मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरची गर्दीची ठिकाणं म्हणजे फूड मॉल्स. गाडय़ांना विश्रांती देण्यासाठी मंडळी इथे थांबतात आणि पोटोबांची पूजा होते. एक्स्प्रेस वेचंच उदाहरण कशाला, अशा बहुतेक सगळ्याच प्रवासांतली वाटेतली खाण्याची काही ठिकाणं हटकून थांबायला लावणारी. कुठला वडा फेमस तर कुठली मिसळ तोंडाला पाणी आणणारी. कुठे चहा कडक तर कुठली भजी फर्मास. साताऱ्याला गेल्यावर जसं कंदी पेढय़ांशिवाय परतायचं नाही, सोलापूरची शेंगा चटणी विसरायची नाही तशीच ही अधली-मधली ठिकाणंही. जातीच्या फिरस्त्यांना तर  कुठल्या एसटी स्टॅण्डचा उपमा फर्स्ट क्लास मिळतो, कुठल्या एसटी स्टॅण्डवर पोहे खाल्लेच पाहिजेत असे असतात हे झोपेतसुद्धा सांगता येतं.

या जातीच्या फिरस्त्यांमध्ये कामासाठी फिरणारे असतात तसे डोंगर भटकेही असतात. त्यांची भटकायला जाण्याची, खाण्यापिण्याची ठिकाणं ठरलेली असतात. पण एकदा डोंगरात शिरल्यावर काही नाही मिळालं तर म्हणून शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाण्याचे लाडू, खजुराच्या पोळ्या, गूळपोळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वडय़ा हा त्यांचा हक्काचा आधार असतो पोटाचा. शिवाय डाळ-तांदळाचा शिधा सोबत नेऊन तीन दगडांची चूल मांडून त्यांची फर्मास खिचडी रात्रीच्या गप्पांसोबत रंगते. याच खिचडचीत सोबत नेलेले कांदे-बटाटे टाकून तिला आणखी ‘न्यूट्रिशनल’ करता येतं. शिवाय मॅगीताई तर कुठेही तत्परतेने मदतीला येतातच.

रस्त्यावरची फूडमॉल्ससारखी चकचकीत महागडी ठिकाणं, सुप्रसिद्ध अशी वाटेतली हॉटेल्स खिशालाही तेवढीच भारी पडतात. तो खर्च वाचवायचा म्हणून किंवा काहीजणांना पोटाला झेपत नाही म्हणून प्रवासात घरून जेवण बांधून नेलं जातं. सकाळी निघून संध्याकाळी पोहोचायचं असेल तर चपात्या किंवा भाकरी, सोबतीला कोरडा झुणका, एखादी झकास चटणी किंवा ठेचा, त्याच्याबरोबर कांदा घेतला की मस्त जेवण होतं. सात- आठ तास हा झुणका टिकतोही चांगला. ते शक्य नसेल तर कोरडय़ा चटणीत तेल घालून नेलं की चपाती-भाकरी आणि तेल-चटणी असं पटकन, पोटभरीचं आणि स्वस्त आणि मस्त जेवण होतं. अगदीच हे असं सगळं साग्रसंगीत जमणार नसेल तर पोळ्या किंवा भाकरी बांधून घेतल्या आणि वाटेत दोन बटाटेवडे घेतले तरी मस्त पोट भरतं. एक-दोन दिवस नुसते प्रवासातच जाणार आहेत अशा वेळी चक्क भरताची वांगी भाजून गार करून सोलून, तशीच सोबत नेतात. जेवायच्या वेळी त्यात बरोबर नेलेलं तिखट, मीठ किंवा चक्क शेंगदाण्याची किंवा लसणाची चटणी मिसळतात आणि बरोबर नेलेल्या भाकरी किंवा चपातीबरोबर या वांग्याच्या भरताचा फक्कड बेत जमतो.

भातखाल्ल्याशिवाय काही जणांना पोट भरल्याचं समाधानच मिळत नाही. सकाळी निघून संध्याकाळी पोचणार किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पोचणार असा प्रवास असेल तर अशांसाठी कर्नाटकी दही बुत्तीचा मस्त पर्याय असतो. त्यासाठी निघायच्या दोनेक तास आधी एकदा छान मऊ भात शिजवून घ्यायचा. तो ताटात पसरून गार होऊ द्यायचा. पाच -दहा मिनिटांत तो होतोही गार, मग त्यात तूप, मीठ घालायचं. तो छान कुस्करून कालवून घ्यायचा. तो एकजीव झाला की त्यात भरपूर कोमट दूध सायीसकट घालायचं. विरजणाला घालतो तेवढंच चमचाभर दही घालायचं, मीठ घालायचं आणि तो भात चांगला कालवून, न्यायच्या डब्यात भरून पॅकबंद करून ठेवायचा. दुपारी जेवायच्या वेळेला तो छान थंडगार झालेला असतो. कोमट दूध घालून त्यात चमचाभर दही घातलेलं असल्यामुळे ते छान विरजलेलं असतं. या दहीभाताबरोबर पिठल्याची एखादी वडी किंवा आंब्याच्या लोणच्याची एखादी फोड असेल तर प्रवासातलं ते जेवण कोणत्याही फूड मॉलमधल्या यच्चयावत सगळ्या पदार्थाच्या तोंडात मारणारं ठरतं.

प्रवासात हमखास साथ देणारा खात्रीचा पदार्थ म्हणजे वेगवेगळे पराठे, थालपीठं. मेथीचे, पालकाचे, कोथिंबीरीचे पराठे किंवा थालपीठं चांगली दोन-तीन दिवस टिकतात आणि चटणी-लोणच्याबरोबर चवीची आणि पोटभरीची ठरतात. चपाती आणि भाकरीही पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करून करतात तेव्हा त्यांना दशमी असं म्हणतात. या दशम्या नेहमीपेक्षा जास्त दिवस टिकतात असं मानलं जातं. त्यामुळे पूर्वी प्रवासात दशम्या बांधून न्यायची पद्धत होती.

चपाती भाजी असं वेगवेगळं न नेता चपात्यांना भरपूर तूप लावून त्यावर चटणी भुरभुरून त्यांचा रोल करून ते रोल डब्यात भरून न्यायचे आणि भूक लागेल तेव्हा खायचे असंही कुणाला आवडतं तर तुपाच्या ऐवजी चटणी आणि तेल किंवा तूप-साखरेचा रोल प्रवासात पोटाला आधार देतो. चपातीबरोबर एक-दोन केळी खाणं हासुद्धा अनेकांचा प्रवासातला आवडता आहार असतो.

भरपूर हॉटेलं उपलब्ध असणं, बाहेर खाण्याची सवय असणं हे नव्हतं त्या वेळी तर प्रवासाला जाणाऱ्या माणसाला लाडू, चिवडा बांधून घ्यायची पद्धत होती. घरी केलेले रव्याचे किंवा बेसनाचे लाडू आणि घरीच केलेल्या चिवडय़ावर मोठमोठे प्रवास व्हायचे.

प्रवासातलं खाणं म्हटल्यावर पूर्वीच्या अनेकांना हमखास आठवतात त्या शाळेतल्या पिकनिक. मुळात रोजच्या रुटीनमधून काहीतरी वेगळं घडणं, आपला परिसर सोडून आपल्या सवंगडय़ांबरोबर कुठेतरी जाणं हाच एवढा मोठा आनंद असायचा. बहुतांश शाळांना एसटीच्या लाल डब्याच्या गाडय़ा भाडय़ाने मिळायच्या. कुठल्याच शाळेचं पिकनिकचं ठिकाण फार लांब नसायचं. तिथे गेल्यावर खेळ, गप्पागोष्टी, गाणी हे सगळं झालं की भुकेलेल्या सगळ्यांचे डबे उघडले जायचे आणि डब्यात असायची उकडलेल्या बटाटय़ांची पिवळी धम्मक भाजी, पुऱ्या आणि शिरा..

शाळेच्या पिकनिकला जायचं म्हणजे हाच मेनू! तो कसा आणि का ठरला होता कोण जाणे, पण त्यामुळे अनेकांच्या प्रवासाच्या आठवणी या मेनूशी निगडित आहेत हे मात्र खरं!
वैशाली चिटणीस

response.lokprabha@expressindia.com

Story img Loader