निवडणुकीच्या काळात आपल्याला टीव्हीवरून दिसणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींच्या मागेही किती नाटय़ रंगलेलं असतं याचा लेखकाचा प्रत्यक्षानुभव-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक माणसाला त्याच्या दैनंदिन कामकाजात, नोकरी, व्यवसायात अनेक वेळेला स्वत:वर पश्चात्ताप करण्याची वेळ येत असते. त्यात मी करत असलेल्या कला क्षेत्रात तर कित्येकांना घडीघडीच येत असते. गेल्या बऱ्याच वर्षांत माझ्यावर नट म्हणून पश्चात्ताप करण्याची वेळ आली नव्हती. पण माझ्याच मूर्खपणामुळे बऱ्याच वर्षांनी माझ्यावर ती आली. पण हा पश्चात्ताप मला बरंच काही शिकवूनही गेला. आयुष्यात यशापेक्षा अपयश तुम्हाला जास्त शिकवत असतं. आयुष्यात आपण ‘नक्की काय करावं’ यापेक्षा ‘नक्की काय करू नये’ हे शिक्षण सर्वात जास्त जालीम असतं याचा मला पुन:प्रत्यय आला.

यावेळची २०१४ ची अभूतपूर्व राजकीय गोंधळाची, ब्रह्मदेवाचीही परीक्षा घेणारी आपल्या राज्याची विधानसभेची निवडणूक झाली आणि तिचे ‘निकाल’ही लागले. संभाव्य गोंधळामुळे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जवळ आला.

पण सरकार कुणाचंही आलं असलं तरी, निवडणूकपूर्व राडेबाजीच्या लाखो घटना निकालानंतर आवर्जून चघळल्या जातील. या निवडणुकीनंतर बरेच हिशेब मांडले जातील. कुठल्या पक्षानं नक्की काय कमावलं आणि काय गमावलं? या कमावण्या गमावण्यामध्ये जागा, पसे, प्रतिष्ठा, मतांची टक्केवारी, विश्वास, पत, नाती सगळ्या सगळ्याचाच हिशेब लागेल. आजवर कधीही न खर्च झाला एवढा पसा यावेळी ओतण्यात आला, असं म्हटलं जातं. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटले जातात असं सांगितलं जातं. तर त्या वाटल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष पशांपासून ते दारूची दुकानं, पेट्रोल पंप्स, हॉटेलं, छपाई यंत्रणा, कामगार, मजूर, मांडववाले, सजावटवाले, टेलर, फुलवाले ते अगदी ज्योतिषांपर्यंत सगळ्यांनी या निवडणुकीत आपापली कमाई करून घेतली. सामान्य माणूसही त्याचा त्याचा हिशेब मांडेल. ज्याला मत दिलं तो मतदार निवडून आला की नाही?; जो निवडून आलाय त्याच्याकडून कशी कामं करवून घेता येतील?; पासून ते नागरिक म्हणून आपलं स्वप्न कसं पूर्ण होणार आहे इथपर्यंत.

पण यावेळची निवडणूक गाजली ती वारेमाप जाहिरातबाजीने. प्रत्येक पक्षानं प्रत्यक्ष कामांपेक्षा पक्षाच्या प्रतिमेसाठी आणि पर्यायाने उमेदवारांच्या प्रतिमेसाठी प्रचंड म्हणजे प्रचंडच खर्च केला. आता बरबटलेली प्रतिमा उजळ दाखवायची म्हणजे तेवढा खर्च होणारच. आता प्रतिमा उजळायची म्हणजे, दिखावटी प्रतिमा; कारण वैचारिक प्रतिमा वगरे कशी पंधरा- वीस दिवसांत निर्माण करणार? आणि म्हणजे नक्की काय करणार? कारण जे आजवर कधी केलंच नाही ते एकदम अचानक महिन्याभरासाठी आदर्श वैचारिक व्यक्तिमत्त्वाचं सोंग वठवणं काही सोपं काम नाही. आणि ते भलतंच अंगाशी येण्याची शक्यता. कारण ‘‘अरे हा एक चांगला माणूसपण आहे’’ असं जर चुकून जनतेसमोर आलं तर राजकारणात कुठेच कुणी उभं करून घेणार नाहीत, अशी कदाचित भीती वाटत असल्याने, बाह्यंगावरच पटकन मेहनत घेऊन रूप पालटवणं सोपं. कारण विचार बदललेले लोकांना पटकन समजत नाही; पण कपडे बदललेले लगेच समजतं; ते चांगले झालेत, रंगीबेरंगी झालेत; नवीन फॅशनचे झालेत हे सगळं बघताक्षणी लोकांना कळतं. मग कपडे, भांग, (केसांचा), चपला, दागिने अशी अ‍ॅपिअरन्सवर मेहेनत घेतलेली बरी. मग चांगल्या लेखकांकडून छान छान लिहून घेऊन, राजकारणात अभिनयच करत असल्याने, प्रत्यक्ष अभिनेत्यासारखी जाहिरात केली तर काय बिघडणार आहे? किती बरं! आपण सतत नटांपेक्षा लोकांना जास्त दिसत राहणार.

यामुळे माझं कलाक्षेत्रही यावेळी इतर व्यवसायांबरोबरच या निवडणुकीत सर्वात जास्त तेजीत होतं. जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी अमाप जाहिराती बनवल्या. जाहिरातींत सामान्य लोकांना दिसतात ते फक्त नट. पण एका जाहिरातीमागे एखाद्या सिनेमाएवढेच लोक कष्ट घेत असतात. लेखक, दिग्दर्शक, संकलक, ध्वनी, कपडे, कॅमेरा, लाइट्स, शूटिंग लोकेशन्स, जेवण सगळं सगळं तसंच. यावर्षी असंख्य कलाकारांनी या निवडणूक कँपेनमध्ये भाग घेतला होता. तसा मीही एका जाहिरातीमध्ये आणि पर्यायाने लोकांच्या तिरस्कारात ‘झळकलो.’

जाहिरात होती राष्ट्रवादीची. ही जाहिरात टी.व्ही.वर दिसण्याच्या क्षणापासून लोकांनी मला प्रत्यक्ष फोन, एसेमेस, वॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर हैराण करायला सुरुवात केली. राष्ट्रवादी पक्षाच्या जाहिरातीत पाहिल्याचा राग म्हणून मला असंख्य मित्रांच्या, नातेवाइकांच्या, बँकेच्या मॅनेजरपासून रिक्षावाल्यांच्या प्रचंड शिव्या खाव्या लागल्या. अनेकांचा एकच प्रश्न होता; ‘‘तू राष्ट्रवादीत शिरलास?’’ नाटय़वर्तुळात, शूटिंग्सच्या सेट्सवर, सिनेमा हॉल्समध्ये प्रेक्षकांमध्ये बसलो असताना व्यायामशाळेत, ते अगदी आत्ता नाटकाच्या प्रयोगासाठी इंदौरला गेलो असतानाही तिथल्या मराठी संयोजक, प्रेक्षकांनी; इथली कुठलीही चहाची टपरी म्हणू नका, आमचा पानवाला म्हणू नका, ते अगदी रस्त्यावर चालताना आमचा भाजीवालाही मला राष्ट्रवादीच्या जाहिरातीत बघून टरकला होता. अनेक जण भडकले होते, संतापले होते. काही लोकांनी घृणा व्यक्त केली. जवळचे अनेक मित्र-मत्रिणी मला बघून फक्त हसले; त्या हसण्याला ‘‘काय हे?’’ अशी हिणकस धार होती. पोस्टमनही पत्र टाकताना, ‘‘कशाला केलीत ती जाहिरात?’’ म्हणून चिडून गेला. माझ्या घरी काम केलेल्या सुताराने, त्याच्या गावाकडच्या लोकांनीही त्या सुताराकडे ‘‘तुझ्या साहेबांनी राष्ट्रवादीची जाहिरात केली?’’ याचं आश्चर्य माझ्या बायकोकडे व्यक्त केलं. माझ्या घरात माझ्या सख्ख्या भावंडांनी मला जाब विचारला, खडसावलं, माझ्या सासरकडच्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला; इतकंच नाही तर माझ्या आईचा मला फोन आला आणि माझ्या आईनं मला विचारलं, ‘‘तुला पसे कमी पडतायत का मुंबईत?’’

मला हसावं की रडावं कळेना. लोकांच्या क्षोभाची परिसीमा झालेली पाहून मी अक्षरश: धास्तावलो. काही मोजक्या लोकांनी ‘‘पैसे घेतलेस ना मजबूत?’’ काहींनी ‘‘नट म्हणून जाहिरात राष्ट्रवादीची केलीस हे समजू शकतो, पण मत मात्र देऊ नकोस हां’’, असा धमकीचा सल्लाही दिला.

वस्तुस्थिती फारच वेगळी होती. खरं तर मी या जाहिरातीमध्ये फसवला गेलो, म्हणजे फसलो गेलो. पण किती जणांना किती तोंडांनी काय सांगणार? पण या सगळ्या काळात मला माझ्या कलाक्षेत्राचे, राजकारणाचे, माणसांचे, त्यांच्या धारणांचे, विभिन्न पद्धतीच्या विचारसरणींचे, खोलवर रुजलेल्या दांभिकतेचे अनेक पलू अनुभवायला मिळाले. या अनुभव कथनात मी केलेल्या जाहिरातीचे मी चुकूनही समर्थन करणार नाही; पण राजकारणात काहीही होऊ शकतं याचा सामान्य नागरिकाला, म्हणजे मला मिळालेला पहिला दणका असा की मी ती जाहिरात राष्ट्रवादीची म्हणून केलीच नव्हती. जाहिरात साधारण दोन महिन्यांपूर्वी म्हणजे गणपतीच्या आधी शूट झाली होती. ती केली तेव्हा ती आघाडीची जाहिरात होती. सरकारची होती. ती फक्त राष्ट्रवादीची चुकूनही नव्हती. जाहिरात झाल्यानंतर मधला बराच काळ गेला. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी जागावाटपाच्या राडय़ानंतर, अंतर्गत कुरबुरींनंतर आघाडी आणि युती फुटली. आता आघाडी फुटणं ही सामान्य नागरिकासाठी अगदीच अविश्वसनीय, अनाकलनीय आणि तितकीच धक्कादायक बाब होती. या फाटाफुटीची दोन महिन्यांपूर्वी कुणी कल्पना केली होती? आघाडी फुटल्यानंतर मी केलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादीच्या माणसांनी खर्च केलेला असल्याने ती जाहिरात राष्ट्रवादीची झाली. मला अनेकांनी धारेवर धरताना विचारलं की, ‘‘करताना माहीत नव्हतं का, काय जाहिरात आहे ती म्हणून?’’ पण माझ्यासारखा नट जाहिरातीआधी का जाणून घेणार नाही, जाहिरात काय आहे म्हणून?

एखाद्या राजकीय पक्षाबद्दल जनमानसात किती राग असावा? लोकांनी मला घातलेल्या शिव्या त्या पक्षासाठीच्या होत्या. सामान्य लोकांना मागच्या अनेक वर्षांत किती त्रास झालाय याचा आरसाच होता तो. कारण पराकोटीच्या रागाशिवाय कुणी इतकं कशाला व्यक्त होईल?

मी दिग्दर्शकाबरोबर बसून त्याला नक्की काय शूट करायचंय, कसं करायचंय, नक्की काय स्क्रिप्ट आहे हे जाणून घेतलं. तुम्हाला पटणार नाही, त्या मूळच्या सबंध जाहिरातीत माझं काम सरकारला शिव्या घालण्याचं, धारेवर धरण्याचं होतं. त्या चाळीस सेकंदांच्या जाहिरातीची साधारण गोष्ट अशी होती की; माझी बायको प्रेग्नंट आहे, मी ग्रामीण भागात राहणारा आहे. अँब्युलन्स वेळेवर येत नाही म्हणून मी आधी शिव्या घालतो, ‘‘काय दळभद्री ही अँब्युलन्स? ही काय वेळेवर येणार’’? मग कट टू अत्यंत खडबडीत रस्त्यांवरून जाणाऱ्या अँब्युलन्समध्य मी बसलोय, रस्त्यांना शिव्या घालतोय, ‘‘कसले हे भिकारडे रस्ते’’.. मग थेट सरकारी दवाखाना; ‘‘कशाला या घाणेरडय़ा सरकारी दवाखान्यात जायचं? त्यापेक्षा प्रायव्हेट क्लिनिकला जाऊ’’ ..माझी आई म्हणते, ‘‘अरे हे सरकारी दवाखाने लई बेश’’.. मुलगी झाल्यावर घरी येताना मी अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला माणुसकी म्हणून पेढा देतो, ‘‘हे घे तुला पेढा’’ आणि अत्यंत उपहासानं दुसरा देतो आणि म्हणतो, ‘‘आणि हा तुझ्या सरकारला.’’ ड्रायव्हर म्हणतो, ‘‘तुझ्या नाही आपल्या म्हणा’’.. आणि सरकार बाजूच्या ड्रायव्हरच्या प्रसन्न आशावादी चेहऱ्यावर ही जाहिरात संपते. माझा स्टान्स सरकार विरोधातला आणि ड्रायव्हर सरकारच्या बाजूचा. म्हणून मी ही जाहिरात करायला होकार दिला. या स्क्रिप्टबरहुकूम शूटिंग झालं. चार दिवसांनी फिल्मसिटीत दोन शॉट्सचं शूट होतं. ते दोन शॉट झाल्यावर मला दिग्दर्शक म्हणाला, ‘‘परवाच्या शूटिंगपकी एक शॉट सेफ्टी म्हणून नवीन घ्यायचाय.’’ म्हणून परत एकच शॉट नवीन घेतला. माझ्यासमोर ड्रायव्हर उभा आहे आणि मी त्याला म्हणतो, ‘‘हा घे पेढा, आपल्या सरकारसाठी.’’ मी दिग्दर्शकाला म्हटलं, ‘‘मी आधी एवढय़ा शिव्या घातल्यात सरकारला; आणि परत सरकारला का पेढा देतो आहे? हा शॉट लावू नकोस’’ दिग्दर्शक म्हणाला, ‘‘एजन्सीनं सुचवलाय, त्यांच्यासाठी करावा लागणार.’’

ही जाहिरातींची कामं मोठमोठय़ा अ‍ॅड एजन्सीकडे जातात. या जाहिराती कोणताही मंत्री स्वत: करत नाही, तर सगळ्या अ‍ॅड एजन्सीज् करतात. त्यामुळे तुम्हाला काम करताना फक्त एजन्सी माहीत असते, मागची माणसं नाहीत.

आघाडी फुटणार किंवा फोडायची.. हे दोन्ही पक्षांचं खूप आधीपासूनच ठरलं होतं का?

साधारण नट म्हणून काम करताना तुम्ही सिनेमात हिरो म्हणून काम केलंय आणि एडिटिंग झाल्यावर तुमची भूमिका व्हिलन म्हणून दिसते असा फरक नाही पडत. काही वेळा काही कारणाने बरंच एडिट होतं, बदल होतात; पण तुमची भूमिका नाही काळ्याची पांढरी होत. किंवा तसंच उलटंही. पण नट म्हणून मला राजकीय जाहिरातीत काम करण्याचा अव्वल धडा असा मिळाला की, तुम्ही शूट करून गेल्यावर मागे तुम्ही केलेल्या कामाचं काय होईल हे काहीही सांगता येत नाही. मी केलेल्या जाहिरातीत या लोकांनी, माझा आवाज कुठेच वापरला नाही, दुसऱ्याकडून माझं डबिंग करून घेतलं; ‘‘अजून अ‍ॅम्ब्युलन्स कशी आली नाही’’? लगेच अ‍ॅम्ब्युलन्स हजर. आणि ‘‘काय भिकारडे हे रस्ते’’ या ठिकाणी ‘‘रस्ते छान आहेत’’ असं वाक्य टाकून गुळगुळीत रस्त्याचा शॉट; दवाखान्यातले माझे संवादच काढून फक्त आईंचं .. ‘‘सरकारी दवाखाने किती बेश’’.. हे एक वाक्य; आणि शेवटी घरी पोहोचल्यावर मी ड्रायव्हरला म्हणतो, ‘‘हा घे पेढा आपल्या सरकारला.’’ ड्रायव्हर हे पात्रच गायब. म्हणजे शूट करताना मी समजा जाहिरात तेलाची केलीय आणि दिसताना ती शू पॉलिशची दिसावी इतका धक्का मला बसला.

मी दिग्दर्शकाला फोन केला की हे इतकं सगळं कसं बदललं? मला त्यानं सांगितलं की, ‘‘पैसे अडकले होते, आघाडी फुटली, त्यांना हवे तसे बदल करून देणं मला एजन्सीला भाग होतं’’. ही शुद्ध फसवणूक होती. म्हणजे एक तर जाहिरात आघाडीची, शकलं झाल्यावर ती राष्ट्रवादीची झाली; आणि जी दिसली ती मूळची नाहीच. भलतीच काहीतरी. माझ्यासारखा एक नट कुणाला नंतर विचारणार? आणि कुणाकुणाला काय सांगणार? लोकांच्या शिव्या खाणं भाग होतं.

पण खरे प्रश्न नंतरच उभे राहिले. या निमित्ताने बऱ्याच चर्चा झडू लागल्या आणि मला अनेक प्रश्न तर पडलेच, पण अनेकांचे अंतरंगही दिसले. खरं तर ती व्यावसायिक जाहिरात होती. मी काही कुठल्या पक्षाच्या मंचावर जाऊन त्यांच्या बाजूनं प्रचाराला उभा राहिलो नव्हतो. मी ती जाहिरात करून चूकच केली. पण मला खरंच प्रश्न पडतो की, जाहिरातीत काम करणं हे नटाचं कामच आहे. मग एखाद्या नटानं राजकीय जाहिरात केली तर बिघडलं कुठे? आणि ज्याची जाहिरात केली त्याच्या विचारधारेशी तुमचा संबंध आहे असा थेट आरोप कसा काय केला जातो? ऐश्वर्या राय लक्सची जाहिरात करते तेव्हा ती काही घरात स्वत: लक्सने आंघोळ करते का? मला एका वकील मित्राने हमरीतुमरीवर येऊन प्रश्न विचारला. मी त्याला म्हटलं, ‘‘तुझ्याकडे समजा अजित पवारांची केस आली तर व्यवसाय म्हणून तू ती चालवशील की नाही’’? तो पटकन उसळून म्हणाला, ‘‘तो व्यवसायच वेगळा आहे. त्याचा काय इथे संबंध?’’ म्हणजे प्रत्येक वेळी वैचारिक बांधीलकी फक्त नटांच्याच माथ्यावर. मी काही मी केलेल्या जाहिरातीचं समर्थन करत नाही; पण आपल्या माहितीचे असंख्य लोक निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या कार्यालयात, नेत्यांच्या, मंत्र्यांच्या वैयक्तिक ऑफिसेसमध्ये असंख्य पदांवर, असंख्य पद्धतीच्या असंख्य कामांसाठी कुणी पगारी, कुणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असतात. तेव्हा तो त्या माणासांचा चरितार्थ असतो. मग नटाचं काय असतं? या अशा जाहिराती कुणीतरी लिहितं, कुणीतरी दिग्दर्शित करतं, खूप जणांची क्रिएटिव्हिटी लागलेली असते. असंख्य नामवंत लोक यामागे काम करत असतात. पण चेहरा दिसतो नटाचा. जसा फायदा त्यांना मिळतो तशी बदनामीही फक्त त्यांच्याच वाटय़ाला येते. माझ्या माहितीची अनेक नामवंत मंडळी, अगदी नॅशनल अवॉर्ड मिळवलेलीही अनेक माणसं निरनिराळ्या पक्षांच्या जाहिरातींचं या वेळी काम करत होती. त्यांचा व्यवसाय आहे तो. चर्मकार चपला बनवताना विचारतो का कुठल्या पक्षाचा नेता ही चप्पल वापरणार आहे ते? तसंच आहे हे. पण लोकांना मान्य नसतं.

पण लोकांच्या क्षोभाचा खरा मार मला बसला. त्याची अंतस्थ महत्त्वाची बाजू ही जाणवत होती की, एखाद्या राजकीय पक्षाबद्दल जनमानसात किती राग भरलेला असावा? लोकांनी मला घातलेल्या शिव्या त्या पक्षासाठीच्या होत्या. या वेळच्या निवडणुकीचं निराळेपण मला सतत सगळीकडे जाणवत होतं. सामान्य लोकांना मागच्या अनेक वर्षांत किती त्रास झालाय याचा आरसाच होता तो. कारण पराकोटीच्या रागाशिवाय कुणी इतकं कशाला व्यक्त होईल? मला तर राष्ट्रवादीच्याच एका नेत्याच्या सेक्रेटरीचा फोन आला, ‘‘कशाला केलीस ही जाहिरात? एक तर ही तर राष्ट्रवादीची वाटतच नाहीय’’.

पण एका दुसऱ्या वादविवादात मी समोरच्याला कुतूहलानं विचारलं, ‘‘मी कुणाची जाहिरात केली असती तर तुला आवडलं असतं? कारण तुला राष्ट्रवादी आवडत नाहीय म्हणून मी नालायक. मी कोणत्या पक्षाची जाहिरात केल्यावर चांगला ठरेन’’? मला एव्हाना हे उमगलेलं होतं, की मी कोणत्याही पक्षाची जाहिरात केली असती तरी रोष आलाच असता आणि शिव्या घालणारी माणसं बदलली असती. आत्ता राष्ट्रवादीच्या बाजूचे लोक मला बोलणार नाहीत; पण भाजपाची केली असती तर आत्ता जे गप्प आहेत त्यांनी शिव्या घातल्या असत्या. राजकीय पक्षांचा त्यांच्या धोरणांपेक्षा जातीय विचार किती खोलवर रुजलेला आहे हे मला खूप प्रकर्षांनं जाणवलं. एकजात सर्व राजकीय पक्ष सेक्युलॅरिझमचा डांगोरा पिटतात; पण सगळ्यांनीच खोलवर जातीव्यवस्था कशी तुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलीय. मी बीजेपीचा पुरस्कार केला असता तर थेट ब्राह्मणवादी ठरलो असतो. भले मोदी स्वत: ब्राह्मण नसोत. त्यात परत माझं आडनावच जोशी. मग ‘‘आपल्या जातीवर गेला’’ हे हिणवायला काही कमी करत नाहीत लोक. शिवसेनेशी संबंध म्हणजे, िहदुत्ववादी असल्याचा थेट आरोप असतो. पण म्हणून काँग्रेसचा पुरस्कार केला तर कुणीही त्या व्यक्तीला सेक्युलर म्हणत नाहीत; काँग्रेसशी संबंध म्हणजे पार वपर्यंत काहीतरी ‘लग्गा’ एवढाच निष्कर्ष असतो. बाकीच्या पक्षांबद्दल बोलायलाच नको. सामान्यांच्या नजरेत कोणत्याही पक्षाशी संबंध येणं याची प्राथमिक रिअ‍ॅक्शन किती भोळसट असते याचीच ही उदाहरणं.

गेल्या चाळीस वर्षांत राजकारण हे नालायक लोकांचं, भ्रष्टाचाऱ्यांचं, गुन्हेगारांचं, लबाडांचं कार्यक्षेत्र मानलं गेलं. म्हणूनच सामान्य, पांढरपेशा, सुसंस्कृत माणूस राजकारणाच्या वाटेला गेला नाही. गेल्या काही वर्षांपासून या धारणेत बदल व्हावा म्हणून प्रयत्न होतायत. चांगल्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्याशिवाय राजकारणाची प्रतिमा खरंच बदलणार नाही. मागच्या वीस वर्षांपर्यंत अनेक नाटककार, साहित्यिक, विचारवंत, उद्योजक, समाजकारणी आपापली राजकीय भूमिका आपल्या कामांतून स्पष्ट मांडत होते. आजचं काय चित्र आहे? आपली राजकीय भूमिका स्पष्ट झाली तर आपली बदनामी होईल; आणि शक्यतो हा मुद्दा जाहीर करायचाच नाही असा काहीतरी कट्टरपणा आज सर्वत्र दिसतो. राजकारणाच्या नादालाच लागायचं नाही म्हणून अनेकजण ठरवून मतदानालाही जात नाहीत; पण म्हणून काही तुमची राजकारणापासून सुटका होत नाही. दररोजचं दैनंदिन जगणं, तुमचे विचार, तुमची अभिव्यक्ती, खिशातला पसा सगळं सगळं राजकारणाशीच तर संबंधित राहतं. मग समजून उमजून राजकारणात ऊठबस ठेवली तर काय बिघडेल?

इंग्लंडपासून स्कॉटलंड वेगळं होण्याची चळवळ अनेक वर्षांपासून चालू होती. मागच्या महिन्यात मी स्कॉटलंडहून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिकडे मतदान व्हायचं होतं. त्यांच्या प्रचारकाळात मी तिकडे होतो. तिकडचे सर्व थरातले, स्तरातले लोक, कला, क्रीडा, साहित्य, अर्थ, उद्योग क्षेत्रातले मान्यवर थेट आपली भूमिका मांडत होते. बाजूनंही आणि विरोधातही. जगातल्या प्रबळ लोकशाहीत आपण सोडून सर्व ठिकाणी सगळे मान्यवर पांढरपेशी आपापली राजकीय भूमिका मांडताना दिसतात. आपल्यालाच राजकीय विटाळ फार. मग कशाला राजकाराणाची प्रतिमा उजळण्याच्या बाता मारायच्या?

एक जाहिरात मला बरंच काही शिकवून गेली. मला जाणवलं ते हे की, मला पडलेल्या शिव्या म्हणजे पक्षाची प्रतिमा आणि माझी समाजातली नट म्हणून प्रतिमा यांचं द्वंद्व होतं ते. लोकांना सहन नाही झालं. ‘‘तू या चिखलात नको रे बाबा’’.. असा काळजीचा स्वर सर्वत्र. शेवटी आजचं राजकारण चिखलच झालंय हेच खरं.

चिखलाचा कमळाशी संबंध असं काही सुचवायचं नाहीय मला. पण राजकारणाची प्रतिमा बदलायला हवी हे मात्र खरंच..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political party election campaign advertisement