स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेल्या कारवाईत संस्थाने खालसा झाली, तरी आजही संस्थानिकांचे वाडे आणि श्रीमंती कायम आहे. असेच एक श्रीमंत संस्थानिक अगदी अलीकडेपर्यंत छायाचित्रकारांची एक फौजच घेऊन फिरायचे. त्यांच्या ताफ्यात विदेशी छायाचित्रकारही होते. जगातील सवरेत्कृष्ट ते आपण बाळगतो, या मस्तीत असलेल्या त्यांना कळले की, उत्कृष्ट छायाचित्रकारांच्या यादीत मुंबईच्या पेसी यांचे नाव आहे. (पेसी प्रसिद्धपराङ्मुख असल्याने त्याचे आडनाव हेतूत टाळले आहे) पेसीला आव्हान देण्यासाठी त्यांनी त्याला पाचारण केले आणि पाणउतारा करण्याच्या भाषेत त्याच्याशी चर्चाही केली. पेसीने आव्हान स्वीकारले. संस्थानिकाच्या ताफ्यातील उत्कृष्ट छायाचित्रकारांपेक्षा उत्तम चित्रण करून संस्थानिकांना हवे होते. चित्रण त्या तोडीस उतरले नाही तर पेसीने नंतर कॅमेऱ्याला हातही लावायचा नाही अशी अट होती. उलटपक्षी गणित सिद्ध झाल्यास तीच अट संस्थानिकांनी मान्य करावी, अशी अट पेसीने घातली. अर्थातच त्यांनी ती सहजच मान्य केली.
दिवस ठरला. राजे अर्थात ते संस्थानिक महालक्ष्मी रेसकोर्सवर त्यांच्या थाटात दाखल झाले आणि त्यांच्या ताफ्यातील छायाचित्रकारांनी चित्रण सुरू केले. त्यांचे सारे काम संपल्यावर पेसीने काम सुरू केले. अवघ्या काही मिनिटांत पेसीचे काम संपले त्या वेळेस संस्थानिकांनी अटीची आठवण करून दिली. पेसी म्हणाला, तुमच्या लक्षात आहे ना अट म्हणजे झालं!
ही गोष्ट अलीकडच्या काळातील असली तरी डिजिटलचे प्रस्थ माजण्याअगोदरच्या कालखंडातील आहे. तेव्हा प्रिंट्स प्रत्यक्ष येण्यासाठी थांबावे लागे काही काळ. संस्थानिकांच्या ताफ्यातील छायाचित्रकारांच्या प्रिंट्स प्रथम पाहण्यात आल्या. छायाचित्रण केवळ अप्रतिमच होते. प्रत्येक छायाचित्रागणिक पाहणाऱ्याच्या तोंडावर एक स्मितरेषा येई आणि मग आता पेसीचे कसे काय होणार, असे भाव उपस्थितांच्या चेहऱ्यावर उमटत..
पेसीची खेप आली त्या वेळेस पेसीने सांगितले, मी फक्त चारच प्रिंट्स दाखवणार. त्या वेळेस त्याची टवाळी उडवली गेली. त्याने पहिली प्रिंट दाखविली आणि साऱ्यांच्याच चेहऱ्यावरचे भाव पालटले. दुसऱ्या प्रिंटला चेहऱ्यावर आश्चर्यमुग्ध झाल्याचे भाव उमटले आणि चौथ्या प्रिंटनंतर तर सगळेच अवाक् झाले होते, संस्थानिकांसह! संस्थानिकाने आणि त्याच्या सर्व ताफ्यातील छायाचित्रकारांनी पेसीची माफी मागितली.
संस्थानिकाने सर्वच्या सर्व म्हणजे चारही प्रिंट्स विकत घेण्याची तयारी दर्शविली आणि किंमत विचारली, त्या वेळेस पेसी म्हणाले, याची किंमत तुम्ही मोजू शकणार नाहीत!
संस्थानिक- राजे म्हणाले, तुला ठाऊक आहे का, की मी संस्थानिक राजा आहे. आजही माझी श्रीमंती काही कमी नाही! काहीही विकत घेऊ शकतो.
त्यावर पेसी म्हणाला, माझी छायाचित्रे अमूल्य आहेत. अमूल्यतेचे मूल्य कसे मोजणार? असा प्रश्न करत त्याने सर्व प्रिंट्स टराटरा फाडल्या आणि तो म्हणाला, तुम्ही राजे असाल तर मी चक्रवर्ती सम्राट आहे! ..आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरून पेसी निघून गेला.
हा तोच पेसी आहे, ज्याला शोधत चांदीच्या कलात्मक वस्तू, मग ते काटे-चमचे असतील किंवा इतर कोणत्याही कलात्मक बाबी, त्याचे जगातील सवरेत्कृष्ट चित्रण करून घेण्यासाठी स्विस कंपन्या भारतात येतात! एका साध्या चमच्याची तब्बल ७०० ज्यात एकही दुसऱ्यासारखे नाही, प्रत्येकात वेगळेपण आहे, अशी छायाचित्रे देणारा पेसी जगाआगळा आणि तेवढाच वेगळाही! विशेषज्ञ व्हायचे तर अपार मेहनत लागते, जीव तोडून काम करावे लागते. पेसी म्हणतो, एका साध्या विटेची २५० वेगवेगळी छायाचित्रे काढताना कस लागतो, तोच सराव, ते सातत्य, तो वेगळेपणाचा ध्यासच इथे कामी आला. त्यासोबत आला तो दुर्दम्य आशावाद आणि धमकही!
मग करिअरच्या वाटेवरचे तुम्हीही होणार का पेसी?
विनायक परब