एरवीची जातीव्यवस्था अजिबात लवचिक नाही, पण राजकारणी जात मात्र कमालीची लवचिक असते. ती कधीही दुसऱ्या कोणत्याही जातीत जाऊ शकते. रबराच्या चेंडूप्रमाणे कितीही टप्पे खाऊ शकते.
आपल्या देशात जातिप्रथा ही फार जुन्या काळापासून प्रचलित आहे. भारताच्या घटनेत तिला एक विचित्र स्थान मिळाले आहे. काही जातींच्या नावांचा उल्लेख करणे अपमानास्पद आणि अपराधिक आहे; परंतु लेखी प्रमाणपत्रात त्या जातीचं नाव विशेषाधिकार देतं. याशिवाय आपल्या देशात एक आणखी जाती व्यवस्था आहे. तिला राजनैतिक, राजकीय किंवा राजकारणी पक्ष असं म्हणता येईल. या जातींची वैशिष्टय़े चमत्कारिक आहेत. सामाजिक जात जन्मापासून ठरते. ती मृत्यूपर्यंत बदलत नाही. आंतरजातीय लग्न केलं तरी मुलीच्या पूर्वाश्रमीची जात कोणी विसरत नाही. परंतु राजनैतिक जात रबराच्या चेंडूसारखी असते. ती कितीही टप्पे खाऊ शकते. राजनैतिक जात जन्मावर आधारित नसून हित, स्वार्थ, सत्तासुख, धनसुख आणि प्रसिद्धी या तत्त्वांचा आधार घेते. ही तत्त्वे लवचीक, परिवर्तनशील आणि सोयीस्कर असतात. एखादी बुद्धिमान (म्हणजे चतुर) व्यक्ती काळाच्या गरजेप्रमाणे आपली जात सोडून कधीही दुसऱ्या जातीत प्रवेश करू शकतो. याला कुत्सित बुद्धीचे आलोचक पक्षांतर किंवा दलबदल म्हणतात. खरं म्हणजे हा आंतरजातीय विवाह आहे. रोटी-बेटीचे व्यवहार फार जपून, नीट विचार करून करतात. आपले हित पुढील परिस्थितीत लाभ, तोटा या सर्वाचा विचार करून जात बदलतात. राजकीय आंतरजातीय विवाहांना मोठे प्रचारसुख लाभते. ज्या जातीत (ज्याला पक्ष, पार्टी असे नाव पण देतात) प्रवेश (म्हणजे विवाह) करायचा असतो त्या जातीचे ज्येष्ठ नेते जात बदलणाऱ्या व्यक्तीचे तीन ‘प’ने स्वागत करतात- पैसा, पद आणि प्रतिष्ठा.
सामाजिक जातीत विवाहाचे मुहूर्त बघावे लागतात. पूर्ण बारा महिने विवाहास उपयुक्त नसतात. परंतु राजनैतिक आंतरजातीय विवाह कधीही करण्याची सूट असते. तरी काही दिवस अशा विवाहास शुभ, फल देणारे आणि प्रसिद्धी देणारे असतात. निवडणूक जवळ आली की आंतरजातीय विवाहांना चांगले दिवस येतात. कुत्सितपणे काही आलोचक अशा विवाहांना घोडाबाजार, पाठीत सुरा भोकणे, तीन ‘प’चं लोभ, अवसरवाद अशी नावे ठेवतात. निवडणूक आणि मंत्रिमंडळनिर्मितीच्या पूर्वीचा काळ (मुहूर्त) या विवाहास अत्यंत अनुकूल असतो. जातीचे काही ज्येष्ठ नेते आपल्या पूर्ण जातीला दुसऱ्या जातीत विवाह करण्याचे औचित्य पटवून देतात. पूर्ण जात (पक्ष) बदलली तर त्याला सामूहिक विवाह म्हणून प्रसिद्धी मिळते.
सामाजिक आणि राजनैतिक जातींमध्ये आणखीही काही फरक आहेत. घटनेनं अस्पृश्यता या विचाराला अपराध मानलं आहे. परंतु राजनैतिक जातीप्रथांमध्ये अस्पृश्यता कठोरपणे पाळली जाते. ज्या जातीच्या हातात सत्ता असते ती काही जातींना अस्पृश्य घोषित करते. सामाजिक जाती प्रथेत ज्या जातींना कधी उच्च स्थान असायचं त्यांनाही अस्पृश्य घोषित करतात. अशा जातीच्या लोकांना भेटणं, मंचावर बरोबर बसणं किंवा चहापान-भोजन घेणे वज्र्य आहे. काही वर्षांपूर्वी विधान सभेच्या निवडणुका झाल्या. एका जातीला बहुमत मिळालं आणि तिच्या नेत्यांनी सरकार बनवले. इतर जातीच्या नेत्यांना हे सहन झालं नाही. विजेत्यांचे अभिनंदन करण्याचे शिष्टाचार पाळले नाहीत. ‘आमचा पराभव झाला’ हे न बोलता ‘जनतेचा निकाल स्वीकार करतो’ (नाही तरी काय केलं असतं?) असे म्हणून स्वत:चा उदारपणा दाखवला. विजातीय सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण समारंभात उपस्थित राहू नये, असा पक्षश्रेष्ठींकडून चाबूक (याला व्हिप म्हणतात) फिरवला जातो. शपथग्रहण समारंभात मिळणारा चहा-मिठाईही अस्पृश्य असते. काही दिवसांपूर्वी एका जातीच्या सत्ताधारी नेत्यानं एका दलित नेत्याची भेट घेतली असं कळलं. सजातीय लोकांनी आपला तीव्र निषेध आणि निंदा व्यक्त केली. दलित नेत्याला का भेटला, असा प्रश्न वर्तमानपत्र आणि मीडियामध्ये प्रकर्षांनं दिसला. शेवटी महान नेत्याला कळून कबूल करावं लागलं की अपरिहार्य परिस्थितीत दलित नेत्याची भेट घ्यावी लागली. अशा भेटीनंतर शुद्धीकरण गरजेचं असतं.
सामाजिक जातीमध्ये आंतरजातीय विवाहास हळूहळू मान्यता मिळू लागली आहे. दोन्ही जातींच्या रूढी आणि विश्वास मान्य करण्यात येतात. अग्निला साक्षी ठेवून, मंत्रोच्चारानंतर एकदुसऱ्याशी निष्ठावान राहण्याची शपथ घेतली जाते. परंतु राजनैतिक (नाही, नाही, नैतिक नाही- राजकारणी, राजकीय) विवाह पद्धती फार सोपी असते. इथे गुरुजी, मौलवी किंवा जज यांची गरज नाही. राजनितिक विवाह म्हणजे आजकालचे लिव-इन-रिलेशनशिप. जोपर्यंत पटलं (म्हणजे स्वार्थ सिद्ध झाला) तोपर्यंत बरोबर राहू. नाही पटलं (म्हणजे तीन ‘प’ मिळाले नाही) तर कधीही सूचना, नोटीस न देता वेगळे होऊ. ईश्वराची साक्ष, पक्षश्रेष्ठींचा विश्वास, जनतेसमोर केलेली घोषणा, जन्माजन्मांतरीची साथ असे शब्द या विवाहात अर्थहीन असतात. या विवाहात लाजा होम नसतो. लज्जेला होमकुंडात जाळतात. हुंडा देण्या-घेण्याची पद्धत सर्वमान्य आहे. तलाक, घटस्फोट, सेपरेशन किंवा निंदा न करता कोणी कितीही वेळा दुसरी जात सोडतो, नवी जात धरतो. सर्व राजकीय लक्षांना लिव-इन-रिलेशनशिप मान्य आहे.
सामाजिक जाती शेकडो वर्षे जुन्या आहेत. परंतु राजनैतिक जाती पन्नास-साठ वर्षे वयाच्या आहेत. या तीन वर्णातून उपजल्या आहेत. एक वर्ण स्वत:ला सेक्युलर म्हणतो, दुसरा पश्चिमेतून मार्क्सकडून आयातीत, तर तिसरा राष्ट्रीय सेवा करणारा. या वर्णातून अनेक जातींचा जन्म झाला. त्यांची प्रजननशीलता बघून आश्चर्य वाटतं. काही जाती-उपजाती पुरुषसत्ताक आहेत, म्हणजे त्या जातीला बाप आहे. काही जाती-उपजाती मातृसत्ताक आहेत म्हणजे त्यांना अविवाहित आई आहे. आता निवडणूक जवळ आली. अगदी लहान उपजातीची किंमत पण आकाशाला भिडते. पक्षश्रेष्ठी व्यवहार (व्यापार) कुशल आहेत. लोकशाहीला शोभेल असे वातावरण आहे. म्हणून सर्व जाती-उपजातींना शुभेच्छा.