ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्य़ुजेसच्या अपमृत्यूचे दु:ख ताजे असतानाच पश्चिम बंगालच्या अंकित केसरीचा खेळताना दुखापत होऊन मृत्यू झाला. म्हणूनच खेळाडू आणि त्यांना होणाऱ्या दुखापतींकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

डोक्यावर चेंडू बसून क्रिकेटपटूचा अंत, दोन खेळाडूंच्या टकरीत अंकित केसरी या युवा क्रिकेटपटूचे निधन, फॉम्र्युला वन शर्यतीचा सम्राट मायकेल शूमाकर स्केटिंगच्या अपघातातून बचावला अशा अनेक बातम्या आपण वाचतो.  केवळ क्रिकेट नव्हे तर अन्य अनेक क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येक क्षणाला दुखापती होण्याची शक्यता असते. अशा दुखापती झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी या दुखापती कशा टाळता येतील यावर भर देण्याची आवश्यकता असते.
दिवसेंदिवस खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. खेळ हा मनोरंजनाचा एक भाग न राहता, त्याद्वारे प्रसिद्धी व पैसा कसा मिळेल याकडे खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे लक्ष असते. अनेक पालकही आपल्या पाल्याने यशाचे शिखर झटपट मिळवावे, अशी अपेक्षा करीत असतात. हातात रॅकेट धरायला शिकला नाही तोच त्याने रॅफेल नदाल किंवा सायना नेहवाल यांच्यासारखे यश मिळवावे अशीच त्यांची अपेक्षा असते. क्रीडा क्षेत्रात निर्माण झालेली अहमहमिका ही अनेक वेळा खेळाडूंना मारक ठरीत असते. येनकेनप्रकारेण अव्वल यश मिळविण्यावर या खेळाडूंचा कल दिसून येतो. साहजिकच अनेक वेळा शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते व कधी कधी एखादी छोटीसी दुखापतही त्या खेळाडूची कारकीर्दच संपविणारी असते. एवढेच नव्हे तर अशी दुखापत त्या खेळाडूला आयुष्यातूनही उठवते. खेळाडूंच्या मार्गदर्शक व पालकांना ही गोष्ट लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. केवळ पश्चात्ताप करण्याखेरीज त्यांच्या हातात काहीही उरलेले नसते.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्य़ुजेस याने डोक्यावर हेल्मेट घातले होते तरीही उसळता चेंडू त्याच्या हेल्मेटवर एवढय़ा जोराने आदळला की त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली व ही दुखापत त्याचा प्राणही घेऊन गेली. एवढी गंभीर घटना होऊनही त्याच्या संघात असलेले द्रुतगती गोलंदाज उसळत्या चेंडूंचा मारा करण्याचे समर्थन करतात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शेन वॉटसन याला तर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्याच्या डोक्यावर किंवा खांद्यावर कसा मारा केला जाईल यावरच भर दिला होता. अलीकडेच बंगालचा युवा खेळाडू अंकित केसरी हा झेल घेताना सहकाऱ्याशी टक्कर झाल्यामुळे मेंदूवर झालेल्या आघातानंतर ह्रदयक्रिया बंद पडून गेला. अशा घटना टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झेल घेताना आपण प्रयत्न करीत आहोत हे अन्य सहकाऱ्यांना ओरडून सांगितले पाहिजे. उसळत्या चेंडूंना सामोरे कसे जायचे याची शिकवण आपण मैदानावरील सरावाचे वेळी घेतली पाहिजे. प्रशिक्षकांनीही या गोष्टींकडे प्राधान्य दिले पाहिजे. खेळपट्टीजवळ क्षेत्ररक्षण करताना हेल्मेट व अन्य संरक्षक साधनांचा उपयोग केला पाहिजे.
lp19हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी आदी सांघिक खेळांमध्ये क्रिकेटपेक्षा दुखापती होण्याचे प्रमाण अधिक असते. हॉकीमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूचे फाऊल होण्यासाठी त्याच्या अंगावर, पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न अनेक खेळाडूंकडून केला जातो. अनेक वेळा खेळाडूंच्या डोळ्याला जीवघेणी दुखापत होण्याचेही प्रसंग घडले आहेत. तसेच स्टीक आडवी टाकून खेळाडूला पाडण्याचाही प्रयत्न केला जातो. फुटबॉलमध्ये दांडगाईचा खेळ झाला नाही असे कधीही घडत नाही. एकमेकांना चाईट घालून किंवा पाठीमागून धक्का देत पाडण्यावर अनेक खेळाडू भर देत असतात. बास्केटबॉलमध्ये धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला जात असतो. अनेक वेळा काही उत्साही खेळाडू बास्केटबॉलची िरगच धरून ठेवतात. अशा वेळी हाताला हिसका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रग्बीमध्ये प्रत्येक क्षणाला दुखापती होण्याची शक्यता असते. खेळाडू चक्क मारामारीच करीत असतात. खो-खो, कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये ठायीठायी दुखापतींचे प्रसंग असतात. पाय मुरगळणे, खांद्याला दुखापती होणे, हाताच्या कोपऱ्याला इजा होणे अशा प्रसंगांना खेळाडूंना सामोरे जावे लागते.
वाढत्या स्पर्धात्मक युगात खेळ हा मनोरंजनाचा भाग न राहता उपजीविकेचे साधन होऊ लागला आहे. त्यामुळेच झटपट यश मिळविण्याकडे कल दिसून येऊ लागला आहे. हे लक्षात घेऊनच दुखापती कशा टाळता येतील किंवा दुखापत झाली तर उपचार तत्परतेने कसे करता येतील हा स्वतंत्र संशोधनाचा विषय झाला आहे. क्रीडा व्यवस्थापन शास्त्रात तसेच क्रीडा वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात दुखापतींचे व्यवस्थापन यास प्राधान्य दिले जात आहे. दुखापती टाळण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब यांसारख्या खेळांमध्ये हातपाय, मान, कंबर लचकण्याच्या दुखापती होण्याची शक्यता असते. मल्लखांबावर कसरती करताना खांबाजवळ गाद्या टाकल्या आहेत ना याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण अनेक वेळा उलटी उडी मारताना डोक्यावर आपटण्याची शक्यता असते. दोरीवरील मल्लखांब करताना दोरी हाताला कासण्याची शक्यता असते. अशा वेळी हाताला पावडर लावणे महत्त्वाचे असते. जिम्नॅस्टिक्समध्ये पॅरलल बार, पॉमेल हॉर्स, बॅलन्सिंग बीम आदी साधनांवर कसरती करताना साधनांभोवती मॅट्स आहेत ना याची खबरदारी घेतली पाहिजे. कसरती करताना आततायीपणा टाळला पाहिजे. हवेत ट्वीस्ट मारताना आपली मान अवघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. खेळाडूंप्रमाणेच त्यांच्या प्रशिक्षकांनी व संयोजकांनी ही साधने अव्वल दर्जाची आहेत ना याची खबरदारी घेतली पाहिजे. वेळच्या वेळी या साधनांची दुरुस्ती केली पाहिजे. अशी साधने घेताना नावाजलेल्या कंपनीकडूनच ही साधने घेतली पाहिजेत व त्यांची नियमित देखभालही केली पाहिजे.
lp20हॉकी, अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी आदी खेळांकरिता कृत्रिम मैदानांचा उपयोग होऊ लागला आहे. या मैदानांचीही देखभाल घेतली पाहिजे. जर हॉकी किंवा अ‍ॅथलेटिक्सचे कृत्रिम मैदान छोटेसे फाटले असले तरीही खेळाडूंना त्यापासून गंभीर दुखापत होऊ शकते. वेळच्या वेळी ही मैदाने दुरुस्ती केली पाहिजे. कबड्डी किंवा कुस्तीच्या मॅट्सवर पाय मुरगळण्याचे प्रमाण वाढले आहे. ही मॅट्स टाकताना त्याखालचे मैदान सपाट आहे ना याची काळजी घेतली पाहिजे. हॉकीच्या कृत्रिम मैदानास सतत पाणी लागते अन्यथा हे मैदान फाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. हॉकीमध्ये जेव्हा खेळाडूंना दुखापत होते, तेव्हा पंचांनी परवानगी दिल्याशिवाय मैदानावर वैद्यकीय तज्ज्ञास प्रवेश दिला जात नाही. काही वेळा हा निर्णय घेताना विलंब झाला तर खेळाडूच्या दुखापतीचे गांभीर्य वाढण्याची शक्यता असते. हॉकी संघटकांनी याबाबत नियमांवलींमध्ये थोडासा बदल केला पाहिजे. अ‍ॅथलेटिक्समध्ये हर्डल्स तुटलेले नाहीत ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. पोलव्हॉल्ट, उंच उडीच्या वेळी मॅट्स आहेत ना याची खात्री केली पाहिजे. हातोडाफेक, गोळाफेक, थाळीफेक सुरू असताना त्याच्या मैदानात कोणी खेळाडू मध्येच नाहीत ना याची खबरदारी घेतली पाहिजे.
जलतरण, वॉटरपोलो व डायव्हिंग या क्रीडाप्रकारांमध्येही दुखापतींना वाव असतो. जलतरणात फिनिशिंग स्पॉट किंवा टर्निग स्पॉटच्या ठिकाणी फरशा तुटलेल्या नाहीत ना हे पाहिले पाहिजे. वॉटरपोलोत काही खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंना अवघड जागी दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीच्या खेळाडूंवर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे. डायव्हिंगमध्ये सूर मारताना स्प्रिंगबोर्ड चांगले आहेत याची खात्री केली पाहिजे. अनेक वेळा तलावात गर्दी असताना काही जण सूर मारण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी खाली तलावात अन्य मुले-मुली नाहीत याची काळजी घेणे जरुरीचे आहे. सूर मारण्यापूर्वी भरपूर सराव केला पाहिजे. डोके किंवा अन्य कोणत्याही अवयवास दुखापती होणार नाही हे पाहणे जरुरीचे आहे. बॉक्सिंग, ज्युदो, तायक्वांदो आदी खेळांमध्ये अनेक वेळा गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. मध्यंतरी शिरस्त्राण न वापरता लढती करायचा नियम करण्यात आला होता. असे जाचक नियम काढून टाकले पाहिजेत. बॉक्सिंगमध्ये शिरस्त्राण वापरणे अनिवार्य केले पाहिजे. व्हॉलिबॉल, हँडबॉलमध्येदेखील दुखापती होतात.
अनेक वेळा असे दिसून येते की खेळांच्या मैदानांजवळ किंवा क्रीडा संकुलांमध्ये स्पर्धा सुरू असताना तेथे प्राथमिक उपचाराचीदेखील सोय नसते. बॉक्सिंग, हॉकी, फुटबॉल आदी खेळांच्या सामन्यांमध्ये गंभीर दुखापती होतात, अशा ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्याची आवश्यकता असते. एक वेळ पारितोषिकांची रक्कम कमी ठेवा, पण अशा आवश्यक सुविधांवर खर्च केलाच पाहिजे. अनेक शहरांमध्ये क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञांची संघटना कार्यरत असते. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी काम करण्याऐवजी चर्चा व कार्यशाळांपुरतेच त्यांचे कार्य मर्यादित असते. संघटनेशी संलग्न असलेल्या प्रत्येक सदस्याने स्पर्धेच्या ठिकाणी एक तास वेळ दिला तरी त्यामुळे बरेच काही साधता येईल. खेळाडूंना दुखापती होतात मात्र वैद्यकीयतज्ज्ञ जागेवरच नाही अशा घटना अनेक वेळा होत असतात. या घटना टाळण्याची आवश्यकता आहे. तसेच खेळाडूला गंभीर दुखापत झाली तर त्याला नेमके कोणत्या रुग्णालयात त्वरित पाठविणे जरुरीचे आहे याबाबत अशा वैद्यकीयतज्ज्ञांनी त्वरित निर्णय घेतला पाहिजे. दुखापती झाल्यानंतर त्यावर उपाय करण्याऐवजी या दुखापती कशा टाळता येतील याबाबत क्रीडा वैद्यकीयतज्ज्ञांनी वेळोवेळी खेळाडू, पालक, प्रशिक्षक व संघटकांकरिता मार्गदर्शन शिबिरे घेतली पाहिजेत. त्यामुळे खेळाडूंची कारकीर्द सुसह्य़ होईल. खेळाडूंनीही सातत्याने स्पर्धा किंवा सामने खेळण्याऐवजी अधूनमधून विश्रांती घेणे आवश्यक आहे. तंदुरुस्ती राहिली तरच तुमची कारकीर्द समर्थ राहील हे खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Pat Cummins likely to miss Champions Trophy 2025 due to ankle injury
Pat Cummins : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का? ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता
Story img Loader