चटण्या-कोशिंबिरींपाठोपाठ ताटात मान असतो तळणाला. आवडीने खाणाऱ्यांच्या जिभेवर मात्र तळणाला पहिला मान. ताटात तळण वाढल्याबरोबर उचलून पटकन तोंडात टाकलं गेलं नाही असं होतंच नाही. मग ते पापड असोत, कुरडया असोत की भज्यांसारखं काही. त्यांचा कुरकुरीतपणा, चटपटीतपणा, जिभेवर ठेवल्यावर विरघळल्यासारखं मऊ पडत जाणं, ते खाताना होणारा कुर्रम् कुर्रम हा आवाज हे सगळं इतकं हवंहवंसं असतं की विचारू नका. असं असलं तरी ते तोंडी लावणं आहे. त्यामुळे तोंडी लावणं म्हणूनच खायला हवं. अर्थात ही मर्यादा घालण्याचं काम आजकालच्या तेल, साखर, मीठ प्रमाणात खा या आरोग्यसल्ल्याने केलेलं आहेच. तरीही तळणाचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही, हेही तितकंच खरं.

कुठेही मिळणारा, सहसा सगळ्यांना आवडणारा पापड म्हणजे उडदाचा. त्यात आणखी वैविध्य हवं असेल तर उडदाचा लसूण पापड, लसूण मिरची पापड किंवा लाल तिखट घालून केलेला पापड, हे काहीही नसलेला उडदाचा साधा पापड तळून समोर आला की त्याचा तुकडा मोडावा असं वाटल्याशिवाय राहातच नाही. पूर्वी घरोघरी केले जाणारे हे पापड विकत आणून खायची सवय लावली ती लिज्जतनं. त्या सवयीमुळे कित्येक भगिनींना घरबसल्या चांगला रोजगारही त्या काळात मिळाला. आता इतरही अनेक ब्रॅण्डचे उडदाचे पापड मिळायला लागले आहेत. नोकरी करणाऱ्यांच्या घरात पापड केले जाणं शक्यच नसतं. पण त्यातल्या आज चाळिशी पार केलेल्यांच्या अनेकांच्या आठवणीत लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आपण कसे पापड लाटले, लाटय़ा कशा खाल्ल्या याच्या आठवणी असणार. पापड लाटल्यानंतर ते वाळवण्याऐवजी तळलेल्या ओल्या पापडांची चवही जिभेवर रेंगाळत असणार. उडदाच्या पापडांइतकेच चवीने खाल्ले जाणारे पापड पोह्य़ांचे. हे पापड उडदासारखे भाजूनसुद्धा खाल्ले जातात, पण ते तळूनच जास्त चांगले लागतात. त्यांचा किंचित ठसका तोंडाला मस्त चव आणतो. पोह्य़ाच्या पापडांचेच भाऊबंद म्हणजे जिभेला तरतरी आणणारी खमंग मिरगुंडं. ती पण अर्थातच तळावी लागतात. हल्ली मायक्रोवेव्हमुळे नुसता तेलाचा हात लावून बेक करता येतात, पण तळल्याची चव काही या बेकिंगला येत नाही, हेही तितकंच खरं. हे पापड जेवणात तोंडी लावणं म्हणून खा, दहीभाताबरोबर खा, तळलेल्या आख्ख्या पापडावर कांदा, टॉमटो, कोिथबीर, लाल तिखट पसरून मसाला पापड म्हणून खा किंवा अगदी पोह्य-उप्पीटाबरोबर खा, ते खाण्यात मजा आणतात.

kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका

याशिवाय पापडांमध्ये उपवासाला खाल्ले जाणारे बटाटय़ाचे पापड हा एकदम चविष्ट प्रकार. बटाटय़ांमध्ये िशगाडय़ाचं, राजगिऱ्याचं किंवा साबुदाण्याचं पीठ घालून केले जाणारे हे पापड म्हणजे उपवास करणाऱ्यांची चनच. कारण उपवास जर पोटाला आराम द्यायला करायचा असेल असा वजनदार पापड तळून खायचा म्हणजे तो पचवायला उलट पोटाला दुप्पट ताकद लावावी लागत असणार.  नाचणीचा पापडही अनेकांच्या आवडीचा असतो. काळपट दिसणारा आणि तळल्यावर एकदम रंग बदलणारा. चवीला एकदम सुंदर, नाजूक, खुसखुशीत. जैन-मारवाडी लोकांमध्ये खीचा पापड खाल्ला जातो. आपल्या मोठय़ा भाकरी-चपातीपेक्षाही मोठा आणि जाडजूड असा हा एक पापड खाल्ला तरी एखाद्याचं पोट भरेल. तोही तळून खातात, भाजून खातात. आधीच आकाराला मोठा असलेला हा पापड तळला-भाजला की आणखी फुलतो. तो तळला तर ठीक आहे, पण भाजला तर खाताना तोंड दुखायला लागतं एवढा तो जाड असतो. तो नाचणी, कणीक, तांदूळ, बाजरी यांचा वेगवेगळा किंवा यातले दोन-तीन प्रकार एकत्र करूनसुद्धा करतात. मुंबईत काही ठिकाणी खीचा पापडावर कांदा, टोमटो, कोिथबीर पेरून मसाला पापड विकणारे स्टॉल आहेत. एक खीचा पापड खाल्ला तरी पोट पॅक. पुन्हा चारपाच तास तरी बघायला नको.

पापडांखालोखालचा तळणातला प्रकार म्हणजे पापडय़ा. तांदळाच्या, साबुदाण्याच्या, नाचणीच्या. करायला तर एकदम सोप्या. पण ती सगळी उसाभर कोण करणार म्हणून हल्ली या पापडय़ाही विकतच आणल्या जातात. पण खरं तर उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हाताशी धरून करून बघाव्यातच. मुलांचं बालपण समृद्ध होण्याची गॅरंटी आहे त्यात. पापडय़ा करणं हे खरंच चहा करण्याइतकं सोपं आहे. समजा की तांदुळाच्या पापडय़ा करायच्या आहेत. तर आधी हाताशी तांदुळाचं पीठ हवं. उन्हाळ्याच्या एखाद्या सकाळी आठच्या सुमाराला तांदुळाच्या पिठाची पेस्ट करून घ्यायची. सकाळी आठची वेळ ही उन्हासाठी गरजेची. गॅसवर मोठय़ा पातेल्यात पिठाच्या सहापट पाणी उकळत ठेवायचं. पाणी उकळलं की त्यात मीठ घालायचं आणि ती पेस्ट घालायची. ती रटरटून शिजू द्यायची. शिजताना तिच्यात आवडीनुसार जिरे किंवा तीळ घालायचे. नाही घातले तरी चालतात. ती पेस्ट फार घट्ट पण होऊ द्यायची नाही. पळीवाढी झाली की गॅस बंद करायचा. आता जे काही तयार झालं त्याला चीक म्हणतात. हा चीक थोडा थंड होऊ द्यायचा. गच्चीत उन्हात एक मोठं प्लास्टिक पसरायचं. मुलांना हाताशी धरून थोडा थंड झालेल्या या चिकाच्या पळीच्याच आकाराच्या, पातळ आणि  गोलाकार पापडय़ा त्या प्लास्टिकवर घालायच्या. मुलं हे काम अगदी आनंदाने, आवडीने करतात. मग ते सगळं वाळायला ठेवायचं. खूपदा पक्षी किंवा मांजर त्यात तोंड घालायची शक्यता असते. त्यामुळे मुलांनाच सावलीत राखणीला बसवायचं. मुलांना अशी राखण करायलाही फार आवडते. दुपारनंतर या पापडय़ांच्या कडा वाळायला लागतात. तेव्हा पापडय़ा उलटायची वेळ झालेली असते. संध्याकाळी ते प्लास्टिक गोळा करून घरात आणून तसंच ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पसरायचं. तीन दिवसांत पापडय़ा पूर्ण वाळतात. तरी त्या प्लास्टिकमधून गोळा करून ताटात भरून चांगल्या वाळवायच्या आणि डब्यात भरून ठेवून द्यायच्या. वर्षभराची बेगमी झाली. हल्ली नोकरीमुळे हे सगळे प्रकार जमत नसले तरी एखाद्या सुट्टीदिवशी दोघीतिघींनी एकत्र येऊन करायला काहीच हरकत नाही. कारण जास्त खटाटोप पहिल्याच दिवशी करायचा असतो. नंतर वाळवायचं काम सूर्यच करतो. आपण ते फक्त मॅनेज करावं लागतं एवढंच. या पापडय़ाही तादूंळ, बाजरी, नाचणी, साबुदाणा अशा सगळ्याच्या करता येतात. साबुदाण्याच्या करायच्या असतील तर साबुदाणा आदल्या रात्री भिजत घालायला हवा एवढंच.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com