वाचकांची टिप्पणी
वाचकांनाही राजकीय मतं असतात, याची जाणीव असल्यामुळेच लोकप्रभाचं निवडणुकांच्या काळात वाचकांसाठी हे नवं व्यासपीठ सुरू केलं आहे. इथे आपले राजकीय विचार, मतं अवश्य मांडावीत, पण ते करताना सभ्यतेची पातळी ओलांडली जाणार नाही, याची वाचकांनी काळजी घ्यावी.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या आठव्या वर्धापन दिनी, ९ मार्च २०१४ रोजी आगामी लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका आणि रणनीती जाहीर केली. त्यांनी घेतलेली भूमिका आश्चर्यकारक तर नाहीच आणि अनपेक्षित तर त्याहून नाही. त्यांच्या रणनीतीमागील कूटनीती जाहीर केलेली नसली तरीही ती लपून राहणारी नाही. उमेदवारांची घोषणा, मोदींना पाठिंबा किंवा सचिन तेंडुलकर- लता मंगेशकर या दिग्गजांची ‘घडवून’ आणलेली भेट असो (सचिन देशभरात लोकप्रिय आणि लतादीदी आदरणीय आहेत, पण त्यांची लोकप्रियता आणि आदर एनकॅश केला तो राज ठाकरे यांनी. आणि या दोघांचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे असा संदेश जनमानसात पोहोचविण्यात राज यशस्वी ठरले); त्यामागच्या अचूक टायमिंगला आहे आणि ते थेट शरद पवार यांच्या टायमिंगशी साधम्र्य सांगणारे आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला असे समजणे चुकीचे आहे. उलट आता खऱ्या अर्थाने चर्चेला उधाण येणार आहे आणि शह-प्रतिशह, कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे.
या सर्व घडामोडींनंतर माध्यमांवर चर्चा झाली. या सर्व चर्चाचा नूर शिवसेनेची होणारी पंचाईत आणि महायुतीत निर्माण होणारा संभ्रम असा होता. परंतु या सर्व गोष्टींचा दोष मनसेला देता येणार नाही. तो सर्वस्वी शिवसेनेच्या ताठर आणि आक्रस्ताळ्या भूमिकेला आणि भाजपने स्वीकारलेल्या बोटचेप्या धोरणाला द्यावा लागेल. शिवसेनेने वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन जागावाटपाबाबत लवचिकता दाखवली असती, किमान दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावर पाणी सोडले असते तर मनसे महायुतीत सामील झालीदेखील असती.. पण सेनेचा मनसेला महायुतीत घेण्याचा हेतू शुद्ध नव्हता. तो वर वर काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टाळणे हा असला तरी अंतस्थ हेतू मनसेची घोडदौड थांबवणे हाही होता. परिणामी मनसेच्या प्रभावाखालील जागादेखील मनसेला सोडण्याचे सेनेच्या चाणक्यांनी नाकारले.. आणि सन्माननीय तडजोडीशिवाय मनसे महायुतीत सामील होणे शक्य नव्हते. भाजपने तसे प्रयत्न केले, पण सेनेच्या दरबारी राजकारण्यांनी ते हाणून पाडले. शेवटी भाजपने मनसेला महायुतीत आणण्याचे प्रयत्न सोडले आणि ते किमानपक्षी भाजपला अनुकूल होतील असे प्रयत्न चालू केले. गडकरींनी घेतलेली राज ठाकरेंची भेट ही याच प्रयत्नांचा एक भाग होती. त्यावर सेनेने ‘सामना’मधून ‘सत्यनारायणाला बोलावले, पण तीर्थ-प्रसाद न देता पाठवले’ अशा आशयाची टीका केली. पण गडकरींनी राज ठाकरेंना निदान सत्यनारायणाला तरी बोलावले. सेनेची भूमिका आणि मनसेकडून अपेक्षा मात्र ‘आम्ही सत्यनारायणाला बोलावणार नाही, पण आम्ही बोलावले आणि तीर्थप्रसाददेखील दिला असे लोकांना सांगा’ अशी होती आणि ती अवास्तव होती.
शिवसेनेला पहिल्यापासून आत्मपरीक्षण- आत्मचिंतन यांचे वावडे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळे, करिश्म्यामुळे ते चालून गेले, पण आता बाळासाहेब हयात नाहीत आणि पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. युतीची गरज भाजपलाच जास्त आहे, अशा तोऱ्यात शिवसेना कायम वावरत राहिली आणि त्यांचे कुरघोडीचे एककल्ली राजकारण मूळ युती झाल्यापासून चालू राहिले आणि त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. त्यातूनच भाजपला आपला पारंपरिक ठाणे मतदारसंघ सोडावा लागला. नव्याने झालेल्या कल्याण मतदारसंघावरदेखील सेनेने दावा सांगितला. मागील निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असणारी गुहागरची जागा शिवसेनेने आकांडतांडव करून मिळविली (आणि गमावली). भाजपशी चर्चा न करता सेना आपल्या भूमिका जाहीर करत असते. मग ते राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणे असो अथवा अलीकडील काळात प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणे असो; सेनेनेही युतीधर्म कधीही पाळला नाही. उलट भाजपने स्पष्टीकरण मागायचा प्रयत्न केला तेव्हा ‘तुमच्या म्यानात तलवार नाही.. उगाच मूठ पकडून तलवार पकडल्याचा आव आणू नका’, असे ‘सामना’मधून सुनावले. हे म्हणजे ऐन युद्धात सहकाऱ्याजवळ शस्त्रे नाहीत हे समजल्यावर सरळ शत्रूला जाऊन मिळण्यासारखे होते, पण राष्ट्रीय राजकारणाच्या अपरिहार्यतेमुळे भाजपची ससेहोलपट होत राहिली. भाजपच्या नेत्यांविषयीची ‘सामना’मधली भाषादेखील कायम टवाळखोर आणि शिवराळ राहिलेली आहे. युतीच्या किंवा महायुतीच्या इतिहासातदेखील सेनेने तडजोड केल्याचे फारसे दिसत नाही. रामदास आठवले यांना महायुतीत सेनेने आणले आणि त्यांना भाजपच्या कोटय़ातून राज्यसभेवर पाठवले. ही म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही गत झाली. एवढे करून विधान परिषदेसाठी आपली ताकद नसताना, भाजपला मदत करायचे सोडून एकतर्फी दुसरा उमेदवार जाहीर केला आणि त्यासाठी अतिरिक्त मतांची तजवीज करण्यासाठी भाजपाला विश्वासात न घेता राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली.
मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादीला थेट मदत केलेली नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते तटस्थ राहिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत सेना-भाजपकडे बहुमताच्या आसपास जाईल इतकेदेखील संख्याबळ नव्हते तरीदेखील मनसेने राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंना पाठिंबा देणे टाळले. सेनेने नाशिकमध्ये विश्वासघात केला तेव्हाच त्यांनी ठाण्यात राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. याउलट अनेक नगरपालिकांत, पंचायत समित्यांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची थेट आघाडी आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेवर सेंटिंगचा आरोप करणे दुटप्पीपणाचे आहे.
या सर्व पाश्र्वभूमीवर मनसे आणि भाजप या दोघांनी शिवसेनेला शह देण्याचे अथवा किमान ताळ्यावर आणण्याचे राजकारण करायचा प्रयत्न केलेला दिसतो. या गोष्टींचा सर्वात जास्त फटका भाजपला बसणार असल्याने त्यांनी घेतलेली भूमिका राज्यशास्त्रीयदृष्टय़ा सुसंगत वाटते.
९ मार्च २०१४ आधी राज ठाकरे आणि मनसे एकप्रकारे अडगळीत गेल्यासारखे होते आणि राज ठाकरेंची कोंडी झाल्याचे चित्र होते. गडकरींची विनंती मान्य करून लोकसभेला उमेदवार उभे न करावे तर ते पक्ष वाढीस आपणहून वेसण घातल्यासारखे झाले असते आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली असती आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतदेखील दिसला असता आणि एक प्रकारे शिवसेनेचे कुरघोडीचे राजकारण यशस्वी झाल्यासारखे झाले असते. उलटपक्षी उमेदवार उभे करावे तर ते शिवसेनेच्या ‘काँग्रेसशी सेटिंग’च्या आणि मतविभागणीच्या अपप्रचारावर शिक्कामोर्तब करण्यासारखे होते.
राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा देऊन एकाच वेळी सेटिंगच्या आरोपांना फुसके ठरवून आपली विश्वासार्हता वाढवली आणि मोजके उमेदवार उभे करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. आजमितीला शिवसेनेमध्ये नाराजांची संख्या मोठी आहे आणि त्यांचे बहुतांश उमेदवार लादलेले आहेत. आजदेखील शिवसेनेत राज यांना मानणारा मोठा गट आहे. या सर्वासाठी त्यांनी मनसेच्या उमेदवाराला मत देण्याचा पर्याय खुला केला. या निवडणुकीतदेखील मनसेला गमावण्यासारखे फारसे काही नाही. पण ते मतदारांसमोर कसे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण मनसेलादेखील अंतर्गत समस्यांनी ग्रासले आहे. मागील निवडणुकांतील यशामुळे पक्ष हुरळून गेला आणि त्यात रममाण झाल्यामुळे भरीव कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे पुण्यासारख्या ठिकाणी नेतृत्वाचा वाद- गटबाजी शिगेला पोहोचली आहे, तर कल्याण- डोंबिवली- ठाणे या ठिकाणी पक्ष नेतृत्वहीन आहे. नाशिकमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी बाकावरील आणि पुणे महापालिकेतील विरोधी बाकावरील कामगिरी निराशाजनक आहे. कल्याण-डोंबिवलीत पक्ष अस्तित्वहीन वाटतो. ठाण्यात तर तो आधीच तोळामासा आहे. राज्यभर संघटनात्मक पातळीवर सर्वकाही आलबेल नाही. टोल आंदोलनाला संमिश्र यश मिळालेले आहे. ब्लू प्रिंट अजून आलेली नाही. केवळ कामगिरीचा विचार करता मनसेची पाटी कोरी आहे. त्यामुळे मनसेची भिस्त पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या वैयक्तिक करिश्म्यावर असणार आहे. मागील संपूर्ण विधानसभा निवडणूक राज यांच्याभोवती फिरली होती. या वेळची चिन्हे फारशी वेगळी नाहीत.
पुढील दोन-तीन महिने मोठे रंजक ठरणार आहेत. यामध्ये मानवी व्यवहाराचे विविध पैलू, कुरघोडी, मनधरणी, आवेश, उत्साह, आक्रस्ताळेपणा शह- प्रतिशह- काटशह पाहायला मिळतील. पण या सर्व हलकल्लोळात सामान्य माणूस आणि त्याचे जिव्हाळ्याचे, जगण्याचे प्रश्न बाजूला पडतील की काय, अशी शंका निर्माण होते. सत्तेच्या सारिपाटात सर्वच पक्ष शड्डू ठोकून उभे राहिल्याने मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील बहुतेक लढती तिरंगी-चौरंगी होणार आहेत. निवडणुका अटीतटीच्या होतील आणि त्यामुळे सर्वात कमी जनाधार असेलला उमेदवार निवडून येईल. उदा. आठ लाख मतदान झालेल्या तिरंगी लढतीच्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला तीन लाख मते पडली आणि दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवाराला अडीच लाख मते पडली तर पाच लाख मतदारांनी नाकारलेला उमेदवार निवडून येईल आणि हे लोकशाहीसाठी पोषक नसेल. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे फक्त विविध पक्षांतील सत्तास्पर्धा नसून मतदारांच्या सुज्ञपणाची कसोटी पाहणारी ठरेल.
९ मार्च २०१४ रोजी संध्याकाळी टी.व्ही.वर एका खासगी वृत्त वाहिनीवर बातम्यांमध्ये ‘लता मंगेशकर- सचिन तेंडुलकर कृष्णकुंजवर’ असा स्क्रोल चालू होता आणि वर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या सचित्र बातम्या चालू होत्या. तेवढय़ात या चित्रांना चालू असणारा व्हॉइसओव्हर बंद झाला आणि कॅमेरा थेट कृष्णकुंजवर सचिन-लतादीदींच्याच्या लाइव्ह पत्रकार परिषदेवर जाऊन खिळला (दोन मराठी भारतरत्ने मराठीचा कैवार घेणाऱ्या नेत्याच्या घरात बसून हिंदीमधून बोलत होती, यात कोणालाही मराठी अस्मितेची आठवण झाली नाही, पण त्या वेळी राज यांचे तेथे नसणे हेदेखील सूचक होते.) एका फ्रेममध्ये गारांचा पाऊस आणि हवालदिल चेहरे होते, तर दुसऱ्या फ्रेममध्ये कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा पाऊस आणि प्रसन्न चेहरे होते. या दोन्ही फ्रेम्स वास्तव होत्या, पण त्यातील विरोधाभास भयानक होता. पण हीच बहुधा पुढील अनागोंदीची नांदी होती.
या अनागोंदीत विजय कोणाचाही झाला तरीही पराभव मात्र सामान्य माणसाचा होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा