राजकारणात डावे, उजवे असतात तसे जेवणाच्या ताटातही असतात. विशेषत: ब्राह्मणी पद्धतीच्या जेवणात डाव्याउजव्याला फार महत्त्व असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कुठले पदार्थ कुठे वाढायचे, हे शास्त्र म्हणून ठरलेलं असतं. म्हणजे भाज्या उजवीकडेच वाढायच्या, चटण्या कोशिंबिरी, पापड-लोणचं हे डावीकडेच वाढायचं. त्यामुळे या लेखाच्या शीर्षकातले ‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. कुणाला सहज जेवायला या म्हणताना ‘या गरिबाघरची चटणीभाकरी खायला’ असं म्हणण्याची प्रथा आहे. असं म्हणून कुणी आलंच तर अगदी चटणीभाकरी खायला घातली जात नसली तर आयत्या वेळेला कुणाच्याही घरात ती असतेच एवढाच त्याचा अर्थ. तरीही मराठी घरात सहसा असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी. यातही पहिल्या तीन चटण्यांमध्ये लसूण घालून आणि लसणाशिवाय असे दोन पर्याय असतात. उपवासवाली मंडळी त्या दिवशीच्या जेवणात सहसा लसूण खात नाहीत. त्यामुळे लसणाशिवायची चटणीही तेवढीच महत्त्वाची. पण चटणी म्हटलं की कुणाच्याही जिभेला तिखटाचा झणका आणि लसणीचा खमंगपणाच आठवतो. आजकाल घरोघरी मिक्सर असले आणि सगळ्या वाटण्याघाटण्यासाठी त्यांचाच वापर होत असला तरी एकेकाळी चटण्या खलबत्त्यात कुटूनच केल्या जायच्या. खलबत्त्यात कुटून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सरमध्ये भरडून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी यांच्या चवीत जमीनअस्मानाचा फरक पडतो. खलबत्त्यात कुटली जाताना ती एकसारखी कुटली जात नाही. त्यामुळे शेंगदाण्याचे लहानमोठे तुकडे होतात. तर मिक्सरमध्ये ती सगळी एकसारखीच वाटली किंवा भरडली जाते. हीच गोष्ट सुक्या खोबऱ्याच्या चटणीची, तिळाच्या चटणीची आणि कारळाच्या चटणीचीसुद्धा. कुटले जात असताना या चारही घटकांना आपोआपच तेल सुटतं. ते हा चवीतला फरक आणत असावं. मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे, तिळाचे, कारळाचे दाणे एकसारखेच गुळगुळीत होऊन जात असल्यामुळे हवी ती खमंग चव येत नसावी. पण आता घरं उभी वाढत गेल्यावर खालच्या मजल्यावरच्या लोकांना आपल्या कुटण्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आणि मिक्सरने जगणं सोपं केलं आहे म्हणूनही खलबत्ता हा प्रकारच नामशेष झाला आहे.
ताटातले डावे
ब्राह्मणी पद्धतीच्या जेवणात डाव्याउजव्याला फार महत्त्व असतं.
Written by वैशाली चिटणीस
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2016 at 01:16 IST
मराठीतील सर्व पोटपूजा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Method of food serving