जून २१ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून गेल्या वर्षी जाहीर झाला. गेल्या वर्षी आणि याही वर्षी सगळीकडे धूमधडाक्यात साजरा झाला आणि सर्वत्र आपापल्या गरजेनुसार ‘योगा’ करण्याचे पेवच फुटले.

वास्तविक, ‘योग’ ही भारताने सर्व जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगाचा संबंध सकल मानव जातीशी आहे, कुठल्याही विशिष्ट धर्मपंथ-समाज यांच्याशी नाही. म्हणूनच त्यावर कुणाची मक्तेदारी किंवा ‘कॉपीराइट’ असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कुठल्याही व्यावहारिक प्राप्तीचा उद्देश समोर न ठेवता ‘परिपूर्ण मानव’ साकारण्याचा मार्ग दाखवणारी, त्याच्या शरीरापासून आत्म्यापर्यंत सर्वामध्ये एकतानता साधणारी ‘योग’ही असाधारण जीवनशैली आहे.

पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यावर योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्यातूनच चेअर योगा, कॉर्पोरेट योगा, योगा बाय बे असे नवनवीन प्रकार जन्माला येऊ लागले आहेत. योगासनं हा या नवीन प्रयोगांचा प्राधान्यक्रम आहे. जणू सर्वाना गुंतवून ठेवते म्हणून पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांचा नाद सोडून ट्वेंटी-२० क्रिकेट सामने खेळवण्यासारखाच प्रकार झाला हा. पण खऱ्या जाणकाराला कला कुठली आणि धंदा कुठला ते बरोब्बर समजते. तोच न्याय योगालाही लागू पडतो.

‘का, योगासनं करणं काही चुकीचं आहे का? आम्हीसुद्धा रोज सकाळी अर्धा तास करतो योगा. एकदम ताजंतवानं वाटतं. आणि आज आसनांमुळेच योगा किती लोकप्रिय झाला आहे. सर्व जग त्यासाठी आपल्याकडे धाव घेत आहे. आणि तुम्हाला त्यात काही तरी गर दिसतं आहे.’

‘त्यात गर काहीच नाही, पण केवळ योगासनं म्हणजे पूर्ण योग नव्हे!’

‘मग? आणखी काय करायचं?’

‘अहो, शरीर, मन आणि त्यापलीकडील आत्मतत्त्व या सर्वामध्ये समन्वय साधणं हा योगाचा उद्देश आहे, केवळ शरीर तंदुरुस्त राखणं हा नव्हे. त्याचं एक सोपं तत्त्व आहे. ज्याच्या ताब्यात मन, त्याच्या ताब्यात जग. आपलं बरोब्बर उलटं असतं, म्हणून आपल्या सर्वानाच आपल्या मनाला योग्य वळण लावण्यासाठी योगाची (केवळ योगासनांची नव्हे) गरज असते.’

‘योगामध्ये योगासनांशिवाय अजून काही आहे?’

‘‘तुम्ही जर पातंजलयोगाबद्दल विचारत असाल तर त्यात यम नियमांपासून समाधीपर्यंत आठ अंगे आहेत. आसन हे त्यातील केवळ एक अंग आहे आणि तेही आपण योगासनांचा जो अर्थ घेतो तसे नव्हेच. आपण जी योगासने करतो ती मुख्यत: हठयोग प्रदीपिकेत विस्ताराने सांगितली आहेत. इतरही अनेक ‘योग’ संकल्पना आहेत. जसे, भगवद्गीतेमध्ये समत्व म्हणजे योग, आपण जे काही काम करतो त्यातील कौशल्य आत्मसात करणे आणि कौशल्याने काम करणे म्हणजे योग, निष्काम कर्मयोग अशा प्रकारे ‘योग’ शब्दाचा अर्थ सांगितला आहे. मात्र, ज्या संस्थांमध्ये ‘योग’ शिकवला जातो, तेथे प्रारंभी नमनाचा जो श्लोक म्हटला जातो, त्यात ऋषी पतंजलींना वंदन केले जाते.

योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य वैद्यकेन

योपाकरोत्ति प्रवरं मुनिनां पतंजली प्रांजली रानतोस्मि

योगाभ्याच्या साहाय्याने मनाची, व्याकरणाच्या साहाय्याने भाषेची, औषधाच्या साहाय्याने शरीराची मलिनता दूर करणाऱ्या, सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ अशा पतंजली मुनींना माझा हात जोडून नमस्कार असो.

हा तो श्लोक आहे. म्हणजे सर्वसामान्यत: योग म्हणजे सर्वाना पातंजलयोग अभिप्रेत असतो व त्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग अशी व्याख्या सांगितली आहे.’’

‘‘जरा सोप्या भाषेत सांगाल का?’’

‘‘आपल्या मनाला आसक्ती, क्लेश, अहंकार, भय, अज्ञान यांपासून कायमस्वरूपी मुक्त ठेवणं म्हणजे योग. मन असं क्लेशमुक्त असेल तर शरीरालाही योग्य वळण लागतं आणि अशाच मनाचं उन्नयन होऊ शकतं.’’

‘‘पण मग या प्रक्रियेत आसनांना काहीच स्थान नाही का?’’

‘‘आहे की! शरीर हे सर्व प्रयत्नांचं साधन आहे. त्यासाठी ते तंदुरुस्त असणं महत्त्वाचं आहे. निरोगी शरीरात निरोगी मन निवास करतं. पण एका प्रश्नाचं उतार द्या. तुम्ही आसनं करण्यात प्रावीण्य मिळवलंत तर तुमचा अहंकार जाईल, अशी खात्री तुम्ही देऊ शकाल का? उलट आपण आसनं अगदी सहजतेने करतो, असा अहंकारही जडू शकतो.  आपण लहान वयापासून काही ठरावीक उपवास करतो. काही जण तर वर्षांनुवष्रे दर आठवडय़ाला उपवास करतात. पण त्यांची सर्वाची अन्नाबद्दलची आसक्ती पूर्ण संपली, असं म्हणता येईल का? तेच जर प्रयत्नांनी मनाची अन्नाबद्दलची आसक्ती कमी केली तर व्यक्तीचा प्रत्येक दिवस उपवासासारखाच होईल. निव्र्यसनी असणं हा आजच्या जगात वाखाणण्यासारखा सद्गुण आहे, पण निव्र्यसनी असण्याचंच व्यसन लागलं किंवा कुणी त्याची शेखी मिरवू लागलं तर तो सद्गुण राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की मनाचं वळण शरीरापर्यंत पोहोचतं, शरीराचं वळण केवळ बाहय़ असतं, ते आतापर्यंत पाझरेलंच असं नाही. पातंजलयोग ही मनाला क्लेशमुक्त करून उन्नयनाच्या वाटेवर नेणारी जीवनशैली आहे. मात्र त्यात शरीराला कमी लेखलेलं नाही, उलट हा प्रगतीचा मार्ग शरीराच्या माध्यमातूनच प्रवास करतो. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य हे परस्परावलंबी आहे. हे सूत्र धरून अष्टांग मार्गाची आखणी केलेली आहे. पाश्चात्त्यांना योगाचं आकर्षण उगाचंच वाटत नाही.’’

‘‘बाप रे! योगाबद्दल इतका विचार कधी केलाच नाही.’’

‘‘अहो, योगशास्त्र वाचलंत तर समजेल की मुनी पतंजली हे आद्य मानसशास्त्रज्ञ होते. मनाची क्लिष्ट गुंतागुंत त्यांनी आपल्यासमोर अचूक उलगडून ठेवली आहे. ‘‘मन सुद्ध तुजं गोष्ट हाये पृथिवीमोलाची’’ हे त्यांनी अचूक जाणलं होतं. तेव्हा चेअर योगा, कॉर्पोरेट योगा या बाहय़ कौशल्यांबरोबरच अथांग योगसमुद्रात स्नान केलं आणि मत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यांच्या मुशीत स्वत:ला घडवलं तर जग हे सदासज्जनांची मांदियाळी व्हायला वेळ लागणार नाही.’’
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader