अफझलखानाच्या वधानंतर राजांनी त्या सगळ्या मोहिमेत जीवाला जीव देणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना इनामे वाटली. पण राजांकडून वतन घेऊन खानाला जाऊन मिळणाऱ्या खंडोजी खोपडेची मात्र गय केली नाही.
अफजलखानाच्या वधामुळे राजांना फार मोठे यश प्राप्त झाले असले तरी एकूणच या भेटीच्या वेळी राजे कित्येक महिने प्रचंड मानसिक दडपणाखाली असणार शिवाय प्रत्यक्ष भेटीप्रसंगी राजे जखमी झाले होते. पण तरीसुद्धा स्वत:चा विचार न करता इतरांची चौकशी करत होते.
आधुनिक काळात व्यवस्थापन शास्त्रानुसार कार्याचे योग्य मूल्यांकन करून त्यानुसार काही बक्षिसे देण्यावर भर दिला जातो. प्राचीन काळी अशी सूत्रं कौटिल्याने मांडली आहेत ज्यांचा उपयोग शिवाजी राजे करताना दिसतात. अर्थशास्त्र हे राजाला शासनात मार्गदर्शन करण्यासाठी रचले आहे. त्यामुळे अगदी छोटय़ा छोटय़ा सूचनासुद्धा आर्य चाणक्य देताना दिसतात. अर्थशास्त्रात ५.३.२८-३१ येथे आपल्या सेवक वर्गाबरोबर राजाचे आचरण कसे असावे ते सांगताना म्हटले आहे, ‘नोकरीवर काम करीत असता मरण पावलेल्यांच्या बायकामुलांना शिधा व पगार चालू ठेवावा. त्यांच्या कुटुंबातील लहान मुले, वृद्ध व आजारी माणसे यांच्यावर मेहेरनजर ठेवावी. त्यांच्या कुटुंबात कोणी मरण पावल्यास, आजारी पडल्यास, बाळंतपण झाल्यास अथवा काही धार्मिक कृत्य करावयाचे असल्यास द्रव्यसाहाय्य देऊन आस्थापूर्वक विचारपूस करावी. त्यापुढे जाऊन कौटिल्य म्हणतो तिजोरीत द्रव्य कमी असल्यास जंगलातील उत्पन्न, पशू, शेती यातील द्रव्य घेऊन ते द्यावे’. थोडक्यात आपला सेवकवर्ग समाधानी असला पाहिजे. सैनिकांच्या बाबतीत कौटिल्य ‘तुष्टभृतपुत्रदार:’ असे विशेषण वापरतो. सैनिकांची बायकामुले संतुष्ट असणे हा त्याचा अर्थ आहे. आणि सैन्याच्या अनेक उत्कृष्ट गुणांपैकी कौटिल्याने तो एक गुण मानला आहे.
अफझलखान वधानंतर शिवरायांचे आचरण अगदी असेच आहे. बखरकारांच्या मते अफझलखानाच्या वधानंतर चवथ्या दिवशी जासूद व हरकाऱ्यांकडून ही बातमी आदिलशाहाला कळली. सारी आदिलशाही शोकसागरात बुडाली. पण त्याच वेळी राजे मात्र आपल्या लोकांची वास्तपुस्त करत होते. सभासदकार वर्णन करतात, ‘राजे रायगडाखाली उतरोन कुल आपले लोक भांडत होते तितकियांसी पोटाशी धरून, दिलास समाधान करून भांडता लोक मेले त्यांची वतने वसवून, पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वतन करून चालवावे ऐसे केले. जखमी जाहले त्यांस पाहून शंभर पन्नास, चाळीस पंचवीस होन दिधले. तैसीच लोकांनी मेहनत केली त्यास हत्ती, घोडे व हातकडे व जडावमंडीत कंठमाला, तुरे, मोतीयाचे पदके व अंगठय़ा व मोहनमाळा व मोत्याच्या कंठय़ा व कडदोरे जडावाचे असे अलंकार वस्त्रे जरी नाना प्रकारची अपार देशोंदेशीची वस्त्रे अप्पर देणे दिधले. प्रत्येक लोकांस हजार होन दिले. बक्षिसे दिली. लोक नावाजले. दिलासे दिले. पोटाशी धरून हे राज्य तुमचे आहे. मेहनतीस अंतर न करिता आणखी ऐसेच सुभे बूडवावे लागतील. प्रारंभ जाहला. येणेप्रमाणे समाधान करून लोकांच्या मनोदयानुरूप समाधान केले. मोठे युद्ध जाहले’’. (सभासद बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १७९).
या साऱ्या लढाईत गोपीनाथपंतांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची होती. केवळ त्याच्या दूतकर्मामुळेच अफझलखान वाईहून जावळीत शिरला होता. राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला. त्यांचे राहाते गाव मौजे हिवरे त्यांना वंशपरंपरागत इनाम दिले. शिवाय एक लाख होन इनाम दिले. शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी येथे प्रत्येक गावी एक चावर जमीन दिली. शिरवळला घरवाडा व मांडकी येथे सेटेपणाचे वतन इनाम दिले. संभाजी कावजी व वाघोजी तुपे ही कान्होजी जेध्यांची माणसे. त्यांचा पराक्रम राजांच्या मनात भरला व राजांनी जेध्यांकडून मागून हशमांच्या हजाऱ्या या दोघांना दिल्या. कान्होजींना राजसभेतील तलवारीचा पहिला मान दिला. अफझलखान भेटीनंतर राजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडावर धावून जाणारा जिवामहाला याला खास इनाम दिले. थोडक्यात या कठीण प्रसंगी जीवावर उदार होऊन साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी राजांनी घेतली होती. स्वाभाविकपणे या साऱ्यांची बायकामुले राजांवर प्रसन्न असणार आणि त्यामुळेच प्रत्येक प्रसंगी जीवावर उदार होऊन लोक राजांच्या पाठी उभे राहात होते.
एकीकडे आपल्या बरोबर येणाऱ्या आपल्या सैनिकांची योग्य ती व्यवस्था करत असतानाच राजे पुढचा विचार करत होते. राजाच्या उद्यमशीलतेला कौटिल्य अतिशय महत्त्व देतो. या गुणाविषयी सांगताना कौटिल्य म्हणतो, राजानमुत्थितमनूतिष्ठन्ते भृत्या: प्रमाद्यमनुप्रमाद्यन्ति। कर्माणि चास्य भक्षयन्ति। द्विषद्भिश्चतिसंधीयते। तस्मादुत्थानमात्मन: कुर्वीत। (१.१९.१-५) म्हणजे राजा उद्यमशील असला म्हणजे त्याच्यामागोमाग सेवकही उद्यमशील होतात. तो निष्काळजी असला म्हणजे तेही निष्काळजी होतात. ते त्याची कार्ये स्वत:च्याच उपयोगात आणतात. शिवाय शत्रूकडून राजावर मात केली जाते. म्हणून राजाने सतत उद्यमशील असावे.
याच अधिकरणात पुढे कौटिल्य सांगतो,
अनुत्थाने ध्रुवो नाश: प्राप्तस्यानागतस्य च।
प्राप्यते फलमुत्थानाल्लभते चार्थसंपदम्।। (१.१९.६)
उद्यमशीलतेच्या अभावी जे मिळालेले आहे व जे पुढे मिळणार असेल त्या दोहोंचा नाश निश्चित होतो. उद्यमशीलतेमुळे फलप्राप्ती होते आणि अर्थसंपन्नतेचा लाभ होतो.
हे सारे वर्णन राजांना सर्वार्थाने व सर्व प्रसंगी लागू होते. पण त्यातसुद्धा अफझलखान वधानंतर राजांनी दाखवलेली उद्यमशीलता केवळ अवर्णनीय आहे.
परव्यसनमप्रतिकरय चेत् पश्येत्।
हीनो२प्यभियायात्।। (७.३.१७) राजनीतीतील हे महत्त्वाचे सूत्र शत्रूवरील संकटाचे निवारण होण्यासारखे नाही, असे दिसल्यास हीनबल राजानेसुद्धा चाल करून जावे.
आधीच खिळखिळ्या झालेल्या आदिलशाहीला अफझलखान वधाचा आघात पचवणे सोपे नाही याची जाणीव राजांना होती. त्यामुळे त्यांनी या परिस्थितीचा योग्य तो उपयोग करून घेतला. उद्यमशीलता आणि परव्यसन या दोन्ही गुणांचा सुरेख संगम राजांच्या आचरणात होता.
दहा नोव्हेंबरला खानाचा वध केल्यानंतर अजिबात वेळ न दवडता राजांनी सातारा, खटाव, प्रायणी, रामापूर, कलेढोण, वाळवे, हलजयंतिका, अष्टे, वडगांव, वेलापूर, औदुंबर, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे, कोल्हापूर या स्थळांवर हल्ला करून पुष्कळ खंडणी घेतली व अभय देऊन ती स्थाने आपल्या सत्तेखाली आणली (अणुपुराण, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. १९९).
त्यानंतर २८ नोव्हेंबर १६५८ राजांनी पन्हाळा घेतला. अणुपुराणानुसार राजांनी ती सबंध रात्र दिवसाप्रमाणे घालवून तट, वाडे, विहिरी, सुंदर बागा, अपार तलाव यांच्यायोगे वृद्धिंगत अशी ती गडाची अप्रतिम शोभा पाहिली (उपरोक्त, पृ. २००)
या साऱ्या लढाईत किंवा इतरत्रसुद्धा राजांकडील अमर्ष गुण प्रकर्षांने दिसतो. प्रत्यक्ष कौटिल्यसुद्धा ‘कामज’ आणि ‘क्रोधज’ असे दोन दोष सांगतात. अमर्ष म्हणजे क्रोध. सामान्य परिस्थितीत क्रोध हा दुर्गुण म्हणून गणला गेला आहे. पण राजाच्या संदर्भात आणि काही विशिष्ट प्रसंगी मात्र हा अमर्ष केवळ क्रोध असा न येता ‘अपमान, अन्याय सहन न करणे,’ अशा अर्थाने येतो. अफझलखान प्रसंगात खंडोजी खोपडे या व्यक्तीने राजांना फार क्रोधित केले होते. उत्रावळीची देशमुखी असलेल्या खंडोजीचा केदारजी हा भाऊ. या देशमुखीवरून दोन्ही भावंडांत वाद झाले. या वादात राजांनी खंडोजीला देशमुखी मिळवून दिली होती. असे असूनसुद्धा अफझलखान चालून आल्यावर दोन्ही भाऊ त्याला जाऊन मिळाले. केदारजी अफझलखानाला मिळाल्याचा फारसा राग राजांना आला नाही. पण ज्या खंडोजीची बाजू घेतली त्याने केलेला दगा बघून राजे खंडोजीवर मात्र संतप्त झाले. पुढे अफझलखान वधानंतर तो कुठेतरी लपून बसला. काही काळानंतर खंडोजीने राजांच्या विश्वासातील हैबतराव शिळीमकरांना राजांकडे बोलणी करण्याची गळ घातली. हैबतरावांनी कान्होजी जेधे यांना साकडे घातले. कान्होजींनी विषय काढताच राजे संतापले, म्हणाले, ‘तो हरामखोर त्यास वतनास ठिकाणा नव्हता. त्याची वतनावर स्थापना केली. निम्मे वतन, सिका दिला. केदारजी खोपडे त्यामुळे आदिलशाहीत गेले. असे असूनही त्याने बेईमानी करून, अफझलखानाकडे जाऊन लबाडी केली आणि हत्यार धरले. तो हरामखोर, त्याची चार धडे चौ मार्गी टाकावी. त्याची रदबदली तुम्ही न करणे. त्यास कौल देत नाही.’’
इतके स्पष्टपणे सांगूनसुद्धा कान्होजींनी पुन:पुन्हा गळ घातली. आणि एक दिवस खंडोजीचा जीव वाचवण्याची निकराची विनंती केली. आता कान्होजी जेधे म्हणजे राजांच्या संकटप्रसंगी वतनावर पाणी सोडलेला माणूस. त्यांना दुखावणे राजांना अशक्य होते. कान्होजींची गळ मोडणे राजांना कठीण वाटले. त्यांनी अभय दिले. खंडोजी मुजऱ्याला आला पण संतप्त राजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हळूहळू खंडोजीची भीड चेपली. आणि एक दिवस राजांनी अचानक खंडोजीचा उजवा हात व डावा पाय कलम करून गडाखाली सोडून दिला. हे कळल्यावर कान्होजी संतापले. त्यांनी राजांना झाल्या प्रकाराचा जाब विचारला. तेव्हा राजांनी समजावले. तुमची भीड पडली म्हणून खंडोजीला ठार मारला नाही. ज्या हाताने तलवार धरली तो हात व ज्या पायाने चालून आला तो पाय कापला. तुमच्यासाठी त्याचे वतनही चालवू.
एकीकडे खंडोजीचे हातपाय तोडणाऱ्या राजांनी केदारजीला मात्र पत्र पाठवले, ‘शक अंदेशा न धरता वतनास यावे व देशमुखीचा इनाम व हक्क खाऊन खुशहालीने राहावे’.
राज्याशी आणि राजाशीही केलेली फितुरी राजांना सहन झाली नाही. त्यामुळे एकच गुन्हा असूनसुद्धा खंडोजी व केदारजीसाठी राजांनी त्यांच्या त्यांच्या गुन्ह्य़ांनुसार वेगळा न्याय केला.
असेच आणखी एक उदाहरण देता येईल. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता. राजे गडावर अडकले होते. या वेळी रेव्हिंगटन, गिफर्ड यांनी त्याला लांब पल्ल्याच्या तोफा व दारूगोळा पुरवला. राजांनी हा विषय मनात ठेवला आणि पुढे त्याच वर्षी राजापूरवर हल्ला करून इंग्रजांची वखार लुटली. तोफा पुरवणाऱ्या रेव्हिंगटन, गिफर्ड आणि टेलर यांना कैदेत टाकले.
समश्चेन्न संधिमिच्छेद्दावन्मात्रमपकुर्यात्तावन्मात्रमस्य प्रत्यपकुर्यात्। (७.३.७) तुल्यबल राजा संधीस तयार नसेल तर तो जितका अपकार करेल तितकाच उलट अपकार करावा. राजनीतीमध्ये चांगलेपणाचा अतिरेक होऊ द्यायचा नसतो, अपकाराला अपकारानेच उत्तर द्यायचे हे महत्त्वाचे सूत्र कौटिल्याने मांडले आणि राजांनी ते प्रत्यक्ष आचरणात आणले हे वरील उदाहरणांवरून सहज लक्षात येते.
-आसावरी बापट