अट्टल चहाबाज असतात काही लोक. ते जगाची चहा पिणारे आणि चहा न पिणारे अशीच विभागणी करून टाकतात. चहा पिणाऱ्यांना एकवेळ डीक्लास व्हायची संधी असते. त्यामुळे दोन अशक्य कोटीतली, अशक्य स्तरातली माणसं चहा पिताना किंवा चहा पिण्यासाठी एका पातळीवर येऊ शकतात. चहा पिण्यासाठी मैत्री होऊ शकते. चहा पिता पिता मैत्री होऊ शकते. कधीकाळी एकत्र चहा घेतला म्हणून भविष्यात मैत्री होऊ शकते. एखाद्या जोडीच्या मैत्रीचं वर्णन ‘एका कपात चहा पिणारे’ असं होऊ शकतं. किंवा पुढेमागे त्याच चहाच्या पेल्यातून वादळसुद्धा होऊ शकतं.

चहा पिणारे एक वेळ चहा अजिबात न पिणाऱ्यांना ‘हाय कंबख्त, तूने पीही नही’ असं म्हणून माफ करतील, कारण ते कधी तरी त्यांच्या गोटात येण्याची, चहाबाज बनण्याची शक्यता असते; पण कॉफी पिणाऱ्यांना ते अजिबात वाऱ्यालाही उभं करत नाहीत. त्यांच्या मते एक वेळ चहा पिऊ नका, पण कॉफी ही काय प्यायची गोष्ट असते का? चहावाल्यांचा कॉफीवाल्यांवर असा भलताच राग असतो. त्याचं एक कारण म्हणजे कॉफी पिणारे वर्गभेद करतात, असं त्यांचं लाडकं मत असतं. आता ते किती खरं-खोटं ते ज्याचं त्यालाच माहीत, पण चहाबाजांच्या दुनियेत कॉफीला प्रतिष्ठा नाही, हे मात्र खरं.

चहा पिणाऱ्यांचे परत दोन प्रकार असतात. ज्या क्षणी चहाची तलफ येईल, त्या क्षणी जिथे जसा मिळेल तसा चहा पिणारे आणि दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा हवा असेल तेव्हा, जसा हवा असेल तसाच चहा मिळाला तरच पिणारे. म्हणजेच थोडक्यात खाईन तर तुपाशीवाले. हा गट अर्थातच अल्पसंख्याक असतो. बाकी चहाची तलफ आल्यावर चहा हवाचवाले खूप. मग तो चहा पाणीदार असो की अमृततुल्य.

घरी समोर येणारा चहा रोज तीच पावडर, तेच दूध, तेवढंच प्रमाण असलं तरी इतक्या विविध चवी घेऊन येतो की हॉटेलवाले रोज एकच चव कशी काय देत असतील हा प्रश्न पडावा. शिवाय घरोघरी चहा करण्याच्या किती तऱ्हा. एखाद्या घरी त्या घरातले पहाटे उठणारे आजोबा उठल्या उठल्या सगळ्यांचा चहा बनवतात. आपापली झोप झाली की उठणारे त्याप्रमाणे चहा गरम करून घेतात. त्यातही एखाद्या घरी इतरांसाठी टीकाक्षण (साखर, चहा पावडर वगैरे घालून उकळलेला चहा गाळून दूध न घालता तसाच झाकून ठेवला जातो, त्याला टीकाक्षण म्हणतात.) बाजूला ठेवलं जातं तर एखाद्या घरी सगळा चहाच तयार करून झाकून ठेवला जातो.

काही जण पाण्यात साखर, चहाची पावडर, दूध असं सगळं एकत्र घालून उकळतात आणि गाळून घेतात. काहींना अशा चहाला लागलेला दुधाचा आडवास आवडत नाही. ते पाण्यात साखर, पावडर घालून उकळतात. ते भांडं झाकून बाजूला ठेवतात आणि वेगळ्या भांडय़ात दूध तापवतात. आता आधी उकळून ठेवलेला चहा तिसऱ्या भांडय़ात गाळतात आणि त्यावर दूध घालतात.

चहा उकळायच्या बाबतीतही कडक चहा हवा असतो ते तो जास्त उकळतात; पण ज्यांना चहा कडक नको असतो ते चहाला जेमतेम एकच उकळी देतात आणि गॅसवरून उतरवून लगेच तो झाकून ठेवतात. या झाकलेल्या चहातली पावडर खाली बसली की चहा मुरला असं समजलं जातं.

चहा करण्याची आणखीही एक पद्धत आहे. एका भांडय़ात पाणी उकळायला ठेवायचं. दुसऱ्या भांडय़ात चहा पावडर आणि साखर घालायची. पाणी उकळलं की ज्या भांडय़ात चहा पावडर आणि साखर आहे, त्या भांडय़ात ते उकळतं पाणी घालायचं आणि एक-दोन मिनिटं झाकून ठेवायचं. त्यातच पुन्हा उकळतं दूध घालायचं आणि मग हे सगळं मिश्रण गाळून घ्यायचं.

चहात घालायच्या दुधाची आणखीनच वेगळी गंमत. काही जण सकाळी दूध आलं की ते सगळ्यात पहिल्यांदा इमानेइतबारे तापवून घेतात. मग दिवसभर जेवढय़ा वेळा चहा लागेल, तेवढय़ा वेळा ते तापवलेलं दूध लागेल तेवढं लहान भांडय़ात घेऊन पुन्हा तापवून चहासाठी वापरतात. पूर्वी जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा आलेलं सगळं दूध पहिल्यांदा तापवून ठेवण्याशिवाय पर्यायच नसायचा; पण अशा पुन:पुन्हा तापवलेल्या दुधाच्या चहाला काही मजा येत नाही म्हणून काही ठिकाणी चहासाठी जेवढं लागेल तेवढंच दूध तापवून ती पिशवी फ्रिजमध्ये तशीच ठेवली जाते. संध्याकाळी पुन्हा चहा करताना पिशवीतलं न तापवलेलं निरसं दूध घेऊन तापवून चहा केला जातो. याआधीच तापवून न ठेवलेल्या दूध वापरून केलेल्या चहाला एकदम ताजा स्वाद येतो. असा दिवसभरातला चहा करून झाला की मग पिशवीतलं दूध तापवून ठेवलं जातं.

काही जणांना चहात थेंबभर जरी दूध जास्त पडलं तरी तो चहा न वाटता मिल्कशेक वाटतो. तरतरी येण्यासाठी लालभडक आणि कडक चहा ही त्यांची गरज असते, तर काहींना साखर कणभर जरी जास्त पडली तरी तो चहा न वाटता साखरेचा पाक वाटतो. त्याउलट काहींना चहात पावडर चिमटीभर जास्त पडली तरी लगेच त्या चहाने डोकं दुखायला लागतं किंवा पित्त होतं. या सगळ्यापलीकडे गेलेली ‘जगी सर्व सुखी कोण आहे’, अशी एक जमात असते. त्यांना चहात साखर, पावडर, दूध सगळंच भरपूर हवं असतं. एवढंच नाही तर दूध गरम करताना त्यावर येणारी साय किंवा फेसही त्यांना चहात हवा असतो. असा गोड, दाट चहा मिटक्या मारत पितात ते खरंच जगात कुठेही फेका, न धडपडता ते मांजरीसारखे अलगद चार पायांवर उभे राहतात आणि नीट जगतात.

शहरातून गावात गेल्यावर एखाद्या घरी तुमच्यासमोर चहा येतो आणि पहिला घोट घेतल्यावरच तोंड गुळमिट्ट होऊन जातं. एरवी तुम्ही चहात दोन चमचे साखर घेत असाल तर या चहात किमान चार चमचे साखर असते. ती खरं तर चार चमचे साखर नसतेच. आलेल्या पाहुण्यावर जेवढा जीव जास्त तेवढी साखर जास्त असं ते साधंसोपं आणि झकास प्रमाण असतं.

नेहमीच्या या चहाशिवाय वेलदोडे घालून केलेला चहा, चहाचा मसाला घालून केलेला चहा, पावसाळ्यात आलं घालून केलेला, गवती चहा, मिरी घालून केलेला चहा अशा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वेगवेगळ्या चवी असतात. ग्रीन टी, लेमन टी असे एकदम सॉफिस्टिकेटेड चहा सॉफिस्टिकेटेड लोकांनाच आवडतात. ज्याला त्याला जे आपले वाटतात, अशा मंडळींची फक्कड बैठक जमली आहे. गप्पांना, हास्यविनोदांना अक्षरश: ऊत आला आहे. अशा वेळी जवळच्या चहावाल्याकडे दहा-बारा ग्रीन टीची ऑर्डर गेली आहे, अशी कल्पनासुद्धा करता येत नाही. तिथे फक्कड चहाच हवा. खरोखरच जिवाभावाची मित्रमंडळी असतात तेव्हा कुठलाही पाणचट चहासुद्धा फक्कडच वाटतो ही गोष्ट वेगळी. चहावाल्यांकडे तर कटिंग, स्पेशल, उकाळा, एक साधा आणि एक स्पेशल एकत्र करून मारामारी, खास पुण्यातला अमृततुल्य चहा, बासुंदी चहा अशी भरपूर व्हरायटी असते.

या सगळ्यावर कडी करतो तो काश्मीरमध्ये मिळणारा दोन प्रकारचा चहा. एक म्हणजे नमकीन. हे कुठल्या खाऱ्या पदार्थाचं हिंदी नाव नाहीये, तर नमकीन हा काश्मिरी चहा आहे. तो असतो आपल्या एरवीच्या चहासारखाच, पण त्याच चवीला चिमूटभर मीठ टाकलेलं असतं. हे मीठ त्या चहाची लज्जतच वाढवतं; पण म्हणून आपण इथे चहात चिमूटभर मीठ घालून नमकीन चहा करायचा प्रयत्न केला तर नाहीच जमत. हवा-पाण्याचा परिणाम असेल कदाचित, पण नमकीन प्यावा तर काश्मीरमध्येच आणि तेही एखाद्या काश्मिरी कुटुंबातच. सकाळी सकाळी त्या घरातल्या काश्मिरी काकूंनी जाऊन जवळच्या बेकरीमध्ये जाऊन रोटय़ा आणलेल्या असतात. तिथे रोटय़ा घरी करायची पद्धत नाही, त्या बेकरीतूनच आणल्या जातात. त्या उभट आकाराच्या कडक रोटय़ांना बटर लावून त्या गरम नमकीन चहात बुडवून खायच्या असतात. त्या नमकीन चहात बुडवल्याबरोबर त्यांना लावलेलं बटरही त्या चहात उतरतं आणि तो चहा सॉलिड टेस्टी लागतो.

अर्थात नमकीनपेक्षाही काश्मिरी लोकांची ओळख आहे ती ‘काहवा’साठी. अर्थात कडक चहाची, त्यात दूध असण्याची सवय आणि आवड असलेल्या देशावरच्या अनेक लोकांना कदाचित काहवा आवडणारही नाही. पण खरं सांगायचं तर काहवा हा काश्मिरी चहा नाही, ती काश्मिरी संस्कृती आहे. एरवी चहा म्हणजे पाण्यात चहाची पावडर, साखर, दूध घालून उकळलेला मातकट रंगाचा उत्साहवर्धक द्रवपदार्थ. पण काहवा म्हणजे असा आपण ज्याला चहा म्हणतो तसा चहा नाहीच. त्याला एक काश्मिरी नजाकत आहे. त्याच्या हलक्या सोनेरी रंगातच एक अभिजात आवाहन आहे. त्याच्या रंगात, चवीत एक प्रकारचा तलमपणा आहे. तिथल्या थंडगार हवेत काहव्याचा एक एक घोट घेताना आपल्या मनात जशा काही रेशमाच्या तलम लडी उलगडत जात असतात. केशर, वेलची, बदामाचे काप, अगदी किंचितशी चहाची पावडर आणि किंचितशी साखर हे सगळं योग्य प्रमाणात वापरून केला जाणारा हा  चहा. त्याला चहा कशासाठी म्हणायचं? तो चहा नाहीच. तर तो आहे, सगळ्या जगाने काश्मीरच्या प्रेमात पडण्यासाठीचा काश्मिरी कावा.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader