पोरीऽऽ, तुला शाळेत पाठवताना..
उगाच मनाचा थरकाप होतो,
शाळेतून घरी परतण्यापर्यंत..
मनाला नसता क्लेश होतो!
तरी पण पोरी! जा शाळेत जा तू-
कारण शिकल्याशिवाय इलाज नाही
आपल्यासारख्या गरीबांसमोर.
पण शाळेत असतांना..
पोरी.. थोडंसं जपून रहा,
कोणावरही डोळे झाकून
विश्वास ठेवू नकोस,
अगदी तुझ्या गुरुजनांवरही,
कारण आज पितृतुल्य गुरुजनही..
कधी-कधी बनतात दुयरेधन,
म्हणूनच पोरी..
पाठीवर फिरणारा त्यांचा हात-
आहे मायेचा की आणखी कशाचा?
याचा तू नीट विचार कर,
नजरेत त्यांच्या आहे वात्सल्य की-
खदखदणारा काम-ज्वालामुखी?
तू वेळीच त्याची पारख कर,
शिकवताना त्यांची भाषा-
सुसंस्कृत-सभ्य आहे का?
तू त्याचे निरीक्षण कर,
कारण…
कारण पोरी नेहमीच पेपरात वाचावयास मिळते
‘‘कोवळी कळी कोण्या शिक्षकाने ओरबाडली,
पाकळी तिची एकेक वासनेने कुसकरली,
शाळेतली स्वप्नं शाळेतच धुळीस मिळाली,
लग्नाआधीच कूस तिची उजवली,
मातृत्वाची जबाबदारी बळजबरीने लादली!’’
पण सगळेच नसतात असे-
माणसातलेही साप ओळखण्यास शीक आता,
नाही तर उगाच तुझ्या अनाठायी विश्वासापोटी-
उद्या तुझेच नाव यायचे पेपरात छापून,
म्हणूनच पोरी.. तुला शाळेत पाठवताना-
उगाच मनाचा थरकाप होतो,
शाळेतून घरी परतण्यापर्यंत-
मनाला नसता क्लेश होतो!
डॉ. सत्यपाल श्रीवास्तव, सोलापूर.
कडकडून पेटलेल्या सूर्याच्या अस्तावेळी
हलकेच आली पावसाची सर,
मग अशा वेळी नशीबही साथ देतं
करण्या कविता एकांत असतो घरी.
तरी आज दुरूनच पाहायचं म्हणून
मी मनाला खूप आवरलं,
आवरून आवरून किती आवरणार.
शेवटी मनच ते, एकदा बावरलं ते बावरलं.
सहज हात खिडकीबाहेर काढला
जमवलेल्या थेंबात पाहण्या प्रतिबिंब,
नकळत मीच त्याच्या अधीन झाले
आणि होऊन गेले ओले-चिंब.
सरीने वेग आवरताच
मन नाराज व्हायला लागलं,
मग हळूच तेही स्वप्नांच्या जगातून
परतायला लागलं.
तेवढय़ात वीज कडाडली अन्
बेधुंद पाऊस पुन्हा अंगावरून ओघळला,
स्वप्नात घेऊन जाणारा दाट मृद्गंध
अन् पुन्हा दरवळला.
आता पाऊस थांबणार, मजा संपणार
म्हणून मी आधीच मनाला सावरलं,
सावरून सावरून कितीक सावरणार?
शेवटी मनच.. ते एकदा बावरलं ते बावरलं.
कु. प्राची अविनाश साळुंखे
मी विचारले,
‘‘कसा असतो दु:खी माणसाचा चेहरा..?’’
तो म्हणाला,
कसाही.
टँ हँ करून रडणाऱ्या अर्भकासारखा..
पाळण्यावर फिरणारे खेळणे पाहून हसणाऱ्या तान्ह्य़ासारखा..
पायरीवर बसून सवंगडय़ांचा खेळ पाहणाऱ्या मुलासारखा..
किंवा
शाळा सुटल्यावर एकटय़ानेच परतणाऱ्या
शाळकरी पोरासारखा..
सायंप्रहरी खडकावर बसून
एकटय़ानेच समुद्र पाहणाऱ्यासारखा..
स्मशानात चटचटत्या बापाच्या चितेकडे पाहून
गतकाळात हरवून गेलेल्या त्याच्या पोरासारखा..
धापा टाकत कामावरून पाळणाघरातील तान्ह्य़ाकडे
किंवा कामावर जाणाऱ्या
कुठल्याही माऊलीसारखा..
साध्या साध्या गोष्टीवरून खळखळून हसणाऱ्या माणसासारखा..
रस्त्यावरून जाताना सालीवरून घसरून पडतानाही
हसणाऱ्या माणसासारखा..
दु:खी माणसाचा चेहरा असतो
अगदी कुठल्याही
चेहऱ्यासारखाच.
राजकुमार कवठेकर