ऐ मेरे वतन के लोगों.. कुछ याद उन्हें भी कर लो, हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आहे. त्याला संगीत दिलं आहे सी. रामचंद्र यांनी. अनेक गायक, संगीतकार यांच्यासोबत लता मंगेशकर २७-१-१९६३ रोजी हे गीत सादर करण्यासाठी नवी दिल्लीला गेल्या होत्या. तो कार्यक्रम दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर (सध्याचं मेजर ध्यानचंद स्टेडियम) आयोजित केला होता. त्या वेळी लतादीदींनी शहिदांच्या स्मृती व अजोड त्याग सर्व प्रेक्षकांच्या डोळय़ांसमोर उभा केला होता. या गाण्यातील भाव मनाला भिडल्याने पं. जवाहरलाल नेहरूंच्या डोळय़ांत पाणी आलं होतं. ते खूप अस्वस्थ झालं होते. त्या वेळी पंडितजींनी लतादीदींना त्यांच्या निवासस्थानी चहापानाला बोलावलं होतं, त्या वेळी त्यांचे नातू राजीव व संजय यांची ओळख करून दिली होती. इ.स. १९६२ सालचे भारतावर झालेलं चीनचं आक्रमण, आपल्या सेनेला घ्यावी लागणारी माघार, अनेकांना आलेलं वीरमरण, यामुळे सर्व भारतीय सैरभैर, दु:खीकष्टी झाले होते. अशा या साऱ्या वेदना कवी प्रदीप यांनी या गीताद्वारे प्रकट केल्या आहेत. चीनच्या आक्रमणाने कवी प्रदीप यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. मनात सतत तेच विचार घोळत होते. ते त्या वेळी काही कामानिमित्त मुंबईला माहीमला गेले होते. एका फुटपाथवर उभे होते. शब्द ओठावर येत होते. जवळच एक सिगारेटचं रिकामं पाकीट पडलेलं होतं. ते त्यांनी उचललं, फाडलं व तेथील बूथवाल्याकडून एक पेन मागून घेतलं व त्या पाकिटावर त्यांचे ते सर्व शब्द उतरले गेले. त्यांची ती सारी अस्वस्थता त्या कागदावर उतरली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा