कांद्या बटाटय़ांशी बहुतेकांचा लहानपणी परिचय होतो तो, ते कसे डोक्यात भरलेले आहेत याचा वारंवार शाळेत उल्लेख होतो म्हणून. त्यामुळे का कोण जाणे पण कांदे आणि बटाटय़ांचा मठ्ठपणाशी काही तरी संबंध आहे, असं बहुतेकांना लहानपणापासून वाटत असतं. खरं तर हे दोन्ही प्रकार आपापल्या जागी इतके गुणी आहेत..

पाण्याबद्दल जसं ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ वैसा’ असं म्हणता येतं, अगदी त्याच चालीवर, तसंच बटाटय़ाबद्दलही म्हणता येतं, की ‘आलू तेरी टेस्ट कैसी, जिसमें मिलाओ वैसी’

मुख्य म्हणजे ही गोष्ट शब्दश: खरी आहे. बटाटय़ाचा वापर अगदी कशातही म्हणजे कशातही करता येतो आणि बटाटा आज्ञाधारक मुलासारखा ज्या पदार्थात घालू त्या पदार्थाचा होऊन जातो. लग्नाच्या पारंपरिक जेवणात पिवळ्या धम्मक रंगाची भरपूर कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची घातलेली खमंग बटाटय़ाची भाजी हवीच, पण बफे जेवणाही पंजाबी ग्रेव्हीचं आवरण लपेटून दोन-चार वेगवेगळ्या भाज्यांमधून बटाटा वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यायला आवर्जून उपस्थित असतो.

सणासुदीला, धार्मिक कार्यक्रमांच्या जेवणात बटाटय़ाची भाजी हवीच. नुसती त्याची भाजी म्हटलं तरी तिचे इतके असंख्य प्रकार करता येतात. गोडाधोडाच्या जेवणाच्या ताटात तोंडी लावायला म्हणून उकडलेल्या बटाटय़ात मीठ, मिरची, कोथिंबीर घालून परतून केलेली भाजी, तीच भाजी गरमागरम, कुरकुरीत दोश्याच्या मध्ये बसून येते तेव्हा ती आपलं सात्त्विक रुपडं टाकून कांदा, लसूण, आल्याचा स्वाद लपेटून एकदम खमंग होऊन आलेली असते. हीच उकडलेल्या बटाटय़ाची भाजी उपवासाला खायची असेल तर जिरे घालून केलेल्या तुपाच्या फोडणीत, हिरवी मिरची आणि जरासं दाण्याचं कूट घालून परतली की एकदम, सात्त्विक-राजस होऊन येते.

गंमत म्हणजे या सगळ्या प्रकारातली बटाटय़ाची भाजी हिरवी मिरची घालून केली तर वेगळी लागते, मिरची वाटून लावली तर तिची चव वेगळी आणि लाल तिखट घालून केली की तो झणका वेगळा. आलं-लसणाची पेस्ट बटाटय़ाची चव अशी काही खुलवते की हा तोच का बटाटा असंच वाटावं.

त्याच बटाटय़ाच्या पातळ काचऱ्या करून, पाण्याचा जराही अंश न घालता फोडणी देऊन नुसत्या वाफेवर शिजवल्या, त्यात तेल-तिखट जरासं हात सैल सोडून घातलं की की एकदम चटपटीत, चंट वाटायला लागतात.

बटाटय़ाचा रस्साही तसाच. नुसते कांदे- बटाटे चिरले, फोडणी दिली, पाणी घालून उकळलं, तिखट-मीठ, कांदे लसणाचा मसाला घातला तरी त्या मिश्रणात कांदा-बटाटय़ाची चव उतरते आणि एक साधी पण चवदार भाजी तयार होते. ती आणखी सजवायची असेल तर ओला नारळ, दाण्याचं कूट, तीळकूट, कोथिंबीर, लसूण, इतर मसाले असं सगळं साग्रसंगीत वापरा किंवा यातलं काहीही असेल तेवढं, जमेल तेवढं वापरा, रस्सा झणझणीत झाला की बास.

बटाटय़ाची आणखी एक गंमत म्हणजे त्याला जेवढं स्वत:चं म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं, तेवढंच इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची आस पण असते. नुसता उकडलेला बटाटा किंचित मीठ पेरून खाल्ला तरी तो चविष्ट लागतो आणि मुख्य म्हणजे पोट भरल्याची पटकन जाणीव देण्याचं काम करतो. याच्या अगदी उलट त्याला इतर कशाच्याही बरोबर टाका, तो त्या पदार्थाबरोबरही तितक्याच बेमालूमपणे मिळून मिसळून जातो, त्या पदार्थाचा होऊन जातो.

नुसत्या बटाटय़ाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायचा कंटाळा आला तर त्याची जोडी अगदी कुणाच्याबरोबर जमवा. कांदा-बटाटा-टोमॅटो, बटाटा फ्लॉवर, वांगं बटाटा या अगदी नेहमीच्या भाज्या. त्याच्या जोडीला फ्लॉवर बटाटा सुकी भाजी, कोबीबरोबर बटाटा, सिमला मिरचीबरोबर बटाटा, गवारीबरोबर बटाटा, मेथीबरोबर बटाटा, पालकाबरोबर बटाटा असं त्याचं कुणाबरोबरही जमतं. पावभाजीत तर बटाटा हा मुख्य बेस धरून दहा प्रकारच्या भाज्या सहज मुरून जातात. झालंच तर पोह्य़ात, खिचडीत, पराठय़ात, थालीपिठात, वऱ्याच्या तांदुळात, मसालेभातात, आमटी किंवा वरणात, सांबारात, रायत्यात, दाटपणा द्यायला सूपमध्ये असा कुणाबरोबरही तो अगदी गुण्यागोविंद्याने नांदतो.

उपवासाला नुसत्या राजगिऱ्याचं थालपीठ खायचा कंटाळा आला असेल तर थोडा भिजवलेला साबुदाणा, उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा, दाण्याचं कूट, कोथिंबीर, मिरची घातली की थालपिठाची टेस्ट एकदम बदलते. अगदी नेहमीच्या थालीपिठातही स्मॅश करून घातलेला बटाटा थालीपिठाचा पोत एकदम बदलून टाकतो.

बटाटय़ाच्या नेहमीच्याच चवींचा कधी कंटाळा येत नाही, पण आला असेल तर त्याची एक एकदम साधी रेसिपीही जिभेला तरतरी आणते. त्यासाठी बटाटा उकडून अगदी हलक्या हाताने स्मॅश करून घ्यायचा. त्यात कच्चा कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. लाल तिखट जरा हात सैल सोडून घालायचं. आणि चक्क कच्च तेल घालायचं. हे सगळं मिश्रण हलक्या हाताने मिसळून घ्यायचं. कच्चा कांदा, लाल तिखट, कच्चं तेल आणि उकडलेला बटाटा या सगळ्याची एक भन्नाट टेस्ट तयार होते. हा पदार्थ तुम्ही भाजी म्हणूनही खाऊ शकता किंवा सॅलड म्हणूनही. बटाटय़ाचे पातळ काप करून ते डाळीच्या पिठात घालून तळले की बटाटा भजी आणि तेच काप डाळतांदळाच्या तिखटमीठ घातलेल्या कोरडय़ा पिठात घोळवून फ्राय पॅनवर श्ॉलो फ्राय केले बटाटय़ाचे काप तयार. हे काप वांगं किंवा घोसावळ्याच्या तोंडात मारण्याइतके चविष्ट होतात.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader