गरमीगरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितली किंवा त्यांचा वास आला की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. दिवस पावसाळ्याचे असतील तर अशी भजी दिसली नाहीत, किंवा आसपास त्यांचा खमंग वास आला नाही तरी चहाबरोबर भजी हवीतच असं वाटत असतं. या भज्यांबाबत एक भन्नाट निरीक्षण आहे. घरी तुम्ही कितीही जीव ओतून, हात सल सोडून भजी करा, बाहेरच्या भज्यांची चव काही घरच्या भज्यांना येत नाही. बरं बाहेरची भजी म्हणजे तुम्ही एखाद्या टापटीप हॉटेलात जाऊन भजी खाल्लीत तर नुसती भजी खाल, पण ‘ती’ चव काही तिथे मिळणार नाही. ती चव म्हणजे रस्त्यावरच्या गाडीवरच्या भजीची चव. तुम्ही घरी पुन:पुन्हा तळलं जाणारं म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने घातक असं तेल वापरणार नाही, सगळ्या गोष्टी स्वच्छ, नीटनेटक्या असतील. टापटीप हॉटेलात पण समोर सगळं तुम्हाला हवं तसं स्वच्छ, नीटनेटकं असेल. तिथल्या तेलाबद्दल, भजीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाच्या दर्जाबद्दल तुम्हाला अगदी मनापासून खात्री असेल. भजीबरोबर तिथले  वेटर तुम्हाला अगदी सॉस पण देतील. तुम्हाला हवं तसं सॉफिस्टिकेटेड वातावरणही तिथे असेल. पण खमंग भजी खाल्ल्याचा आनंद तुम्हाला रस्त्यावरचा गाडीवालाच किंवा टपरीवालाच देणार.

खरंतर ते उलटं समीकरण आहे. ती गाडी किंवा टपरी जितकी कळकट्ट तितकी भजी खमंग. कांदा, तिखट-मीठ-हळद याशिवाय काय घालतात त्या सगळ्या पिठात काय माहीत, पण खमंगपणाचं वरदानच घेऊन आलेले असतात, रस्त्यावरचे गाडीवाले.

त्यांच्याकडे आणखी एक जादूची कांडी असते बहुतेक. महिनोनमहिने खोकल्याने हैराण झालेला एखादा महाभाग एखाद्या दिवशी जाम वैतागतो. भरपूर औषधं खाऊन-पिऊन झालेली असतात, सगळ्या पथ्यांचा वीट आलेला असतो, सगळं जग खाण्यापिण्यात मग्न असताना त्याला मात्र खोकल्याच्या नावाखाली अनेक गोष्टींवर पाणी सोडून द्यावं लागत असतं. खोकून खोकून दमला-भागलेला तो जीव रस्त्यावरून जात असताना त्याला कुठून तरी भज्यांचा बेसुमार खमंग वास येतो. अचानक त्याच्यामधली बंडखोरी उसळी मारून वर येते. मरू दे खोकला, मरू दे पथ्यं, मरू दे औषधं असं म्हणत तो सरळ जातो आणि त्या कळकट्ट गाडीवरच्या कळकट्ट कढईतल्या पुन:पुन्हा तळल्यामुळे कळकटलेल्या तेलातल्या भजी चांगल्या दोन प्लेट हाणतो. त्या भजीतलं तेल पिळून काढलं तर एखाद्या घरातली दोन दिवसाची भाजी होईल इतक्या जाम तेलकट असतात त्या भजी. तरीही सगळ्या पथ्यांवर मनातल्या मनात आसूड ओढत जाम आसुरी आनंद तो त्या भजी खाताना उपभोगतो. डोळ्यात पाणी आलं आणि जिभेला जाम चटका बसला तरी तो सोबतच्या हिरव्या मिरच्या चापतो. त्या चटक्यावर उतारा म्हणून हा हू करत त्या गाडीवरचाच चांगला दोन कप गरमागरम चहा ढोसतो आणि समाधानाने घरचा रस्ता धरतो. इतक्या दिवसांच्या पथ्यातून झालेला तेलाचा, खमंगटमंग खाण्याचा बॅकलॉग भरून काढल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर तरळत असतं. औषधपाणी घेतलं, सगळी पथ्यं पाळली, इतकं सगळं करून थांबत नाही ना खोकला, मग आता हवं ते खाऊनपिऊन तरी खोकतो, असंच त्याचं म्हणणं असतं. आणि धमाल म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचा खोकला बाजूला काढून ठेवल्यासारखा थांबलेला असतो. भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते कळकट, तेलकट गाडीवरच्या भजीने केलेलं असतं. वर ‘अरे असाच काटय़ाने काटा निघतो कधीकधी,’ असं घरातली एखादी अनुभवी आजी सांगते. हा अघोरी उपाय खोकल्यावर कधी कधी कामी आल्याचं काही जण सांगतात. पण करून बघायचाच असेल तर ज्याने त्याने तो आपापल्या जबाबदारीवर करून बघावा.

तर अशी ही भजी किंवा अगदी लोकभाषेत भजं. जे आपल्याला खायला आवडतं, पण व्हायला आवडत नाही. भज्यासारख्या सुंदर, टेस्टी, सहसा न बिघडणाऱ्या पदार्थाचा फजिती किंवा पचका होण्याशी संबंध का आणि कसा जोडला गेला आहे, समजत नाही. पण भजी हा मराठी माणसाचा फार जुना पदार्थ आहे हे मात्र खरं. लीळाचरित्र हा तेराव्या शतकातला ग्रंथ मराठीतल्या आद्य ग्रंथांपकी एक. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या लीळा म्हणजेच आठवणी या ग्रंथात त्यांच्या शिष्याने, म्हाईंभटाने संकलित, संपादित करून ठेवल्या आहेत. त्यातल्या एका आठवणीत म्हणे असा उल्लेख आहे की चक्रधरांनी आपल्या शिष्याला एक भजी फेकून मारली. आता अन्न फेकणं, शिष्याशी असं वागणं हे आताच्या काळात कुणाला खटकणारंही असू शकतं. पण इथे लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे त्या काळातही म्हणजे तेराव्या शतकातही भजी खाल्ली जात होती. याचा अर्थ त्याही बराच काळ आधीपासून भजी करणं, खाणं माहीत होतं. भजी हा आपला मराठी माणसाचा आवडता पदार्थ आहे याचा हा शेकडो वर्ष आधीचा पुरावाच म्हणायचा.

खरंच काय अफलातून पदार्थ आहे भजी हा. विशिष्ट पीठ, विशिष्ट पद्धतीने पाण्यात भिजवून तेलात तळलं की एक चविष्ट रसायन तयार होईल हे कसं लक्षात आलं असेल? सगळ्यात पहिल्यांदा अशी भजी कुणी केली असतील? सगळ्यात पहिल्यांदा ती कुणी खाल्ली असतील? पहिली भजी तोंडात टाकल्यावर ‘वाह’ किंवा तत्सम पहिलीवहिली दाद कुणी दिली असेल?

Story img Loader