सध्या निवडणुकीचा माहोल आहे. हे मीडिया व चॅनल यावर ‘नमो’ व ‘रागा’ या दोन्ही पक्षाच्या नवयुवक व नवयुवती यांना घेऊन दिवसभर खूप मसालेदार खमंग चर्चा चालते. संसदेसारखी मारामारी व स्प्रे उडविणे होत नाही. हे आपले नशीब. काही चॅनेलवर ही चर्चा ऐकली, बघितली की खालील निष्कर्ष निघतात.
आपले नवयुवक-युवती हुशार, विचारवंत आहेत. त्यांची भारत हा देश महान व्हावा ही प्रबळ इच्छा आहे. चॅनेलवर जी ‘नमो’ व ‘रागा’ यांची चर्चा होते. ती चांगली असते. अँकर पोटतिडकीने प्रश्न विचारतात त्याचे उत्तर युवक देतात परंतु उत्तरांना जी खोली पाहिजे ती दिसत नाही. आताच्या काळात सर्वच युवकांना डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ वगैरे होण्याची इच्छा असते. त्यामुळे नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल वगैरे विषयांचा अभ्यास होत नाही. त्यामुळे लोकशाही ही काय बला आहे याचे ज्ञान कमी असते. विकास म्हणजे नोकरी असा विचार दिसतो.
चॅनेलवरील चर्चा ऐकताना असे दिसते की आपल्या भागाचा विकास व्हावयास पाहिजे पण विकास म्हणजे रस्ते नाही हेच दिसते. खासदार, आमदार, नगरसेवक, नगरपालिका, पंचायत समिती हे करू शकतात, करावयास पाहिजे. हा विकास कसा, कुठे बघायचा, विचारायचा ही माहिती नसते. या सर्व लोकांचे मानधन, पगार किती, सुविधा काय मिळतात याची माहिती नसते. हे फक्त एकमताने मंजूर करून घेतात हे माहीत असते. घोटाळय़ावरील प्रश्नावर काहीच माहिती नसते. पुढे काय होते हे माहीत नसते वगैरे वगैरे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे चालू असतात. सध्या शिक्षणक्षेत्रात कोचिंग क्लासेसचे पेव फुटले आहे त्याप्रमाणे विद्वान पत्रकार, लेखक, वकील, डॉक्टर, शिक्षक यांनी लेख लिहून किंवा नॉमिनल फी घेऊन क्लासेस सुरू करावेत. नवयुवक भरपूर मिळतील, दमदार युवक-युवती निवडून येतील.. टीव्हीवर पाहण्यापेक्षा वाचनांत मजकूर आला तर तो जास्त वेळ मेंदूत टिकून राहतो.

Story img Loader