‘फोटो सर्कल सोसायटी’ या संस्थेतील महिला फोटोग्राफर्स गेली काही वर्षे आठ मार्चच्या निमित्ताने फोटो प्रदर्शन मांडतात. या वर्षी त्यांच्यातील काहीजणींनी पूर्वाचलात जाऊन तिथली फोटोग्राफी केली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल-

चळवळीतून उभी राहिलेली ‘फोटो सर्कल सोसायटी’ ही आमची संस्था गेली १६ र्वष ठाणे जिल्ह्यत कार्यरत आहे. ग्रामीण भागातील फोटोग्राफर्सना व्यासपीठ देणारी फोटोग्राफर्ससाठी फोटोग्राफर्सनी सुरू केलेली ही सेवाभावी संस्था. प्रदर्शन, स्लाईड शो (चित्रफीत), कार्यशाळा हे आमचे नेहमीचेच उपक्रम. त्यामुळे प्रदर्शन उभारणं हे काही नवीन नाही. चारशेहून अधिक जणांचा इथे पाठिंबा असतो, पण फोटोग्राफीसारख्या चंचल क्षेत्रात महिला फोटोग्राफर्सनी पुढाकार घेऊन स्त्रीशक्ती आणि स्त्रीकार्य लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी धडपडणं म्हणजे थोडं निराळंच! संस्थेच्या पहिल्या महिला फोटोग्राफर सतेजा राजवाडे यांनी महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला काही देऊ पाहणाऱ्या स्त्रियांना आपल्या प्रकाश चित्रणामार्फत लोकांपुढे आणू शकतो अशी कल्पना मांडली. मग काय विचारता! सर्वानी ती उचलून धरली आणि या नव्या प्रकल्पाला नाव सुचवलं माधवी नाईक यांनी.. ‘विद्युल्लता’ – स्वयंप्रकाशित असलेल्या आणि तेजाने सभोवताल उजळून टाकणाऱ्या विद्युल्लता..
२०१४ हे विद्युल्लताचं तिसरं वर्ष. विविध विद्युल्लतांचं प्रकाशचित्रण करण्यात यंदा १८ महिला फोटोग्राफर्स आणि एकूण ५४ महिला सदस्यांचा समावेश होता. याआधी सिंधुताई सपकाळ, अपर्णा पाध्ये, संपदा जोगळेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, भारती व मंदाकिनी आमटे अशा अनेक विद्युल्लतांना आणि त्यांच्या कार्याला कॅमेऱ्यामध्ये टिपून आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त सतत तिन्ही वर्षे प्रकाश चित्रणाद्वारे प्रदर्शित केलं. यावरच न थांबता टॅक्सीचालिका, पेपरची लाईन टाकणाऱ्या आणि अगदी स्वेच्छेने स्मशानभूमीत काम करणाऱ्या विद्युल्लतांचे देखील फोटो या प्रदर्शनात मांडले. त्यामुळे गगनात भरारी घ्यायला महिलांच्या झेपेला मर्यादा नाहीत, हे आम्ही या प्रदर्शनाद्वारे दाखवू शकलो. इथे प्रत्येक फोटोग्राफरचा अभ्यासाचा आणि कामाचा विषय तसा वेगळा! कोणी व्यवसायाने डिझायनर, आर्किटेक्ट, तर कोणी अजूनही विद्यार्थी. व्यवसायाने फोटोग्राफर असणाऱ्या मोजून तिघी! त्यामुळे सर्वाचंच फोटोग्राफीचं शिक्षण अजून चालूच आहे.
विद्युल्लतांचे फोटो काढायचे म्हटलं तर त्यांच्या कार्याविषयी अगोदर अभ्यास करणं आवश्यक होतं. एकदा ती व्यक्ती समजू लागली, की हळूहळू डोळ्यांसमोर फ्रेम्स तयार होऊ लागतात. मग तेव्हा प्रत्यक्ष जागा, तिथल्या भावना या सर्व गोष्टी विचारात घेऊन फोटो अरेंज करावा लागतो. जसं की नाशिकमधील स्मशानभूमीत स्वेच्छेने काम करणाऱ्या विद्युल्लतेचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या विधी करतानाच्या फ्रेम्स डोक्यात ठेवल्या. आमच्या आर्जवाने त्यांनी रिकामी चिता पुन्हा रचली व विधी चालू असावा असा भास निर्माण झाल्यावर आम्हाला फोटो काढू दिले. स्मशानभूमी तयारच वेगळ्या कारणासाठी झालेली असते. अशा वेळी तिथे जाऊन फोटो काढणं थोडं थरारक वाटलं.
सलग दोन र्वष आम्ही महाराष्ट्रातील विद्युल्लतांना या प्रकल्पाद्वारे लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण यंदा मात्र महाराष्ट्रासोबत बाहेरही पाऊल टाकलं. तेव्हा सर्वात पहिले डोळ्यांसमोर आलं पूर्वाचल. पूर्वाचल हा मुळातच अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. सरचिटणीस संजय नाईक यांचा त्यावर विशेष अभ्यास होता. पण हा प्रदेश प्रकल्पासाठी निवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथलं मातृसत्ताक राज्य. तेव्हा सुमारे १५ दिवसांत अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि आसाम या चार राज्यांत आमच्या तीन महिला व दोन पुरुष फोटोग्राफर्सनी विद्युल्लतांची प्रकाशचित्रं टिपली. देशात पुरुषप्रधान संस्कृती असली, तरी या सात बहिणींनी मातृसत्ताक राज्य तयार केलंय, याचा प्रत्यय तिथे पोहोचताच येतो. मुंबई हे मुलींसाठी भारतातलं सर्वात सुरक्षित शहर मानलं, तरी रस्त्यावरून चालताना अंगावर खिळणाऱ्या नजरा, बसमध्ये ‘सो कॉल्ड’ चुकून लागणारे धक्के नेहमीचेच असतात. पण तिथे जाणवला तो स्त्रियांविषयी अतीव आदर; चित्रविचित्र नजरा आणि स्पर्श तर दूरची गोष्ट!

पूर्वाचल हा सतत दहशतीखाली जगणारा भाग.. सीमेवरच्या प्रदेशांचं जगणंच वेगळं.. त्यात ते भारतापासून तुटलेले.. तिकडचं दैनंदिन जीवनही आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं असतं. त्यामुळे ‘खडतर जीवन पद्धतीत स्वत:ला तगवण्यासाठी स्वावलंबी होऊन खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रियांचा प्रदेश’ म्हणून याची ओळख आहे. पूर्वाचलाच्या भौगोलिक स्थितीने या विद्युल्लतांना अतिशय कणखर आणि तितकंच मृदू मनाचं बनवलंय. माणसांची (दोन्ही पुरुष व स्त्री) विक्री जिथे सर्रास चालते. तेव्हा पद्मश्री बिन्नी यांनी लोकांचा रोष पत्करून सुमारे २०० जणांना यातून सोडवलं, पण त्या तिथेच थांबल्या नाहीत. उद्ध्वस्त झालेल्यांचं आयुष्य मार्गी लावून दिलं, मुलांची लग्नं लावून दिली, अगदी रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली. आजही त्यांच्या राहत्या घरात सुमारे २४ मुली आहेत. स्वत: गेली सहा र्वष कॅन्सरशी झुंज देत लोकांना त्यांचं आयुष्य त्यांनी परत मिळवून दिलं. डाकीण प्रथेविरुद्ध शौर्याने आवाज उठवणाऱ्या बिरुबाला राभा असोत वा रात्रीची घुसखोरी, लाकूडतोड यांना आळा बसवण्यासाठी केवळ विजेरी आणि काठीसह गट तयार करून गस्त घालणाऱ्या तेरेसा खोम्ङथॉ असोत, त्यांच्या निर्भयपणाचं आश्चर्य वाटतं.
पूर्वाचल हा हिमालयजवळचा डोंगराळ भाग. महाराष्ट्रासारखं रांगडं रूप नाही त्याचं.. ठिसूळ जमीन.. रस्ते बनवणं जिकरीचं काम! त्यामुळे भात वा इतर अन्नधान्याची ने-आण करायची झाल्यास लोकांना दोन किलो जास्तच दिले जातात. कारण शे-किलोमीटर्सचे घाट पार करताना दोन किलो सहज संपून जातात. इटानगरच्या महापौर आरुणी हिगिओ यांची मुलगी एका शाळेत शिकवते. घरापासून शाळेत जाण्यासाठी त्यांना सलग दोन दिवस तो डोंगराळ भाग पार करून जावं लागतं. त्यात कधी आईशी फोनवर बोलायचं झालं तर पुन्हा दोन तास डोंगर चढून रेंज मिळाल्यावर बोलता येतं. यावरून तिथल्या जीवनाची कल्पना तुम्हाला आली असेलच!
आता फोटोग्राफीविषयी बोलायचं तर दिवसातली कोणतीही वेळ उत्तमच. वर्षांचे सलग आठही महिने पाऊस आणि उरलेल्या चार महिन्यांत अवेळी पडणारा पाऊस! त्यामुळे फोटोग्राफीच्या भाषेत तिथे ‘हार्श लाईट’ नसल्याने ती एकदम उत्तम चालते.
या चारही राज्यांत सतत सैन्य तैनात असल्यामुळे एक वेगळाच दबाव जाणवतो. भारतीयांनी चिनी वा नेपाळी म्हटल्याची चीड मनात असलेला एक विशिष्ट वर्ग तिथे असला, तरी तिथल्या माणसांची माणुसकी हरवली नाही. खरं तर थोडी शाही वागणूक आणि पराकोटीचं आदरातिथ्य तिथे अनुभवायला मिळालं.
सुरुवातीला डोक्यात केवळ एक प्रदर्शन म्हणून उभं केलेल्या या प्रकल्पात आता सर्व विद्युल्लतांची माहिती देणारी पुस्तिका तयार केलीये. त्यामुळे तुम्ही फोन, ई-मेल पत्त्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचून मदतीचा हात पुढे करू शकतो. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुढे तुम्हाला फोटो सर्कलवर अवलंबून राहायची गरज पडणार नाही. आज त्यांच्यावर तयार केलेल्या स्लाईड शोमार्फत आम्ही महाराष्ट्रभर दौरा सुरू केलाय आणि देशभर या स्त्रियांचं कार्य आणि त्यांची स्त्रीशक्ती पोहचवण्याची इच्छा आहे. या प्रकल्पामुळे एका प्रकाशचित्राची ताकद आम्ही ओळखू शकलो. विद्युल्लतांचं गगनभेदी काम उघडय़ा डोळ्यांनी पाहून जी ताकद आणि प्रेरणा मिळते त्याला तोड नसते. फोटोग्राफीमार्फत उभ्या केलेल्या संपूर्ण पसाऱ्यामुळे या सेवाभावी शक्तींना, त्यांच्या कार्याला हातभार लागताना पाहण्यासारखं आमच्यासाठी दुसरं सुख नाही.

Story img Loader