पत्ते म्हणजे बैठय़ा खेळांचा राजा. हा असा एक खेळ आहे जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे त्या खेळाची मजा लुटता येते. हा असा खेळ आहे तो एकटय़ाने खेळता येतो, जोडीदार लागतोच असे नाही. पत्त्याचा कॅट कुठेही कॅरी करायला सोपा. हा असा खेळ आहे तो कुठेही, केव्हाही अगदी चालत्या वाहनात पण खेळता येतो.
वाईट एवढेच वाटते हल्लीची मुले पत्तेच खेळत नाहीत. त्यांना ५२ पत्ते साधे पिसता येत नाहीत. माझे वडील ५२ पत्ते अर्धे अर्धे दोन हातात धरून फुर्र्र.. करून कातरी मारायचे, आम्ही ते बघत बसायचो.
कडक उन्हाळय़ाची सुट्टी आणि पत्ते यांचे अतूट नाते आहे. चाळीत कोणाच्या घरात, गॅलरीत, व्हरांडय़ात टाकलेला पत्त्यांचा डाव आठवला की लहानपणीचा काळ आठवतो. आरडाओरडा, भांडणे, रुसवे फुगवे, खाणाखुणा, लबाडी वगैरे सगळं सगळं पत्ते खेळताना चालते. तसा गलका आमच्या सोसायटीत बरीच मुले असून दिसत नाही. त्यांना पत्ते कसे खेळतात, किती प्रकारे खेळतात हेच माहीत नाही.
पत्ते आणि त्याचे विविध खेळ (डाव) आठवले तरी स्फुरण चढते मनात. काय काय सांगाव्या त्या गमती-जमती. गेले ते दिवस. कुठे असेल तो चिडका बिब्बा मन्या आणि हातात पान असून हुकमाच्या पानाने मारणारा खोटारडा वशा (वसंता). भेटतील का मला हे सगळे भिडू?
ते राज्य, ते गाढव होणे, एकावर एक लाडू खाणं (चढवणे), कोट चढवणे, ती वख्खई, ते भिडू मागणे, पान लपवणे, हुकूम बोलणे, एकावर एक हात लावणे, पान ओढणे, सगळे शब्द आठवले की ५२ पाने वाटण्यात हात शिवशिवतात. पत्ते कुटावेसे वाटतात.
चाळ संस्कृती गेली, वाडे गेले आणि कोणच्याही घरात घुसणे, एकमेकांना मजल्यावरून ओरडून हाका मारणे, मिळेल ते मुठीत घेऊन खात खात गप्पा मारणे, चल पत्त्याचा डाव टाकूया म्हणत तेथेच ठिय्या मारणे सगळे बंद झाले. सोसायटय़ा झाल्या, दारे बंद झाली. सुट्टीत मुलांना निरनिराळय़ा सकाळ-संध्याकाळ शिबिरात भरपूर पैसे खर्च करून अडकवण्याची पद्धतच पडली.
मला पत्त्याची भयंकर आवड असल्यामुळे मी माझ्या नातीला सांगितले. दोन-तीन दिवस दुपारचे सोसायटीतल्या सर्व मुलांना आपल्याकडे बोलाव, मी तुम्हाला पत्त्यांचे विविध डाव शिकवीन. तीन दिवस मुले-मुली येत होती. समस्या एकच होती ती म्हणजे पत्त्याच्या खेळातील इरसाल मराठी नावे, या इंग्रजी मीडियमच्या मुलांना कशी सांगायची. मराठी मुलगा पानाला ‘पेज’ म्हणाला, त्यावर पंजाबी मुलगा म्हणाला पेज नाही म्हणायचे ‘कार्ड’ म्हणायचे. माझी या मुलांना पत्ते शिकवताना होणारी तारांबळ, अचूक शब्दांचा गोंधळ, पाहून घरातील हसत होती, पण मी जिद्द सोडली नाही.
पत्त्याचे डाव कितीतरी गोष्टी लहानपणी मुलांना शिकवतात. अगदी पहिला भिकार-सावकर डाव शिकताना, भिकारी झालो तर हार स्वीकारायची. गरीब हा श्रीमंत होऊ शकतो ही शिकवण मुलांना मिळते. प्रत्येक डावात एक लपलेली शिकवण असते. चिकाटी, कसोटी, सचोटी, भिडूला सांभाळून घेणे, स्मरणशक्ती, दुसऱ्याची खेळी ओळखणे, अंदाज बांधणे, समोरच्या खेळाडूंना बुचकळय़ात पाडणे, वगैरे वगैरे.
भिकार-सावकर, पाच-तीन-दोन, बदाम सत्ती, मांडणी डाव, छब्बू, मेंढीकोट, लॅडीस, मार्कडाव, गुलामचोर, रमी, बिझीक आणि शेवटी ब्रिज; बिझीक आणि ब्रिज खेळणारी मंडळी पत्ते खेळण्यात हुशार पटाईत असतात असा समज असे. सर्वात खतरनाक खेळ पण मनोरंजक म्हणजे ‘रमी’ डाव. कारण बरीच माणसे पैसे लावून हा खेळून बरबाद झाल्याचे पाहिले आहे.
पत्त्यात हुकमाची र्दुी, तर्िीसुद्धा महत्त्वाची असते. हुकमाची तेरा पाने कोण कशी टाकते हे लक्षात ठेवणे, कोण खेळाडू खेळताना पान जाळत आहे, समोरच्या भिडूने खेळताना काय काय पाने टाकली किंवा जाळली याकडे लक्ष ठेवणे या सर्व पत्त्यांच्या डावातील चलाखी, हुशारी हल्लीच्या मुलांना कोण शिकवणार? टीव्हीपासून मुलांना दूर करायचे असेल तर उन्हाळय़ात जुने जुने बैठे खेळ मुलांना शिकवले पाहिजेत. आपोआप गोडी निर्माण होते.
अगदीच पत्ते खेळून कंटाळा आला की आम्ही पूर्वी एकमेकांना पत्त्याच्या जादू करून दाखवत असू. एखादा मित्र कुठे नातलगांकडे गेला की तो नवीन जादू शिकून आम्हाला दाखवायचा. सर्वात सोप्पा बाळबोध पत्त्यांचा वापर म्हणजे अगदी लहान मुलांना पत्त्यांचा बंगला करून दाखवायचा. तो मोडला की त्याला आनंद वाटायचा.
काय! आलाना तुम्हाला पत्ते खेळण्याचा मूड, तर बसा पत्ते कुटायला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा