मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये लेफ्ट ओव्हर फूड फेस्टिव्हल असतं. इंग्लिश नाव आणि त्याला फेस्टिव्हल वगैरे शब्द जोडला की काही तरी भारी वाटू शकतं. पण खरं तर ती असते आपली शिळ्याची सप्तमीच. आज नाश्त्याला काय आहे या प्रश्नावर आईने किंवा बायकोने ‘फ्राइड राइस विथ क्रिस्पी ओनियन अ‍ॅण्ड क्रंची ग्राऊंडनट्स, आल्सो डेकोरेटेड विथ कोरिएंडर अ‍ॅण्ड कोकोनट क्रश अ‍ॅण्ड स्प्रिंकल्ड लेमन’, असं टेचात सांगितलं आणि समोर फोभा आणून ठेवला तर कसं होईल तसंच असतं ते.

फोभा अर्थात फोडणीचा भात हा घराघरांमधला फेवरेट आणि तितकाच अटळ नाश्ता. घरी पूर्वसूचना न देता बाहेर काही तरी हादडून आल्यावर उरलेल्या भाताचं आता काय करू, डोक्यावर थापू का, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फोभा. दुसऱ्या दिवशी तो आणखी मोकळा, सडसडीत होतो आणि भरपूर हिंग घालून केलेल्या फोडणीत खमंग लागतो. जोडीला लाल तिखट घाला किंवा हिरवी मिरची घाला, कांदा-कोथिंबीर-शेंगदाणे घाला किंवा घालू नका, (काही जण त्यात मेतकूटही घालतात) रात्रीचं बाहेर खाल्लेलं सगळं जिरलेलं असतं, नव्या दिवसाची नवी कडकडीत भूक लागलेली असते, आपल्यामुळे उरलेला भात संपवण्याची नैतिक जबाबदारीही असते, अशा वेळी फोडणीच्या चविष्ट भाताने दिवसाची दमदार सुरुवात होते म्हणून अनेकांचा तो फेवरेट नाश्ता असतो. याउप्पर वेळ असेल तर याच उरलेल्या भातात वेगवेगळी पिठं आणि कांदा-कोथिंबीर किंवा मेथी-पालक अशा भाज्या घालून थालिपिठंही लावली जातात. किंवा त्या भातात अशीच पिठं मिसळून त्याचे वडेही तळले जातात.

फोडणीच्या भाताची आणखी भावंडं म्हणजे फोडणीची पोळी, फोडणीची भाकरी. अशाच वेगवेगळ्या कारणांनी रात्री उरलेल्या पोळी-भाकरीचा चुरा करून कांदा-कोथिंबीर घालून फोडणीची पोळी किंवा भाकरी होते. पण खूप जणांना रात्रीची उरलेली पोळी चहाबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर रोल करून किंवा तव्यावर तूप लावून कुरकुरीत करून खायलाही आवडते. शिळ्या पोळ्या चुरून त्या कुस्कऱ्याचा गोड लाडू हासुद्धा नाश्ता म्हणून एकदम उत्तम. कढईत थोडंसं तूप घालून त्यात चिरलेला गूळ किंचित गरम करून घ्यायचा. त्यात हा पोळीचा चुरा घालून जराशी वेलचीपूड किंवा जायफळ पूड भुरभुरली की त्याला छान स्वादही येतो. त्याआधी त्याच कढईत तेल किंवा तूप घालून जाड पोहे तळून घ्यायचे आणि ते बाजूला काढून ठेवून नंतर पोळीचा चुरा आणि गुळाच्या मिश्रणात घातले तर हे लाडू आणखीनच टेस्टी होतात. तसंच भाकरीचंही रात्रीची भाकरी, शेगदाण्याची झक्कास चटणी-दही किंवा कुस्करलेल्या भाकरीचा दही-दूध किंवा ताकात चुरा करून तो तसाच किंवा कढीपत्त्याची फोडणी देऊन काला केला की दमदार नाश्ता होतो.

आदल्या दिवशीची साबुदाण्याची खिचडी काही कारणाने उरली असेल तर तिच्यात चक्क कांदा आणि वेगवेगळी पिठं घालून केलेली थालिपीठं एखादी सकाळ खमंग करतात. अर्थात ही थालिपिठं फक्त उरलेल्या साबुदाण्याच्या खिचडीचीच होतात असं नाही तर ती कशाचीही होऊ शकतात. रात्रीचं वरण किंवा आमटी उरलीय, घाला पिठांची भर आणि करा थालिपिठं. आदल्या दिवशीच्या मेथी किंवा पालकासारख्या भाज्या उरल्यात करा थालिपिठं. भाज्यांच्या बाबतीत आणखी एक चांगला पर्याय असतो तो पराठय़ांचा. उरलेल्या पालेभाज्यांमध्ये वेगवेगळी पिठं, जास्तीचं तिखट-मीठ, लसूण घालून पराठे केले, बटरमध्ये घोळवले की हातोहत संपतात. पावभाजी उरली तरी सहसा चिंता नसते कारण ती शिळी झाल्यावरही चांगलीच लागते. पण तिच्यातही पिठं मिसळून केलेले पराठे दाद मिळवून जातात. एवढंच कशाला आदल्या दिवशीचा बटाटय़ाचा किंवा वांग्याचा रस्सा, भरली वांग्याची भाजी दुसऱ्या दिवशी खायला कुणी तयार नसतं, पण याच भाज्या मिक्सरमध्ये फिरवून पिठं मिसळून पराठे किंवा थालिपिठं म्हणून समोर येतात तेव्हा त्यांना सहसा नकार मिळत नाही. उकडलेल्या बटाटय़ांची भाजी उरली की नंतर कुणी खाणार नाही, याची खात्री असेल तर ती कुस्करून चक्क बटाटेवडे किंवा कटलेट्स केले की कुणाकडूनही नकार मिळण्याची सुतराम शक्यता नसते. अगदी उरलेल्या वांग्याच्या भरितामध्ये पिठं मिसळून केलेले पराठे किंवा थालिपिठंही वेळ मारून नेतात.

शिळं खाऊ नये हे वैज्ञानिकदृष्टय़ा बरोबर असलं तरी अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याने घेतलेले कष्ट, ते शिजवण्यासाठी आपण घेतलेले कष्ट आणि महागाई हे तीन घटक गृहिणींना ते अन्न फेकून देण्यापासून परावृत्त करतात. त्यामुळे काही तरी उरलं आणि ते कुणी खाणार नाही हे माहीत असेल तर त्यात कशाची तरी भर घालून काही तरी नवं करायचं हे प्रयोग घरोघरी सुरू असतात. कधी कधी तर असं होतं की मूळ पदार्थापेक्षा प्रायोगिक पातळीवर केला गेलेला नवा पदार्थच जास्त भाव खाऊन जातो.

मटकीची किंवा कुठलीही उसळ उरली असेल तर कांद्याची फोडणी देऊन केलेले मिसळीचा कट, फरसाण, कांदा, कोथ्िंाबीर, शेवचिवडा, लिंबू, ब्रेड असा सगळा सरंजाम केला तर मिसळीचा फक्कड बेत जमतो आणि उरलेली उसळ हा त्याचा पाया आहे, हे कुणाच्या लक्षातही येत नाही.

तसंच इडल्यांचंही. इडली एके इडली खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी शिल्लकच राहतात. आता सगळ्यांना त्या इडल्यांकडे बघायचाही कंटाळा आलेला असतो. अशा वेळी इडलीफ्राय हा एकदम उत्तम पर्याय ठरतो. इडलीचे चार किंवा सहा एकसारखे तुकडे करायचे. ते तेलात चांगले परतायचे. हवं तर इडल्या फ्राय करण्याआधी कांद्याचे, सिमला मिरचीचे, मोठेमोठे तुकडेही अर्धवट परतून घ्यायचे. इडल्या परतून झाल्या की मग बाजूने लोणी सोडायचं आणि कर्नाटकी चटणीपूड किंवा घरात असलेली शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी, मीठ भुरभुरायचं. जास्त तिखट हवं असेल तर लाल तिखटही घालायला हरकत नाही. हव्या त्या सॉसबरोबर, शेजवान चटणीबरोबर किंवा अगदी नेहमीच्या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर ही इडली फ्राय मस्त लागते.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader