग पर्यटकांसाठी खुला झाला.

कामचाट्का हा भाग येलीझाव, पेट्रोपॉवलस्की कामचाट्का, गिलुजिंस्का या तीन जिल्ह्य़ांचा आहे. पैकी पेट्रोपॉवलस्की-कामचाट्का, येलीझाव हा पर्यटकांसाठी खुला आहे. विलुजिंस्का हा भाग हवाई दलासाठी राखीव आहे. तेथे पर्यटक जाऊ शकत नाहीत. पेट्रोपॉवलस्की व येलीझावच्या परिसरात ३०० ज्वालामुखी आहेत. पैकी २९ जागृत आहेत. आमचा मुक्काम पेट्रापॉवलस्कीमध्ये होता.

कामचाट्का येथील ज्वालामुखी ग्लेशिर्सने झाकलेले असतात. आपण बरेच वेळा डिस्कव्हरी चॅनेलवर ब्राउन बेअर्स नदीच्या पाण्यात उभे राहून सामन् मासा खाताना पाहतो. तेच ब्राऊन बेअर्स इथे उन्हाळ्यात इथल्या तलावात माशांची शिकार करताना दिसतात. नाताळातल्या सांताच्या घोडय़ाच्या स्लेजसारखी गाडी बर्फात ओढणारे हस्की कुत्रेसुद्धा इथे आहेत.

कामचाट्काचा परिसर हा भूगर्भातील हालचालींचा, अति संवेदनशील भाग असल्याने तेथे ज्वालामुखींबरोबर हॉट मडपॉट्स, गरम पाण्याचे तलाव, जमिनीतून येणारे गरम पाण्याचे गिझर्स म्हणजेच फवारे, झरे आहेत. हे असे एक नैसर्गिक संग्रहालयच आहे. पेट्रोपॉवलस्की हा भाग या पट्टय़ाच्या जवळ असल्याने गावातूनच आपल्याला अवाचिन्स्कि, कोरियास्की आणि कोझेल्स्कि हे तीन ज्वालामुखी दिसतात. कोरियास्कीच्या हा ज्वालामुखी जागृत असून माथ्यावरील कोनातून बऱ्याच वेळा धूर येताना दिसतो.

हा भाग कायनेरान्, कोरीयाक, इतलमन्, इव्हान या तीन जमातींचा. आमची कामचाट्काच्या परिसरातील पहिली भेट होती ती कायनेरान् या जमातीच्या खेडय़ात. आता या जमातीचे लोक दूरवर डोंगरावर राहतात. आम्ही गेलो तिथे अगदी थोडेच लोक आहेत. नव्या पिढीतील काही लोकांनाच जमातीची भाषा येते. असो. पूर्वी नदीकाठी त्यांची वस्ती असे. नदीकाठी मोकळ्या जागेवर एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात नमुन्यादाखल एक तंबू ठेवला आहे. या भागात हरणं, रेन डिअर व अस्वलांची संख्या भरपूर असल्याने खाण्यात हरणाचे मांस, तंबू, घरातील अंथरूण-पांघरूण हे सर्व त्यांच्याच कातडीपासून बनवले जाते. इतकेच नव्हे, तर लहानपणी मुलांनादेखील हरणाचे दूध पाजले जाते.

इका कँपच्या आवारात १०० हस्की कुत्रे वयोमानाप्रमाणे वर्गवारी करून  वेगवेगळे ठेवले होते. काही कुत्रे हे कुत्रा व लांडगा यांच्या मीलनातून जन्मलेले असतात. त्यामुळे काही लांडग्याप्रमाणे दिसतात व त्यांचे डोळेही निळे असतात. एका कुत्र्याचा एक डोळा पांढरा तर दुसरा निळा होता. मला वाटलं त्याचं वय झाल्याने मोतीबिंदू झाला असेल, पण आमची गाइड दारिया म्हणाली हे सर्वसामान्य आहे. आणि खरंच, काही कुत्रे तशाच डोळ्यांचे होते. काही पाहुण्यांकडून लाड करून घ्यायला आसुसले होते, तर काही जवळ येऊ देत नव्हते. पिल्लांची तर आम्हा सर्वाना पाहून पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी धडपड चालली होती.

27-lp-paryatan

रोज सकाळी त्यांना धावण्याची परेड करावी लागते. हिवाळ्यात जेव्हा ते गाडीला जुंपले जातात तेव्हा सर्वात पुढची जोडी कॅप्टन, म्हणजे सिनिअर व तीसुद्धा नर-मादी अशी असते. नाहीतर त्यांच्यात भांडणं होतात. म्हणजे हस्कीसुद्धा भांडायला मागे नसतात. यांच्या मागे कुवतीप्रमाणे कुत्रे असतात. मागच्या कुत्र्यांकडून कामात थोडीदेखील कुचराई झाली तर कॅप्टन लगेच अस्वस्थ होतो. एका गाडीला १० ते १५ कुत्रे जोडलेले असतात.

कायनेरान्चे घर म्हणजे तंबू असतो. हे तंबू मंगोलिअन गरसारखेच असतात. मध्यवर्ती बांबूच्या आधाराने गोलाकार उभारलेल्या तंबूच्या मध्यभागी चूल असून बाजूला बसण्याची, तसंच  पाहुण्यांची ऊठबस करण्यासाठी ओंडक्यावर आडवी फळी ठेवून केलेली व्यवस्था असते. तेथे येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य म्हणजे जमातीचा पारंपरिक पोशाख घालून नाचगाणी असा करमणुकीचा कार्यक्रम. आम्हालाही त्यांनी त्यांची पारंपरिक गाणी म्हणून नृत्य करून दाखवले. नंतर आम्हालाही नाचायला लावले. ही शिकवणूक प्रत्येक मुलीला आपल्या आईकडून मिळते. निघण्यापूर्वी आम्हाला लाकडी वाडग्यात ग्रीन टी व नानकटाईसारखी बिस्किटं खायला दिली.

कामचाट्काचा हा भाग पॅसिफिक महासागर, बेरिंग समुद्र व हॉश्तोक समुद्र असा घेरलेला आहे. जोडीला जागृत ज्वालामुखी, गरम पाण्याचे गिझर्स त्यामुळे कुठल्याही भागाशी रेल्वे अथवा रस्त्याने जोडलेला नसल्याने तेथे विमान प्रवासाशिवाय पर्याय नाही. आणि विमान प्रवासदेखील दोन-चार तासांचा नसून मस्त साडेआठ, नऊ तासांचा आहे. शिवाय विमान प्रवासात आपण नऊ वेळा टाइम झोन बदलतो. आमची फ्लाइट मॉस्को येथून संध्याकाळी सहा वाजता निघून कामचाट्का येथे सकाळी दहा वाजता पोहोचली. पण गंमत अशी या प्रवासात आम्ही रात्र अनुभवलीच नाही. सदाच लख्ख उजेड. यावरूनच रशियाच्या अवाढव्यतेची कल्पना आली असेल.

कामचाट्काचा किनारा वळणवळणांचा असल्याने तेथे समुद्राचे पाणी आत येऊन खाडय़ा, उपसागर तयार झाले आहेत. किनाऱ्यावर जुन्या-नव्या भागांचा मिलाफ आहे. शिवाय निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर हिमाच्छादित ज्वालामुखी, असा सुंदर देखावा असतो. म्हणूनच अवाचिन्स्कि ही सुंदर खाडी गणली जाते. येथून एक दिवसाच्या समुद्र सहलीला जातात. खाडी असल्याने समुद्र शांत असतो, पण तो किनाऱ्यापासून १० किमी अंतरावर पॅसिफिक समुद्राला मिळतो तिथे खाडी न राहता खवळलेला समुद्रच असतो. बोटीतून फिरताना आपल्याला सी गल्स्, टर्न किटीवेक्स्, पाणकावळे असे पक्षी, सील, उडय़ा मारणारे मासे दिसतात. समुद्रात मधेमधे वेगवेगळ्या आकारांचे खडक आहेत. त्यावर या पक्ष्यांची घरटी आहेत. ही जागा पक्ष्यांची प्रजनन करण्याची आहे. डोंगरावर पक्ष्यांच्या बरोबरीने सी ईगल्सही आहेत.

28-lp-paryatan

समुद्राच्या पाण्याचा सतत मारा होऊन काही खडकांना हत्ती, गेंडा, कासव असे आकार आले आहेत. हे लहान खडक नाहीत तर डोंगर असून त्यांचे बेटच बनले आहे. रशियन भाषेत म्हाताऱ्या माणसाला स्टारीकोव्ह म्हणतात. डोक्यावर काळा रंग, लाल पिवळी रंगीत चोच, नाकावर दोन्ही बाजूंनी पांढऱ्या मिशा असलेला पफीन् पक्षी संख्येने इतके आहेत की या संपूर्ण बेटालाच स्टारीकोव्ह आयलंड म्हटले जाते. हे दृश्य पाहण्यात आपण एवढे गुंग होतो की वेळ कसा जातो ते समजतच नाही. या सफारीत आमच्या बोटीवरील कर्मचाऱ्याने समुद्रात बुडी मारून आणलेल्या तीन ते पाच किलो वजनाच्या डझनभर मोठमोठय़ा कुल्र्या, शिंपले, स्कॅलप्स, काटेरी सी अर्चीन्स अशा समुद्री खजिन्याची दुपारच्या जेवणासाठी मेजवानी ठेवली होती. थ्री ब्रदर्स रॉक म्हणून समुद्रात १२ ते १५ फूट उंचीचे तीन सुळके  आहेत. त्याबद्दल अशी आख्यायिका आहे की पूर्वी सोयीस्कर म्हणून समुद्रकिनारीच वसाहत असे. त्या काळी कधीतरी समुद्राला आलेल्या उधाणामुळे गावाचे नुकसान होऊ नये म्हणून तीन भाऊ खांद्यापर्यंत पाण्यात उभे होते. देवाने त्यांचे प्रयत्न पाहून त्यांना यशस्वी केले आणि गावाचे नुकसान टळले.

गावापासून ५० कि. मी. अंतरावर असलेला अवाचिन्स्की ज्वालामुखी हा येथील सुप्त ज्वालामुखी आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार ७५० मीटर उंचीवर असणारा अवाचिन्स्की सदैव बर्फ व धुक्यात लपेटलेला असतो. शेजारीच १२७५ मी. उंचीवर कॅमल माऊंटन हा उंटाच्या पाठीसारखा दिसणारा डोंगर आहे. कामचाटकाच्या क्षेत्रात आपण उन्हाळ्यात गेलो तरी तिथे कडकडीत ऊन असे मिळत नाही. इथले हवामान लहरी आहे. त्यामुळे कशाचीच खात्री नसते. तिथे जाण्याचा रस्ताही खडतर आहे. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत थोडा तरी सूर्यप्रकाश होता, पण लगेच अंधारून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि धुक्याचे साम्राज्य पसरले. तरीही काहीजण अवाचिन्स्की चढायला लागले आणि थोडय़ाच वेळात परतले. पण आम्ही मात्र कॅमल माऊंटनचा रस्ता घेतला.

ज्वालामुखीचा भाग असल्याने शिखर व अध्र्या डोंगरावरचा काळा कातळ सोडला तर सर्वत्र हिरवळ होती. त्यावर आपल्या सातारच्या कास पठारासारखी फुलांची पखरण होती. लहान ओहोळ, डबकी, भुसभुशीत चढउतार पार करून बर्फाच्या चढणीवर आलो. इथे मात्र सांभाळून चालावे लागत होते. काही ठिकाणी ताजी बर्फवृष्टी असल्याने तिथे भुसभुशीत बर्फ होता तर काही ठिकाणी बर्फामुळे घसरगुंडी होत होती. सावधानता म्हणून गाईड व्होल्गाच्या बुटांच्या खुणावरूनच चालत होतो. ही कसरत संपली नाही तोच माऊंटनची चढ सुरू झाली.

इथे बर्फ नसला तरीही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीचा पोत अगदीच मऊमऊ लाव्हाच्या मातीचा होता. त्यामुळे एक पाऊल चढलो की सहा इंच घसरण व्हायची. पण आम्ही कसरत करत माथ्यावर पोहोचलो. इतक्यात लख्ख ऊन पडले आणि सर्वचजण एकदम खूश झाले. समोरच्या डोंगरावरून आमचे सहकारी परतताना दिसले. आम्ही पुन्हा कसरत करत खाली रेस्क्यू कॅम्पला आलो. कॅम्पमध्ये खास रशियन पद्धतीचे बीट रुटचे गरमागरम सूप पिऊन थोडे लवंडलो आणि नंतर परतीचा प्रवास सुरू झाला.

कामचाटका येथून कामचाटका, बिस्त्रया, तेगील, ईचा या आणि अशा अनेक लहानमोठय़ा नद्या वाहतात. इथल्या नद्यांत साल्मन, ट्राऊट, शार आणि वेगवेगळ्या माशांचे प्रजनन जुलै ते ऑक्टोबपर्यंत मोठय़ा प्रमाणावर होते. जगातील सर्वात जास्त मत्स्योत्पादन येथे होते, असे सांगितले जाते. त्यामुळे पक्षांच्या बरोबरीने ब्राऊन बेअर्स मासेमारीसाठी नद्यांवर टपून बसलेले असतात. बसमधून जाताना लोक नदीपात्रात लांबलांब वॉटरप्रूफ पँटस् घालून उभे असलेले दिसतात.

बरेचसे सकाळी पिकनिकसाठी म्हणून बोट घेऊन नदीकाठी येतात, चांगले मोठे मासे पकडून बार्बेक्यु करून मजा करतात. आम्हीही राफ्टमध्ये बसून बिस्त्रया नदीतून सफर केली. या भागात हवामान चांगले असते. त्यामुळे भाज्या-फळे-फुले भरपूर. पण बरोबरीने उंचउंच गवत, त्यात हैराण करणारे अगणित डास आणि चिलटं. त्यांना दूर ठेवण्यासाठी आम्हाला हातवारे करत नाचायला लागत होते म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. राफ्टमध्ये मासे पकडण्यासाठी सर्वाना गळ दिले होते. पण मासे त्यादिवशी रजेवर होते की काय कोण जाणे. सर्वच जण हिरिरीने गळ टाकत होते. मधेच हुक एकमेकात अडकून मासा मिळाल्याचा आनंद वाटत होता, पण बाहेर आल्यावर काय फुस्स. आठ- दहा राफ्टपैकी दोघांनाच ट्राऊट व ग्रेलिंग हे मासे मिळाले.

इथली पर्यटन स्थळे म्हणजे ज्वालामुखी, त्यांची विवरं, त्यामुळे झालेले लेक, नद्या इत्यादी. आणि अशा ठिकाणी ट्रेकिंग किंवा बोटिंग केलं जातं. अशा नैसर्गिक परिस्थितीमुळे येथे उंचसखल, खडकाळ, रेतीचा, निसरडा मार्ग आहे. म्हणून त्यावर फिरण्यासाठी सिक्स व्हील ड्राइव्ह स्पेशल बस किंवा ट्रकच वापरावा लागतो. वाकाझेटस् हा असाच एक ज्वालामुखीचा डोंगर आहे. त्याचा उद्रेक होऊन त्या डोंगराचे वाकाझेट्सी, लेनिआ व वाकाझेट अशा तीन भागांचे रिंगणच झाले आहे. इथे ट्रेकिंग करताना धबधब्याच्या बाजूबाजूने निमुळत्या चढणीवर सांभाळावे लागत होते. आदल्या दिवशीच्या पावसाने चढ निसरडा झाला होता. परंतु वर गेल्यावर थंड हवा, हिरवागार झालेला परिसर मन सुखावून गेला. वेगवेगळ्या प्रजातींच्या अगदी नखाएवढय़ा फुलांपासून ते तगरीपर्यंतच्या फुलांचा नुसता गालिचाच अंथरल्यासारखे वाटत होते. फिरताना कोल्हा, मार्मोटसारखे प्राणी दिसले. खाली उतरताना गाईडने बऱ्याच झाडांची, पानांची माहिती दिली; शिवाय जेवणात, सलाडमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही पानांची मिरमिरीत, आंबट चवही घ्यायला सांगितली.

मत्नोवस्की ज्वालामुखीच्या पायथ्याशी जुने वीजनिर्मिती केंद्र आहे. त्या बर्फमय परिसरातून गेल्यावर एके ठिकाणी लहानशीच गिझर्सची जागा आहे. पण व्हॅली ऑफ गिझर्स पुढे हे अगदीच क्षुल्लक म्हणायला हवं.

कुरील लेक

पृथ्वीच्या पोटात भूपृष्ठाखाली कित्येक मीटर खोलवर वाळू, मऊ दगड, कातळ, पाणी, खनिजे, लाव्हा असे एकावर एक अनेक थर असतात. सर्वात आतमध्ये प्रचंड उष्णतेचा लाव्हारस असून त्याची सतत हालचाल सुरू असते. ती कमी जास्त प्रमाणात झाली की त्याचा उद्रेक होऊन आपल्याला सौम्य, तीव्र असे भूकंपाचे धक्के जाणवतात. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे झालेला कच्छ येथील तसेच अगदी अलीकडचे म्हणायचे. ताजा म्हणायचा तर जपान, नेपाळमधले ७-८ रिश्टर स्केलचे भूकंप व त्यामुळे झालेले नुकसान आपण पाहिलेले आहे.

कामचाटकाचा परिसर हा पॅसिफिक व ओखोस्त टेक्टॉनिक प्लेटस्च्या सतत हालचाल होणाऱ्या अतिसंवेदनशील भागात असल्याने भूकंप होण्याचे प्रमाण बरेच आहे. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड उद्रेकामुळे येथे दक्षिण व उत्तर भागात अनेक विशाल विवरं, तलाव, डोंगरकडे तयार झाले. अशाचपैकी एका विवरात कुरील लेक झाला आहे. त्यावेळी उडालेली राख आशिया खंडापर्यंत विखुरली गेली असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यावरून उद्रेकाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते. त्या विवरात पावसाचे, वितळणाऱ्या बर्फाचे, जमिनीतून येणारे पाण्याचे स्रोत, तसंच नद्यांचे पाणी जमून कुरील लेक तयार झाला आहे. त्यानंतर बरेच लहानमोठे उद्रेक होऊन लेकची खोली, किनारा यांचा आकार कमीजास्त होऊ लागला. सद्यस्थितीत लेकची खोली ३०० मी. आहे. समुद्रसपाटीपासून १०४ मी. उंचीवरील गोडय़ा पाण्याचा कुरील लेक, १२ कि.मी. लांब, व ८ कि.मी. रुंद आहे. ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे झालेले लेक हे आम्लयुक्त पाण्याचे असतात. पण रशियातील कोंटोस्की या गोडय़ा पाण्याच्या लेकनंतर विस्तारात कुरील लेकचा नंबर लागतो. हा लेक कामचाटकाच्या दक्षिणेला असून तेथे हेलिकॉप्टरनेच जावे लागते.

पेट्रोपावलस्की एअरपोर्टवरून  हेलिकॉप्टर निघाल्यावर आपल्याला बऱ्याच ज्वालामुखींचे दर्शन होते. काहींवर बर्फ असून काहींवर हिरवेगार डोंगर दिसतात. एके ठिकाणी तर कधी काळी झालेली तीन विवरे अगदी एकमेकांच्या हातात घालून असल्यासारखी दिसली. मी कुठे अस्वलांची हालचाल दिसते का हे पाहण्यातच दंग होते. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरते तिथे कमरेएवढय़ा उंचीच्या गवताने परिसर आच्छादलेला आहे. उतरल्यावर सिक्युरिटी बंदुकधारी गार्डबरोबरच व्हिजिटर्स सेंटरला जावे लागते. येथे आपल्याला मन मानेल तिथे फिरता येत नाही.

या लेकच्या दोनही बाजूना ईलीन्स्की व कंबलोनी असे दोन ज्वालामुखी आपण स्वच्छ हवामानात पाहू शकतो. तसे बऱ्याच खोलपर्यंत लेकमधील मासे ,वनस्पतीही दिसू शकतात. इथे अस्वलांच्या वस्तीची जागा असल्याने ती कधीही, कुठेही आपल्याला दर्शन देतात. त्यामुळे आपल्याला ठरावीक क्षेत्रातच फिरावे लागते. प्रजननाच्या काळात, म्हणजे जुलै ते सप्टेंबर, येथे हजारोंच्या संख्येने साल्मन व वेगवेगळे मासे असतात. एके ठिकाणी माशांच्या अंडी, पिलावळीसाठी व्यवस्था आहे.

साल्मनची खासियत अशी की नदीत त्यांचा जन्म होतो. ते पुढे समुद्रात जातात आणि परत मूळच्या जागी अंडी घालण्यासाठी तसंच  आयुष्याच्या शेवटी येतात. त्यामुळे या काळात, कुरील हा पाण्याचा नसून साल्मन माशांचा लेक असतो. येथे रंगाने लाल असणाऱ्या स्कोकी साल्मन माशांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे तेव्हा कुरील लेक लालीलाल होते असे म्हणतात. अस्वलांबरोबर, गल्स, केल्पस्, वेगवेगळे ईगल्स यांचाही मोठय़ा प्रमाणावर वावर असतो. अस्वल हा एकटाच फिरणारा प्राणी असतो, असं मानलं जातं. पण या काळात लेकमध्ये अस्वले १५ ते २० अशा संख्येने एकत्रच असतात.

गावात किंवा रस्त्यावर, इतर नदीच्या पात्रात दिसली नाहीत तरी इथे खात्रीपूर्वक अस्वलं पाहायला मिळतील असे सांगितले गेले होते आणि खरंच, आम्ही बोटीतून फिरताना बरीच अस्वलं पाहिली. सततच्या पावसाने लेकमधील पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे ती मासे शोधत फिरत होती, मध्येच पाण्यात डुबकी मारीत होती, पण हाती काही लागत नव्हते. त्यामुळे नॅशनल जिओग्रॉफीकवर अस्वले साल्मन मासा खाताना दिसतात तशी दिसली नाहीत. असो.

कुरील लेकची सफर झाल्यावर आमचा मोर्चा कुदाश ज्वालामुखीच्या विवराकडे वळला. १९०७ मध्ये झालेला उद्रेक हा कामचाट्काच्या इतिहासातील सर्वात मोठा मानतात. हा उद्रेक जमिनीच्या स्तरास्तरांनी झाल्याने येथे भलेमोठे विवर तयार झाले आहे. विवरात बॉल शू, क्रेटर नो असे दोन लेक आहे. त्यावेळी उडालेल्या लाव्हारसाने लेकच्या पश्चिमेला तीन कि. मी. अंतरावर कातळाची जणू भिंतच उभी राहिली आहे. रशियन भाषेत या आविष्काराला कुथिनी बेटी असे म्हणतात.

आम्ही बॉल शू लेकजवळ उतरलो, अर्थात हेलिकॉप्टरने. किनाऱ्यावर एका लहानशा भागात खोदुत्का स्प्रिंग आहे. तेथे जवळच्या डोंगरात असलेल्या उष्ण तपमानामुळे जमिनीखालून गरम पाणी येते. या ठिकाणी जमिनीला हात लावला तर ते जाणवत होते. किनाऱ्यावर एका ठिकाणी पाणी ७५ अंश सेल्सिअल्स होते. त्याला हातही लावता येत नव्हता. पण तलावातील पाणी कोमट होते. पेट्रोपावलस्की येथून बराच प्रवास करून येणारे शौकीन ट्रेकर्स किंवा संशोधन करणारे आपला कार्यक्रम आटोपल्यावर तलावात श्रमपरिहार म्हणून पोहतात. एवढेच नव्हे तर थंडीत स्नो मोबील घेऊन गरम कपडे परिधान करून येतात आणि बर्फाने आच्छादलेल्या लेकमधील उबदार जागेत पोहण्याचा आनंद घेतात.

व्हॅली ऑफ गिझर्स

कामचाट्का या भागाची भौगोलिक रचनाच अशी आहे की तिथे बरेच ज्वालामुखी, त्यांची विवरं, गरम पाण्याचे झरे, तलाव, त्यातून ठरावीक वेळी उडणारे गरम फवारे म्हणजेच गिझर्स, खदखदणाऱ्या चिखलांची कुंडे आहेत. अशा ठिकाणी जायचे तर अगदी १००किमी. अंतर असले तरीही हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नाही. अशाच कधीकाळी झालेल्या उद्रेकामुळे तेथे डोंगरच उद्ध्वस्त होऊन उझोन कॉलड्रान म्हणजे प्रचंड कढईसारखा १२ किमी. व्यासाचा खोलगट भाग तयार झाला आहे. त्याला उझोन काल्डेरा म्हटले जाते. या भागात बांबूच्या फलाटावरूनच चालावे लागते. कारण एक तर आपण हेलिकॉप्टरच्या अगदी जवळ उतरतो, जमिनीचे तपमानही जास्त असते.

येथे फिरताना गाईड स्टेला म्हणाली की, आता इतक्या कालावधीनंतर आपण हे दृश्य पाहतो, पण लाखो वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी हे कसं असेल त्याची कल्पना करा, म्हणजे तुम्हाला याच्या तीव्रतेची कल्पना येईल. काही ठिकाणी पाण्यातून तसंच जमिनीतूनही वाफा येताना दिसत होत्या. तर कुठेकुठे वाफेच्या इंजिनासारखा आवाज होता. भूगर्भातील वेगवेगळ्या खनिजांमुळे पाण्याचाच नाही तर मातीला लाल, पिवळा, हिरवा, आणि कोळशासारखा काळा रंगसुद्धा होता. काही चिखल कुंडांतून बुडबुडे फुटल्यानंतर त्यांना सुंदर फुलांचा आकार येत होता. पण विरोधाभास असा होता की जवळूनच वाहणाऱ्या नदीचे पाणी मात्र थंडगार होते. उद्रेकावेळी उडालेल्या राखेत कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर होते. त्यामुळे तिथे एका बाजूला गुळगुळीत व्हाईट माऊंटन आहे.

तिथून परत हेलिकॉप्टरने तासाभराच्या प्रवासानंतर व्हॅली ऑफ गायझर्स येथे आलो. या प्रवासात आमची फ्लाईट माली सेम्याशिक् व कारिम्स्की या जागृत ज्वालामुखींवरून होती. कारिमस्किहा जागृत ज्वालामुखी असून तेथे लहानमोठे उद्रेक सतत चालू असतात. त्याचे विवर पाच किमी. व्यासाचे आहे. कधीकधी लाव्हाही दिसतो. डोंगराचा कोन लाव्हाच्या दगडाचा असून बाहेरच्या बाजूला वाळू, माती, स्नो, थोडी हिरवळ आहे.

माली सेम्याशिक् हादेखील विशाल ज्वालामुखी. त्याच्या ७००मी. खोल विवरात ट्रॉयस्की हा तलाव आहे. जमिनीखाली असलेल्या खनिजांमुळे त्याचा रंग हिरवट निळसर असून पाणी तीव्र आम्लयुक्त आहे. या तलावाची खोली पाहण्यासाठी शास्त्रज्ञ इंजिनाच्या रबर बोटीतून गेले होते. ते कसेबसे किनारी पोहोचले. बोटीच्या इंजिनाचा पंखा त्यात वितळून गेला होता. लाव्हा व उडणाऱ्या राखेतील खनिजांमुळे लेकच्या वरील बाजूच्या भिंतींवर चट्टेपट्टे आहेत. या भागाचा शोध तिथल्याच तातियाना उस्तिनेव्हा या स्त्री शास्त्रज्ञाने १९व्या शतकाच्या मध्यावर लावला.

हेलिकॉप्टर सुरक्षित ठिकाणी उतरल्यावर आपल्याएवढय़ा उंचीच्या गवतातून वाट काढत खड्डे सांभाळत वाट काढत जायला लागते. ही व्हॅली चार किमी. रुंद, आठ किमी.  लांब, ४००मी. खोल आहे. लहानमोठे मिळून ४० गिझर्स आहेत. प्रत्येकाची वेळ, उसळण्याची तऱ्हा वेगळी. काही जमिनीलगतच बुडबुडय़ासारखे आहेत, तर काही फूट दोन फूट उंचीचे आहेत. काहींतून नुसताच धूर निघतो, तर काही खड्डय़ात आहेत. त्याबरोबर भरपूर गरम पाण्याचे झरे, तलाव, चिखल कुंडे आहेत.

२००७ मध्ये दरड कोसळून इथल्या नैसर्गिक संपत्तीचे फार नुकसान झाले. कोसळून आलेल्या कचऱ्यात लहानमोठे दगड, चिखल झाडेझुडुपे, स्नो यामुळे तिथल्या नदीत बंधारा तयार होऊन तलाव निर्माण झाला. त्यात कित्येक गिझर्स लुप्त झाले, तर काही वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात गडप झाले. काही ठिकाणी नवीन गिझर्स उत्पन्न झाले. पण असं म्हणतात की दरडी कोसळल्यानंतर आतापर्यंतच्या कालावधीत तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून काही परत दृश्यवत झाले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ आशावादी आहेत.

पण इथला नजारा पाहायचा असेल तर २००मी. खाली उतरायची तयारी पाहिजे. दर पाऊण तासाने उसळणारा व्हेलिकन् गीझर सदा थोडय़ा उसळ्या मारतच असतो. पण जोरदार आविष्काराला सुरुवात होताना प्रथम हळूहळू धूर व पाण्याचा कारंजा, नंतर जोरदार फवारा धुराच्या लोटाबरोबर पाच मिनिटांपर्यंत उसळत राहतो. धूर व पाण्याचा कारंजा हे अगदी हातात हात घालून असतात, त्यामुळे काही वेळ पाणी दिसतच नाही. हा नजारा संपल्यावर शो खतम् व पर्यटक चढून परत दुसऱ्या  नजाऱ्यासाठी उतरणीला लागतात.

इथे मोठे गिझर्स नाहीत, पण बरेच लहानलहान उसळणारे आहेत. याशिवाय वाफाळणारे लहान तलाव, चिखलाचे कुंड आहेत. वाटेवरील लाल रंगाच्या दोन सारख्या दिसणाऱ्या कुंडांना ट्विन्स म्हणतात, तर लगतच्या जवळजवळ असणाऱ्या लहान आणि मोठय़ा कुंडांना मम् अँड बेबी म्हणतात. एके ठिकाणी तर जमिनीत दोन डोळ्यांसारख्या असणाऱ्या गुहेत कितीतरी खोलवर पाणी कोसळत असल्याचा आवाज येत होता. या सहा ते आठ किमी. च्या परिसरात आपल्याला भूगर्भात घडणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठावर त्यांचे होणारे सर्वच प्रकारचे आविष्कार जसे गरम पाण्याचे झरे, कुंडे, तलाव, नद्या चिखलाची कुंडे पाहायला मिळतात. असे प्रकार जगात रशियासह आणखी सहा ठिकाणी आहेत असे सांगितले गेले, पण युरेशिआतील हे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे कुणी म्हटलं आहे की ‘या भागाला व्हॅली ऑफ गिझर्स’ म्हणण्यापेक्षा ‘व्हॅली ऑफ रिव्हर गिझर्स’ असे म्हणणे उचित ठरेल.

कामचाटकामध्ये दरदिवशी आपले पर्यटन झाल्यावर, म्हणजे चांगली चारपांच तासांची पायपीट झाल्यावर भरपेट खाऊन श्रमपरिहार म्हणून गरम पाण्याच्या नदीच्या कालव्यात, नैसर्गिक किंवा बांधलेल्या तलावात पोहण्यासाठी किंवा पाहिजे तर डुंबण्यासाठी घेऊन जातात. तसे आम्हीही नालीशेव्हो व्हॅलीत, वाकाझेटस् ट्रेकनंतर ओझेर्की रॅड्न, मलीन्स्की या गरम पाण्याच्या झऱ्यात पोहायला गेलो होतो. येथे पाण्याचे तपमान ३५ ते ४० अंश सेल्सिअल्स होते. पण आपल्या शरीरातील अंतर्गत तपमानही वाढते यामुळे जास्त वेळ पाण्यात राहता येत नाही. शारीरिक त्रास होऊ नये म्हणून प्रकृती स्वास्थ्यासाठी नियमानुसार आपण फक्त १५ ते २० मिनिटेच पाण्यात राहू शकतो. ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी पाण्यात जाण्यास सक्त मनाई आहे. दाशिन् स्िंप्रग्जमध्ये तर तपमान ४५अंश सेल्सिअल्स होते. इथे आत पाय ठेवणं म्हणजे पायाला जोरात चटका. म्हणून त्यापासून दूरच राहणं योग्य होतं.

कामचाटका हे शहर समुद्रकिनारीच असल्याने अतिशय ताजे, फडफडीत, चवदार साल्मन, हालीबट, सीबास असे मासे, कुल्र्या क्लॅमस् अशा समुद्री खजिन्याचा आस्वाद घ्यायला मिळाला. माणसेही दिलदार व मदतीला तत्पर होती. आमच्या या ट्रिपची सांगता आम्ही मॉस्को येथे केली.

आता एवढा लांबचा प्रवास झाल्यावर थोडी विश्रांती पाहिजेच ना? मॉस्को येथे आल्यावर रेड स्क्ेवअरला भेट द्यायची नाही हे कसं शक्य आहे? रेड स्क्वेअरमध्ये सर्वच इमारती लाल. आयव्हरीन चॅपेलकडून येथे आत आल्यावर पहिलं आहे ते लाल रंगाचं हिस्ट्री म्युझियम. रशियाची सगळी माहिती येथे आपल्याला मिळते. समोर कांद्यासारखे घुमट असलेला सेंट बेसिल डोम आहे. एका बाजूला शतकापूर्वी बांधलेले गुम शॉपिंग मॉल, तर दुसरीकडे लेनिनचे स्मारक आहे. हे आपल्या लाल किल्ल्यासारखेच खास प्रसंगी राष्ट्राध्यक्षांचे उंच व्यासपीठावरून भाषण करण्याचे स्थळ आहे. हा परिसर वाहतुकीसाठी बंद असल्याने खास समारंभ, पर्यटक, स्थानिकांसाठी फिरण्याचे, तसेच नवविवाहित जोडप्यांचे फोटो काढण्याचे स्थळ आहे. इथे आलं की वेळ कसा जातो ते मात्र समजतच नाही. व्यवस्थित फिरून दमल्यावर पोटपूजेची काळजी नकोच. कारण कबाब, आईस्क्रीम, सोडा फाऊंटन, चॉकलेटचे स्टॉल तयार असतातच. आपला राज कपूर आणि त्याचा ‘मेरा नाम जोकर’ हा सिनेमा तर इथे सर्वानाच प्यारा. एकाने तर आम्हाला ‘जीना यहां, मरना यहां’ हे गाणं म्हणून दाखवलं आणि ‘हिंदी-रुसी दोस्त’ असंही ऐकवलं.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader