उपवास खरं तर दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे निर्जळी आणि दुसरा एकादशी दुप्पट खाशी प्रकारातला. आपण कुठल्या प्रकारात बसतो हे उपवास करणाऱ्या ज्याने त्याने ठरवावं. तरीही अगदी पाणी न पिता उपवास करणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे निर्जळी उपवास करणाऱ्यांना या चच्रेतून थोडं बाजूला काढून ठेवू या. एरवी उपवासाच्या खाद्यपदार्थामधली राणी म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा किती भयंकर पद्धतीने तयार केला जातो याची एक पोस्ट व्हॉट्स अॅपवर नेहमी फिरत असते. पण साबुदाण्याची खिचडी आवडत असेल तर दृष्टीआड सृष्टी हा नियम लागू करायचा आणि तयारीला लागायचं. खिचडीची सगळ्यात पहिली तयारी म्हणजे शेंगदाण्याचं कूट. खिचडी पांढरीशुभ्र हवी असेल तर दाण्याचं कूट पांढरंशुभ्र हवं. त्यासाठी दाणे अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचे. गार झाल्यावर त्यांची सगळी सालं काढून टाकायची. या कामाचा जाम कंटाळा येणं साहजिक आहे. पण अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता तसं आपल्याला पांढरीशुभ्र खिचडी दिसत असेल तर तेवढं करायलाच हवं. आता हे दाणे मिक्सरमधून बारीक करायचे. पण ते बारीक करताना मिक्सर भस्सकन लावला फिरवला की झालं असं अजिबातच करायचं नाही. तसं केलं तर अगदी अध्र्या मिनिटातही त्या कुटाचा गच्च गोळा तयार होतो आणि मग उपवासाला साबुदाण्याच्या खमंग खिचडी ऐवजी दाण्याचा लाडू खायची वेळ येते. त्यामुळे मिक्सरमध्ये दाणे घातल्यावर मिक्सर सुरू करताना बटण अर्धा सेकंद फिरवायचं, पॉझ घ्यायचा, असं दोन-तीन वेळा केलं की मिक्सर उघडून बघायचा. आपल्याला दाण्याचा कूट करायचाय पण तो एकदम गुळगुळीत नकोय, भरडसर हवाय. मिक्सर असा अर्धवट फिरवला की हवा तसा भरडसर कूट मिळतोच. तो खिचडीमध्ये दाताखाली येतो तेव्हा चावून खाताना खिचडीची मजा आणखी वाढते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा