रायगड जिल्ह्य़ातील पेण शहर हे गणपतीचे गाव म्हणून नावारूपास आले आहे. शहरातील घराघरातून बाराही महिने गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू असतो. सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगती यामुळे इथल्या मूर्तीना देश-विदेशातून मागणी असते. दरवर्षी या व्यवसायात जवळपास ६० कोटींची उलाढाल होत असते.
पेण शहरात गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सुरुवात झाली. ही सुरुवात नेमकी कशी झाली आणि कोणी केली याची माहिती उपलब्ध नाही. मात्र पेणमध्ये पूर्वी जोशी, टिळक आणि परांजपे यांच्यासारखे काही वतनदार लोक राहत होते. त्यांच्याकडे विजापूरहून आलेले काही कारागीर काम करत होते. आपले कामकाज आटोपल्यावर हे लोक फावल्या वेळात मातीची खेळणी, भांडी आणि मूर्ती बनवत असत. या वस्तूंना चांगली मागणी मिळत असे. कोकणात जाणारे चाकरमानी या वस्तू व मूर्ती पेणमधून घेऊन जात असत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव परंपरेला सुरुवात केल्यानंतर या मूर्तीकलेला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मातीची खेळणी, भांडी हळूहळू बंद होत गेली आणि गणेशमूर्ती बनवण्याची कला नावारूपास आली. पेणमध्ये घरासमोरील मातीतून छोटय़ा आणि सुबक गणेशमूर्ती तयार होऊ लागल्या, याच दरम्यान कोकणात गणेशोत्सवाचे महत्त्व वाढत गेल्याने पेणच्या गणेशमूर्तीना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली.
सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे पेणच्या गणेशमूर्तीची मागणी वाढत गेली. सुरुवातीला कोकण, त्यानंतर मुंबई-पुण्यात पेणच्या गणेशमूर्ती जायला लागल्या. हळूहळू राज्यभरातून पेणच्या गणेशमूर्तीना मागणी येण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकांत या मूर्तीची लोकप्रियता इतकी वाढली की कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तीना नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली. अगदी अलीकडच्या काळात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस या देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांकडून आता पेणच्या गणेशमूर्तीना मागणी आहे. दरवर्षी जवळपास आठ हजार गणेशमूर्ती या देशांमध्ये निर्यात केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे वर्षांगणिक इथल्या मूर्तीना मागणी वाढते आहे.
त्यामुळे गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांची संख्यादेखील वाढत आहे. सुरुवातीला पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज पेण शहराच्या आसपासच्या परिसरातही झपाटय़ाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. जोहे, हमरापूर, दादर, वडखळ या परिसरातही गणेशमूर्तीचे अनेक कारखाने सुरू झाले आहेत. कच्च्या गणेशमूर्तीची मोठी बाजारपेठ म्हणून जोहे, हमरापूर परिसराकडे पाहिले जाऊ लागले आहे. राज्यभरातील मूर्तिकार येथील कच्च्या मूर्ती विकत घेण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे पेण तालुक्यातील २५ ते २६ हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
मूर्तिकारांसमोरील आव्हाने
पेण शहरातील देवधर, हजारे, समेळ, वडके आणि परांजपे यांच्या चार पिढय़ा या व्यवसायात कार्यरत आहेत. मात्र त्यांची पुढची पिढी या व्यवसायात राहील की नाही याबाबत मात्र साशंकता आहे. पेणच्या गणेशमूर्तीना जगभरातून मागणी असली तरी या पुढील काळात हा व्यवसाय करणे जिकिरीचे होणार असल्याचे मूर्तिकार सांगतात. कारण दिवसेंदिवस गणेशमूर्ती कारखान्यांची संख्या वाढते आहे. मूर्तीकामासाठी चांगले मूर्तिकार आणि कुशल कारागीर मिळणेही कठीण झाले आहे. आजचा कारागीर उद्या आपल्याकडे येईल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. तर दुसरीकडे हाताने मूर्ती घडवणारे मूर्तिकार कमी होऊन साच्यातून मूर्ती काढणाऱ्या मूर्तिकारांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. जादा गणेशमूर्ती तयार करण्याच्या नादात मूर्तीचा दर्जाही घसरत जातो आहे. पण ही परिस्थिती थांबवणे आता कठीण झाले असल्याचे पेणच्या मूर्तिकारांनी सांगितले आहे. पेणच्या गणपती व्यवसायाला संघटित स्वरूप देण्याचे सर्व प्रयत्नही फसले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने आणि त्या तुलनेत मूर्तीच्या किमती वाढत नसल्याने व्यवसायातील फायदा कमी होत चालला आहे.
गणेशमूर्तीचा बदलता ट्रेण्ड
पूर्वी पेणच्या गणेशमूर्ती या फक्त शाडूच्या मातीपासून बनवल्या जात असत. आता मात्र इथल्या ८५ टक्के गणेशमूर्ती या केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जाऊ लागल्या आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यास लागणारा वेळ आणि त्यांचा नाजूकपणा यामुळे मूर्तिकार प्लास्टरकडे वळले आहेत. प्लास्टरच्या मूर्ती वजनाने हलक्या, मातीच्या तुलनेत मजबूत आणि फिनिशिंगसाठी चांगल्या असल्याने मूर्तिकारांनी प्लास्टरचा पर्याय स्वीकारला आहे. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या आहेत. पेण शहरातील निवडक मूर्तिकार सोडले तर आज सर्वत्र प्लास्टरच्या मूर्तीच बनवल्या जात आहेत. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर ही गावं तर कच्च्या गणपतींची गावं म्हणून नावारूपास आली आहेत. अलीकडे गणपतीच्या मूर्ती तयार करून रंगकाम न करताच या ठिकाणाहून विकल्या जात आहेत. अगदी अध्र्या फुटापासून ते दहा फुटांपर्यंतच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उपलब्ध असल्याने, राज्यभरातील गणपती विक्रेते तसेच मूर्तिकार या ठिकाणी कच्च्या मूर्ती खरेदीसाठी येत असतात. त्यानंतर त्या रंगवून विकतात.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव</strong>
महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेला व्यापक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली गणपतींची मागणी वाढली आहे. त्यामुळे पेणमधील शाडूच्या मूर्तीना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती आणि त्यांच्या सजावटीसाठी वापरलेल्या रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या शाडूच्या मातीने बनवलेल्या गणेशमूर्तीच बनवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने केले आहे. काही सामाजिक संघटनाही पर्यावरण पूरक गणेशमूर्तीसाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे शाडूूच्या गणपतींची मागणी पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पेण शहरातील काही मूर्तिकार यासाठी पुढे आले. प्लास्टरच्या मूर्ती तयार करण्याऐवजी फक्त शाडूच्या मूर्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीच्या रंगकामासाठी नैसर्गिक रंग वापरण्यास सुरुवात केली आहे.
या व्यवसायातून होणारी उलाढाल वर्षांगणिक वाढते आहे. सुरुवातीला काही लाखांत असणारी उलाढाल आज वार्षिक ६० कोटींच्या घरात गेली आहे. हे चित्र आशादायक आहे. पेण परिसरातून तयार होणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या ही वीस लाखांच्या घरात पोहोचली आहे. अजूनही मागणीच्या तुलनेत पेणमध्ये तयार होणाऱ्या मूर्तीची संख्या कमी आहे. त्यामुळे या व्यवसायाला इथे वाढायला अजूनही वाव आहे. हे पेणच्या गणेश मूर्तिकारांसाठी आशादायक चित्र आहे.